Saturday, August 29, 2009

असं असावं जगणं...


निळ्याशार समुद्रात मनमुराद डुंबावं,

सहस्त्रश्मीची ऊबदार किरणं अलगद अंगावर घ्यावीत,

मनसोक्त शंख शिंपले वेचता वेचता,

एखाद्या पेटीत अचानक मोती सापडणं...

असं असावं जगणं!


बागेत एकटच बसावं निवांत स्वप्न रंगवत,

एखादं फुलपाखरू अलगद हातावर येऊन बसावं,

नकळत मूठ मिटताना आपलं तिकडे लक्ष जावं,

त्याच क्षणी फुलपाखराचं आपल्याकडे बघून विश्वासाने हसणं

असं असावं जगणं!


दऱ्याखोऱ्यात, निसर्गाच्या सान्निध्यात मन रमवायला जावे,

तिथे अचानक काही मोर फिरताना दिसावे,

पावसालाही अचानक अवसान यावे,

त्या फुललेल्या पिसाऱ्याच्या सौंदर्याने डोळ्याचं फिटलेलं पारणं...

असं असावं जगणं!


चांदण्यारात्री तिच्याबरोबर आकाशातले कोटीकण बघत बसावे,

तिचा हात हातात धरून आयुष्यावर बोलत राहावे,

दोघांनी भावी जीवनाची स्वप्ने रंगवतानाच

एखाद्या उल्केचं निखळून पडणं...

असं असावं जगणं!


आपल्या माणसांवर जीवापाड प्रेम करणं,

कोणाचाचं वियोग सहन होणार नाही असं जाणवणं,

सर्वात आधी मला वर घे असं देवाला विनवणं,

आणि यमराजाने लगेच हसून मान डोलावणं...

असं असावं जगणं!


Monday, August 24, 2009

'त' ची भाषा

" आई, मी तुला कसा झालो गं? बाळ कसं जन्माला येतं? म्हणजे ते असं आईच्या पोटात जातं कुठून?!" छोट्या विनयने आईला एका दमात असे सगळे प्रश्न विचारले. तो आता दादा होणार होता ना...! त्यावर, "विनू, अरे 'ते' तुला तू मोठा झाल्यावर कळेल हं.." असं साधं, सोप्प उत्तर आईने त्याला दिलं. त्यामुळे विनू गोंधळायचा तो गोंधळलाच आणि तिथूनच सुरुवात झाली '' च्या भाषेला..!

"अहो, केबल घेताय, ठीक आहे. पण ते 'तसले' channels block करा. लहान मुलांना नसते अक्कल, बसतात बघत आणि वाईट परिणाम होतात मग मनावर.." असं म्हणून विनूच्या आईने त्याच्या बाबांना 'तसले' channels block करायला लावले. खरं म्हणजे बाबांनाही 'तसलं' काही आता बघायला मिळणार नव्हतं! आईने एकाच दगडात दोन पक्षी मारले होते!

विनय आता मोठा झाला होता. फुल पँट घालून हायस्कूलला जायला लागला होता. मित्रांकडून त्याला आता 'तसलं' knowledge मिळत होतं... 'तसल्या' गप्पा, 'तसले' jokes हा त्याच्या group मधे बोलण्याचा मुख्य विषय असे. मिळालेलं knowledge एकमेकांना देऊन सगळेच 'सुशिक्षीत' होत होते... ज्ञानाचे दीप पेटवून आता सबंध group 'उजळला' होता. 'ते' ज्ञान वाटता वाटता 'एकमेकां साहाय्य करु, अवघे धरु सुपंथ' चा प्रत्यय त्यांच्या group मधल्या प्रत्येक विनयला येत होता. वी मधे ती 'तसली' CD पाहिली, 'तसल्या' websites बद्दल त्याला कळलं आणि मंडळी आता चांगलीच ज्ञानी झाली होती...!

इथे आई बाबानां म्हणाली, "अहो, विनय आता मोठा झालाय, त्याला आपणं 'त्या' बद्दल काही सांगणं अपेक्षित आहे का? उगाच बाहेर चूकीचं काहीतरी शिकून यायचा आणि हल्लीची पिढी तर घसरडे बूट घालूनच जन्माला आलीय! कधी पाय घसरेल सांगता येत नाही...!" त्यावर बाबांचं असं म्हणणं होतं की मुलगे त्यांचे ते शिकतात आणि त्याला काही प्रश्न असतील, तर तो स्वत: मला येऊन विचारेल की! मी खूप friendly आहे त्याच्याशी...विनयचं मात्र मत होतं की आपले आई-बाबा खूप सज्जन आहेत आणि आपण त्यांच्यापेक्षा जास्त 'पोहचलेलो' आहोत..!!

पण एके दिवशी जेवताना आईने बाबांना खूण केली आणि बाबा धीर एकवटून म्हणाले, ."विनय, जरा बोलायचंय तुझ्याशी..तुझा अभ्यास वगैरे व्यवस्थित चाललायं ना? काही problem वगैरे नाही ना? हं, म्हणजे एवढे चांगले marks पडतायत म्हणजे चांगलाच चालला असेल! Good, good! Keep it up! लढत राहा. खूप मोठी स्वप्न बघ...तीव्र इछाशक्ती ठेव आणि ती स्वप्न पूर्ण करायच्या मागे लाग..!!" Friendly म्हणवणारे बाबा पूर्णपणे भरकटले होते...आईने आलेलं हसू दाबलं होतं..विनयला काहीच कळत नसल्याचं पहून आई म्हणाली, " हे बघ विनय, तुझं हे आत्ताचं वय आहे ना, ते थोडसं वेडं असतं. ह्याला कुमारावस्था म्हणतात. या वयात शरीरात आणि मनात बदल होत असतात..." गाडी नेमकी कुठं चाललीय हे ज्ञानी विनयला लगेच समजलं आणि घाईत असल्याचं काहीतरी कारण सांगून तो तिथून सटकला!

विनयची आता १२वी झाली होती आणि त्याचा धाकटा भाऊ, सुशील, ६वीत गेला होता. विनय एकदा आईला म्हणाला, "आई,तू घरी असतेस ना, तर सुशीलवर जरा लक्ष ठेवत जा. परवा रात्री तो M TV बघत बसला होता. त्याला सांग ते 'तसलं' काहीतरी बघण्यापेक्षा अभ्यास कर म्हणावं! लहान आहे अजून तो आई...!" मोठ्या विनयची जबाबदारीची भाषा ऐकून आईला खूप कौतुक वाटत होतं आणि विनयही आता '' ची भाषा बोलत असल्याचं पाहून आईला वाटलं, आता खरा मोठा झाला आपला मुलगा..!

मधे बरीच वर्षे गेली. विनयचं लग्न झालं. त्यालाही आता वर्ष होतील. विनय एव्हाना अस्ख्लितपणे त्याच्या बायकोशी ''ची भाषा बोलू लागला होता..! एकदा असच विचार करताना विनयच्या लक्ष्यात आलं...की Sex Educationहे फक्त science नसतं. म्हणजे जरी ते पूर्णपणे scientific असलं तरी त्याच्याबरोबर एक language compulsory असते... '' ची language! तुम्हाला यात elective नसतो.दोन्हीवर अगदी प्रभुत्व हवं तुमचं. नाहीतर काही खरं नाही! '' ची भाषा घरी शिकवली जाते. पण science साठी मात्र मित्रांचे coaching classes लावावेच लागतात! हल्ली coaching classes ना कुठे पर्याय आहे?!

विनयने त्याच्या मुलीचं नाव ठेवलं नम्रता..हे नाव आजी-आजोबांना खूप आवडलं. 'विनय' आणि 'सुशील' च्या decent league मधे 'नम्रता' हे नाव आलं होतं..! त्या दिवशी बारशाला एका सुसंस्कारित मराठी कुटुंबात, आपल्या घराण्याचा सज्जनतेचा वारसा जपल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर होता...