Friday, November 26, 2010

देवबाप्पा

आस्तिकतेच्या आणि नास्तिकतेच्या मधे असलेल्या अदृष्य रेषेवर माझं मन नेहेमी रेंगाळत असतं. आणि ते फक्त रेंगाळतच नाही, तर चक्क तळ्यात-मळ्यात खेळत असतं! ती रेषा अदृष्य यासाठी की आस्तिक म्हणावं, तर देव आणून दाखवता येत नाही! तो आपल्याच दिसत नाही, तर आणणार कुठून! आणि नास्तिक म्हणावं, तर आपलं विज्ञान अजून एवढं प्रगत नाहीये, की देवाविना मनाच्या कुतूहलाची तहान भागवता येईल!

मला नेहेमी वाटतं की संस्काराच्या नावाखाली आई-बाप त्यांच्या मुलांना गंडवत असतात! म्हणजे, लहानपणी आयुष्याचं अगदी गोजिरं रूप दाखवलं जातं. तेव्हा आयुष्याचे नियमही खूप साधे असतात. ‘चांगलं वागलं, की देवबाप्पा खूश होऊन बक्षीस देतो आणि वाईट वागलं, की देवबाप्पा शिक्षा करतो.’ ‘आपले आजोबा खूप म्हातारे झाले होते की नाही, मग देवबाप्पाने त्यांना बोलवून घेतलं. आता ते देवबाप्पाकडे असतात.’ रोज संध्याकाळी देवापुढे दिवा लावल्यावर ‘शुभम् करोति’ म्हणा, शाळेत अथर्वशीर्ष म्हणा, १२वा,१५वा अध्याय म्हणा, रामरक्षा म्हणा. आपले आई-बाबा आपलं लहानपण अगदी देवबाप्पामय करून टाकतात! देवबाप्पा आपल्याच कुटुंबाचा एक परमोच्च सदस्य असतो. अगदी Highest Authority! आणि वरच्या मजल्यावर जावं तसे आपले आजोबा त्याच्याकडे गेलेले असतात..!

लहान असताना माझा देवावर अगदी विश्वास होता. परीक्षेच्या आधी न चुकता त्याला नमस्कार करून जायचो आणि देवाची आपल्यावर कृपा आहे म्हणूनच आपल्याला पेपर चांगले जातात, असा शाळेतल्या प्रत्येक पोट्या-सोट्यासारखाच माझाही समज होता. रस्त्यावरून जाताना मंदिर दिसलं की नमस्कार करायची मला तेव्हा सवयच लागली होती. एकदा आम्ही गाडीतून परगावी चाललो होतो. त्या प्रवासात एक रस्ता असा होता, की त्याच्या दोन्ही बाजूला तुरळक लोकवस्त्या अधून मधून लागायच्या. लोकवस्ती लागली, की त्यात दर १० सेकंदाला डावीकडे किंवा उजवीकडे एकतरी छोटंसं मंदिर असायचंच. आणि धावत्या गाडीत मी एकही मंदिर चुकू नये म्हणून दोन्हीकडे बघून पटापट नमस्कार करत होतो. अशाच एका मंदिराला मी नमस्कार केला आणि मला थोडीशी शंका आली. म्हणून मी मागे वळून बघितलं तर ते मंदिर नव्हतं, ती मुतारी होती! आणि घाईघाईत चक्क मी त्या मुतारीला नमस्कार केला होता!

जसे जसे आपण मोठे होतो, तसं तसं आपल्याला येड्यात काढलंय हे कळायला लागतं! B.Com, M.Com होऊन बँकेत नोकरी करणारा बाप आपल्या ‘हुशार’ मुलाला Science ला घालून पुढे Engineering ला पाठवतो. आणि विज्ञानाची कास धरलेल्या त्या मुलाच्या मनात, रंगलेली मेंदी जशी हळू हळू विरून जाते, तशी देवबाप्पाची छबी पुसत जाऊन अस्पष्ट होऊ लागते. आणि मनी पसरते ती नास्तिकता... ज्ञानाच्या सक्तीमुळे म्हणा, ज्ञानाच्या अभिमानामुळे म्हणा किंवा गर्वामुळे म्हणा.. आणि मीही ह्याला काही अपवाद नव्हतो.

मी देवाचं नाव घेणं खरं तर शाळेत असतानाच बंद केलं होतं आणि आस्तिकतेतून पूर्ण नास्तिक होऊन सुद्धा माझ्या आयुष्यात अगदी काहीच फरक पडला नाही! ना त्या देवाचा प्रकोप झाला, ना मला काही शिक्षा मिळाली, ना माझं खूप काही वाईट झालं. अगदी खूप काही चांगलं झालं अशातलाही भाग नव्हता. म्हणजे नास्तिक होऊन मला काही फायदाही झाला नाही. ह्याचाच अर्थ, आपला देवावरचा विश्वास हा ‘no profit – no loss’ या तत्वावर काम करतो, हे मला समजलं!

तर जेव्हा ‘देव नाहीच आहे’ आणि ‘Science च खरं रे’ ह्या मताचा मी होतो, तेव्हा गणपतीत आरती झाल्यावर नमस्कार करून डोळे बंद करून मी बाप्पाला म्हणायचो, “हे बघ गण्या, तुला माहितीच आहे, की आता काही माझा तुझ्यावर विश्वास नाहीये. पण मला लहानपणापासून तुला नमस्कार करायची सवय लागलीय म्हणून मी करतोय. मी तुझ्याकडे काही मागत नाही. पण जर का तू खरंच असशील(!), तर या बाकीच्या लोकांनी जे काही मागितलंय ते त्यांना देऊन टाक!’ देवालाच नमस्कार करून त्याच्याशीच गप्पा मारताना त्यालाच म्हणायचं, की ‘तू नाहीच आहेस, मला माहितीय!’ ह्यातला वेडेपणा, निरागसता आणि सौंदर्य कळायला अजून ५-६ वर्षे लागली!

अजून थोडा मोठा झाल्यावर जेव्हा देव आणि धर्म ह्यातला संबंध कळला, आणि ‘धर्म’ ह्या अतिशय फोल गोष्टीवर चाललेला मुर्खपणा समजला तेव्हा तर देवाचा अक्षरशः रागच आला. लोकं टोळक्यांना आणि टोळकी समाजाला जोडली जावीत आणि समस्त मानवजातीचा वेगाने विकास व्हावा म्हणून आपल्या थोर पूर्वजांनी ‘देव’ ही संकल्पना समाजात रुजवली. त्यांचा हेतू चांगलाच होता. फक्त निसर्गाची चूक एवढीच झाली, की एकाचवेळी असे वेगवेगळे दैदिप्यमान नेते जगाच्या वेगवेगळ्या ठिकाणी तिथल्या जनसमुदायाला ‘देव’ म्हणजे काय ते सांगत होते. ते जर तेव्हा एकमेकांना ओळखत असते, telecommunication, transportation तेवढं विकसित असतं, तर कदाचित problem आलाच नसता. पण झालं असं, की त्या प्रत्येक नेत्याने देवाचं एक वेगळं चित्र उभं केलं. त्यातून पुढे ‘तुझा देव खरा का माझा’ किंवा ‘हिंदू खरा, मुसलमान का ख्रिश्चन’ यावरून भांडणं होतील, दंगली होतील, एकमेकांचे गळे कापले जातील, हे त्या बिचाऱ्या साधू-संतांच्या ध्यानी-मनीही नव्हतं. आजही विव्हळत असतील त्यांचे आत्मे.. स्वर्ग असेल तर स्वर्गात आणि जर नसेल तर त्यांच्या शरीराच्या राखेने सुपीक झालेल्या जमिनीतही आज भितीने पिकं येण्यास कचरत असतील..
पण धर्म हा समाजासाठी असतो तर देव हा प्रत्येकासाठी. आज मी अशी बरीच लोकं बघतो, जी धर्मांध मुळीचं नाहीयेत. पण देवावर मात्र त्यांचा विश्वास आहे. ‘देव सहकारी बँकेत’ त्यांची personal accounts आहेत! त्यामुळे देवावरचा राग आता माझा निवळला आहे..

अडीच वर्षांपूर्वी मी इथं अमेरिकेला आलो, आणि मला एका वेगळ्याच देवाने दर्शन दिले! असं म्हणतात एखादी गोष्ट आपल्या आयुष्यातून निघून गेली, की त्याची आपल्याला किंमत कळते. त्याचीच प्रचीती पुन्हा एकदा आली. इकडे पहिल्यावर्षी गणपती आले आणि उत्सवाविनाच निघूनही गेले. गणपतीची ती प्रसन्न मूर्ती नव्हती. छोटासा उंदीर नव्हता. आरास नव्हती. मोदक नव्हते. तबकातला जळणारा तो कापूर नव्हता. आरत्यांचे स्वर नव्हते. ढोल ताशांचे घुमणारे आवाज नव्हते. गुलाल नव्हता आणि लयीत नाचणारी पावलंही नव्हती.. भारतात सगळीकडे उत्सव चालू होता. तिकडे घरी गणपती बसला होता. आईकडून सगळं फोनवर ऐकत होतो. पण काहीच जाणवत नव्हतं. खूप वेळ मांडी घालून बसल्यावर पायाला मुंग्या येऊन जशी बधिरता येते, तसंच काहीसं मनाचं झालं होतं.

दसऱ्याला केशरी-पिवळ्या झेंडूला बहुतेक डोळे शोधत होते. सारखं अस्वस्थ वाटत होतं. आपट्याची पानंही कुठे दिसली नाहीत. माझ्या टेबलवर दहा डॉलरची नोट खूप दिवसांपासून पडून होती. संध्याकाळी सहज ती हातात घेतली. तेव्हा पैशाच्या राक्षसाने दसऱ्याच्याच दिवशी त्याच्या दहा तोंडांसकट मला दर्शन दिल्यासारखं वाटलं!

कोरडी दिवाळी तर मनाला अक्षरशः चटका लावून गेली. दिवाळी माझी सगळ्यात लाडकी. त्यामुळे सगळंच खूप प्रकर्षाने जाणवू लागलं. माझा जन्मही दिवाळीतला. खूप प्रदूषण होतं, हे बुद्धीला कितीही पटत असलं तरी मला फटाक्यांचे आवाज लागतातच! ‘फटाक्यांविना दिवाळी’ वगैरे माझ्या कल्पनेच्याही पलीकडची होती. आता तर मी ते प्रत्यक्ष अनुभवत होतो! साधा एक लवंगी फटाकाही नव्हता हो! डोळ्यांना स्वतःकडे बघायला लावणाऱ्या त्या असंख्य पणत्या नव्हत्या. पणत्या मला नेहेमी ७-८ वर्षांच्या, परकर-पोलकं आणि केसांचा बो घातलेल्या मुलींसारख्या वाटतात. त्या चिमुकल्या तोंडातून, गोड आवाजात सतत बडबड करणाऱ्या.. वारा आला आणि पणत्यांची ज्योत फडफडली, की त्या पोरींची बडबड वाढते! त्या पणत्यांचीही खूप आठवण येत होती. घराबाहेर आकाशकंदील नव्हता. उटणं लावून अभ्यंगस्नान नव्हतं. ओवाळणं नव्हतं की नातेवाईकांना भेटणं नव्हतं... घरून दिवाळीचा फराळ आला होता, पण त्याला दिवाळीपणच नव्हतं. लाडू, चिवडा, चकली, सगळंच छान झालं होतं. पण तेव्हा ते नुसतेच पदार्थ होते. त्याचं फराळत्वच हरवलं होतं..

दुसऱ्या वर्षी ठरवलं की परत असं होऊ द्यायचं नाही. त्या गणपतीत स्वत:हून enjoy करायचा प्रयत्न केला. सगळे मित्र जमलो. जेवणाचा खास बेत केला. एवढंच नाही तर ‘You Tube’ वर गणपतीच्या आरत्या ऐकल्या आणि विसर्जनाला मिरवणुका बघितल्या. दिवाळीत झब्बा-सलवार घालून Indian Student Association च्या cultural program ला गेलो. दिव्यांची माळ आणून घरासमोर लावली. आणि एवढं सगळं करून मग घरून आलेला फराळ खाल्ला.. पण कशाचाच फारसा उपयोग झाला नाही.

‘हे असं सगळं का होतं?’ असा विचार करत असताना अचानक ‘tube’ पेटली आणि एका ‘खऱ्या’ देवाचं दर्शन झालं! गणपतीची आरास, तबकातला कापूर, निरांजन, रंगपंचमीचे रंग, दहीहंडी, आकाशकंदील, मिरवणुकीतला गुलाल, पणत्यांच्या ज्योती, फटाके, नागपंचमीचा तो टोपलीतला नाग आणि पुंगीवाला गारुडी, नंदीबैल, झेंडू, आंब्यांच्या पानांची तोरणं, गुढी, दारातली रांगोळी... यांसारख्या फारसा काही अर्थ नसलेल्या मानवनिर्मित गोष्टी सण किंवा उत्सव कसे उभे करू शकतात? मनामनात उत्साह पेरून आनंदाची हंगामी पिकं कशी आणू शकतात? एवढं सामर्थ्य त्यांच्यात येतं कुठून? याचं एकमेव कारण म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये ओतप्रोत चैतन्य भरलेलं आहे. आणि हाच तो देव!

घरी माझा नीट अभ्यास होत नसला की मी लायब्ररीत जातो. तिथल्या ‘अभ्यासू’ वातावरणात मग माझा चांगला अभ्यास होतो. हे वातातावरण तयार होतं तिकडे अभ्यास करणाऱ्या लोकांमुळे. वातावरण हाच तो देव! आई घरी असली की घरातला उत्साह दुप्पटीने वाढतो. घर जणू बोलकं होतं. हाच तो देव! निसर्गाच्या सान्निध्यातलं शांत वाटणं, शिक्षकांच्या सहवासातलं प्रोत्साहित वाटणं, मित्राच्या सहवासातलं हलकं वाटणं आणि प्रेयसीच्या सहवासातलं तरंगणं... हाच तो देव!

मी विचार केला , समजा आत्ता या क्षणी समस्त मानवजात नष्ट झाली. सगळे प्राणी, वनस्पती, कीटक.. म्हणजे सगळेच सजीव नाहीसे झाले तर काय उरेल? ओसाड कॉंक्रीटचा पसारा उरेल, उजाड जमिनी उरतील आणि इलेक्ट्रोनिक्सचा कचरा उरेल.. सगळं चैतन्य हरपून जाईल.. त्या क्षणासाठी ती पृथ्वीची मृतावस्था असेल..

हा विचार होताच मला संतांच्या शिकवणीचा अर्थ कळला. देव माणसात, निसर्गात कसा असतो, हे उमगलं. मला माझा ‘देवबाप्पा’ भेटला..!

Sunday, September 26, 2010

सोळोळ्या (४ चारोळ्या :) - भाग ६

~~~~~~~~~~~~~~~~
पतंग माझ्या स्वप्नांचा
मुक्त आकाशी बागडतोय
वर्तमानाचा काचेरी मांजा
मात्र रोज हात सोलवतोय
~~~~~~~~~~~~~~~~



~~~~~~~~~~~~~~~~
शून्यातून आलेले आपण
शून्याकडेच जाणार असतो
मधले कोटी श्वास संपताना
तो 'आर्यभट्ट' वरून हसतो
~~~~~~~~~~~~~~~~



~~~~~~~~~~~~~~~~
जळावं तर मेणासारखं
वातीबरोबर वातीसाठी
आधार द्यावा वातीसारखा
मेणामध्ये मेणासाठी
~~~~~~~~~~~~~~~~



~~~~~~~~~~~~~~~~
गहिरे होते आकाश
सांजवेळी संधीप्रकाशी
विरक्तीचा ध्यास उरी
मन मात्र होतं उपाशी
~~~~~~~~~~~~~~~~

Thursday, September 9, 2010

आणि आम्ही Engineer होत आलो...

(हा लेख मी Engineering च्या शेवटच्या वर्षात, अगदी वर्ष सरत आलं असताना, 'Engineer' होऊ घातलो असताना लिहिला होता!)


Engineer काय किंवा Doctor काय, या आपल्या भारतातल्या एक प्रकारच्या जमातीच आहेत..! अशा जमाती, ज्यांच्या वाटयाला फक्त कौतुकच यायचं.. पण आता या जमातींची लोकसंख्या एवढी वाढलीय, की जमातीतल्या लोकांचा अभिमान सोडाच, पण जमातीबाहेरच्या लोकांनाही याचे अप्रूप वाटेनासं झालंय! म्हणजे पूर्वी, ‘माझा मुलगा Engineering करतोय..’ ही एकच बाब कॉलर ताठ करायला पुरेशी होती. पण आता, पुढे तो M.Tech करणार आहे, MBA करणार आहे का MS?... यावर ते सगळं अवलंबून आहे!

‘Engineer’ हा शब्दच मोठा विचित्र वाटतो मला! याची संधी सोडवायला जावं, तर Engineचं ज्ञान असणारा किंवा Engine तयार करणारा तो Engineer अशी होते. पण असं जर असेल तर Civil , Metallurgy किंवा IT मधल्या लोकांना Engineers का म्हणावं असा प्रश्न पडतो! कारण, आम्ही Mech, Prod ची लोकंच Engine बद्दल शिकत असतो (असा समज तरी आहे!). हे जरा विविध धर्मांना समान स्थान असून भारताला ‘हिंदू’स्तान म्हटल्यासारखं झालं! एकात्मता वाढावी, ‘मी एक भारतीय आहे..’ सारखं ‘मी एक Engineer आहे..’ अशी भावना प्रत्येकाच्या मनात रुजावी, या कारणाने ते ‘Engineer’ असं नाव ठेवलं गेलं असावं (इथे ‘नामकरण करणं’ असा अर्थ अपेक्षित आहे, ‘नाव ठेवणं’ नाही!). पूर्वजांचा हेतू चांगलाच असावा.. पण Mechanical पासून Production, Computer पासून IT किंवा Electronics पासून Instrumentation सारख्या branches उदयाला आल्याचे पाहता झारखंड, उत्तरांचलची आठवण आल्याखेरीज राहत नाही!

आम्ही अगदी ‘खरे’ Engineers असलो तरी आम्हा Mechanical, Production वाल्यांना तरी ४ वर्षात Engine ची ओळख कुठे होते सगळी! एका Viva ला आम्हाला विचारलं होतं, ‘4-Stroke, Single Cylinder Engine ला Rocker Arm किती असतात?’ आता ‘Rocker Arm’ हा शब्द मी कधी जन्माच्या कर्मात ऐकला नव्हता! मग विचार केला की उत्तर तयार करूयात! ‘उत्तरं येत नसतील तरी ती तयार करता आली पाहिजेत!’ हे प्रत्येक Engineer न शिकवताच शिकलेला असतो! असा विचार करून मी Engine डोळ्यासमोर आणलं. तरी मला कुठे ते Rocker Arms बघितल्यासारखे वाटत नव्हते. त्या ऐवजी तो WWF चा ‘Rock’ आणि त्याचा तो पिळदार दंडच ‘Rocker Arm’ म्हटल्यावर डोळ्यासमोर यायला लागला! आणि मी तसाच मक्खासारखा चेहेरा करून बसलो..! खरंतर Engineering Viva म्हणजे प्रत्येक Engineer च्या आयुष्यातला एक रोमहर्षक अनुभव! त्या २०-२५ मिनटात एका वेगळ्याच विश्वाची सैर घडू येते! जणू एक नाटकंच चालू असतं! त्या नाटकात External Examiner इनिस्पेक्टर ची भूमिका (इन्स्पेक्टर नाही!), Internal Examiner पांडू हवालदाराची आणि विद्यार्थी आरोपीची भूमिका करत असतो! त्या पांडू हवालदाराला आनंद झालेलं असतो की आपण आरोपीला पकडून साहेबांसमोर उभं केलंय.. इनिसपेक्टर त्याला खोदून खोदून प्रश्न विचारात असतो आणि आरोपी मान खाली घालून त्याचे सगळे आरोप कबुल करत असतो. शेवटी ‘मला काहीही येत नाही, मी बिनडोक आहे!’ असं कबुल केल्यावर इनिसपेक्टर आणि पांडू हसतात आणि मगच त्या आरोपीची सुटका होते! पण मुलगी जेव्हा आरोपी असते, तेव्हा चित्र अगदी वेगळं असतं! ती गोड बोलून अशी काही जादू करते की इनिसपेक्टर आणि पांडू त्यांचे dialogues विसरतात आणि तिला पोतंभर मार्क देऊन टाकतात! आपल्याला शेंडी लावली गेलीय हे त्या बिचार्यांच्या ध्यानीही नसतं...! मुलींना असे आरामात मार्क मिळतात आणि आपल्याला इतका त्रास सहन करावा लागतो, याची माझ्या एका मित्राला एवढी चीड होती की एक दिवस मुलीच्या वेशात viva ला जायचं, असं त्याने ठरवलं होतं! आमच्याकडे viva घ्यायची एक विशिष्ठ पद्धत आहे. एका वेळी तिघांना बसवतात. एकच प्रश्न एका पाठोपाठ एक असा तिघांना विचारला जातो. अशात जर कोणी तिसरा असेल, तर त्याच्यासारखा बिचारा तोच! आधीच्या दोघांनी एकाच प्रश्नाची दोन संपूर्ण वेगळी उत्तरे दिलेली असतात आणि या बिचाऱ्या तिसऱ्याला दोन्ही उत्तरं बरोबर वाटत असतात..! अशावेळी External Examiner पटकन कृष्णाच्या भूमिकेत शिरतो आणि, “तुला माझं लक्षावधी सैन्य हवंय का मी स्वतः!” असं विचारून त्या बिचाऱ्या तिसऱ्याची अवस्था दुर्योधानासारखी करून टाकतो! त्यामुळे ‘जग’ ही रंगभूमी आहे की नाही ठाऊक नाही, पण Engineering आणि मुख्यत्वे ‘Engineering Viva’ ही नक्की एक रंगभूमी आहे, या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलोय आता!

‘Submissions’ हा असाच एक अजब प्रकार! नुसतं हात तुटेपर्यंत लिहायचं. इकडचं तिकडे उतरवायचं आणि Journals पूर्ण करायची ही त्याची थोडक्यात व्याख्या! पण मग हे असं का करायचं असतं याचं उत्तर कधीच कोणाकडे नसतं. Syllabus मधे सांगितलंय, त्यामुळे पास व्हायचं असेल तर ते करायचं, एवढयाच विचाराने प्रत्येक वर्षी पोथ्या भरवल्या जातात. ह्यातून आणि काहीच मिळत नसतं. कृष्णाने गीतेत म्हटलेच आहे, “कर्म करत रहा, फळाची अपेक्षा धरू नका.” आणि आम्ही सगळे Engineers तेव्हा गीता जगत असतो. गेली ४ वर्षे मीसुद्धा नुसता इकडचं तिकडे उतरवतोय.. त्या दिनानाथाची गीता जगतोय..!

ह्या सगळ्या प्रकारामुळे मला एक दिवस खूप गंभीर प्रश्न पडला होता, की ‘आपण Engineer आहोत का Technical कारकून?!’ मला खात्री आहे, हा प्रश्न माझ्यासारख्या प्रत्येक होतकरू Engineerला एकदातरी पडला असणार! पण image आणि ego जपायचा म्हणून प्रत्येकच जण हा टोचणारा काटा हृदयाच्या मखमली पेटीत बंद करून अस्वस्थता अनुभवत असतो.. हे एकमेकांना कधीच सांगितलं जात नाही. दोन Engineers मधलं हे mutual understanding असतं..!

असंच एक न उलगडलेलं कोडं म्हणजे Engineering चे Professors! ‘तुम्ही एकवेळ काहीही शिकवलं नाहीत तरी चालेल, पण विद्यार्थ्यांना त्रास देणं हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो तुम्ही बजावलाच पाहिजे!’ असंच त्यांच्या मनावर जणू बिंबवलं असतं! कदाचित ‘Engineering हे येऱ्यागबाळ्याचं काम नाही. पदोपदी नरकयातना भोगाव्याच लागतात, तरच सिद्धी प्राप्त होते!’ हे सांगण्यासाठीच हा सगळा प्रयत्न असतो! बाहेर हा माणूस अगदी तुमच्या आमच्यासारखाच असतो. पण कॉलेजमधे आल्यावर तो अचानक बदलून जातो! बाहेर रस्त्यात कधी कुठल्या शिक्षकाने आपल्याकडे बघून मंद स्मित केले (Smile दिली!), तर, अनेकवेळा आपल्या sheets वर ‘Redo’ शेरा मारणारा, खंडीभर assignments देणारा, submissions साठी शेवटपर्यंत छळ छळ छळणारा, खुन्नस म्हणून पेपर अवघड काढणारा आणि viva च्या वेळेस External ने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आली नाहीत की हळूच खुनशी हसणारा मनुष्य हाच का असा प्रश्न पडतो..! अशाच एका ‘हिटलर’ professorने रस्त्यात आपणहून दिलेली ओळख बघून मला ही नक्की ‘राम और श्याम’ किंवा ‘कुंभ के मेले मे बिछडे हुए भाई’ ची case आहे असं वाटलं होतं!

यानंतर ज्याची प्रत्येक जण ४ वर्षे आतुरतेने वाट पाहत असतो असा तो Engineers च्या आयुष्यातला सोन्याचा दिवस उजाडतो.. दिवस असतो ‘placements’ चा..! सगळीकडे एकच लगीनघाई सुरु असते! असंख्य काका, मामा आणि ‘family friends’ कडे चौकश्या करून झालेल्या असतात. ‘थोडयाच वर्षात Software ची boom परत येईल..’, ‘पण Core ला काही मरण नाही यार..!’, ‘TCS मधे २ वर्षांच्या bond पेक्षा १ वर्षाच्या bond ची Infy बरी, असं माझ्या ताईचे मिस्टर सांगत होते, जे Wipro मधे आहेत!!’ अशी वाक्ये या काळात सगळीकडे सर्रास ऐकू येतात.. त्या दिवशी सगळेजण कडक इस्त्रीच्या स्वच्छ कपडयात असतात आणि मागच्या खिशातल्या कंगव्याने सारखा भंग पाडत असतात..! मधेच polish केलेल्या बुटांवर बसलेली धूळ पाय वर करून pant च्या मागे पुसत असतात.. ‘मी किती cool आहे’ हे दाखवण्याचा प्रत्येकच जण अयशस्वी प्रयत्न करत असतो! कारण प्रत्येकालाच चिंता असते आपल्या placement ची, आपल्या भवितव्याची!

दिवस जेव्हा सरतो तेव्हा आम्हा Engineers च्या चेहेऱ्यावरून निकाल ओळखणे सोपे असते. आमच्यातले काही लोक उडया मारत असतात, काही भावूक होऊन आईशी फोनवर बोलताना दिसतात. तिची स्वप्ने पूर्ण केलेली असतात ना त्यांनी! अगदी हळवा क्षण असतो तो.. तर काही हिरमुसून होस्टेलकडे निघालेले असतात. चेहऱ्यावर निराशा असली तरी मन कणखर असतं त्याचं. ‘अजून युद्ध संपलेलं नाहीये. अजून लढायचं..’ या भावनेने ते दुसऱ्या दिवसाच्या तयारीला लागतात.. पण आठवडा-दोन आठवडयातच चित्र स्पष्ट होतं.. हळूहळू विश्वास बसायला लागतो की आपण एक नव्हे तर दोन कंपनीत place झालोय! आणि मग आनंदाला काही पारावार उरत नाही..

Placement सारख्या खूप आनंद देणाऱ्या अशाच अजूनही काही गोष्टी या माझ्या Engineering च्या आयुष्यात घडून गेल्यात.. आज सगळं आठवतंय.. College चा पहिला दिवस.. Boat Club वर तासनतास मारलेल्या गप्पा.. पावसाच्या काळात दुथडी भरून वाहणारी ती नदी.. तिच्यातलं उसळून वाहणारं पाणी नकळत मनाला उभारी देऊन जायचं.. Freshers’ Party… Technical Events.. Zest मधली केलेली मजा.. Regatta मधले श्वास रोखून ठेवणारे ते events आणि तो दिव्यांचा अद्भूत खेळ.. इच्छेनुसार साजरी होणारी दिवाळी फक्त COEPतच! होस्टेलवर पडीक असणं..खूप खूप cricket खेळणं.. 1st year मधली ट्रीप.. आणि पुढील प्रत्येक वर्षातल्या अशाच सहली.. Traditional dayला ते भान हरपून नाचणं... Valentine’s Day ला लाल नाही निदान पिवळं तरी फुल मिळावं अशी भाबडी आशा.. आणि मिळालं नाही की ‘एक दिवस खूप मोठा होईन आणि मग मनासारखी मुलगी मिळेल मला.. सगळ्यात सुंदर..’ असं पाहिलेलं स्वप्न..! Gathering मधली मजा.. Cultural Group मधे मिळालेला तो अवर्णनीय आनंद..पुरुषोत्तम..फिरोदिया..सगळाच उत्सव, सगळाच सोहळा, सगळाच जश्न...! बेंबीच्या देठापासून अगदी कानठळ्या बसेपर्यंत ओरडून ओरडून आसमंत दणाणून सोडणारा C.O.E.P चा तो गजर... गजर कसला, गर्जनाच असतात त्या! C.O.E.P रूपी सिंहिणीच्या आम्ही केलेल्या छाव्यांनी..! मिळालेल्या करंडकाकडे बघून वाटणारी ती जग्गजेते झाल्याची भावना...

आता जाताना या सगळ्या आठवणी घेऊन जाऊ. जाता जाता प्रत्येक ‘मामू’ professor ला एक ‘जादू की झप्पी’ द्यावीशी वाटतीय! (ज्या शिक्षकांना मानलं त्यांना तर दंडवतच घालीन!) आणि म्हणावसं वाटतं.. “सर, तुमच्यामुळेसुद्धा मी इतक्या छान आठवणी घेऊन जाऊ शकतोय.. तुम्ही दिलेला त्रास आज खरंच प्रेमळ वाटतोय.. धन्यवाद सर!” सगळ्या मित्र-मैत्रिणींना सोडून जावं लागतंय ह्याचं मात्र दु:ख आहे. त्यांच्याही खूप आठवणी आहेतच.. पण ‘एवढया सगळ्या आठवणी कायमच्या राहतील माझाबरोबर?’ असा प्रश्न पडतो, अन् वाटतं 200 GB memory हवी होती आपली! त्या computer नामक निर्जीव यंत्राचा हेवा वाटायला लागतो.. आणि अचानक मनात विचार येतो, ‘200 GB ची Hard Disk माणसात implant करता येऊ शकेल? सगळ्याच आठवणी कायमच्या राहू शकतील मग आपल्याकडे.. Natural आणि Artificial Intelligence चं असं हे hybridization शक्य आहे का..?’ आणि मग माझ्यातला ‘खरा Engineer’ विचार करायला लागतो...

Friday, September 3, 2010

पाऊस!

‘पाऊस’...प्रत्येक कवीचा आणि बहुदा प्रत्येक लेखकाचा हा अगदी जीवाभावाचा विषय! प्रत्येक कवी, मग तो होतकरू कवी असो, वा अगदी कोणी जेष्ठ कवी, तो त्याच्या आयुष्यात एखादी तरी पावसावर कविता करतोच! म्हणजे, जणू कवीने पावसावर कविता केल्यावरच त्याला ‘कवित्व’ प्राप्त होते, हे साहित्य क्षेत्रातलं एक ‘समीकरण’च आहे! पण पावसावर लिहिणं हे काही कवीचं कर्तव्य नसतं. तो त्याचा लोभ असतो!

अश्मयुगातला माणूस जेव्हा दगडी हत्यार घेऊन उघडा फिरत असेल,त्याच्या डोक्यावर कडक ऊन असेल, पायात काही नसल्यामुळे चटके बसत असतील. भूक लागली की कंदमुळे-फळे खायची. त्यात कुठूनही हिंस्त्र पशू हल्ला करू शकतो. म्हणून सतत ते दगडी हत्यार हातात घेऊन तत्पर रहायचं. त्यात सोबत बायकोची भूणभूण असेलच! ‘अहो, मी या झाडाची वल्कलं घालू का त्या झाडाची? मी काय नेसू? मी कशी दिसते? माझे केस आवडतात का तुम्हाला? कापू का लांबच ठेवू? ती शेजारची आहे ना, तिने दगडी हत्याराने कालच कापले केस. मी काय करू? तिच्यापेक्षा मीच सुंदर आहे ना? अहो सांगा ना...!’
अशा सगळ्या त्रासात ‘Life जाम tough आहे राव’ असा तो विचार करत असतानाच अखंड मानवजातीचा पहिला पाऊस कडाडून बरसला असेल..! हे आकाशातून असं पाणी कसं पडतंय..!! काही झेपायच्या आतंच चिंब भिजले असतील दोघेही.. तापलेल्या जमिनीबरोबर मग त्याचंही डोकं थंड झालं असेल..सगळा उकाडा क्षणार्धात मारला असेल त्या पावसाने...मग त्या चिंब भिजलेल्या बायकोकडे बघून तो म्हणाला असेल , “खूप सुंदर दिसतीयस..केस लांबच ठेव!” अन् मग तीही लाजली असेल.. असा हा पाऊस!

माणूस जगतो तो त्याच्या भविष्यकाळातल्या स्वप्नांवर आणि भूतकाळातल्या आठवणींवर. स्वप्नं त्याला दिशा देतात, तर आठवणी सोबत. माझा आठवणींचा कप्पा मी जेव्हा उघडून बघतो, तेव्हा तो निम्मा-अधिक पावसाच्या पाण्यानेच भरलेला असतो..!
कोरा करकरीत निळा रेनकोट घातलेला तो शाळेतला दिवस..येताना ओलेकच्च भिजलेले ते पांढरेशुभ्र सॉक्स..आज्जीबरोबर शेजारच्या बोळात वेचलेल्या गारा..पहिल्यांदा पाहिलेलं आणि अगदी काहीच क्षणात अदृष्य झालेलं इंद्रधनुष्य..ओल्या मातीचा तो वास आणि ‘मातीला इतका छान वास असतो?’ हे वाटलेलं नवल.. अळूच्या पानावर बसून डळमळणारा तो दवबिंदू..अंगणात बसलेली, ओलीचिंब भिजून थरथर कापणारी ती मांजराची दोन पिल्लं.. त्यांच्या केविलवाणेपणाने त्यांना त्याच क्षणी आमच्या घरात मिळालेली जागा..डबक्यात सोडलेल्या होडया..एकमेकांच्या अंगावर उडवलेलं ते डबक्यातलं पाणी..आणि ‘श्रावणमासी हर्ष मानसी’, लहानपणीची सगळ्यात आवडीची कविता...!
सतत laptop समोर असताना ‘निसर्गापासून आपण किती लांब गेलोय..फक्त स्वतःमधे जगतोय, स्वतःसाठी जगतोय’ हा विचार जेव्हा त्रास द्यायला लागतो, तेव्हा अशाच पावसाच्या आठवणींची सोबत मिळते. पाऊस हा निसर्गाचाच एक भाग असला तरी मला तो निसर्गाकडे जाताना वाटेत मदत करणाऱ्या वाटाडयासारखा वाटतो. पावसावाटेच मी निसर्गाजवळ जात असतो. तो वेडयासारखा बरसतो. धरणीमातेला न्हाऊ घालतो. तिला हिरवी वस्त्रं घालतो. पिसाटलेल्या वाऱ्यांनी तिचे केस वाळवतो. गव्हाच्या पिकांनी, कणसाच्या टपोऱ्या दाण्यांनी तिची कांती उजळतो. अवघ्या प्राणीमात्रांना सुखावतो आणि मला म्हणतो, “आता ये बघायला. बघ ही पृथ्वी किती सुंदर आहे. जरा भिज. खेळ इकडे. हाच तुझा देव आहे. बस त्याच्या मांडीत थोडयावेळ. नंतर जाणारच आहेस त्या कोंदट, कृत्रिम आणि मिथ्या जगात पळायला... ये, थोडं खेळून जा!” तोच मला घेऊन जात असतो.. असा हा पाऊस!

त्या वरून पडणाऱ्या पाण्यात नाती जोडायची शक्ती कशी असू शकते, हा प्रश्न मला नेहेमी पडतो. पावसात कधी कुणाला गाडीतून lift दिली जाते, तर कुणाला छत्रीत घेतलं जातं. फुगलेलं धुकं आणि मुक्तपणे कोसळणारे धबधबे तर सहलीचं आमंत्रण देत असतात! अन् मग अनोळखी लोकं ओळखीची होतात. ओळख मैत्रीत बदलते. मैत्री घट्ट होते आणि कदाचित पुढे आयुष्यभर पुरते. पावसात भिजत मित्रांबरोबर घेतलेला वाफाळत्या चहाचा प्रत्येक घोट मैत्रीची वीण घट्ट करत असतो. त्या चहात पडणारे पावसाचे थेंब त्याची चव द्विगुणीत करत असतात. तेव्हा तो चहा खराच ‘अमृततुल्य’ होतो..! कित्येकांचं प्रेम जमण्यात आणि फुलण्यात ह्या पावसाचा मोठ्ठा वाटा असतो! Chemistry मधे सांगायचं तर प्रेमाच्या reaction चा तो Catalyst असतो. संगीतात सांगायचं तर तबला लावताना तो पेटीचा स्वर असतो. पु.लं.च्या भाषेत सांगायचं तर तो लग्नातला ‘नारायण’ असतो. आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर तो ‘mood creator’ असतो..! वरून पडणारं हे पाणी नकळत मनात झिरपत असतं. अन् त्यातूनच मग नात्यांमधे ‘ओलावा’ तयार होत असतो...असा हा पाऊस!

इयत्ता तिसरी. निबंध लिहा- ‘माझा आवडता ऋतू’ आणि मग सगळ्या उत्तरपत्रिकांत पाऊसच पाऊस होतो! उन्हाळ्यात आपण आंब्याची वाट बघतो, तर हिवाळ्यात दिवाळी किंवा ख्रिसमसची. पावसाळ्यात फक्त पावसाचीच वाट बघितली जाते! त्यामुळे मला पावसाळा हा खूप 'सजीव' ऋतू वाटतो! शेतकऱ्यांचा देव आणि भजी-वडापाववाल्यांची लक्ष्मी तर असतेच पावसाळा, पण तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसं हातात कॉफीचा मग घेऊन गहन कादंबऱ्या वाचायचा निरागस प्रयत्न करतात, तो ह्या पावसाळ्यातच! ही त्याची किमया!

मला जर हवी ती एक गोष्ट मिळणार असेल आयुष्यात, तर मी माझं बालपण मागीन. बालपण मिळालं तर सगळं काही मिळेल मला. मी खूप लहान असताना पप्पा मला shower खाली आंघोळ घालायचे. आंघोळ कमी आणि पाण्यात खेळणंच जास्त असायचं ते! आपण मोठे होतो आणि बरेच आनंद नकळत निघून जातात. पण कधी मी रस्त्याने जात असताना अचानक जोराचा पाऊस सुरु झाला, तर वाटतं देव थोडयावेळासाठी समस्त प्राणीमात्रांना त्यांचं लहानपण परत करतोय..सगळ्यांना एकत्र आंघोळ घालतोय!
त्या वरून पडणाऱ्या पाण्याबद्दल लिहिणं कर्तव्य नसतं..त्याचा लोभ असतो..तर असा हा पाऊस!

Saturday, August 21, 2010

सोळोळ्या (४ चारोळ्या :) - भाग ५

~~~~~~~~~~~~~~~~
लाजाळूला त्या दिवशी
खूपच एकटं वाटलं
हात न लावताच ते मग
तसंच आपसूक मिटलं
~~~~~~~~~~~~~~~~



~~~~~~~~~~~~~~~~
हसत होतो मी भूतकाळावर
तेव्हा वेडा होतो कसला
तेवढयात हा आत्ताचा क्षणही
भूतकाळात जाऊन बसला
~~~~~~~~~~~~~~~~



~~~~~~~~~~~~~~~~
मरून पुन्हा जगासाठी
कीर्तिरूपे का उरावं
इथेच चरावं, इथेच झुरावं
इथेच करावं अन् इथेच पुरावं
~~~~~~~~~~~~~~~~



~~~~~~~~~~~~~~~~
ते दिवसच होते मंतरलेले
रात्रही आपल्यासह जागायची
८ बाय १० च्या त्या खोलीत
तेव्हा सुखंही मागे लागायची
~~~~~~~~~~~~~~~~

Monday, August 16, 2010

सोळोळ्या (४ चारोळ्या :) - भाग ४

~~~~~~~~~~~~~~~~
भिन्न भाषा भिन्न धर्म
भिन्न रंग भिन्न वेश
भिन्नतेच्या भिन्न रक्तात
भिनलेला भारत देश
~~~~~~~~~~~~~~~~



~~~~~~~~~~~~~~~~
प्रलोभने सभोवताली
गुंग होते मती
विवेक कधी ना ढासळे
हीच उराशी भिती
~~~~~~~~~~~~~~~~



~~~~~~~~~~~~~~~~
ठाऊक होतं मला एकदा
मौन आपलं सुटणार
जीर्ण अशा या रुक्ष वृक्षाला
पुन्हा पालवी फुटणार
~~~~~~~~~~~~~~~~



~~~~~~~~~~~~~~~~
मोठेपणाचं आमिष दाखवून
हळूच लहानपण नेतो
खांद्यावरचं ओझं काढून
मग म्हातारपण देऊन जातो
~~~~~~~~~~~~~~~~

Saturday, August 14, 2010

सोळोळ्या (४ चारोळ्या :) - भाग ३

~~~~~~~~~~~~~~~~
बघता वहीतलं
ते जाळीचं पान
लुप्त आठवणींचं
माजलं रान
~~~~~~~~~~~~~~~~



~~~~~~~~~~~~~~~~
दु:ख विरहाचं नाही
आठवणी सलतात
तुझ्या भासावर मग
अश्रूही भुलतात
~~~~~~~~~~~~~~~~



~~~~~~~~~~~~~~~~
आपल्या पिढीचा
मुख्य शाप
धावताना लागलेली
कायमची धाप
~~~~~~~~~~~~~~~~



~~~~~~~~~~~~~~~~
रात्रीपुरतीच जगली होती
वेडी प्राजक्ताची फुलं
तेवढयात त्या पिंपळाला
त्यांनी जगण्याचं बळ दिलं
~~~~~~~~~~~~~~~~

Thursday, August 12, 2010

सोळोळ्या (४ चारोळ्या :) - भाग २

~~~~~~~~~~~~~~~~
शहराच्या वेशीपलीकडे
वसतो एक अजब गाव
शिक्षण नाही, नाही पैसा
तरी अंतरंगात शुद्ध भाव
~~~~~~~~~~~~~~~~



~~~~~~~~~~~~~~~~
चार शब्दात सांगतो
या जगण्याचे सार
आयुष्याच्या छातीवर
नियतीचे वार
~~~~~~~~~~~~~~~~



~~~~~~~~~~~~~~~~
आपल्यांत नेहेमीच
होती एक अदृश्य भिंत
एकाएकी तुटलेलं नातं
ही एकच काय ती खंत
~~~~~~~~~~~~~~~~



~~~~~~~~~~~~~~~~
आनंदयात्री व्हायला
थोडं वेडं व्हावं लागतं
शहाणपण हवं कशाला
अहो चार पैशात भागतं
~~~~~~~~~~~~~~~~

Tuesday, August 10, 2010

सोळोळ्या (४ चारोळ्या :) - भाग १

~~~~~~~~~~~~~~~~
तुझा निरोप घेताना
डोळ्यात पाणी साठलं
पण तुझे अश्रू बघताच
वेडं क्षणार्धात गोठलं
~~~~~~~~~~~~~~~~



~~~~~~~~~~~~~~~~
नाती आणि पैशात
कधीच गल्लत नसते
नाती 'किंवा' पैसा
हीच इथली रीत असते
~~~~~~~~~~~~~~~~



~~~~~~~~~~~~~~~~
तुला समोर बघताच
सगळं जुनं आठवू लागलं
तरी कधी नव्हे ते मन
माझं शहाण्यासारखं वागलं
~~~~~~~~~~~~~~~~



~~~~~~~~~~~~~~~~
माझ्या या स्वच्छ आकाशी
फक्त एकच ढग काळा आहे
बुद्धीला मुळीच पटत नाही
मनालाच त्याचा लळा आहे
~~~~~~~~~~~~~~~~

Monday, July 19, 2010

पूर्णब्रम्ह

‘आपण कशासाठी जगतो?’ हा प्रश्न मला अधूनमधून पडायचा. अजूनही पडतो! आता हा प्रश्नच इतका भयंकर philosophical असल्यामुळे त्याचं समाधानकारक उत्तर कधी मिळालंच नाहीये. ‘आयुष्यात प्रत्येकाचं काहीतरी ध्येय असतं, ते पूर्ण करण्यासाठी..’, ‘आपल्या माणसांसाठी’, ‘आता आलोच आहोत तर जगायचं आणि वेळ झाली की मरायचं!’ ही त्यातलीच काही उत्तरं.. पण त्यातल्या त्यात मला सगळ्यात पटलेलं उत्तर म्हणजे ‘आपण पोटासाठी जगतो’!

‘कशासाठी-पोटासाठी’ हे वर वर बघता फारच फालतू उत्तर वाटतं, पण नीट विचार केल्यावर त्यातली गंमत दिसून येते! मानवी शरीराला काही ठराविक अवयव असतात आणि प्रत्येक अवयवाच्या ठराविक अशा गरजा असतात. बाकी सगळ्या अवयवांच्या गरजा भागवणं सोपं असतं. म्हणजे गणितं सोडवली, विचार केला, की मेंदूची गरज भागली. सुंदर गोष्टी बघितल्या की डोळ्यांची गरज भागली. श्रवणीय संगीत ऐकलं की कानांची गरज भागली. खेळलं, व्यायाम केला, की हातापायांची गरज भागली. पण पोटाचं असं नाहीये बघा. कारण पोटाची गरज भागवायला अन्न लागतं आणि ते मिळवण्यासाठी आणि शिजवण्यासाठीच तर सगळा खटाटोप असतो!

अन्न मिळवण्यासाठी पैसे कमवा, पैसे कमावण्यासाठी नोकरी करा, नोकरीसाठी शिक्षण हे लागतंच आणि एकदा का नोकरी सुरु झाली की तुमचं काम अगदी रिटायर्ड होईपर्यंत करत बसा! नाहीतर ‘पोटा-पाण्याचे’ वांधे होतात! आणि फक्त एवढंच नाही. अन्न मिळवल्यावर ते शिजवायचं असतं. त्यासाठी घरातलं स्वयंपाकघर आयुष्यभर चालू ठेवा. मग ते एकटयाला कसं झेपणार? त्यामुळे लग्न करा! चार दिवस प्रेमात घालवा. पुढची चाळीस वर्षे भांडत बसा! पण ते स्वयंपाकघर अखंड चालू राहिलं पाहिजे..कशासाठी?..अहो पोटासाठीच नाही का!

तर अशा ह्या पोटासाठी जगण्यानेच ज्यात ‘scope’ आहे तिकडे माणूस वळाला, आणि ह्या जगाचा विकास झाला! शेती, मासेमारी, घरबांधणी, व्यापार, धातू, खनिजे, तंत्रज्ञानाची सुरुवात, रस्ते, गाडी, रेल्वे, विमानं, संगणक, इलेक्ट्रोनिक्स, मोबाईल्स, इंटरनेट, सोशल नेटवर्किंग... जे विकलं जाईल ते तो तयार करत गेला. एका कुठल्या व्यवसायात गर्दी झाली की तो दुसरं काहीतरी करू लागला. नवीन शोध लावू लागला..सगळं पोटासाठी, म्हणजेच जगण्यासाठी! असं हे पोटासाठी जगणंच हे जग अखंड चालू ठेवतं आणि या जगाचा विकास करतं.

आता हे जे अन्न आपण मिळवतो, वेगवेगळ्या पद्धतीने शिजवतो, ते खाऊन पोट भरायच्या आधी त्याला एका ‘जीभ’ नावाच्या Quality Assurance Inspector मार्फत जायला लागतं! आणि या ‘जीभ’ नावाच्या Quality Inspectorला जे आवडतं, तेच आपल्यालाही खावंसं वाटतं आणि त्याला जे आवडत नाही, ते आपल्यालाही आवडत नाही. प्रत्येक माणसाचा तो ‘Quality Inspector’ थोडयाफार फरकाने सारखाच असतो. त्याला पुरणपोळी, बासुंदी, जिलबी.. असे गोडधोड पदार्थ, वडापाव, समोसा, भजी.. यासारखे तळलेले पदार्थ, पावभाजी, चायनिज, पंजाबी किंवा नॉनव्हेज सारखे चमचमीत पदार्थ, बर्गर, पिझ्झा सारखं फास्ट फूड किंवा आईस्क्रीम, मिल्कशेक, कोल्ड्रिंक सारखे गोड आणि गार पदार्थ खूप आवडतात. पण दोडकं,पडवळ, तोंडलं, कारलं या सारख्या फळभाज्या आणि माठ, आंबट-चुका, करडई यासारख्या पालेभाज्या आवडत नाहीत. आणि तिथेच निसर्ग एक खेळ मांडतो!

तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का, की जे पदार्थ आपल्याला भयंकर आवडतात, ते नेहेमीच अपायकारक, हानिकारक किंवा शरीराला वाईट का असतात? आणि जे पदार्थ आपल्याला मुळीच आवडत नाहीत ते प्रचंड पोषण करणारे, शरीराची वाढ आणि विकास करणारे का असतात? कधी आई किंवा आपले डॉक्टर आपल्याला असं म्हणतात का की, ‘तू रोज सकाळ संध्याकाळ बासुंदी पीत जा! भरपूर तेल घालून deep fried भजी खा! रोज एक बर्गर तर खाल्लंच पाहिजेस आणि आईस्क्रीमची एखादी बादली फ्रीजरमधे ठेवत जा!’ हे सगळे आवडणारे पदार्थ आपलं वजन वाढवतात, cholesterol वाढवतात, आपल्याला डायबेटीस होऊ शकतो आणि पुढे Heart Attack ही येऊ शकतो..
या उलट पथ्य-पाणी म्हणजे, ‘दुधी भोपळ्याचा रस प्या. उकडलेली कडधान्य खा. उपासाचे पदार्थ खा. बिनसाखरेचं दूध प्या. कमी तेलाची भाजी खा. Lettuce सारखा पालापाचोळा खा!’ म्हणजे अगदी त्या ‘Quality Inspector’ला काळ्यापाण्याची शिक्षा देऊन, त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न करा! म्हणजे तुम्ही तंदुरुस्त व्हाल!

लहानपणी आईने मला डब्यात कधी आंबट-चुक्याची भाजी दिली, तर मी तसाच न खाता डबा संध्याकाळी घरी आणायचो. आईला उघडून दाखवायचो. हात जोडायचो आणि विचारायचो, “आई माझ्या हातून काही ‘चुका’ झाल्यात का!” पडवळ, दोडकं या सारख्या बेचव भाज्या कसं काय पोषण करू शकतात? कारलं तर म्हणे भयंकर healthy असतं! पण ते खाताना मला कुठलीतरी शिक्षा भोगत असल्याची जाणीव होत असते! हिरवा माठ, लाल माठ खाऊन बुद्धी तल्लख होऊच कशी शकते? आणि जर होते, तर ‘माठ’ नाव ते कशाला! आणि बिनसाखरेचा चहा किंवा दूध प्यायचं असेल तर वासरू होऊयात किंवा मांजराचा जन्म घेऊयात! Sprouts किंवा lettuce ‘चरायचं’ असेल तर शेळी होण्यात काय वाईट आहे!

असा हा विरोधाभासाचा खेळ निसर्ग मांडतो आणि चविष्ट अन्नाच्या मोहात पाडून रोज जिभेची लढाई लढायला लावतो! पण अशावेळी निसर्ग मला आई-वडिलांसारखा वाटतो. ‘काय चांगलं आहे, पेक्षा काय योग्य आहे’ ते करत रहा असे संस्कार जणू तो करत असतो. हा त्याने मांडलेला खेळ ही वडीलकीच्या नात्यानेच केलेली गोष्ट आहे.
आता आपण पोटासाठी जगतो, अन्न मिळवतो. पण जे अन्न खूप चविष्ट आहे ते जर मुळीच हानिकारक नसतं, उलट जर का ते पौष्टिक असतं, तर ते आपण गरजेच्या पलीकडे जाऊन खाल्लं असतं. माणसाचं खाण्याचं प्रमाण वाढलं असतं. नावडत्या भाज्यांची शेतीच केली गेली नसती. अन्नधान्य साठा मर्यादित असल्याने आणि श्रीमंत लोकांचा आहार वाढल्याने गरीब नेहेमीच उपाशी राहिले असते. लोकं, जिभेचे आनंद उपभोगत बसले असते. जगाचा विकास थांबला असता. अपरंपार प्राणिहत्या झाली असती. एक दिवस अन्नधान्य संपूनही गेलं असतं. सगळंच विस्कळीत झालं असतं..

लहानपणी आई म्हणायची, “वरण भाताचे हे शेवटचे तीन घास खाल्लेस तर चॉकलेट मिळेल..” आणि मी ते तीन घास खायचो.
पोटासाठी असणाऱ्या या जगण्यात, निसर्गाचं ऐकायचं असतं. तीन घास ‘वरण भाताचे’ खाऊनच मग एक ‘चॉकलेट’ खायचं. जगण्याची लढाई आणि स्वतःशी लढाई एवढंच तर सगळं काही असतं. म्हणूनच कदाचित अन्नाला ‘पूर्णब्रम्ह’ असं म्हणतात..

Sunday, June 27, 2010

राखाडी रावण

बालवयात जे आपल्यावर संस्कार होतात त्यात गाणी आणि गोष्टींचा सिंहाचा वाटा असतो! ससा-कासवाच्या ‘classic’ गोष्टीपासून ह्या संस्कारांना सुरुवात होते आणि ‘आळस’ हा जो मित्र वाटणारा शत्रू पुढे आयुष्यभर पाठ सोडणार नसतो, त्याची या गोष्टीतून तोंडओळख करून दिली जाते. त्यानंतर ‘चिऊताई चिऊताई दार उघड..’ सारखं timepass गाणं, ‘गाणं’ म्हणजे काय असतं हे सांगायला शिकवतात. नंतर इसापनीतीतल्या ५०-१०० प्राण्यांच्या गोष्टींचा नंबर लागतो. ह्यात प्रत्येक गोष्टीला काहीतरी तात्पर्य असतंच! ह्या गोष्टी सतत काहीतरी शिकवतच असतात! आणि या गोष्टींचा आपल्यावर एवढा भडीमार होतो की नंतर कुठल्या काका किंवा मामाने ‘ये गोष्ट सांगतो’ म्हणून तात्पर्य नसलेली गोष्ट सांगितली, तर उगाचंच आपल्याला वेड्यात काढल्यासारखं वाटतं! ते झालं की टिळकांच्या शेंगांच्या टरफलावाटे पिल्लाच्या चोचीत संस्काराचा दाणा भरावला जातो! आणि मग पाळी येते सगळ्यात लाडक्या, संस्कारक्षम, ‘देव’ या संकल्पनेची ओळख करून देणाऱ्या दोन महान गोष्टींची.. रामायण आणि महाभारत!

रामायण आणि महाभारत ही दोन अफाट गाजलेली महाकाव्ये! आता त्या गोष्टी खऱ्या का खोट्या, राम-कृष्ण, कौरव-पांडव, हनुमान, वानरसेना हे सगळे खरेच होऊन गेले आहेत का, हा भाग जरा बाजूला ठेवूयात. मुख्य मुद्दा हा, की सगळ्यांना रामायण आणि महाभारत भयंकर आवडतं. पण जर असं कोणी विचारलं की तुम्हाला रामायण जास्त आवडतं का महाभारत? तर बहुतेक सगळ्याचं उत्तर ‘महाभारत’ असंच येईल! आणि ह्याला एक कारण आहे...

लहानपणी या दोन्ही गोष्टी एकाच पठडीत सांगितल्या जातात. म्हणजे बघा, रामायणात राम, लक्ष्मण, सीता हे देव असतात आणि रावण हा राक्षस असतो. दुष्ट रावण सीतेला पळवून नेतो आणि मग राम-लक्ष्मण, हनुमान आणि त्याच्या वानरसेनेच्या मदतीने लंकेवर स्वारी करतात. रावणाचा वध करतात. जिंकतात. सत्याचा विजय होतो! किंवा महाभारतात, कौरवांचा पांडवांवर राग असतो. पांडव ५ तर कौरव १०० असतात. पांडव चांगले आणि कौरव वाईट असतात. कृष्ण देव असतो आणि तो चांगलं वागणाऱ्यांची म्हणजे पांडवांची बाजू घेतो. कौरव आणि पांडवांच्यात घनघोर युद्ध होतं. भर युद्धात कृष्ण अर्जुनाला भगवतगीता सांगतो! पांडव जिंकतात. सत्याचा विजय होतो! ह्या अशा ‘हिरो आणि व्हिलन’, ‘देव आणि राक्षस’ स्वरुपात आपण लहानपणी रामायण-महाभारत ऐकतो. मग त्यात हिरोला अजून हिरो करायला अर्जुनाची पक्ष्याच्या डोळ्याची किंवा लक्ष्मण-शूर्पणखेची गोष्ट असते आणि व्हिलनला आणखी व्हिलन करायला जयद्रथ, शकुनी मामा, दु:शासन, बिभीषण अशी पात्रं प्रवेश घेतात.

पण जसे आपण मोठे होतो तशी आपल्याला महाभारतातल्या प्रत्येक मुख्य पात्राची नव्याने ओळख होते. कृष्णाची आणि पांडवांची ‘धुतल्या तांदळाची’ आपल्या मनातली छबी साफ धुवून निघते! चंद्रावरचे डाग दिसतात. आणि प्रत्येक पात्र अतीव सुंदर असा करडा रंग धारण करतो. म्हणजे द्रोणाचार्य एकलव्याला शिकवायचं नाकारून ‘racism’ करतात. नेहेमी खरं बोलणारा युधिष्ठीर ऐन युद्धात ‘नरो वा कुंजरो’ अशी थाप मारून आपल्याच गुरूंना आत्महत्येला भाग पाडतो. द्रोपदी भर सभेत सूतपुत्र म्हणून कर्णाचा उगाचंच अपमान करते. आणि कृष्णाने खेळलेली ‘राजनीती’ तर विचारायलाच नको! कर्णाच्या हाती शस्त्र नसताना तो अर्जुनाला कर्णावर बाण मारायला भडकावतो. ही कुठली नीती? का, तर कृष्णालाही माहिती असतं अर्जुन कर्णाशी कधीच जिंकू शकणार नाही. ‘मृत्युंजय’ आणि ‘राधेय’ वाचल्यानंतर तर मला कृष्णाचा एवढा राग आला होता ना...अशाप्रकारे कृष्णही करडाच होतो..

प्रत्येक जिवंत माणसाला जन्मतःच काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे षडरिपु म्हणजे सहा शत्रू आणि सहस्त्र वेगवेगळ्या भावना असतात. कुठलाच माणूस १००% शुद्ध, चांगला किंवा कुठलाच माणूस १००% वाईट असू शकत नाही. म्हणूनच, ही महाभारतातली राखाडी पात्रं आपल्याला जास्त जवळची वाटतात. मनाला पटतात..भिडतात..

पण रामायणाचं असं नाहीये बघा. रामायणाच्या अगदी शेवटी राम सीतेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला अग्निपरीक्षा घ्यायला लावतो, ही गोष्ट सोडल्यास राम नेहेमीच शुद्ध, चांगला असा देव असतो आणि रावण हा नेहेमीच दुष्ट राक्षस असतो.

मध्यंतरी रामायण आणि महाभारतावर २ चित्रपट आले. ‘राजनीती’ ह्या चित्रपटात आधुनिक महाभारत साकारलंय. पण ‘रावण’ या चित्रपटात मणिरत्नमने ‘रामायण’ नव्याने लिहायचं प्रयत्न केलाय...! रामायणात सीता खूप सुंदर असल्याचा उल्लेख आहे. आणि जर रामायणाच्या शेवटी सीता अग्निपरीक्षेत उत्तीर्ण होते, तर एवढा बलशाली रावण हा नक्कीच एक महान व्यक्ती असला पाहिजे. सीतेचे फक्त सौंदर्यच नाही तर अंगभूत गुणांनीही तो चकित झाला असेल, अगदी तिच्या प्रेमातही पडला असेल. मग अशात रावणही रामासारखाच मर्यादापुरुषोत्तम ठरतो! रावणालाही स्वतःची अशी गोष्ट आहे. तो लहानपणी खूप उद्धट आणि चिडका होता. पण म्हणून काही तो outright वाईट ठरत नाही. आणि लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापल्यानेच चिडून रावणाने सीतेचं अपहरण केलं होतं.

रावणाला दहा तोंडं होती असं त्याचं वर्णन आहे. पण त्यापेक्षा १० पंडितांपेक्षा तो हुशार होता, तो अत्यंत हुशार व्यक्तीपेक्षा १० पट वेगाने विचार करू शकायचा किंवा त्याला ४ वेद आणि ६ उपनिशिदं असं सगळ्याचं ज्ञान होतं हे जास्त पटण्यासारखं आहे. रावण शंकराचा निस्सीम भक्त होता. त्याने सलग कित्येक वर्षे ब्रम्हाची तपश्चर्या केली होती. आणि जर त्याचा वध करायला विष्णूला रामाचा अवतार घ्यायला लागला ह्याचा अर्थ किती सामर्थ्यशाली असेल रावण.. श्रीलंकेत आजही रावणाची मंदिरं आहेत आणि लोकं त्याला देव मानून नियमित दर्शनाला जातात.

ह्या सगळ्या गोष्टी रावणाचा काळा रंग राखाडी बनवतात. रावणाचं हे नवं (आणि कदाचित खरं) रूप मणिरत्नमने पडद्यावर साकारलंय. आणि म्हणूनच चित्रपट कितीही कंटाळवाणा झाला असला, त्याचा first half अगदी बैलगाडीच्या वेगाने पुढे सरकत असला किंवा dialogues अतिशय फुसके असले तरी आता हयात नसलेल्या रावणाच्या मनात जाऊन त्याच्या पात्राचा विचार करून ते पडद्यावर उभ्या करणाऱ्या मणिरत्नमला माझा सलाम!

या नंतर एक विचार मनात येतो की जर राम आणि कृष्ण हे जर विष्णूचे म्हणजे साक्षात देवाचे अवतार असतील तर त्यांनी खऱ्या हिरो कर्णाचे किंवा अगदीच वाईट नसूनही रावणाचे प्राण घेऊन काही चूक केली का..? कदाचित नाही! कदाचित कृष्णाला अर्जुनापेक्षा जास्त कर्णच आवडत होता. पण नियतीमुळे म्हणा, कर्ण कौरवांच्या बाजूने होता आणि कौरवांचं हारणं आणि पांडवांचं जिंकणं हे ‘सामाजिक हिताचं’ होतं. आज कदाचित आपणही पांडवांचेच वंशज असू आणि आपल्यालाही कौरवांपेक्षा पांडवांचेच वंशज होणं आवडलं असतं. तसंच रावणाचा वध करणं हेसुद्धा ‘सामाजिक हिताचं’च होतं. आणि भावनेच्या, स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाचा फक्त विचारच नाही तर समाजासाठी जो कृती करतो त्याला ‘देवत्व’ प्राप्त झालंय असं म्हणायला हरकत नाही. राम आणि कृष्ण करडया रंगाचे असूनही ह्या देवत्वाने त्यांच्यात एक लकाकी आहे. म्हणूनच त्यांचा करडा रंग स्वर्गीय चंदेरी दिसतो. आणि त्यांचं देवत्व तसूभरही कमी होत नाही..

पण हे काही असलं तरी रावणाचं हे नव्याने समजलेलं राखाडी रूप माझ्या मनाला खूप भावलंय. या राखाडी रावणाला माझे शतश: प्रणाम!

Thursday, June 24, 2010

माझं शिक्षण...

कॉलेजमधे शरीरशास्त्र शिकताना आम्हाला-

जिभेवरच्या taste buds मुळे चव कशी कळते
ते शिकवलं
पण एखाद्या पदार्थाचा ‘आस्वाद’ कसा घ्यायचा
ते नाहीच शिकवलं...

Respiratory system शिकवताना
श्वासाचं mechanism शिकवलं
पण ‘गंधवेडं’ होणं म्हणजे काय
ते नाहीच शिकवलं...

कानाची बाह्यरचना आणि
आंतर्रचना सुद्धा शिकवली
पण ‘श्रवणीय’ गोष्टींची
ओळखच नाही करून दिली...

डोळ्यांची रचना व कार्य शिकवलं
पण ‘दृष्टी’ द्यायचं राहूनच गेलं..

हृदय आणि रक्ताभिसरण शिकवलं
पण ‘दिल की धडकन’ क्या होती है
ते समजावलंच नाही...

रक्तातील सर्व घटक सांगितले
गोठवायचं कसं, साठवायचं कसं तेही
पण ‘आटवायचं’ कसं?
ते नाहीच शिकवलं..

Digestive system चे सर्व पार्टस्
त्यांच्या functions सहित शिकवले
पण एखाद्याचे अपराध पोटात कसे
घालायचे, ते नाहीच शिकवलं..

मज्जासंस्थेचे कार्य, मेंदूची रचना
कशी गुंतागुंतीची तेही शिकवलं
पण एखाद्याच्या मनापर्यंत कसं
पोहचायचं हे नाही शिकवलं..

स्नायूंचं चलनवलन आणि
घामाचं उत्सर्जन शिकवलं
पण ‘घाम गाळणं’ म्हणजे काय?
ते कधी कळलंच नाही..

हाडांची संरचना आणि त्यांचं
महत्व नक्कीच पटवलं
पण,
‘हाडाचा शिक्षक’ म्हणजे काय?
ते कळलंच नाही..

Reproductive system, Hormonal changes
सगळं काही शिकवलं
पण पालकत्व म्हणजे काय?
हे कधी कळलंच नाही...

जिवंत शरीराची Anatomy, Physiology
सगळं काही शिकवलं
पण जगण्याचं सार्थक कशात?
ते कधी कळलंच नाही

कुणीतरी म्हटलेलं आणि मला एकदम पटलेलं...
I was born intelligent, but Education ruined me!


- सुषमा खोपकर

Sunday, June 20, 2010

स्वप्नास्तित्व

‘एक दिवस येईल माझा. मी एक मोठा माणूस असीन. माझी सगळी स्वप्नं पूर्ण होतील तेव्हा. भरपूर पैसा, प्रसिद्धी, सुंदर, समजूतदार आणि प्रेमळ बायको, कौटुंबिक समाधान, सगळं काही असेल माझ्याकडे...’ हा विचार ज्या क्षणी मनात येतो, त्याक्षणी आपला आणि वर्तमानकाळाचा संबंध तुटतो. जणू कुठलंसं circuit break होतं आणि आपल्या स्वप्नातलं आपलं अस्तित्व आपण जगायला घेतो..!

एखादा पारंगत चित्रकार जसं पांढऱ्याशुभ्र कागदावर वेगवेगळे रंग फसाफस् पसरवून चित्र काढायला घेतो आणि काहीच क्षणात जसं ते चित्र अतीव सुंदर दिसायला लागतं, तसंच असतं हे स्वप्नास्तित्व! काहीच क्षणात प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्येनुसार भरभरून सुख प्रत्येकाच्या स्वप्नातल्या अस्तित्वाकडे असतं. मन लावून ते आल्हाददायी चित्र आपण रंगवायला घेतो. ते चित्र अगदी मनासारखं पूर्ण होईपर्यंत आपण रंगवत असतो. पण ज्या क्षणी ते चित्र पूर्ण होतं, त्याच क्षणी circuit पुन्हा जोडलं जातं आणि आपण भानावर येतो!

पण या सगळ्यात गंमत अशी होते की, स्वप्नातलं अस्तित्व हे केवळ मृगजळ असतं आणि त्यात जगल्याने आपलं खरोखरीचं अस्तित्व कमी होत असतं! म्हणजे बघा ना, एखाद्या गोष्टीचा, कामाचा पूर्ण आनंद आपण कधी घेऊ शकतो? जेव्हा आपण पूर्ण एकाग्रतेने आणि मन लावून ते काम करतो. पण जर त्यावेळी वर्तमानकाळातलं circuitच break झालं, तर कुठून एकाग्रता येणार आणि कुठून आपण त्या कामाचा आनंद उपभोगू शकणार! सतत परतत बसायला लावणारी भेंडीची भाजी नेमकी शिजल्याचा क्षण किंवा चहाला हवा तसा लाल रंग येण्यासाठी, दूध घालायच्या आधी तो किती वेळ उकळावा हे कळण्यासाठी आपल्याला एकाग्रताच लागते. बॅडमिंटन खेळताना हव्या त्या जागी हव्या तितक्या वेगाने शटल जाणं, बॅक्टेरिया कल्चर अगदी नीट बनवून microscopeचा exact focus adjust करून हवा तो result येणं किंवा ‘मृत्युंजय’ मधलं कर्णाच्या तोंडातलं एक जबरदस्त वाक्य पूर्णपणे मनाला भिडणं, हे आपण १००% वर्तमानात असल्याशिवाय होणं केवळ अशक्यच! म्हणजे मन सुखवायला आपण स्वप्नं बघतो खरी, पण स्वप्नं बघताना आपण वर्तमानातला आनंद, सुख गमावत असतो! केवढा हा विरोधाभास! नेहेमीच्या रस्त्यावरून जाताना आपण आजूबाजूच्या किती गोष्टी निरखून बघतो? मनात साठवतो? दोनच आठवडयापूर्वी ओळख झालेल्या आणि पुन्हा दिसलेल्या व्यक्तीचं नाव आपण का विसरतो? सध्या सहवासात नसलेल्या एखाद्या व्यक्तीला तिच्या लकबींसकट आपण तंतोतंत डोळ्यासमोर उभं का करू शकत नाही? एवढी कमी निरीक्षण किंवा स्मरणशक्ती आहे का आपल्याला? नाही! हे सगळं पूर्णपणे वर्तमानात न जगल्याने होतं. आपण पूर्णवेळ आपल्या अस्तित्वात जगतंच नाही! कुठल्याश्या मृगजळापायी आपण आपले हातचे आनंद गमावत असतो. म्हणजेच याचाच अर्थ, आपण आपलं आयुष्य वाया घालवत असतो..!

पण मला वाटतं या नाण्याला अगदी खणखणीत अशी दुसरी बाजू आहे! असं म्हणतात, स्वप्नं बघावीत. खूप मोठी स्वप्नं बघावीत. त्यानेच पंखात बळ येतं. वर्तमानात राहून पूर्ण एकाग्रतेने एखादं काम आपण चोख करू, त्यात पारंगत होऊ. दुसरंही तसंच करू आणि तिसरंही..पण पुढे काय? आणि अशी कामं का करत बसावं? याचं उत्तर आपली स्वप्नं देतात. प्रत्येकाच्या मते त्याला काय मिळालं की तो सुखी होईल ह्याचं उत्तर म्हणजे त्याची स्वप्नं! ही स्वप्नं त्याच्या जगण्याला एक उद्दिष्ट देतात. स्वप्नातलं जगणं म्हणजे सत्यात अथक जगण्यासाठी लागणारं इंधन. रखरखत्या उन्हात मिळालेली किंचीतशी सावली. एक मृगजळ.. जे तहान भागवत नाही पण पुढे जायचं बळ मात्र देतं..!

बऱ्याच वेळा आपण दु:खी होतो, रडतो, आपला आत्मविश्वास खूप वेळा कोलमडतो. पण आपलं मनंच असं आहे ना, जे फार वेळ दु:खी राहू शकत नाही. ते मग काही वेळ स्वप्नात जगू पाहतं. मग इंधन भरलं जातं. मनाला उभारी येते आणि आपण पुन्हा एकदा आत्मविश्वासाने सत्यात जगायला सुरुवात करतो.

ह्याचाच अर्थ असा की पूर्णवेळ स्वप्नात जगणं चांगलं नाही, पण पूर्णवेळ सत्यातही जगणं अशक्यच असतं. जगताना कुठे खरचटलं तर फुंकर मारावी. ती स्वप्नातल्या अस्तित्वात जगायची वेळ असते. मन तेव्हा जणू बुद्धीला आर्जवत असतं, ‘बेहेने दे, मुझे बेहेने दे.. बेहेने दे घनघोर घटा, बेहेने दे पानी की तरहा|’

हा circuit ‘make’ आणि ‘break’ चा खेळ अगदी ऊन-पावसाच्या पाठशिवणीच्या खेळासारखाच असतो. निसर्गासारखा मस्तपणे आपल्याला तो खेळता आला पाहिजे. तरंच आयुष्याचं सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसू शकेल...!

Saturday, May 22, 2010

फुगेवाला

प्रत्येक माणूस एक फुगा घेऊन जन्माला येतो. इगोचा फुगा! बालवयात तो न फुगलेल्या अवस्थेत असतो. पण जसं जसं कळायला लागतं तशी तशी त्या फुग्यात हवा भरायला सुरुवात होते...

३री-४थीत असताना ‘अरे, तो ‘ढ’ मुलगा आहे. त्याला नको आपल्या ग्रुपमधे घ्यायला.’ असं कधी आपण मित्रांना म्हणतो. आता हे चूक की बरोबर हा भाग बाजूला ठेवूयात. पण तो मुलगा ‘ढ’ वाटतो कारण आपण स्वतःला हुशार वाटत असतो. आणि आपण हुशार का, तर आपल्याला परीक्षेत जास्त मार्क असतात! म्हणजेच ‘sense of achievement’ आपली ‘image’ तयार करत असते. आपल्या इगोच्या फुग्यात हवा भरत असते. प्रत्येक achievement बरोबर, प्रत्येक झालेल्या कौतुकाबरोबर हवा भरली जाते.

आता achievement किंवा केलेलं कौतुक हे अभ्यासातल्या हुशारीपुरतंच मर्यादित नसतं. कोणी खेळात पुढे असतं, कोणी कुठल्या कलेत पुढे असतं, तर कोणी सगळ्यांकडून ‘गुणी मुलगा’ अशी पदवी मिळालेलं असतं! आणि या प्रत्येक माध्यमातून फुगा फुगवला जात असतो. त्यामुळे होतं असं, की जेव्हा ९वी-१०वी येते, तेव्हा प्रामुख्याने मुलांचे ३ गट पडलेले असतात. पहिला गट असतो हुशार मुलांचा! या गटात ५-६ मुलं असतात. त्यांच्यात पहिल्या तीनात नंबर येण्यासाठी चुरस असते. आपलं करियर उत्कृष्टच होणार असा विश्वास त्यांचा फुगा त्यांना देत असतो आणि वर्गातल्या बाकीच्या मुलांची नाही म्हटलं तरी त्यांना थोडीफार कीव येत असते. दुसरा गट असतो ‘हिरो’ मुलांचा! जे खेळात नाहीतर ‘Extracurricular activities’ मधे पुढे असतात आणि अभ्यासात बऱ्यापैकी असतात. त्यांचा फुगा त्यांना सांगतो की ही पहिली पाच मुलं म्हणजे फक्त पुस्तकी किडे आहेत! पुस्तकं चावून आयुष्यात काही होत नसतं. सर्वांगाने विकास झाला पाहिजे. तुम्हीच खरे ‘हिरो’ आहात! आणि तिसरा गट असतो थोडा आत्मविश्वास कमी असलेल्या मुलांचा. त्यांच्या achievements तशा कमी असतात. कौतुकही कदाचित फारसं झालेलं नसतं. त्यांच्या फुग्यात खूप कमी हवा असते. त्यामुळे त्यांचे फुगे काही बोलण्याच्या अवस्थेत नसतात!

पुढे कॉलेजमधे गेल्यावर कला-गुणांना व्यक्त करायला मोठा मंच मिळतो. तिथे फुगे फुगतात. काही मुली सौंदर्याच्या जोरावर किंवा आपल्याला मुलं किती भाव देतात या गोष्टीमुळे हवा भरत असतात. कॉलेजच्या cultural ग्रुप मधल्या मुलांचे फुगे तर एवढे मोठे असतात की एखादा जुनियर, त्याला अनुभव नसल्यामुळे काही चांगलं करूच शकत नाही यावर त्यांचा गाढ विश्वास असतो! ऑफिसमधे बॉसच्या फुग्यात हवा असते ती त्याला मिळालेल्या खुर्चीमुळे. आणि ‘आपला बॉस बिनडोक आहे. फक्त अनुभवाच्या जोरावर आज तो तिथे आहे.’ असा विचार जो जुनियर लोकांच्या मनात येतो, तो त्यांच्या फुग्यातल्या हवेमुळेच, नाही का!

हा इगोचा फुगा कधीकधी पंक्चर सुद्धा होतो! आपल्याला ज्या गोष्टीचा अभिमान आहे, त्याच गोष्टीत कोणी आपल्यापेक्षा श्रेष्ठ बघितल्यावर आपल्या फुग्याला भोक पडतं आणि हवा निघून जाते. पण निसर्ग तात्काळ आपल्याला पंक्चर काढून देतो आणि आपण पुन्हा त्यात हवा भरायला सज्ज होतो!

हाच फुगा कारणीभूत ठरतो नवरा-बायकोच्या ‘Classic’ भांडणांना! २ पिढ्यांपूर्वी बायका फक्त चूल आणि मूल करायच्या. तेव्हा फक्त पुरुषांच्या फुग्यात हवा असायची! नवऱ्याने उठ म्हटलं उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं! पण आज मुली शिकल्या. मुलांच्या खांद्याला खांदा लावून achieve करायला लागल्या. आता दोघांचे फुगे फुगलेले असतात. त्यामुळे ‘एवढं असेल तर तू कर ना स्वयंपाक. घर सांभाळ. मी जाते फक्त कमवायला.’ किंवा ‘नेहेमी तुझाच मुद्दा कसा काय रे बरोबर असतो? भांडण तुझ्याच वाक्याने संपलं पाहिजे का?’ ही अशी वाक्यं हमखास बोलली जातात!

‘बघितलंस, तिने स्वत:हून ओळखही नाही दाखवली. मीपण नाही दाखवणार!’, ‘मी का सॉरी म्हणू? तो पण चुकलाय. माझं घोडं काही त्याच्यावाचून अडत नाही!’... ही सगळी त्या फुग्यातल्या हवेचीच करामत..!

पण जरा विचार केला तर लक्षात येईल की हा हवा भरलेला फुगा जगायला आवश्यक असतो. जर त्याची काही गरजच नसती, तर निसर्गाने माणसाला त्याच्या जन्माबरोबर तो दिलाच नसता. माकडाचा माणूस होताना जसं गरज नसल्यामुळे निसर्गाने शेपटी काढून घेतली, तसंच त्याला फुगाही काढून घेता आला असता. आणि त्या फुग्यात हवाही असणं महत्वाचं आहे. नाहीतर अवस्था ९वी-१०वीतल्या त्या तिसऱ्या गटातल्या मुलांसारखी होईल. हवा भरलेला फुगा आपल्याला आत्मविश्वास देतो. फक्त त्या भरल्या जाणाऱ्या हवेवर आपलं नियंत्रण हवं. कुठली आणि किती हवा भरावी हे आपणच ठरवायचं. पाय जमिनीवर राहिले पाहिजेत. फुग्यातल्या हवेने मनाला उभारी यावी, पण त्याच हवेने आयुष्य ‘पोकळ’ होणार नाही ना ह्याची काळजी आपण घ्यायची..

Saturday, April 24, 2010

Bio-Tech

माणसाला चाकाचा शोध लागला आणि तिथेच नियतीने प्रगतीचा गिअर टाकला! तिथे जो गाडीने वेग पकडलाय, तो आजतागायत वाढतोच आहे.. तेव्हा गाडीतून जाताना माणसाने झाडावरचं सफरचंद तोडलं आणि आज त्याच हातात ‘Apple’ चा ‘i-phone’ आहे! पण या जगात माणूसच फक्त सजीव नाहीये. माणसाची ही तुफान प्रगती कदाचित प्राणी, वनस्पती आणि कीटकांना समजण्याच्या पलीकडची होती...!

या प्रगतीने कित्येक प्राणी निराश झाले असतील. सुतारपक्षी, ज्याला आपल्या धारदार चोचीचा अभिमान असतो, त्याने एक दिवस माणसाला ‘Electric cutter’ ने झाड तोडताना बघितलं असेल आणि त्याच्या मनात inferiority complex तयार झाला असेल. जिराफाने कधी अवाढव्य क्रेनला बघितलं असेल आणि आपल्यापेक्षाही उंच ‘प्राण्याला’ बघून तो खट्टू झाला असेल. फुलांचंही तसच काहीसं झालं असेल. एखादी तरुणी perfumeची बाटली अंगावर फवारून बाहेर जायला निघाली असेल आणि त्या artificial chemicals चा एवढा घमघमाट पसरला असेल की रस्त्यातल्या जाई, मोगरा, रातराणी अगदी हिरमुसल्या असतील बिचाऱ्या..!

माणसाने जेव्हा बंदुकीने वाघाची शिकार करायला सुरुवात केली, तेव्हा वाघाला कळलंच नसेल की आपण कशाने मरतोय! एकदा दोन वाघ असे जंगलातून चालले असतील. त्यातला एक वाघ माणसाला बघून त्याच्या अंगावर धावून गेला असेल आणि माणसाने त्याला गोळी घालून ठार केलं असेल. हे सगळं तो दुसरा वाघ लांबून बघत असेल. त्याला बंदूक म्हणजे काय, ते कळलं नसेल. पण त्याने त्याच्या सहकाऱ्यांना सांगितलं असेल की तो ३ पंजांचा माणूस होता आणि त्याने त्याच्या मधल्या पंजाचं नख फेकून आपल्या मित्राला मारलं! आणि मग तेव्हापासून वाघांच्या समाजात बछड्यांना तयार करताना हे शिकवलं जात असेल की ‘दोन पंजांचा माणूस असेल तरच हल्ला करा. ३ पंजांच्या माणसासमोर आपला टिकाव लागणं शक्य नाही..!’ डासांनाही ‘Good Knight’ चा शोध लागल्यापासून त्यांच्या संस्कारात एका शिकवणीची भर घालावी लागली असणार. ते पिल्लू डासांना शिकवत असतील की ‘जरा विवेकबुद्धीचा वापर करत जा. छान वास आला म्हणून तिकडेच गुणगुणत बसू नका!’ आणि डासांमधला ‘Murphy’s Law’ असेल..’जेव्हा शिकार शांत झोपलेला असतो आणि सुगंध दरवळत असतो तेव्हाच काहीतरी विपरीत घडायची तयारी चालू असते.’!!

पण फक्त निराशा आणि सावधानतेच्या पलीकडेही खूप गंमत-जंमत झाली असेल. एका teenager कबुतर तरुणीला जेव्हा पहिल्यांदाच विमान दिसलं असेल तेव्हा ती उडत जाऊन तिच्या आईला म्हणाली असेल, “आई, तू म्हणाली होतीस बघ, गरुड हा पक्षांचा राजा असतो..तो खूप देखणा आणि ताकदवान असतो..आज मी त्याच्याहून राजबिंडा आणि शक्तिशाली पक्षी पाहिला..!” आणि मग ती त्याचं वर्णन करण्यात रमून गेली असेल..! त्यानंतर कदाचित कित्येक पक्ष्यांनी ‘राजबिंड्या तरुणावर’ line मारायला म्हणून त्याच्या जवळ जाऊन प्राण गमावले असतील..

एका घरातली मुंगी, दुसऱ्या घरातल्या मुंगीला म्हणाली असेल, “तुम्ही कशा गं एवढं maintain करता? कमाल आहे बाई तुमची!” त्यावर दुसरी मुंगी म्हणाली असेल, “अगं आमच्या मालकिणीने साखर बदललीय. आता ती ‘sugarfree’ साखर वापरते! मग आम्हीपण तीच खातो. त्याने वजन नाही वाढत. तुला हवी असेल तर एक दाणा देते मी. चांगला महिनाभर पुरतो..!”

झेब्र्याने कधी झेब्रा-क्रॉसिंग बघितलं असेल, तेव्हा त्याला वाटलं असेल की तिथे आपला मित्र झोपलाय! त्याने खूप वेळा त्याला उठवायचा प्रयत्न केला असेल..आणि मग सिग्नल सुटल्यावर जेव्हा भरदाव वेगाने गाड्या त्यावरून गेल्या असतील तेव्हा ‘त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असेल’ असं समजून त्या बिचाऱ्याने शोक व्यक्त केला असेल..!

मेंढ्यांचा कळप जाताना तिथे एक लहान मुलगी लोकरीचा स्वेटर घालून आपल्या आईबरोबर चालली असेल. त्यातल्या एखाद्या मेंढीला ते बघून वाटलं असेल, ‘अरे! हिच्या अंगावर पण लोकर? आपल्यातलीच कोणीतरी दिसतीय..!’ असं समजून ख्याली-खुशाली विचारायला म्हणून ती जवळ गेली असेल आणि त्या मुलीच्या आईने दगड मारून तिला हाकललं असेल..बिचारी मेंढी..आपल्या मैत्रिणींना म्हणाली असेल, “कलियुग आहे बघ. आजकाल ‘मेंढीसकीच’ राहिली नाहीये! जुन्या काळातल्या मेंढ्या किती प्रेमाने वागायच्या एकमेकींशी..!”

देवमासा मोठ्या जहाजाला बघून घाबरला असेल, मधमाश्या चुकून ‘artificial flowers’ वर मध मिळायच्या अपेक्षेने येऊन गंडल्या असतील, मांजराने चुकून computerच्या ‘mouse’वर झडप घातली असेल आणि सापाला प्रभुदेवा किंवा हृतिकचा डान्स बघून गंमत वाटली असेल!

वनस्पती विश्वातल्या गंमती-जंमतींनापण अगदी उधाण आलं असेल! काही आंबे पटकन पिकावेत म्हणून ‘artificial ripening’ पद्धतीने त्यांना पिकवलं असेल आणि त्यांना बघून त्यांचे मित्र घाबरले असतील! मग आंब्यांच्या विश्वात theories मांडल्या गेल्या असतील. कुणाचं म्हणणं असेल की त्यांना ‘अकाली वृद्धत्व’ आलंय. मग काहीजणांना ‘पा’ सिनेमा आठवला असेल! आंब्यांमधला Einstein तर म्हणाला असेल, “आपण नक्कीच ‘Speed of light’ पेक्षा जास्त वेगाने जाऊन आलोय. ‘time lag’ झालाय मित्रांनो! म्हणूनच आपण तेवढेच राहिलोय आणि ह्यांची वयं वाढलीयत..!!

गुलाबाचं वेगळ्याच रंगाचं कलम बघून ‘बाबा लाल गुलाब’ ‘आई लाल गुलाबाला’ त्या दुसऱ्यांच्या पोराकडे बघून म्हणाले असतील, “बघितलंस ते? हे असं होतं आंतरजातीय विवाह केल्याने! पोरांवर संस्कार केले नाहीत की हे असं बघायला मिळतं!” पण गुलाबातले अब्दुल ‘कलाम’ म्हणाले असतील, “आपण या ‘कलम’ पद्धतीचं स्वागतच केलं पाहिजे! ही मानवाच्या तंत्रद्यानाची झेप आहे..!”

Seedless द्राक्षांना हे कायमचं दु:ख असेल की आपण कधी आई होऊ शकणार नाही! ‘कापा फणस’ ‘बरक्या फणसाला’ म्हणाला असेल, “लोकं भाजी करतील तुझी एक दिवस. ते शिजवतील तुला. तयारी ठेव. मी तुला आधीच सांगितलंय ‘बरंका’!” आणि केळी केळफुलाला म्हणाली असतील, “Don’t be fool! आम्हाला कच्चं खाल्लं तरी केळफुलाची भाजी खूप ‘tasty’ असते! त्यामुळे तू भी गया रे..!”

पण ही गंमत-जंमत, हे रुसवे-फुगवे, ही सुखं-दु:खं अजून काही वर्षांतच संपून जातील. भारतातल्या चिमण्यांनी factoryच्या चिमणीतून येणाऱ्या धुरामुळे कधीच देश सोडलाय. वाढत्या प्रदूषणामुळे त्या लवकरच जगही सोडतील. आता वाघासमोर येणारा प्रत्येक माणूस ३ पंजांचा असतो. आणि त्या वाघाने हल्ला केला नाही तरी त्याला प्राणाला मुकावे लागते. त्यांचीही संख्या दिवसेंदिवस कमी होतीय. आणि हे सगळं मेंढ्यांची मेंढीसकी कमी होतीय म्हणून नाही, तर माणसाची माणुसकी कमी झालीय म्हणून होतंय..
कोण जाणे, अपरिमित वृक्षतोड होऊन त्या जागी कॉंक्रीटचं जंगल झाल्यामुळे पृथ्वी विचार करत असेल की ‘माझे पूर्वीचे मऊ, मुलायम केस आता खूप राठ झालेत. एकदा शाम्पू लाऊन ते खसाखस धुतले पाहिजेत.’ आणि म्हणूनच ज्वालामुखी आणि विनाशकारी महापूर येऊ घातले असतील...


(आमोद आगाशे आणि सुशांत खोपकर यांच्या 'विनोदाची चादर' या लेखमालेतला हा दुसरा लेख)

Thursday, April 22, 2010

आई

आई..

तो तांदूळ काही वेगळा नसतो,
तूरडाळपण तीच असते.
भूकेचाही प्रश्न नसतो खरंतर,
ती तुझ्या हाताचीच चव असते.


घरासारखं घर असतं ते,
त्याला चार भिंती आणि एक छप्पर असतं.
पण त्याची ओढ आणि त्यातली प्रसन्नता,
याला कारण तुझंच अस्तित्व असतं.


मी काढलेलं चित्र जेमतेमच असतं खरं म्हणजे,
मी केलेली कवितापण ठीकच असते.
पण त्यावेळी मी मोठा कलावंत असतो आणि,
तुझ्या डोळ्यातलं कौतुक, ही त्याचीच पावती असते.


दृष्ट काढून काही होत नसतं आई,
ती केवळ अंधश्रद्धा असते.
पण तरीही मी सुरक्षित राहतो,
कारण त्यावर तुझी श्रद्धा असते.


घरी कधी वाद होतात तर कधी भांडणं,
प्रत्येकाचाच ‘मी’पणा अधून-मधून डोकावतो.
पण तरीही नाती घट्ट राहतात,
कारण आमच्या ‘मी’पणाला देखील तुझाच लळा असतो!


कुणीच कुणाचं नसतं ग इथे,
प्रत्येक जण स्वतःमधे बुडलेला असतो.
पण एकटेपणा जाणवत नाही कधी बघ.
आई, तुझं प्रेम हा खूप मोठा आधार असतो..

Saturday, April 3, 2010

तत्वज्ञान

• शिऱ्या तुला खरं सांगू..काही अर्थच राहिला नाहीये बघ आयुष्याला! जखडून गेलोय बघ आपण सगळीकडून. काही मनासारखं करताच येत नाही..नाही करायचंय Engineering! अगदीच नाही..पण मग प्रतिष्ठित career कुठून होणार? पैसा कुठून मिळणार…
* मग का आलास Engineering ला? नव्हती आवड, तर नाही यायचं इकडे..
• वाह बेटा शिऱ्या! जसं काय तू तुझ्या आवडीने आलायस इकडे. हातात Screw Driverच घेऊन जन्माला आला होतास ना तू! ऊSSऊSS करत रडण्याऐवजी स्क्रूSSस्क्रूSS करत रडला होतास! आणि स्वतःचाच पाळणा dismantle करायला निघाला होतास ना! काय बोलतोयस..
मला सांग, महाराष्ट्रात दर वर्षी किती मुले १२ वी देत असतील?
* काय माहिती..
• आकडा कितीपण असू देत. त्यातली ८०% मुलं तरी Engineering किंवा Medical CET देतात. बरोबर?
* बरोबर.
• मला सांग, जगात एवढ्या fields आहेत. निसर्ग या एवढ्या सगळ्या मुलांना Engineering किंवा Medical मधेच आवड आणि गती देतो का? निसर्गाला कळतं होय, या fieldsमधे scope जास्त आहे म्हणून..? सालं झूठ आहे सगळं! सगळ्या बाता साल्या...सगळ्यांना कागदावरचे गांधीजी हवेत आणि नंतर जॉर्ज वॉंशिंग्टन!
* खरं आहे तुझं..
• अरे जगात खूप चांगली कामं आहेत. जी करायची गरज आहे. मला समाजकार्य करायला आवडतं..भारतात किती मागासलेली, गरीब खेडी आहेत. त्यांचा विकास करता येईल. हे किती चांगलं कार्य आहे.. गरज आहे देशाला त्याची. पण याला Commercial aspect शून्य आहे. उद्या जायचो मी खेडयापाड्यांचा विकास करायला, खाण्यापिण्याची बोंब व्हायची माझ्या आणि त्या खेडयातच कायमचं राहायची वेळ यायची माझ्यावर!
या उलट Computer field बघ. १९९० च्या आधी आम्हा सगळ्या Engineersचे interest Mechanical किंवा Civil Engineering होते. आणि त्यानंतर आता सगळ्यांची आवड Computer Engineering झालीय..! शिऱ्या तुला सांगतो..एकवेळ कोड झालेली मुलगी सून म्हणून स्वीकारतील लोकं, पण coding येत नसेल तर आजकाल कुत्रही विचारात नाही तुम्हाला! का असं?
* आणि हे आयुष्यातलं मोठं 'कोडं'च आहे! नाही का?
• तुला jokes सुचतायत शिऱ्या?
• अरे लेका विचार कर, जर आवडीचं काम नाही मिळालं करायला, तर पोटापाण्यासाठी राबणं म्हणजे गुरा-ढोरांसारखंच झालं की रे! निम्मं आयुष्य जाईल आपलं ऑफिसात, जे आवडत नाहीये, तेच करत बसण्यात! काही अर्थ आहे का रे?
* अरे, मग जे काम मिळालंय ते आवडीने करूयात ना..
• म्हणजे compromise! ना? मनाची समजूत घाला स्वतःच्या. अरे किती फसवायचं स्वतःला सांग. ही शाळेतली लहान मुलं टप्पाटप आत्महत्या करतायत ना.. काही उगाच नाही रे..त्यांना कळलं की नाहीये आयुष्याला काही अर्थ आणि त्यांना compromiseही करायचं नव्हतं. म्हणून ‘Give me some sunshine’ म्हणत म्हणत गेली बिचारी..
* छ्या सौऱ्या काहीतरीच.. अरे ‘I want to grow up once again’ असं म्हणायला काही अर्थ तरी आहे का? आधी एकदा तरी grow व्हा, againचं पुढे बघू की! तुला आत्महत्या हा option वाटतो?
• नाही रे! मुळीच नाही..लढूयात की! पण प्रवाहाबरोबर नाही जायचंय बघ. प्रवाहाबरोबर जाणं खूप सोपं असतं रे..नुसतं तरंगायचं..प्रवाह नेतो बरोबर आपल्याला मग..ही जी सगळी career oriented लोकं आहेत ना, काय हवं असतं त्यांना..? Degree? मग छान नोकरी? छोकरी? गाडी..बंगला..भरपूर पैसा..सगळ्या सुखसोयी..पण पुढे काय? What Next? आत्तापर्यंत हजारो,लाखो लोकांनी हे सगळं कमावलं असेल..पण is that it? घाम गाळून हे सगळं कमवून श्वास सोडून द्यायला आहे हे आयुष्य? काय अर्थ आहे रे...?
* का? तुला नकोय हे सगळं? आणि..छोकरी पण नकोय..??
• नाही, असं नाही रे! पण हे सगळं कमावणं हेच आयुष्याचं अंतिम ध्येय कसं असू शकतं..? आणि छोकरी म्हणालास तर आजकालच्या पोरी, तुला सांगतो शिऱ्या...अक्कल गहाण टाकून आल्यात देवाकडे! अरे, मुलगा कसा आहे, काही फरकच पडत नाही त्यांना! त्याच्याकडे भरपूर पैसा असेल, एकुलता एक मुलगा असेल, मोठया पोस्टवर असेल तर झाल्या एका पायावर तयार! माझी सानिया मिर्झा...शोएब मलिक?? तिची बुद्धी नक्कीच 'लिक' होत असणार बघ..!
* तुझी सानिया मिर्झा..?!
• माझी म्हणजे भारताची रे! 'भारत माझा देश आहे' म्हणतो ना..म्हणून माझी म्हटलं! आता खेळेल पाकड्यांकडून! देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे रे.. जागत नाहीत पोरी अस्मितेला आजकाल..आणि ती ‘B’ divisionची अस्मिता.. एवढं सगळं दिलंय देवाने..तिला तो 'बाल की दुकान' चिन्मय आवडला..?! जगात काय होतंय बघ रे शिऱ्या..!
* बरं...म्हणजे मुद्दा 'अस्मितेचा' आहे तर..अस्मिता चव्हाणचा!
• नाही रे शिऱ्या..तुला कळत नाहीये...मी सांगायचा प्रयत्न करतोय, की तू कुठूनही बघ. आयुष्याला काहीही अर्थ नाहीये..जन्माला आलो जगायचं..जा म्हटलं की जायचं..! खेळ मांडलाय नुसता..खेळ!
पण नाही शिऱ्या.. तो खेळसुद्धा अक्षय कुमार होऊन खेळायचा..
* अक्षय कुमार?
• खिलाडी रे! बासंच! अशी fight मारुयात ना..काहीतरी करूनच दाखवूयात! काय करता येईल रे? काय वाटतं...?
* खरं सांगू..?
• बोल ना..
* अभ्यास करूयात का..? उद्या पेपर आहे रे!
• काय रे शिऱ्या तू..?!
* बर मग बसू चर्चा करत..होऊ दोघं जणं नापास! चल बोलू आयुष्यावर..
• च्यायला १ तास झाला? १५ मिनिटंच ब्रेक घेतला होता ना..! शिऱ्या होईल का रे अभ्यास? मला जाम tension आलंय..अरे खूप वाजलेत रे..झोपुयात का? उद्या ४ वाजता उठून करू.. होईल ना..?!

~~~~~~~~~~~~~

• चल शिऱ्या बस मागे..
* काय रे, कसा होता पेपर?
• चांगला होता..झाला बघ एकदाचा..परीक्षा संपली..फार सुटल्यासारखं वाटतंय बघ.. ह्या Pulsar ची मजा काही औरच आहे! कसलं design आहे..खासंच! असं मस्त ८० चा speed..समोर मोठ्ठा मोकळा highway..लोणावळ्याचा रस्ता..आणि समोरून येणारा गारेगार वारा.. हा वारा म्हणजे, असं राजा चालताना समोर शे-सव्वाशे लोकं मुजरा करतात ना.. तसाच मुजरा घालतोय असं वाटतंय! ही life आहे बघ गडया...असं पावसाळी वातावरण..त्या टपरीवरची कांद्याची खेकडा भजी आणि वाफाळता चहा.. अहाहा! मज्जानु life!
* खरं आहे बघ! कसलीच फिकीर नाही! अरे, ती कालची चर्चा पुढे नेऊयात..? आयुष्यात काय करायचं वगैरे..
• करू रे..सावकाश करू..आत्ता डोक्याला कसला ताप नकोय बघ..आत्ताच परीक्षा संपलीय..आता फक्त enjoy करायचं...!!


'माणूस जेव्हा खराखुरा आनंदी असतो ना, तेव्हा त्याला तत्वज्ञान कधीच सुचत नसतं.. पण तेव्हाच नियती त्याला तत्वज्ञान सुचवायची तयारी करत असते..आणि म्हणूनच माणूस सतत आनंदी राहू शकत नाही.'- सुर्फी’s law

Friday, March 26, 2010

युग युग जियो!

आत्तापर्यंतची चार युगे मानली जातात. सत्य युग, त्रेता युग, द्वापार युग आणि आपलं कलियुग! एक सज्जन सत्य युग सोडलं, तर प्रत्येक युगात काही चांगल्या गोष्टी झाल्या तर काही वाईट. पण सगळ्यात जास्त शिव्या ह्या आपल्या आत्ताच्या कलियुगालाच दिल्या जातात! म्हणजे बघा, महाभारत इसवी सन पूर्व ३१३७ वर्षांपूर्वी झालं. त्यानंतर ३५ वर्षांनी कृष्णानी प्राण सोडले. आणि तिथेच सुरु झालं आपलं हे शिव्या-शापांनी भरलेलं, दुष्ट प्रवृत्तीचं, वाईट असं कलियुग!

आता ज्ञानेश्वर-तुकारामांसारखे थोर संत, शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, राणा प्रताप, यांसारखे थोर योद्धे, हे सुद्धा कलियुगातलेच! तरीसुद्धा त्यांचा काळ हा बऱ्यापैकी 'चांगला' काळ मानला जातो. सगळ्यात वाईट हा आत्ताचा, आपला काळ! आपण याला 'उत्तर कलियुग' म्हणूयात. या उत्तर कलियुगात सगळीकडे भ्रष्टाचार बोकाळलाय, महागाई वाढलीय, आपणच प्रदूषणाने पृथ्वीचा नाश करू पाहतोय...तर असं हे आपलं 'उत्तर कलियुग' सगळ्यात वाईट युग आहे!

पण आपण याच युगाचा आता भाग आहोत. म्हणून या युगात निमुटपणे जगणे आपल्याला भाग आहे! म्हणून या 'उत्तर कलियुगावर' मी विचार करायला लागलो.. खरंच एवढं वाईट आहे का हे? एखादी तरी चांगली गोष्ट असेलच की! काय बरं असेल ती चांगली गोष्ट..? असा विचार करताना पहिली गोष्ट मनात चमकली ती म्हणजे 'Technology'..तंत्रज्ञान! तंत्रज्ञानालाही सरळसोट शिव्या घातल्या जातात! पण या तंत्रज्ञानाचे फायदेही अनेक आहेत. जर आत्ताएवढं प्रगत तंत्रज्ञान या आधीच्या युगांत असतं, तर त्या युगातल्या लोकांना काही मदत झाली असती का..?

अहो नक्कीच झाली असती! म्हणजे बघा, आपल्याला माहितीय कर्णाचा मृत्यू त्याच्या रथाचं चाक जमिनीत रुतल्यामुळे झाला. कर्णाच्या रथाचं चाक जमिनीत रुतलं, तो खाली उतरून ते काढायचा प्रयत्न करू लागला आणि तेवढ्यात अर्जुनाने त्याचा वध केला. पण जर का त्यांची तांत्रिक प्रगती झाली असती, तर कर्णाचा रथ म्हणजे ‘All wheel drive’, SUV (Sports Utility Vehicle) असता! आणि त्याला खाली उतरून चाक काढायची गरजच पडली नसती..दुसरं उदाहरण म्हणजे अभिमन्यूचं. चक्रव्यूह ही सैन्याची रचना. अभिमन्यूला चक्रव्युहात शिरायचं कसं हे माहिती होतं. पण ते भेदून बाहेर कसं यायचं, याचं ज्ञान त्याला नव्हतं. आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला. पण जर का त्यावेळी त्याच्या जवळ GPS (Global Positioning System) हे device असतं..तर त्याच device ने त्याला सांगितलं असतं.. ‘Take left from here. Go straight. Kill that Kaurav and take next exit..’ वगैरे! आणि त्याचाही मग जीव वाचू शकला असता..

त्या काळच्या दुष्ट लोकांचाही फायदा झालाच असता की! म्हणजे सुदर्शन चक्राने सूर्याला झाकून श्रीकृष्णाने जयद्रथाला गंडवलं होतं! आणि अर्जुनाने त्याचा वध करून आपली प्रतिज्ञा पूर्ण केली होती..पण जर त्यावेळी जयद्रथाने ‘Weather Forecast’ check केलं असतं..तर त्याला सूर्यास्ताची exact वेळ कळली असती! आणि मग कृष्ण त्याला गंडवू शकला नसता..! भीमाने युद्धाचे नियम तोडून दुर्योधनाच्या मांडीवर गदेचा प्रहार केला. पण जर दुर्योधनाने त्या वेळी थाय पॅड घातलं असतं, तर तो वाचू शकला असता! किंवा कोण जाणे, कदाचित त्या काळी ‘technology’ असती, तर १०० कौरव झालेच नसते!!

रामायणातही खूप फायदा झाला असता तंत्रज्ञानाचा..आता लक्ष्मणाला वाचवायला जी संजीवनी वनस्पती लागत होती, ती आणायला हनुमान इतक्या लांब द्रोणागिरी पर्वतावर गेला. आणि एवढंच नाही, तर तो अख्खा द्रोणागिरी पर्वतच घेऊन आला! एवढं करण्यापेक्षा ‘Google’ वर search करून जवळच्या केमिस्टकडे नसती मिळाली संजीवनी?!

किंवा हनुमानाने शेपटीला आग लावून अवघी लंका जाळली! तेंव्हा एक साधा Fire Extinguisher असता, तर वाचली असती लंका! आज त्या श्रीलंकेची लोकं जरा तरी उजळ असती! किंवा कमीतकमी क्रिकेट ग्राउंडवर फिल्डिंग करणाऱ्या श्रीलंकेच्या प्लेयर्सपैकी नक्की कोण कुठे उभा आहे, हे तरी समजलं असतं! आणि रावणाचा वध झाल्यावर, रामायण संपताना, सीतेला अगदी अग्निपरीक्षा द्यावी लागली नसती. साधी ‘Lie Detector Test’ पुरली असती की तिला!

या तंत्रज्ञानाने सगळे काही फायदेच झाले असते, असंही नाही! काही तोटेही झाले असते. Mediaचा धुमाकूळ हा त्यातला एक मोठा तोटा! त्याकाळीही मग Mediaचा सगळीकडे मुक्त वावर असता..राम, लक्ष्मण, सीता वनवासात गेले असताना तिथेही मग Mediaची लोकं सापडली असती! काय दृश्य असतं ते...! एक जण रामाला विचारतोय, "प्रभु राम, आप कैसा मेहेसूस कर रहे है? आपकी सौतेली माँ, कैकेयी, आपसे इतनी नफ़रत क्यूँ करती है?" तर दुसरा सीतेला विचारात असेल, "इतने रईस खानदान की बहु होते हुए भी आज आपपे ये नौबत आयी है| क्या प्रभु राम से शादी करने का आपका निर्णय सही था? आपकी क्या राय है?!" किंवा 'आज तक' ने ‘Breaking News’ दाखवली असती..'खबर मिली है के अभी अभी प्रभु रामने एक फल का प्राशन किया है| और ये एक ऐसा फल है, जिसके बारे में ना किसीने कभी सुना था, ना किसीने इस फल को कभी देखा है! जहरीला भी हो सकता है ये फल..! क्या प्रभु राम जिंदा रहेंगे..? क्या ये फल 'रामफल' नाम से जाना जाएगा?..अभी अभी खबर मिली है के सीताने भी प्रभु राम का अनुयय करते हुए ऐसाही एक फल खाया है! अब उस फलको 'सीताफल' की संज्ञा प्राप्त हुई है! राम और सीता को देखकर लक्ष्मणनेभी एक फल खाया है! लेकिन ठहरिये, उस फल को 'लक्ष्मणफल' कहेनी की जरुरत नहीं है| क्यूँ के खबर के मुताबिक लक्ष्मण हापूस आम खा रहा था!!

मराठी News channel वाले सुद्धा काही मागे नसतील! 'आत्ताच एक हेलावून टाकणारी बातमी मिळाली आहे! लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापलं आहे! राम त्यावर बेहद्द खुश झाले आहेत!' मी किशोर, कॅमेरामन किरणसोबत, स्टार माझा! 'आत्ताच एक नवी बातमी मिळाली आहे..रामाने खुश होऊन लक्ष्मणाला वर दिला आहे की 'इथून पुढचा ६२ वा जन्म तू भारत देशातच घेशील. तू खूप प्रसिद्ध होशील! भारताकडून क्रिकेट खेळशील आणि IPLमधे हैद्राबाद डेक्कन चार्जर्सचा कॅप्टन होशील! तेंव्हा तुझं नाव व्ही.व्ही.एस.लक्ष्मण असेल...!!'
आता आपल्या सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे की प्रभू राम त्यांच्या ६२ व्या जन्मात कोण असतील..? आम्ही हे खुद्द प्रभू रामालाच विचारलं, पण त्यांनी उत्तर न देण्याचं पसंत केलं..त्यांनी फक्त काही संकेत, काही hints दिल्या आहेत. त्यांचे शब्द होते..'मी तेव्हाही लक्ष्मणाला साथ देईन. या जन्मात मी दशरथाचा पुत्र आहे आणि दशमुखी रावणाचा वध करणार आहे. त्या जन्मात 'दश' हा शब्द माझ्या आडनावात असेल. माझी उंची थोडी कमी असेल आणि केस कुरळे असतील..' कोण असेल राम त्या जन्मात? काय असेल त्याचं आडनाव? दशपुत्रे? आपण फक्त अंदाजच बांधू शकतो..कॅमेरामन किरणसोबत, मी किशोर, स्टार माझा..!

याबरोबरच अशा कित्येक गमती-जमती होतील! तंत्रज्ञान असतं तर यम यामाहावरून आणि देवाचे राजदूत, राजदूत मोटरसायकलवरून फिरले असते! गणपतीने उंदराऐवजी टाटा नॅनो पसंत केली असती! भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपुने विचारलं असतं, " काय रे, या खांबात आहे का तुझा देव?" आणि हो म्हणाल्यावर त्याने गदेने त्या खांबावर जोरदार प्रहार केला असता. पण तो खांब काही तुटला नसता. दोन, चार, दहा, अगदी शंभर वेळा प्रहार करूनही तुटला नसता! आणि नंतर कळलं असतं की त्या खांबात 'अंबुजा सिमेंट' वापरलंय! कर्ण त्याच्या आईला म्हणाला असता, "आई ही permanent कुंडलं नकोत मला. त्यापेक्षा मी फिरकीची कानातली घालतो! रोज बदलत जाईन!" द्रोणाचार्यांकडे शिकायला CET द्यावी लागली असती! एकलव्याने मग त्यांचे ‘Online Courses’ घेतले असते! बिचाऱ्याचा अंगठा वाचला असता..! श्रावणबाळाने नदीवर पाणी आणायला जाऊन प्राण नसता गमावला. त्याने जवळच्या ‘Vending machine’ मधून ‘Mineral water’ ची बाटली काढून दिली असती आपल्या आई-वडिलांना! गांधीजी ‘Cotton King’ चे brand ambassador असते, रामदास स्वामींची ‘Fitness club’ ची chain असती, तर ज्ञानेश्वरांचे प्राकृत मराठीचे classes प्रसिद्ध झाले असते! आणि युद्ध्याची सुरुवात शंख फुंकून व्हायच्या ऐवजी अजय-अतुलच्या दमदार गाण्याने झाली असती! भीष्मांनी त्यांची 'भीष्म प्रतिज्ञा' सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘buzz’ वर नाहीतर ‘facebook’ वर टाकली असती! भीष्म एवढे सुस्वरूप आणि तरणेबांड! आता ते ब्रम्हचर्यत्व स्वीकारणार हे वाचून, आणि आता आपल्याला scope जास्त आहे, असा विचार करून त्या काळच्या तरुणांनी तो status message ‘Like’ केला असता! तर तरुणी हे ऐकून हिरमुसल्या असत्या! किंवा युधिष्टिर Facebook वर ‘Lover of the day’ खेळला असता आणि उत्तर आलं असतं गांधारी! आणि कदाचित हेच कारण ठरलं असतं महायुद्धाचं...

खरंच, कोणी काही म्हणा, पण आपलं हे 'उत्तर कलियुग' आणि त्याची तंत्रज्ञानाची देणगी अगदीच काही वाईट नाहीये! जसं बाकी युगात काही चांगलं होतं आणि काही वाईट होतं, तसं आपल्याही युगात आहे..या वीरांनी त्यांची युगं गाजवली, आपण आपलं गाजवूयात! खूपसं वाईट असलं तरी चांगलं ते वेचूयात. ‘3 idiots’ नुसार आपल्या युगात ‘Life is a broken अंडा' असते. आणि म्हणूनच आपलं युग हे 'युगांडा' आहे! तरी त्या युगांडात भरताचं राज्य आणुयात. त्याचा खराखुरा पूर्वीसारखा भारत करूयात...!


(आमोद आगाशे आणि सुशांत खोपकर यांच्या 'विनोदाची चादर' या लेखमालेतला हा पहिला लेख!)

Saturday, March 20, 2010

शेवट..

पश्चिमेच्या खोल डोहात सूर्य बुडायला सुरुवात झालेली असते. संध्येच्या तांबूस-पिवळ्याला काळसर छटा कवेत घ्यायचा प्रयत्न करत असते. क्षणाक्षणाला रंग गहिरा होत असतो. पाकोळ्या सैरभैर उडत असतात. हलकेच, पण गंभीरपणे वाहणारा वारा जमिनीवरच्या कोरडया मातीला उडवत असतो. फांद्यांचा सांगाडा झालेल्या, पर्णहीन होऊ घातलेल्या झाडावरचं शेवटचं पिकलेलं पिवळं पान देठापासून वेगळं व्हायची वाट बघत असतं.. शेवट आलेला असतो...

परवा बिछान्यातून उठताना मी डोळे उघडत होतो..तर मला दोन मोठ्ठी काळी शिंगं दिसली! क्षणभर एवढा खूष झालो मी..! वाटलं आली वेळ आपली. आला यमराज सोडवायला..! पण कसलं काय! गोखले डॉक्टरांची काळी कुळकुळीत दाढी होती ती! मी पूर्ण डोळे उघडताच मला म्हणाले, "आजोबा, बरं आहे का? जेवण झाल्यावर ताट ठेवायला म्हणून निघालात आणि चक्कर आली तुम्हाला! शुगर थोडी वाढली होती. पण आता सगळं नॉर्मल आहे. त्या गोळ्या वेळच्यावेळी घेणं चालू ठेवा. काळजी घ्या. चला मी येतो.." अहो काय सांगू तुम्हा दोघींना! चक्कर आली होती की झोपेतून उठतोय, हेही कळत नाही हल्ली मला!

ह्या दाढीवाल्या गोखले डॉक्टरांचं मला विशेष कौतुक वाटतं! एकदा ते असेच मला तपासायला घरी आले होते आणि तपासून झाल्यावर ते माझ्या शेजारीच बसलेत, हे मी साफ विसरलो! त्यांच्या समोरच मी मुलाला म्हणालो, "त्या गोखले डॉक्टरांचं औषध काही काम करत नाही बघ! दुखणं काही थांबत नाही. आपण डॉक्टर बदलुयात का?!" त्यावेळी माझ्या मुलाचा चेहेरा अगदी बघण्यासारखा झाला होता! पण हे बिचारे गोखले डॉक्टर तरीही येतात. मला तपासतात, विचारपूस करतात.

पण मी चक्कर येऊन पडलो त्या दिवशी माझा मुलगा चांगलाच घाबरला होता! त्याने मला चांगलंच खडसावलं..मला नीटसं आठवत नाही, पण 'कोणालातरी हाक मारत जा' असं काहीतरी म्हणाला. पण आता तुम्हीच सांगा, सारखं त्या बाईंना हाका मारणं बरं वाटतं का? आणि हा नातू माझा लहान आहे..बाकी सगळे कामाला. कोणाला हाक मारायची? आणि तेही फक्त ताट ठेवायला...

आधी रात्री आम्ही सगळे एकत्रच जेवायचो. पण नंतर माझ्या अंगाला कंप सुटायला सुरुवात झाली. हातात कितीही ताकद आणली तरी तो थरथरायचा काही थांबेना. चमच्यातलं तोंडात जायच्या आधी अर्ध-अधिक खाली सांडायला लागलं. माझा नातू हसायचा मला मग..लहान आहे तो बिचारा. त्याला काय कळतंय..आता सूनबाई मला आधी वाढतात जेवायला.

सूनबाईंना माझा सगळ्यात जास्त त्रास होतो. त्यांना मी म्हणजे, घरातली एक अडगळ वाटते..मग माझ्यावरून कधी कधी मुलात आणि सुनेत भांडणं होतात. पण मला सूनबाईंचं काही चुकीचं वाटत नाही. अहो, माझी मलाच अडचण होते हल्ली..स्वतःचाच त्रास होतो! सूनबाईंचं काय घेऊन बसलायत! आंघोळ करायचं म्हटलं की ज्या अग्निदिव्याला मला सामोरं जावं लागतं..ते माझं मलाच ठाऊक!

रात्र झाली का हो? थांबा, मी उठून बसतो. आई Sग..पाय खूप दुखतो माझा..तरुणपणी काय व्यायाम करायचो माहितीय तुम्हाला! आमच्या ग्रुपमधे सगळ्यात फिट मीच होतो! नंतर रिटायर झाल्यावरही आमच्या ग्रुपमधे आम्ही पंजा लावायचो. मला कोणीच हरवू शकायचं नाही! पण हळू हळू ताकद कमी होते. हे अवयव साथ सोडू पाहतात. अंग खूप दुखतं हो..उभं राहिलं की गुडघे दुखतात आणि बसलं की कंबर. एक क्षण थांबत नाही. पण रात्री एकदा झोप लागली की मग काही जाणवत नाही. पण मग पुन्हा सकाळी जाग आली की सगळं दुखायला सुरुवात होते! म्हणून वाटतं जागंच येऊ नये..कायमचीच झोप लागावी..आमच्या ग्रुपमधले सगळे गेले मला सोडून. मी असा हा एकटाच आता वाट बघत बसलोय..वर जाऊन पुन्हा पंजात हरवीन एकेकाला!

लहानपणी तर मी अभ्यास आणि खेळ, दोन्हीत पुढे होतो. सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याचं पारितोषिक मिळालं होतं मला. ते दिवसच मंतरलेले होते..मी अगदी खवय्या होतो! आणि मला पैजा लावायचा भारी शौक! एकदा पैज लावून हॉटेलमधे मेनूकार्डवरची प्रत्येक डीश मागवून संपवून दाखवली होती! आमचं गणपतीचं आणि दहीहंडीचं पथक होतं. मी सगळ्यात वरच्या माळ्यावर चढून दहीहंडी फोडायचो! एका गोकुळाष्टमीला तर मी ५ ठिकाणच्या हंडया फोडल्या होत्या! कामातही मी अगदी चोख बरंका! मला आमचे साहेब म्हणायचे, "तुझ्यावाचून आपल्या ऑफिसचं पान हलत नाही...तू एक दिवस मोठा साहेब होणार बघ! माझ्याहून मोठा साहेब!" मी पत्तेपण छान खेळायचो. आम्ही सगळे भावंडं जमलो की रम्मीचा डाव व्हायचा. एक पॉईंट- एक पैसा. आमची 'ही' पण मस्त खेळायची रम्मी! नेहेमी ती नाहीतर मीच जिंकायचो! आता राहिलं नाही काही यातलं..इस्पिक राजा झालाय म्हातारा आणि इस्पिक राणीतर गायबच झालीय कॅटमधून...

खरं म्हणजे आता कशाचं काहीच वाटत नाही मला. जेवताना पदार्थांच्या चवी नीटशा कळत नाहीत. स्पष्ट दिसत नाही, त्यामुळे वाचू शकत नाही. टी.व्ही बघता येत नाही. ऐकूही नीट येत नाही. सगळ्या इच्छा-आकांक्षा कधीच संपून गेल्यात.. पण 'ही' गेल्यापासून एकटेपणा जास्त जाणवतो. म्हातारपणात सगळं गेलं तरी प्रेम, आपुलकी या भावना काही शेवटपर्यंत जात नाहीत. आजही वाटतं कोणीतरी येऊन आपल्याशी बोलावं. संध्याकाळी छान गप्पा माराव्यात. निदान..माझ्या मुलाने तरी... पण नंतर वाटतं कदाचित माझ्याच अपेक्षा अवाजवी आहेत. बाहेरचं जग आता खूपच धकाधकीचं झालंय म्हणतात..जो काही थोडासा वेळ मिळत असेल त्यांना, तो त्यांनी संसाराला द्यावा. अगदी मान्य आहे. खरं सांगायचं तर आता माझी पिढीच संपलीय. माझ्यासाठी जागाच नाहीये इकडे आता. म्हणून मी सारखी मृत्यूची वाट बघत असतो...

पण तुम्हा दोघींना अगदी खास धन्यवाद बरं का! तुम्ही मला नेहेमी साथ देता. २००४ साली, म्हणजे बघा.. ६ वर्षांपूर्वी माझे अगदी सगळे दात मला सोडून गेले. त्यानंतर तुमचीच तर साथ मिळालीय मला!

अरे, झालीच बघा जेवणाची वेळ! रोजच्यासारखी साथ देणार ना मला? जेवण झाल्यावर छान आंघोळ घालीन मी तुम्हाला..

ती कसली भाजी होती, कळलं का हो? कोबी होता बहुतेक..का भेंडी होती? देव जाणे! बर, तुम्हा दोघींना मी परवाची गंमत सांगितली का? 'परवा बिछान्यातून उठताना मी डोळे उघडत होतो..तर मला दोन मोठ्ठी काळी शिंगं दिसली..क्षणभर एवढा खूष झालो मी..वाटलं, आली वेळ आपली. आला यमराज सोडवायला..'

समईतलं सगळं तेल संपलेलं असतं. वातसुद्धा कोरडी पडत आलेली असते.. ज्योतीचा एक छोटासा निळा-पिवळा बिंदू त्या वातीवर बसून, कधी वारा आपल्याला पोटात घेईल याची वाट बघत असतो...शेवट आलेला असतो...

Saturday, March 13, 2010

मिसेस कुलकर्णी

आज महिला दिवस असून मिसेस कुलकर्णींचा काही मूड नव्हता. त्या एकट्याच पलंगाच्या कोपऱ्यात बसून खिडकीच्या बाहेर बघत बसल्या होत्या. त्यांचा मूड जायला कारणंही तसं 'खास' होतं. ऑफिसमधून घरी येताना त्यांची मैत्रीण त्यांना तिचं नवं घर दाखवायला म्हणून घेऊन गेली होती. आणि तिनं त्यांना त्यांचं नवं कोरं पाच खोल्यांचं घर, त्याच्या मार्बल टाईल्स, त्याला शोभेल असं interior, नवा सोफा सेट, नवी कांजीवरम आणि अष्टेकर ज्वेलर्स मधून घेतलेल्या नव्या कोऱ्या सोन्याच्या घसघशीत पाटल्या दाखवल्या होत्या..! हे एवढं सगळं एकावेळी पचवणं मिसेस कुलकर्णींच्या सहनशक्तीच्या पलीकडचं होतं!

त्यामुळे आज त्या, नुसता राग येणं, डोकं दुखणं किंवा पोटात काहीतरी 'जळजळतय' असं वाटणं...याच्या पलीकडे गेल्या होत्या! आज त्या चक्क आयुष्यावर विचार करत बसल्या होत्या!

'उगाच कुलकर्ण्यांच्या घरची सून झाले! एवढी स्थळं चालून आली होती..एखाद्या श्रीमंताशी लग्न केलं असतं, तर आज श्रीमंतीत लोळत असते! पण कुठे गेली होती अक्कल? मिस्टर कुलकर्ण्यांच्या रंग-रूपाने, भारदस्त आवाजाने, प्रामाणिक डोळ्यांनी भाळले. पण या सगळ्याची काय भाजी करायची का आता? शी बाई! 'सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही' हेच खरं! खरंच मूर्खपणा केला. एवढं सुंदर रूप दिलं होतं देवाने...स्वतःच्या हाताने पायावर दगड मारून घेतला मी! तेव्हा आई म्हणाली होती, "कुलकर्ण्यांचं कुटुंब अगदी छान आहे. बरंका सुमे, नवऱ्याइतकेच त्याचे कुटुंबीयही महत्वाचे!" पण मिस्टर कुलकर्णी हे एकुलते एक सुपुत्र. आणि लग्नानंतर ५-१० वर्षांत सासू-सासरे एवढे थकलेले असतात, की ते चांगले आहेत का वाईट आहेत, काही फरकच पडत नाही! सेवा करत बसावं लागतं त्यांची...छे! छे! छे! चूक झाली आयुष्यात...मोठ्ठी चूक झाली!' खरं तर मिसेस कुलकर्णी मनाने खूप चांगल्या. सासू-सासऱ्यांचं अगदी मनापासून सगळं केलंय त्यांनी..पण तरीही आज त्यांच्या मनात असे विचार येत होते. त्यांच्या मैत्रिणीच्या अष्टेकर ज्वेलर्सच्या पाटलीवरची नाजूकशी नक्षी त्यांच्या डोळ्यांना जरा जास्तच टोचत होती..

त्यांचा धाकटा मुलगा रोहन आणि मोठी मुलगी राधिका नुकतेच शाळेतून आले होते. रोहन आत येऊन म्हणाला, "आई भूSS क लागलीय. खायला दे न काहीतरी."मिसेस कुलकर्ण्यांनी त्याच्याकडे एक त्रासिक कटाक्ष टाकला आणि जरा वैतागूनच म्हणाल्या, " आल्या आल्या काय रे भूक भूक? ताईला maggi करायला सांग. मी काही करणार नाहीये!" आईचं हे असं रूप पहिल्यांदाच बघून रोहन बिचकलाच! आणि पटकन खोलीच्या बाहेर निघून गेला.

त्या पुन्हा विचार करू लागल्या. 'मलाच सगळी कामं करायला लागतात. ह्यांच्यासारखी मीसुद्धा नोकरी करते. तरीसुद्द्धा एक 'स्त्री' म्हणून मीच सगळी कामं करायची. पुरुष हा 'कर्ता पुरुष' असतो म्हणून काय आम्ही लगेच 'कर्म स्त्री' होऊन सगळी कामं करत बसायचं का? ह्यासाठी मिळालाय का जन्म?...' तेवढ्यात त्यांचं लक्ष शेजारच्या पेपरवर पडलं. पहिल्याच पानावर बातमी होती, 'स्त्रियांसाठी ३३ टक्के आरक्षण मंजूर!' त्याचाही त्यांना राग आला. '३३ कशाला, ५० द्या की! तुम्ही तुमच्या ५० टक्क्यात मग हवा तो गोंधळ घाला! आम्ही आमचे ५० सांभाळतो..'

दाराची बेल वाजली. रोहनची मित्र-मंडळी त्याला खेळायला बोलवायला आली होती. पण 'आता वार्षिक परीक्षा तोंडावर आलीय. म्हणून आता खेळ बंद.' असं कालच आईने रोहनला बजावलं होतं. रोहन नाही म्हणतोय म्हणून त्याचे मित्र त्याच्या आईला विचारायला थेट आत गेले! "काकू please रोहनला आजच्या दिवस पाठवा ना खेळायला. उद्यापासून आम्ही कोणीच खेळणार नाहीयोत. सगळे अभ्यास करणार आहोत.." त्यांना चांगलंच ओरडावं आता, असं मिसेस कुलकर्ण्यांना वाटलं. पण मग त्यांनी विचार केला, 'जरा खेळायला गेला हा, तर तेवढाच आपल्या डोक्याशी कटकट करणार नाही.' त्यांनी जरा चिडूनच, "जा, जाऊन ये' असं रोहनला सांगितलं आणि तो खेळायला निघून गेला.

'काकू'... मी कधी सुमित्राची 'काकू' झाले..कळलंच नाही. सगळं किती पटपट होतंय..एकदा लग्न झालं, पोरांची आई झालं की रंग, रूप, बांधा सगळंच सरायला लागतं..आणि मग आपण काकू होतो..काकू?!! काकूंच्या कपाळावर एकदम आठ आठया पडल्या! त्यांनी खिडकीतली केस काळे राहण्यासाठी असलेली जास्वंदाच्या तेलाची बाटली खसकन घेतली. तळहातावर बदाबदा तेल ओतलं आणि ते डोक्यावर थापून केसातून हात फिरवू लागल्या..त्यांचं डोकं एव्हाना एवढं तापलं होतं की त्या तेलाचाही boiling point येऊ घातला होता! त्यांना स्त्री जन्मावर एक जबरदस्त शिवी हासडायची इच्छा झाली. पण 'हलकट', 'नालायक' च्या पुढे त्यांना पटकन काही सुचेना! त्यांना मग पुन्हा पुरुषांचा हेवा वाटू लागला. पुरुष आई-माईवरून शिव्या देऊ शकतात. दारू पितात. सगळ्यांसमोर सिगरेटी ओढतात. मिसेस कुलकर्ण्यांना ह्यातलं काहीच करायचं नव्हतं. पण जर पुरुष हे सगळं करतात, तर काही स्त्रियांनी असं करण्यात काही चूक नाहीये, असं त्यांना वाटत होतं..

असा सगळा सगळा विचार झाल्याने त्यांना जरा बरं वाटू लागलं. एव्हाना संध्याकाळ झाली होती. मिस्टर कुलकर्णी घरी आले होते. रोहनही खेळून आला होता. रोहन आणि राधिकाने बाबांना कानात 'आज आईला काहीतरी झालंय..' असं हळूच सांगितलं.

मिसेस कुलकर्णींनी मावळत्या सूर्याकडे पाहिलं. ते पाहून स्वयंपाकाची वेळ झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं! त्यांनी स्वतःला सावरलं. डोळे आणि गाल पुसले. अश्रू गालावर येऊन वाळून गेले होते. त्या पलंगावरून उठणार तेवढयात रोहन आत आला. "आई बाबा विचारतायत 'जयश्री'ची पावभाजी आणि कॉफी का 'मयुरी' ची थाळी? आणि आम्हाला 'मयुरी'ची थाळीसुद्धा चालेल. आम्ही दोघं तिकडे J.M रोडवर 'पिझ्झा हट' मधे जाण्याचा हट्ट करणार नाही..!" आपल्याला बघून ही दोघं आणि आता बाबाही घाबरलेत हे मिसेस कुलकर्णींच्या लक्षात आलं. त्या रोहनकडे बघून हसल्या आणि त्याला घेऊन खोलीबाहेर आल्या. हॉलमधे बाबा पेपर वाचत बसले होते. आई आल्याचे पाहून त्यांनी हळूच पेपेरच्यावरून मिसेस कुलकर्णींकडे पाहिले आणि म्हणाले, " चल ग, आज बाहेरच जाऊयात जेवायला! रोज रोज स्वयंपाक करून कंटाळा येणं साहजिकच आहे..!" हॉलमधे घाबरून काय प्रकार घडला असणार, हे मिसेस कुलकर्णींच्या लक्षात आलं. त्यांना पुन्हा हसू आलं. आणि 'महाराष्ट्रीयन थाळीपेक्षा मुलांना पावभाजी आवडते' असा विचार करून "जयश्रीत जाऊयात!" असं त्या म्हणाल्या.

'जयश्री'त चौघही निमूटपणे पावभाजी खात होते. कोणीच फारसं बोललं नाही. मग कॉफी आणि मिल्कशेक आले. आई कॉफी पीत असताना राधिकाने बाबांना खूण केली. आईने ते पाहून बाबांकडे पाहिलं. बाबांनी खिशातून 'आयुष्यावर बोलू काही' ची तिकीटं काढली. रात्री ९ ते १२ चा show होता. ते पाहून आईची कळी खुलली!

मिसेस कुलकर्णींना आपला नवरा आणि मुलं अगदी बिच्चारी वाटू लागली. त्यांनी विचार केला, 'एक दिवस काय माझा मूड नेहेमीसारखा नव्हता, तर ह्यांची कशी अवस्था झाली!' आपला नवरा, मुलं आपल्यावर केवढं प्रेम करतात हे त्यांना जाणवलं आणि घरात आपलं स्थान किती महत्वाचं आहे, हेही लक्षात आलं. त्यांचा मूड पुन्हा पहिल्यासारखा झाला. त्या तिकिटांकडे पाहून म्हणाल्या, "अहो, याची काय गरज होती...?"

९ वाजता 'आयुष्यावर बोलू काही' सुरु झाला. मध्यंतरापर्यंत पावसाची गाणी, प्रेम कविता झाल्या. 'कसे सरतील सये..' गाण्याला मिसेस कुलकर्णींना आपल्या लग्नानंतरचे 'ते' दिवस आठवले..त्यांच्या मनानेही 'हनिमून' हा शब्द उच्चारला नाही. त्यांना ते दिवस आठवले..मिस्टर जयंत कुलकर्णी. देखणे रूप, पिळदार शरीरयष्टी, कुरळे केस आणि काळेभोर डोळे..त्यांनी विचार केला, 'आपली निवड नाही चुकलेली. आपण काय विचार करत होतो..जयंता खरोखरच लाखात एक आहेत..! आपण भाग्यवान आहोत..त्या मैत्रिणीपेक्षाही!!' त्यांनी मिस्टर कुलकर्ण्यांकडे पाहिलं. मिस्टर कुलकर्णी मिशीतून मिश्कील हसत होते.. काही वेळाने 'मन तळ्यात, मळ्यात..' गाणं सुरु झालं. मिस्टर कुलकर्णींनी कोपराने हळूच मिसेस कुलकर्णींना 'Ping' केलं! पण 'आपलं वय काय...आणि इथे लोकं बसलीयत!' असा विचार करून मिसेस कुलकर्णींनी त्याकडे लक्षही दिलं नाही!

मध्यांतरानंतर थोडी गंभीर गाणी आणि विरह कविता सुरु झाल्या. 'मिस्टर कुलकर्णी आपल्याला केवढं समजून घेतात..आमचा विरह कधीच होणार नाही...' असा त्यांनी मनोमनी विचार केला. कार्यक्रमाचं शेवटचं गाणं गायला सलीलने सुरुवात केली. गाणं होतं, 'नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो. जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो..' मिसेस कुलकर्णी अगदी गढून जाऊन ते गाणं ऐकत होत्या. त्यांना पुन्हा एकदा स्वतःचे, 'एक स्त्री' असल्याचे महत्व पटले. आपल्यावाचून जयंताची कशी अवस्था होईल, हे ते गाणं सांगत होतं. त्यांनी मोठया कौतुकाने मिस्टर कुलकर्ण्यांकडे पाहिलं आणि त्यांना धक्का बसला! त्यांचा जयंता चक्क घोरत होता!! आता मिसेस कुलकर्णींना अगदी मनापासून हसू आलं..

कार्यक्रम संपला. घड्याळात १२ वाजले होते. महिला दिनाच्या शेवटी मिसेस कुलकर्णींच्या चेहेऱ्यावर अगदी छान हसू उमटलं होतं...

Monday, March 8, 2010

समृद्ध चैतन्य

समृद्ध आणि चैतन्य. दोघांचाही जन्म ७ मार्च, १९८१ साली झाला. तोही एकाच वेळी. त्यांची जन्मवेळ सकाळी ११ वाजून,८ मिनिटं आणि ३३ सेकंदाची! खरंतर दोघांचा तसा काहीच संबंध नाही. समृद्धचा जन्म पुण्याचा, तर चैतन्याचा रत्नागिरी जिल्ह्यातल्या लाटघरचा. दोघात फक्त एकचं काय ते साम्य होतं. एकाच क्षणी जन्म झाल्याने, त्यांनी आत्तापर्यंत सारखेच श्वास घेतले होते.
आज रविवार, दि. ७ मार्च, २०१०. दोघांचाही आज २९ वा वाढदिवस.

समृद्ध देशमुख. गोरा,उंचापुरा, देखणा. पोट थोडंसं सुटलेलं. लकाकणारे तपकिरी डोळे आणि त्यावर Professional look देणारा चौकोनी काचांचा चष्मा. समृद्ध एका Investment firm मधे Financial Analyst. अतिशय तल्लख बुद्धीची देणगी लाभलेला समृद्ध सध्या कॅलिफोर्निया, USA . मधे स्थायिक झालेला. गेल्याच वर्षी त्याने स्वतःचं असं घर विकत घेतलं होतं. बुद्धीच्या जोरावर शेअर मार्केटमधून त्याने बराच पैसा कमावला होता.

सकाळी जाग आली. त्याने घड्याळात पाहिलं.१०:४१ झाले होते. काल रात्री ‘Birthday Celebration'साठी मित्रांबरोबर पबमधे गेला होता. तिथे घेतलेल्या scotch चा hangover अजून होता. डोकं थोडं दुखत होतं. त्याने त्याच्या Apple Macवर शेअर मार्केट check केलं. त्याला $४२४५ चा फायदा झाला होता. त्याच्या चेहेऱ्यावर हास्याची बारीकशी लकेर उमटली आणि लगेच मिटूनही गेली. त्याने त्याचा i-phone check केला. आईचे २ missed calls होते. 'Happy Birthday' wish करायला असतील, असा विचार करून, आवरून झाल्यावर घरी फोन करायचा असं त्याने ठरवलं.

समृद्ध एवढ्या मोठ्ठ्या घरी एकटाच राहत होता. २ वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं. त्याची बायको, मीना, जर्मनीत PhD करत होती. हे तिचं शेवटचं वर्ष होतं. कालच संध्याकाळी त्यांचं एका छोट्याश्या कारणावरून मोठ्ठं भांडण झालं होतं. त्याला काही मीनाला फोन करावासा वाटत नव्हता आणि तिचाही आला नव्हता. भुकेमुळे पोटात गरम वाटून ते दुखू लागल्याने तो आवरायला म्हणून उठला. खोलीत बराच पसारा झाल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि आता लवकरच तो आवरला पाहिजे असं त्याने ठरवलं. त्याने कधी नव्हे ती आज त्याच्या पांघरुणाची घडी घातली. तोंड धुतलं आणि नाश्ता तयार करायला सुरुवात केली.

त्याने केलेला चहा कपात ओतताना थोडा बाहेर सांडला. त्याला आईची आठवण आली. सॅंडविचेस तयार करताना त्याला मीना आठवत होती. सगळ्या बाजूंनी सारखा आणि काहीसा खरपूस असा मीना भाजते तसा ब्रेड त्याला नाही भाजता आला. ती सॅंडविचेस आणि चहा घेऊन तो सोफ्यावर येऊन बसला. त्याने त्याचा 47 inches, Flat screen, LCD TV सुरु केला आणि Basketball match बघत खाऊ लागला.

खाऊन झाल्यावर घरी फोन करू म्हणून त्याने फोन घेतला, पण डोकं अजूनही थोडं बधीर होतं. छान गरम पाण्याने आंघोळ करून, fresh होऊन मग घरी फोन करूयात असं त्याने ठरवलं.

आज रविवार असल्याने कसलीच घाई नव्हती. त्याने टब बाथ घ्यायचं ठरवलं. पाणी तयार केलं. सगळे कपडे उतरवले आणि त्या टबात स्वतःला झोकून दिलं. त्या गरम साबणाच्या पाण्यात त्याला खूप बरं वाटलं. अंगावर काही नसल्याने छान हलकं वाटत असावं असा विचार त्याच्या मनात आला. मग अंगावर उरलेली शेवटची वस्तू, त्याच्या बोटातली अंगठी त्याला जास्तच जड वाटू लागली. त्याने तीही मग बाजूला काढून ठेवली.

आता त्याला खरंच fresh वाटत होतं. मेंदूची बधिरता हळूहळू उतरत होती. ते गरम पाणी त्याच्या body cells charge करत होतं. त्याची विचारचक्र सुरु झाली. 'आज आपला वाढदिवस आहे. आज खूप special दिवस आहे.' असा त्याने विचार केला आणि तो त्याच्या आत्तापर्यंतच्या आयुष्याचा विचार करू लागला. त्याला आधी त्याच्या सगळ्या achievements आठवल्या. १० वी, १२ वीतलं घवघवीत यश, एका प्रतिष्ठित Engineering College मधे मिळालेली admission, राष्ट्रस्तरीय Project competition मधला प्रथम क्रमांक, MBA entrance मधे पहिल्याच प्रयत्नात मिळालेलं अचंबित करणारा यश..MBA Finance आणि आता गलेलठ्ठ पगाराची नोकरी..त्याने विचार केला, 'याला म्हणतात 'कमावणं'!.. असंच लढत राहिलं पाहिजे..' मग त्याने आयुष्यातल्या अपयशांचा विचार करणं सुरु केलं. त्याला काही सुचलंच नाही. फक्त खूप वेळा ठरवून आपण नियमितपणे व्यायाम करू शकलो नाहीये आणि gym ची फी वाया घालवलीय याची थोडीशी खंत वाटली, एवढंच. पण 'ही काही मोठी गोष्ट नाहीये. लवकरच पुन्हा सुरु करू' असा विचार त्याने केला. आणि gym ची वाया गेलेली फी तर त्याच्यासाठी मुळीच मोठी गोष्ट नव्हती. हे सोडून बाकी काही अपयश त्याला आठवलं नाही. मग असेच मनात random विचार आणि आठवणी येऊन गेल्या... १०वीत बोर्डात आल्यामुळे बक्षीस म्हणून मिळालेला त्याचा पहिला computer आठवला. आणि त्यावर मग सुट्टीभर दिवस-रात्र कसे गेम्स खेळत बसायचो..हे आठवलं.. Engineeringमधे मित्रांबरोबर प्यायलेली पहिली beer आठवली. ऑफिसमधून घरी येताना तो नेहेमी त्याच्या ipod वर गाणी ऐकत येतो. त्यातल्या एका गाण्याची tune त्याच्या डोक्यात वाजू लागली. Facebook मधल्या त्याच्या 'Childhood' नावाच्या अल्बम मधला एक फोटो त्याला आठवला..ह्या सगळ्या विचारांचे अर्थ त्याला कळत नव्हते. मग त्याला emails check इच्छा झाली म्हणून तो टब मधून उठला.

त्याला एक ‘New Mail’ दिसला. त्याचा Payment direct deposit झाल्याची ती receipt होती. सवयीप्रमाणे त्याने तो ‘Payments’ folder मधे transfer केला. त्याचं घड्याळाकडे लक्ष गेलं. दुपारचे २ वाजले होते. आई आता झोपली असेल हे त्याला जाणवलं. तिला फोन करायचा राहून गेला होता. त्याच्या उजव्या पापणीच्या कठड्यावरून एक पाण्याचा थेंब हलकेच खाली घरंगळला. त्याने खिशातून रुमाल काढला. त्या चुरगळलेल्या रुमालाने त्याने तो गालावर आलेला थेंब पटकन पुसला…


चैतन्य खोत. कुरळ्या केसांचा, गव्हाळ रंगाचा, मध्यम उंचीचा आणि पिळदार शरीरयष्टीचा हा एका कोळ्याचा मुलगा. त्याने रत्नागिरीत B.com केलं आणि आता मासेमारीच्या व्यवसायात आहे. ह्याचे वडील जरी कोळी असले तरी ह्याने स्वतःच्या हिम्मतीवर बँकेतून कर्ज काढून एक छोटीशी बोट विकत घेतली आणि मासेमारीचा व्यवसाय सुरु केला. कोळ्यांना त्या बोटीतून मासेमारी करायला पाठवायचं आणि आलेले मासे मार्केटमध्ये विकायचे हा त्याचा धंदा. आज त्याच्याकडे स्वतःच्या ३ बोटी आहेत. हा लाटघर मधेच स्थायिक आहे. छान कौलारू घर, मागे नारळ-पोफळीची बाग, ३ काजूची आणि २ आंब्याची झाडं आणि घरासमोर अंगणात एक मोठ्ठं जांभळाचं झाड. चैतन्यचं लग्न काहीसं लवकर, म्हणजे तो २४ वर्षांचा असतानाच झालं..

आज दि. ७ मार्च, २०१० रोजी ह्याचाही वाढदिवस. सकाळी ५ वाजता उठून चैतन्य आणि त्याची बायको सुलेखा, टेकडीवरच्या देवळात जायला निघाले. सकाळच्या त्या प्रसन्न वातावरणात सूर्य नुकताच त्याला 'Happy Birthday' wish करायला आला होता! सर्वत्र केशरी-पिवळ्या कोवळ्या किरणांची उधळण चालू होती. त्यातली काही किरणं चैतन्यच्या डोळ्यांचे चटाचट मुके घेत होती. टेकडीच्या माथ्याशी असलेल्या देवळात कीर्तन चालू असल्याने टाळ, मृदुंग, चिपळ्यांचे हळुवार, काहीसे अस्पष्ट आवाज ऐकू येत होते. दूरवरून येणाऱ्या मधुर बासरीचे स्वर त्यात मिसळले होते. पक्ष्यांची किलबिल सुरु होती. कळसावर फडकणारा तो भगवा, चैतन्यला खुणावत होता. त्या दोघांच्या चालीला गती देत होता. जसजसे ते माथ्याजवळ जायला लागले तसे ते टाळ मृदुंगाचे आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागले. आजूबाजूला निलगीरींचा वास दरवळत होता. देवळात चैतन्यने एकदा खणखणीत घंटा वाजवली आणि गणपतीसमोर साष्टांग घातला. चैतन्यचं कपाळ त्या गार फरशीला टेकलं आणि त्याच्या आजूबाजूची प्रसन्नता दुप्पटीने वाढली..

खरंतर समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांना समुद्राचं अप्रूप नसतं.पण आज चैतन्यला समुद्रात भिजावंसं वाटलं. सुलेखाला पुढे पाठवून तो समुद्रात गेला. काही वेळ मनसोक्त पोहून झाल्यावर त्याने मग डुंबायला सुरुवात केली. येणारी प्रत्येक लाट तो पाठीवर घेऊ लागला. जणू ती प्रत्येक लाट त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थापच देत होती! सूर्य आता थोडा वर आला होता. काहीशा प्रखर पण तरीही खूपशा कोमल अशा सूर्याकडे त्याने पहिले आणि नंतर डोळे मिटून पाण्यावर तरंगायला लागला. हे सगळं चालू असताना त्याच्या मनात ना कुठला विचार होता, ना कुठली आठवण होती, ना कुठली चिंता होती..
तो फक्त आनंदित होता. स्वतःवर आणि सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीवर. २ तास मनसोक्त डुंबून झाल्यावर तो घराकडे जायला निघाला.

घरी त्याच्या आवडीचं कोलंबीचं कालवण, पापलेट फ्राय, दशमी आणि सोलकढी असा बेत होता. घरी जाताना त्याने मार्केटमधून Payment collect केलं. ते होतं समृद्धच्या biweekly paycheck च्या फक्त एक दशांश..

घरी आल्यावर आजीने त्याला ओवाळलं. मग काकीने, मग सुलेखाने आणि मग आईने. आईने जेव्हा त्याच्या कपाळाच्या मधोमध मोठ्ठं उभं गंध लावलं तेव्हा त्याचे डोळे मिटले गेले. त्याला जणू गणपतीला पुन्हा साष्टांग घातल्यासारखा वाटलं. त्याने डोळे उघडले. आईच्या डोळ्यातला अभिमान आणि ओसंडून वाहणारं कौतुक बघून त्याच्या उजव्या डोळ्यातून एका पाण्याच्या थेंबाने पटकन गालावर उडी मारली! कोणाच्या हे लक्षात येऊ नये म्हणून त्याने खिशातून रुमाल काढला आणि त्या पांढऱ्याशुभ्र, कडक इस्त्रीच्या रुमालाने भरकन ते पाणी पुसलं..

त्या दोघांच्यात फक्त एकच काय ते साम्य होतं. त्यांनी आत्तापर्यंत सारखेच श्वास घेतले होते..

Sunday, February 28, 2010

दिल तो बच्चा है जी!

व.पु.काळे म्हणतात, 'गरुडाचे पंख कबुतराला लावता येतीलही. पण गरुडभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. आकाशाची ओढ उसनी आणता येत नाही...' पण समजा, एका गरुड दांपत्याने एका कबुतर पिल्लाला दत्तक घेतलं आणि त्याला हे कधी कळूच दिलं नाही की 'तू एक कबुतर आहेस'. जर त्याच्या नातेवाईकांनी, भावंडांनी, मित्र-मैत्रिणींनी, कोणीच त्याला हे सांगितलं नाही किंवा जर आयुष्यात त्याला कधीच फुटक्या आरशाचा तुकडादेखील सापडला नाही, की ज्यात तो स्वतःला बघू शकेल..तर ते कबुतराचं पिल्लू स्वतःला गरुडच समजायला लागेल! त्याच्या आई-वडिलांप्रमाणे, भावा-बहिणीप्रमाणे तेही गरुडभरारी घ्यायचा प्रयत्न करेल. 'आपण गरुड आहोत. आपल्याला हे जमेलच.' ही भावनाच त्याच्या पंखात बळ देईल. त्याच्या रक्तात गरुडभरारीचं वेड जन्मतःच नसलं, तरी या विश्वासाने ते त्याच्या रक्तात भिनेल. त्यालाही मग आकाशाची ओढ निर्माण होईल. आणि जरी तो कधी पक्ष्यांचा राजा होऊ शकणार नसला, तरी कबुतरांचा राजा होण्याची क्षमता त्याच्या अंगी नक्की येईल!

एखाद्या चांदण्यारात्री पारिजातकाने अंगणभर कधी तिच्या फुलांचा सडा घातला असेल आणि त्या फुलांनी अंगणात खेळता खेळता वर बघून जर आपल्या जन्मदात्रीला विचारलं, "आई, या आकाशातल्या चांदण्या किती सुंदर आहेत! आम्ही का नाही ग इतक्या सुंदर झालो..?" तर त्यावर त्या झाडाने उत्तर द्यावं, "अगं वेडयांनो! तुम्हीच तर आहात त्या! आकाशात एक मोठ्ठा आरसा असतो. त्या सुंदर चांदण्या, म्हणजे तुमचंच त्या आरशातलं प्रतिबिंब! केवढ्या सुंदर आहात तुम्ही...!" खरंतर केवढी त्या फुलांची फसवणूक! कुठे त्या तेजस्वी चांदण्यांचे कोट्यावधी वर्षे आयुष्य आणि कुठे या सौम्य फुलांचे काही तासभर..पण असं फसवून जर ती फुलं त्यांचं मोजकं आयुष्य स्वतःवर खूष होऊन आनंदात आणि हसत -खेळत जगणार असतील..तर धन्य आहे ती फसवणारी आई..!

मला नेहेमी वाटतं,डॉक्टरांनी कधीच पेशंटला याची कल्पना देऊ नये की तो किती आजारी आहे..त्याला साधी सर्दी झाली असली काय किंवा अगदी असाध्य आजार झाला असला काय..'अरे काही नाहीये. लवकरच बरा होणार आहेस तू' हेच वाक्य असावं डॉक्टरांचं! कारण 'आपण नक्की बरे होणार आहोत' हा विश्वासच त्याला पूर्ण ताकद देतो, त्या आजाराशी लढण्याची. पण एकदा का त्याला त्याच्या आजाराचे details कळाले, मग या stageला वाचण्याचे ‘chances’ कळाले, statistics कळाले, तर तो मनानेच इतका खचून जाईल की पूर्ण ताकदीनिशी लढायला त्याला खूप कष्ट घ्यावे लागतील. या उलट जर खोटं सांगून 'नक्की बरा होशील' असा विश्वास त्याला दिला, तर हेच लढणं आपोआप होईल त्याच्याकडून. त्याचे मानसिक कष्ट वाचतील.

असं हे मनाला फसवण्याने केवढी शक्ती निर्माण होऊ शकते, याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आत्मघातकी अतिरेकी! कोण अनोळखी लोकांचा विनाश करायला स्वतःचा जीव गमावेल? पण त्यांचा धर्म, त्यांची शिकवण स्वर्गसुखाचा एवढा विश्वास त्यांच्यात बिंबवते, की ते मरायलाही तयार होतात! हा एवढा जास्त खोटा विश्वास जर या ऐवजी एखादं सद्कृत्य करण्यासाठी दिला, तर जगाचं सोनं होण्याखेरीज राहील का?

Managementमधेही या विश्वासाचं खूप मोल आहे. सगळ्यांची स्वप्ने पूर्ण होणार नसली तरी सगळ्यांना स्वप्ने दाखवावीत. बुद्धिबळाच्या पटावरच्या राजाने त्याच्या प्याद्यांना म्हणावं, " तुम्ही माझे होऊ घातलेले वजीर आहात! तुम्ही निकराने लढून त्या शेवटच्या चौकोनात पोहचलात, तर तुमचं वजिरात रुपांतर होईल. आणि मग तुम्हीही पट गाजवू शकाल. माझ्या शेजारी असलेला हा वजीर कधी काळी तुमच्या सारखंच एक प्यादं होता..." का जीव तोडून लढणार नाहीत गडी?

मला वाटतं आपणही आयुष्यात असंच स्वतःला फसवत राहिलं पाहिजे! हा ‘3 Idiots’ मधला माझा favourite dialogue.."..उस दिन एक बात समझ में आयी| ये जो अपना दिल है ना, बड़ा डरपोक है यार| इसको बेवकूफ बनाके रखो|Life में कितनी भी बड़ी problem हो ना, उसको बोलो,"कोई बात नहीं चाचू, सब ठीकठाक है| All izz well!" "और उससे problem solve हो जाएगी?" "नहीं, लेकिन उसको झेलने की हिम्मत आ जाती है|"

आपलं मन हे खरंच एखाद्या लहान मुलासारखं असतं. आणि आपल्याला जन्मतःच त्याचं पितृत्व लाभलं असतं! आपल्या या 'मुलाला' चांगलं वळण लावण्यासाठी, त्याला तरबेज बनवण्यासाठी आणि आयुष्यभर आनंदी ठेवण्यासाठी त्याला असं अधून मधून फसवत राहावं लागतं.. आणि ते ही लहान असल्यामुळे फसू शकतं! काही लागलं, खरचटलं तर त्याला 'आल्ला मंतर कोल्ला मंतर..' करायचं..इच्छेविरुद्ध काही काम करायचं असेल तर त्याला, 'हा शेवटचा वरण-भाताचा घास खल्लास ना, तर संध्याकाळी एक चॉकलेट!' असं करायचं..पण आयुष्यात त्याला कधीच कसलं tension द्यायचं नाही. कधी घाबरला कशाला तर पाठीवर थोपटून 'All izz well' म्हणायचं! आणि तो आपलं नक्की ऐकेल..
आखीर, दिल तो बच्चा है जी...

Friday, February 26, 2010

पहिलं प्रेम!

पहिलं प्रेम, म्हणजे ते 'First and Last' प्रेम नाही म्हणायचं मला. 'प्यार जिंदगी में सिर्फ एक ही बार होता है' वगैरे असली काही भानगड नाहीये ही! हे Love, 'Love at first sight' जरी असलं तरी ती अगदीच 'First sight' आहे हो! आपण त्याला भाबडं प्रेम म्हणूयात. शाळेत होणारं प्रेम! आता शाळेत म्हणजे ८ वी , ९ वी, १० वी नाही. कारण पहिली गोष्ट म्हणजे तेव्हा आपण भाबडे मुळीच नसतो! आणि दुसरं म्हणजे तेव्हा बोर्डाच्या परीक्षेची tensions वगैरे असतात. हे प्रेम, 'प्रेम कशाशी खातात' हेही कळायच्या आधीचं आहे! अगदी ३ री, ४ थीतलंच म्हणा ना...!

नवी कोरी वह्या-पुस्तकं आणि ती ठेवायला नवं कोरं दप्तर पाठीवर अडकवून आपण नवीन शालेय वर्षासाठी तयार होतो. पहिल्या दिवशी वर्ग भरतो आणि आपलं 'तिच्याकडे' लक्ष जातं. कडक इस्त्रीचा गणवेशाचा फ्रॉक, त्याला फ्रीलच्या फुगेदार बाह्या, खांद्यांपर्यंत लांब केस, डोक्यावर पांढरा hair-band, त्याला काळी क्लिप लावून त्यात ताज्या-टवटवीत मोगऱ्याच्या फुलांचा गजरा अडकवलेला, डोळ्यात काजळ घातलेलं..पापण्यांची नाजूक तर नाहीच नाही, पण अतिशय स्पीडात फडफड! गौर वर्ण..दोन्ही गालांवर छानशा खळ्या..आणि तोंडाची कधीही न थांबणारी बडबड! हे असं सगळं पाहताना, आपल्या बरगड्यांच्या पिंजऱ्यातल्या, हृदयाच्या पेटीतल्या, सगळ्यात आतल्या चोरकप्प्यात तिने क्षणार्धात जागा घेतली असते! आणि ती जागा एवढी लहान असते, की त्यात फक्त तीच मावू शकते. तिच्या वयाला, आडनावाला, आई-बाबांना त्यात मुळीच जागा नसते!

मराठीचा तास होतो, गणिताचा होतो, शास्त्राचा होतो, तरी अधून-मधून तिच्याकडे लक्ष जाणं काही थांबत नाही. मधल्या सुट्टीत ती डबा खायला बसते. डब्याखाली मस्त मोठ्ठा टर्किश कापडाचा नॅपकिन अंथरते आणि त्यावर डबा ठेवून मैत्रिणींशी गप्पा मारत मारत मधेच फिदीफिदी हसत डबा खाते. आपण तिच्या गप्पा ऐकायला गेलो, तर ऐकू येतं, " अगं काय गंमत झाली..आमच्या त्या शोभाताई आहेत किनई, त्यांच्याकडे किनई, छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आहे! ते किनई.." आणि गप्पा ऐकून झाल्यावर आपण त्या ‘किनई’ शब्दाच्या प्रेमात पडलेलो असतो! आत्तापर्यंत आयुष्यात आपण ३-४ हिंदी सिनेमे पाहिलेले असतात. त्यामुळे 'हिरो', 'हिरोईन' या concepts अर्धवट का होईना कळलेल्या असतात. पण आपल्याला तिच्याकडे बघितल्यावर सिनेमातली नटी का आठवतीय, ते मात्र कळत नसतं..!

संध्याकाळी शाळा सुटल्यावर आपण घरी येतो. खांद्यावरचं दप्तराचं ओझं काढून, बूट न काढता तसेच आरशात बघायला जातो. तिथे वेगवेगळ्या प्रकारे हसायचा प्रयत्न करून, कुठेतरी छोटीशी तरी खळी पडतीय का.. हे बघत असतो! आईला कळत नाही, ह्याला एकदम काय झालं! मग आपणच आईला म्हणतो, "आई, सांग ना, मी असा मोठ्ठं हसल्यावर मला इकडे उजवीकडे खळी पडते ना?" आई बघते आणि म्हणते, "नाही रे.." "आई पडते ग..छोटीशी पडते.." मग आई विचारते, " काय रे, डबा खाल्लास का? आवडला का?" "हो खाल्ला. आई पण किती भंगार नॅपकिन दिलायस! हा नको मला." "अरे, नवीन आहे तो राजा.." "नाही ग आई. भंगार आहे तो. मला तो, तसा टॉवेलसारखा पंचा असतो बघ..आणि तो पंचा कापून नॅपकिन बनवतात..तसा दे..!”

काही दिवसांनी 'मुलं फार दंगा करतात' म्हणून बाई मुलं-मुलींना शेजारी बसवायचं ठरवून उंचीप्रमाणे उभं करतात. तिकडे पोरींचा कलकलाट सुरु असतो, 'शी बाई! नको हो बाई! बाई आम्ही शांत बसतो. मुलांमुळे आम्हाला का शिक्षा..?" आणि इकडे आपण पहिल्यांदाच गणपतीबाप्पाचा धावा करत असतो! पण आपलं नशीब कुठे आलंय एवढं चांगलं..! आपल्या शेजारी दुसरीच कुठलीतरी मुलगी बसते. 'ती' वर्गातल्या कुठल्यातरी 'ढ' मुलाच्या शेजारी बसलेली असते. आणि 'देवबाप्पाला कधीपासून 'ढ' मुलं आवडायला लागली?!' असा आपल्याला प्रश्न पडलेला असतो..

ती आपल्या शेजारी नसली म्हणून काय झालं..आपण स्वप्नांच्या नगरीत केव्हाच रममाण झालेलो असतो! 'समजा ती माझ्या शेजारी बसत असती आणि समजा लिहिताना तिच्या पेन्सिलीचं टोक तुटलं आणि तिच्याकडे दुसरी कुठलीच पेन्सिल नसली..तर मी माझ्या कंपासच्या खालच्या कप्प्यात ठेवलेली, माझी सगळ्यात लाडकी पेन्सिल तिला लिहायला देईन!' आपणही कधी ती लाडकी पेन्सिल वापरत नसतो! जणू तिच्यासाठीच ती जपून ठेवलेली असते..संध्याकाळी मित्रांबरोबर घरी जाताना रस्त्यात चिंचा घ्यायला आपण थांबतो. एक रुपयाचा सगळ्यात मोठा आकडा आणि अजून थोड्या चिंचा विकत घेतो. 'ती आत्ता इथे असती, तर मी तिला हा सगळ्यात मोठा आकडा दिला असता!' स्वप्नांचे घोडे दौडतच असतात..

बाई तिला कधी रागावल्या की आपल्याला बाईंचाच राग येत असतो! तिला कधी हातावर पट्टी मारली की आपलाच हात खसकन मागे जातो..खेळात आपला हाउस जिंकला नाही तरी चालेल, पण तिचा जिंकावा असं मनोमनी वाटत असतं..तिला 'impress' करायला म्हणून आपण एवढा मनापासून अभ्यास करतो, की चक्क आपला पहिला नंबर येतो! आणि तेव्हा आई-बाबांना वाटतं आपल्या पोटी हिरा जन्माला आलाय..! खरं म्हणजे वार्षिक परीक्षेला थोडं वाईट वाटत असतं की आता सुट्टीत तिची भेट होणार नाही. सुट्टीत कुठेतरी रस्त्यात भेटावी असं वाटत राहतं.. पण ते तेवढ्यापुरतंच! एकदा सुट्टीतला दंगा सुरु झाला की थेट पुढच्या वर्षी शाळा सुरु व्हायच्या वेळेसच तिची आठवण होते! आणि आता पुन्हा भेट होणार म्हणून आपण खुशीत शाळेत जातो!

पालक सभेला वाटतं, तिच्या आईने येऊन आपल्या आईशी बोलावं..म्हणावं, " तुमचा मुलगा केवढा हुशार आहे! कसा अभ्यास करतो तो..?" आणि मग त्यांच्या गप्पा व्हाव्यात..मैत्री व्हावी..पुढे लग्नाची बोलणी व्हावीत! स्वप्नांचे घोडे आता आकाशात उडत असतात..! पण दुसऱ्याच क्षणाला वाटतं, नको रे बाबा! तिची आई विचाराची, 'कसा अभ्यास करतो?' आणि आपली आई म्हणायची, " अहो, काय सांगू, करतंच नाही हा अभ्यास! सारखं मागे लागावं लागतं त्याच्या..!"

कधीतरी चुकून-माखून एकदाच ती आपल्याशी बोलते. गैरहजर राहिल्याने, बुडलेलं भरून काढायला तिला 'हुशार' मुलाची वही हवी असते..आपण ती वही तिला देताना दोनदा तपासून घेतो, की कधी घाईघाईत लिहिताना अक्षर तर खराब आलं नाहीये ना..! तो आपल्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस असतो..

पण या भाबड्या प्रेमाचं आयुष्य अगदीच कमी असतं. ते कधी संपतं, कळतही नाही. बरगड्यांच्या पिंजऱ्यातलं, हृदयाच्या पेटीतल्या त्या चोरकप्प्यातलं ते प्रेमाचं फुलपाखरू आपल्या नकळत उडून जातं..आणि ते एकटं उडत नाही, आपल्या निरागस बालपणालाही त्याच्याबरोबर घेऊन जातं..भाबडं प्रेम, ही भाबड्या वयाची शेवटची अवस्था असते. आणि हे प्रेम संपणं हीच मोठं झाल्याची पहिली खूण असते..

Friday, February 19, 2010

गोधडी

गोधडी म्हटलं की मला माझ्या आज्जीशिवाय दुसरं काही आठवूच शकत नाही! मी लहान असताना तिच्या एका जुन्या साडीची कापूस घालून आम्ही गोधडी शिवली होती. ती मी वापरायचो. इतकी मस्त मऊ आणि उबदार होती ती गोधडी..अगदी माझ्या आज्जीसारखीच! लहानपणी आज्जीच्या हातावरून हात फिरवून मी म्हणायचो, "आज्जी अगं किती ग सुरकुत्या आहेत तुझ्या हातावर! आपण इस्त्री करायची का तुला?!" तेव्हा ती हसून म्हणायची, " नाही होणार रे..बघ करून हवं तर..!" आणि मग मी म्हणायचो, "नको ग आज्जी. तू अशीच राहा मऊ-मऊ!" म्हणून गोधडी म्हटलं की मला माझ्या आज्जीचीच आठवण येते..!

आज मी जो पण कोणी आहे, जेवढं काही चांगलं म्हणून असेल ना माझ्यात, त्याचं श्रेय आई-वडिलांना तर जातंच, पण तितकंच मोठं श्रेय माझ्या आज्जी-आजोबांनाही जातं. लहानपणी आम्ही साताऱ्याला राहायचो. आई कॉलेजमध्ये शिक्षिका. ती सकाळी कॉलेजला जायची. पप्पा पुण्याला असायचे. शनिवार-रविवार भेटायचे आम्हाला. त्यामुळे दिवसभर फक्त मी, आज्जी आणि आजोबा! असं म्हणतात, लहानपणीच मुलं सगळ्यात जास्त शिकतात,घडतात. संस्कारक्षम वय असतं त्यांचं ते. त्यावेळी आज्जीने जे माझ्यावर अफाट कष्ट घेतलेत ना, ते शब्दात मांडण्याच्या पलीकडचे आहेत..रामायण-महाभारत, इसापनीतीच्या जाड पुस्तकातल्या अगदी सगळ्या गोष्टी, कित्येक छान गाणी, कविता, श्लोक, रामरक्षा, १२ वा अध्याय, १५ वा अध्याय, अथर्वशीर्ष, शुभं करोति.. आणि अजून बरंच काही, ह्या सगळ्याची हसत-खेळत पारायणं व्हायची घरी! रंग ओळखा, बदक शोधा, कोडी सोडवा..यांसारखे असंख्य लहान मुलांचे खेळ खेळलोय आम्ही. शेजारच्या बोळात रोज क्रिकेट खेळायचो आम्ही. त्यात फक्त एकच नियम होता. मी कायम बॅटिंग करणार आणि आज्जी नेहेमी बॉलिंग! 'एक रुपयात हत्ती' हे माझं सगळ्यात लाडकं गोष्टीचं पुस्तक होतं. ती गोष्ट अशी होती की, एकदा सगळी लहान मुलं जत्रेला जातात. तिथे १ रुपयात प्राणी विकत मिळत असतात! कुठलाही प्राणी घ्या, फक्त १ रुपयाला! मग कोणी वाघ घेतं, कोणी सिंह घेतं, कोणी मोर घेतं तर एक जण चक्क हत्ती आणतो घरी! आणि मग त्या मुलांचे पालक कसे घाबरतात वगैरे.. जेवण झाल्यावर झोपताना मी ते अख्खं पुस्तक आज्जीकडून वाचून घ्यायचो! आणि आज्जीसुद्धा आवडीने मला मधाचं चाटण भरवत ते वाचून दाखवायची. मला अजूनही ती गोष्ट लक्षात आहे. त्या मुलांची नावं आठवतायत. इतकंच नाही तर कोण कुठला प्राणी विकत घेतो, हेसुद्धा लक्षात आहे!

एकदा खेळताना कशानेतरी माझ्या बोटाला कापलं आणि मी रडायला लागलो. ते बघून आज्जीने मूठभर हळद आणून माझ्या बोटावर ओतली! तिच्या साडीचा पदर फाडून बोटावर पट्टी बांधली आणि मला उचलून १२० च्या स्पीडने कोपऱ्यावरच्या बोधे डॉक्टरकडे घेऊन गेली! त्याच साडीची नंतर आम्ही गोधडी शिवली...

खूप वर्ष झाली या गोष्टीला..आता तिच्या हातावरच्या सुरकुत्या आणखी वाढल्यात..त्याचा grit size वाढलाय. एकदम high quality texture तयार झालंय त्या क्रेपच्या कागदासारख्या तिच्या त्वचेचं. थकलीय आता ती.. आणि त्यात भर म्हणजे सगळं विसरायला लागलीय आज-काल! ५ मिनिटांपूर्वी सांगितलेली गोष्ट पुन्हा सांगायला लागते तिला. मध्ये एकदा पत्यातलं ७-८ खेळत होतो आम्ही. प्रत्येक पान टाकताना विचारायची, "हुकुम काय रे?" मग दरवेळी हिला सांगा, "इसपीक ग.." आणि तिचे त्या डावात मी हात ओढले असले तरी पुढच्या डावात विचारणार, "किती हात ओढले मी तुझे? बोल हात देतोयस का पान?!" तेव्हा जरा वैतागून तिला म्हणालो, "अगं मी ओढलेत हात! किती ग विसरतेस? तू काय गजिनीचा आमीर खान आहेस का?!" त्यावर म्हणाली, "म्हणजे काय असतं? आम्हाला नाही बाबा ठाऊक!" त्यावर इतकं मनापासून हसू आलं मला..तिला म्हणावसं वाटलं, "आज्जी अगं अनंत हातांचं कर्ज आहे ग तुझं माझ्यावर..मी या दोन हातांनी ते कसं फेडू सांग..!"

तर अशी माझी आज्जी सध्या 'अनझेपेबल' state मधे आहे. थोडं कमी ऐकू येतं. गोष्टी सारख्या विसरते. परत परत तेच तेच प्रश्न विचारते. त्यामुळे कधी कधी मला तिला त्रास द्यायला खूप मजा येते! मी तिला छळायच्या मूडमध्ये असलो की तिला आज्जी कधी म्हणतच नाही! मालतीबाई किंवा थेट मालते! तिला मी म्हणतो, "मालते, तू आता ७५ वर्षांची झालीयस. एवढं आयुष्य जगलीस. एव्हाना तुला नक्कीच कळलं असेल की आयुष्य म्हणजे नेमकं काय असतं ते! सांग ना, काय असतं आयुष्य म्हणजे?!" पूर्ण bouncer असतो हा! जणू आता माझी बॉलिंग असते! ती हसून म्हणते, " नाही रे मला माहिती.." अजून काय बोलणार बिचारी? मग मी म्हणतो, "मी काय तसा लहानच आहे अजून. त्यामुळे माझ्या जन्माच्या आधीचं मला आठवतंय..सांगू?" "सांग बरं.." "अगं, ब्रम्हदेवाने जन्म देताना मला विचारलं, तुला कुठली आज्जी हवीय? एक खूप छान आज्जी दिसली मला तिथे...ती तू नव्हतीस काही! मी त्याला म्हणालो मला ती दे. आता ब्रम्हदेव तुझ्यासारखाच म्हातारा! त्याला ऐकू आलं 'मालती' दे! म्हणून मी तुझा नातू झालो आज्जी..!" ह्यावर उत्तर म्हणजे फक्त कवळी नसल्याने बोळक्यातून आलेलं हसू! मग मी तिला म्हणतो, "नाही अग आज्जी. मी मालतीच म्हणालो होतो. खरंच..आणि पुढच्या जन्मीसुद्धा मी मालतीच म्हणणार आहे. तू पुढच्या जन्मी अगदी काटेरी साळींदर झालीस ना, तरी मीच तुझा नातू होईन. आणि तुझ्या अंगावर काटे असले तरी तू तितकीच मऊ-मऊ असली पाहिजेस! मला काही माहिती नाही..कळलं ना तुला?..साळू आज्जी..!"

माझ्या लहानपणी आज्जी एक सोन्याची बांगडी घालायची. पण काही वर्षांपूर्वी जेव्हा आज्जीच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, तेव्हा तिने ती बांगडी घालणही सोडून दिलं. मधे एकदा आईने मला ती बांगडी दाखवली. मी ती हातात घेऊन बघत होतो तेव्हा लक्षात आलं की त्या बांगडीच्या थोड्या भागावारची नक्षी पूर्णपणे गेलीय. पण बाकी ठिकाणी ती शाबूत आहे. त्याबद्दल आईला विचारलं तेव्हा कळलं, माझ्या लहानपणी आज्जी मला मधाबरोबर सोन्याच्या वर्खाचं चाटण द्यायची, ती बांगडी उगाळून! का, तर म्हणे डोकं सुपीक होतं मुलाचं. हुशार होतं मूल.. दोन क्षण पायाखालची जमीन सरकल्याचा भास झाला आणि डोळ्यातून खळकन पाणी आलं.

एक ठराविक वय ओलांडलं की सगळेच आज्जी-आजोबा अशा अनझेपेबल state मधे जातात. आपण बऱ्याच वेळा आपल्याच धुंदीत आणि घाईत असतो. त्यामुळे कधी त्यांच्यावर वैतागायला होतं. एकच गोष्ट सारखी सारखी सांगायला लागल्यामुळे कधी कधी चिडचिड होते. पण कधी त्यांना आपण वेळ दिला ना, तर त्यांच्याशी गप्पा मारताना खूप मजा येते! अगदी मनापासून हसू येतं. आपण खूप प्रसन्न राहू शकतो त्यांच्यामुळे. पण कदाचित ही गोष्ट लक्षात न आल्याने म्हणा किंवा सुनेचा सासूवर राग म्हणून म्हणा, पण आज्जी-आजोबांपासून लांब राहण्याचा निर्णय आई-बाबा जेव्हा घेतात, किंवा त्याही पुढे जाऊन जेव्हा त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात, तेव्हा मला त्यांची कीव येते.. नातवंडांना त्यांच्या आज्जी-आजोबांपासून दूर करणं म्हणजे थंडीत शांत झोपलेल्या लहान मुलाच्या अंगावरची गोधडीच काढून घेऊन त्याला कुडकुडत ठेवणं. कधी कधी मोठ्याच्या वाट्याला येते ती गोधडी, पण धाकट्याला वंचित राहावं लागतं त्यापासून. का हा भेदभाव? का गोधडी जुनी झाली म्हणून? आणि मग आज्जी-आजोबाच मिळाले नाहीत तर मुलं गाणी, गोष्टी, श्लोक ऐकत घडण्याऐवजी टीव्हीवरच्या निरर्थक मालिका, वीडियो गेम्स आणि कॉम्पुटर मधे रमून जातात. आणि तसेच वाढतात. कसे संस्कार होतील सांगा? आणि तो मुलगा पुढे कितीही यशस्वी झाला ना, तरी तो आयुष्यातल्या खूप मोठ्या आनंदाला, खूप मोठ्या प्रेमाला आधीच मुकला असेल. आज्जी ही आईची आई असते या logic ने, तो अगदी तिन्ही जगाचा स्वामी झाला तरी भिकाऱ्यांचा भिकारीच असेल..बंगला असेल कदाचित त्याच्याकडे, गाडी असेल, उच्चशिक्षण, भरझरी वस्त्रे असतील आणि अगदी तलम, रेशमी, उंची कापडाचं पांघरूणही असेल अंगावर घ्यायला..पण ज्यात कापसाबरोबरच प्रेमही काठोकाठ भरलंय आणि म्हणूनच जी खूप उबदार झालीय.. आणि जी अंगावर घेतल्यावर एकटेपणा निघून जातो..अशी आज्जीची गोधडी मात्र त्याच्याजवळ नसेल…