Thursday, September 29, 2011

पूर्वीसारखी झोप

थिएटरमधे पाऊल टाकल्या टाकल्या सिनेमा सुरु व्हावा,
तसं बिछान्यात पडल्या पडल्या झोप लागून मी स्वप्नही पाहू लागायचो!
तेव्हाची स्वप्नं निरागस होती
आता स्वप्नं पाडावी लागतात
पण ठरवून पाडलेली स्वप्नं स्पष्टपणे दिसत नाहीत
हल्ली मला पूर्वीसारखी झोप काही येत नाही.

दुधाचे दात तर केव्हाच गेलेत
त्यानंतर कॉम्प्लानचे दातही येऊन गेले
आता चहाच्या दातांनी खळखळून हसू फुटत नाही
हल्ली मला पूर्वीसारखी झोप येत नाही.

निळ्या निळ्या फेसबुकने प्रत्येकाशी जोडला गेलोय
प्रत्येकच जवळच्याशी कुठेतरी तोडला गेलोय
कुणाची जगणी कुणावाचून अडलीयत?
देवाला वाहिलेली फुलं निर्माल्य होऊन तिथेच सडलीयत
लोकांची आयुष्य त्या wall वर उघडी पडलीयत
झोपताना कुणी आता तेल लावत नाही
हल्ली मला पूर्वीसारखी झोप काही येत नाही.

लहानपणी पत्त्यांचा बंगला करायचो
जरा वारा आला, की पुन्हा सुरु करायचो
आता अपयश काही पचवता येत नाही
त्यामुळे मीही मग यशाची गाडी सेकंड गिअरपुढे नेत नाही
बँक बॅलन्स वाढतोय, पण आयुष्य मात्र भरत नाही
हल्ली मला पूर्वीसारखी झोप काही येत नाही.

स्वप्नांचा बादशाह भविष्यकाळात जगतोय
विचारांचा गणिती भूतकाळातून शिकतोय
वर्तमानातल्या क्षणात क्षणैक सुख शोधतोय
कर्माची फळं वर्मावर भोगतोय
हातावर छडी मिळूनसुद्धा आता वागणं बदलत नाही
हल्ली मला पूर्वीसारखी झोप काही येत नाही...

Thursday, August 11, 2011

राजसा निजलास का रे..?

चौथीला स्कॉलरशिपला बसवणार आहात का मुलाला? ५ वी पासून आम्ही ह्याला वेगळ्या शाळेत घालणार आहोत. जरा लांब आहे ती. पण चांगली आहे. आई ७ वीची स्कॉलरशिप अवघड असते का ग? नाही बाळ. तू हुशार आहेस ना? तुला सोप्पी जाईल. ८ वीला परांजपे सरांचा क्लास लावायचाय अहो ह्याला! आता रोज इतक्या लांब सायकल मारत जाणार का हा? जाऊ देत ग, त्याचे सगळे मित्र तिथेच जाणार आहेत म्हणतोय ना..नववी ही दहावीपेक्षा अवघड असते बरं.. आता स्पर्धा काय फक्त शाळेतल्याच मुलांशी नाही.. बोर्डात आलं की आयुष्याची दिशाच बदलते... आर्ट्स साईडला पुढे काय असतं? काहीच नसतं! अरे तू हुशार आहेस ना? हुशार मुलं Science च घेतात. ११ वीत timepass करून career चा बट्ट्याबोळ करून घेतलेल्या मुलांची भरपूर उदाहरणं आहेत.. हे बघ. नीट ऐक. हे वय पाय घसरायचं असतं. या वयात प्रेमात वगैरे पडू नकोस. त्यासाठी अख्खं आयुष्य पडलंय. या वयात मुलांनी मनापासून अभ्यास केला पाहिजे.. हेच तर घडायचे दिवस असतात.. १२ वी बोर्ड आणि दहावी बोर्ड यात जमीन अस्मानाचा फरक आहे... अभिनंदन! बोल. मग काय ठरवलंयस? Engineering का Medical?... मी..? माझं ठरत नाहीये.. कळत नाहीये.. तुला Physics आवडतं का Biology? काहीच नाही.. बरं, मग तुला Maths आवडतं का Bio? Umm.. Maths. म्हणजे Engineering... ए माझं ठरलं रे. Engineering. मी लहानपणीच ठरवलं होतं. मला Computer Engineer व्हायचंय म्हणून. Computer का?.. मला लहानपणापासून Computer ची आवड आहे. माझ्या बाबांचा आहे ना आमच्या घरी. आणि मी आता सुट्टीत एक course पण करणार आहे. आणि सध्या भयंकर scope आहे अरे. माझ्या चुलत भावाला तर ३ कंपन्यांनी offer दिली होती.. MS करावं, MBA करावं की MTech? GRE चे words पाठ झाले का? कुठे कुठे apply करतोयस? मी त्या बँकेचं लोन घेणार आहे. Interest rate सगळ्यात कमी आहे. इकडची education system कसली चांगली आहे ना? Job मिळाला का रे? खूप apply केलंय.. मला आश्चर्य वाटतं की अमेरिकेतही ओळखीने नोकऱ्या मिळतात. आता कमावतोयस तर मार एकदा आमच्या west cost ला ट्रीप! हा..काका काय म्हणताय? काय अमेरिकन..तुम्ही आता तिकडचेच झालात की.. इकडे यायचा विचार आहे की आता तिकडेच..? नाही नाही. असं कसं. येणार ना भारतात.. Frankly speaking, all I am looking for is the results. That's the bottom line. Come on..You know you are intelligent. You are smart. All you have to do is to put little extra bit of efforts.. You are young. You should be more efficient than me!..काय म्हणतेस आई? अरे किती दिवसांनी बोलतोयस..busy असतोस का? बर मी काय म्हणते, आपल्याला तुझ्या लग्नाचं बघायला हवं आता. तू काही ठरवलंयस का तिकडे? नाही आई.. नक्की नाही? नाही. म्हणजे अशी कोणी मिळालीच नाही. ठीक आहे मग आम्ही बघायला लागतो. तुझी काय स्वप्नं आहेत? मला काही वर्ष job करून भारतात यायचंच. Great! आणि तुझी? मलाही काही वर्षे अमेरिकेत राहायला आवडेल. Independent. नंतर सासरच्या लोकांबरोबर राहायचं असतंच.. तुम्ही दोघेही आता तिशीचे झालायत.. तुम्ही family planning करताय की नाही..? हे बघ, योग्य वेळेत सगळं झालं पाहिजे.. हो आई..एक heavy प्रोजेक्ट चालू आहे..promotion चे chances आहेत.. मग आम्ही...आज मला इतक्या सकाळी का जाग आलीय? किती वाजलेत? ४?! सूर्योदयापूर्वी बाहेर कसं असतं बघून तरी येऊ..बोचरी थंडी आहे..काय सुंदर दिसतीय बाग..धुक्यात. एक मिनिट! माझ्या घरामागे अशी बाग नाहीये.. हे तर माझं आजोळ आहे. मी स्वप्नात आहे का? झाडं अजून झोपेत आहेत.. पानापानातून झोप ओघळतीय खाली.. ह्या कळ्या तर आज उमलतील.. त्यांच्या आयुष्याचा पाहिला दिवस!.. हा प्रेमळ गारवा फक्त पहाटेच पाडतो का? कसे सगळे शांत झोपलेत.. जागा आहे तो फक्त मी आणि ही थंडी. म्हणजे कोणीतरी आहे माझ्या सोबतीला.. मी चप्पल काढावी.. हा... पायरीची फरशी कसली गार पडलीय... इथंच उभं राहावं. हा पायाखालचा गारवा कधी जाऊच नये.. अहाहा.. जग थांबलय असंच वाटतंय. at least वेळ खूप हळू पुढे सरकतीय.. आईनस्टाईन चा काहीतरी प्रमेय आहे ना यावर? आज पहिल्यांदा असं झालंय की मी सोडून बाकी सगळे सजीव झोपलेत. अगदी झाडंसुद्धा.. ती लाडकी मोगऱ्याची फुलंसुद्धा.. त्यामुळेच मला इतकं शांत वाटतंय.. सजीवांचासुद्धा गलका होतो.. मेंदू न चुकता अगदी रोज ठणकतो.. आणि आयुष्यात आपण रोज गुंतत जातो.. समोरची व्यक्ती कोणतीही असू देत.. आई..बायको..Boss..मित्र..काका..मामा.. किंवा आपल्याला ज्याचा सगळ्यात जास्त राग येतो असा तो... मी शेजारी नाही म्हटल्यावर हिला जाग तर आली नसेल..? आणि ती आपल्या मागे उभी तर नसेल..? नाहीये.. मला अजून थोडयावेळ एकांत हवाय.. हे स्वप्न असेल तरीही..please मला कोणी स्वप्नातून उठवू नका.. हा आलाच बघ सूर्य. ए अरे..कशाला पाडतोयस किरणं तुझी? बघ उठायला लागले सगळे.. चिमण्या ओरडायला लागल्या.. झाडं जागी होतायत.. नको ना... त्या समोरच्या मोगऱ्याचा देखील मला राग येतोय आता.. म्हणजे मी त्याच्यावर मनापासून प्रेम केलंच नाही का?... मी जातो आत.. दिवस उजाडायच्या आत मला थोडा वेळ झोपायचंय.. परत तेच सगळं सुरु व्हायच्या आत मला थोडावेळ झोपायचंय... नेमकी आत्ताच बाथरूमला लागायची होती..?

झोपेत सगळा गुंता सुटत असतो.पुन्हा गुंता होण्यासाठी..

Thursday, February 24, 2011

बिन्न्या

आमच्या भारत देशात, महाराष्ट्र राज्यातल्या एका छोटयाश्या खेडयात १० वर्षांचा बिन्न्या राहतो. वडील शेतकरी. आई घरीच असते. बिन्न्या म्हणजे अगदीच किडकिडीत शरीरयष्टीचं वितभर पोर. आईबापाचा गव्हाचा रंग, कणसाच्या दाण्यासारखे दात आणि काळेभोर डोळे घेऊन जन्माला आलेला. अन् डोळेपण किती काळे, तर त्यांचा रंग अमावास्येच्या काळ्यामिट्ट रात्रीलाही फिका पाडतो! त्या रात्री चंद्र नसल्यामुळे कशी एखादी चांदणी जास्तच चमकत असते, त्याच चांदणीची चमक डोळ्यात भरून त्या वरच्या देवाने त्याला खाली टाकलंय!

तर असा आमचा बिन्न्या गावातल्या सरकारी शाळेत शिकतो. सकाळी उठून मोरीत दात घासून झाले की शेजारच्या बंबावर तापत असलेलं गरम पाणी घेऊन आई त्याला तिथंच आंघोळ घालते. ते झालं, की घरच्या एकुलत्या एका गाईचं धारोष्ण दूध प्यायचं अन् शाळेकडं पळायचं. खाकी चड्डी-पांढरा शर्ट आणि चड्डीच्याच रंगाचं त्याचं ते एका बंदाचं दप्तर. तेल लाऊन आई चप्पट भांग पाडून देते अन् मग स्वारी शाळेकडे जायला निघते.

शाळेची पायवाट कुरणातून जाते. त्यामुळे बिन्न्या जेव्हा शाळेत पोहोचतो, तेव्हा त्याच्या सावळ्याश्या पायांवर कुरणांचे पांढरे ओरखडे उठलेले असतात. बाई जे शिकवतायत ते भक्तिभावानं शिकायचं, मधल्या सुट्टीत अखंड दंगा घालायचा, मित्रांबरोबर भाकरी खायची अन् शाळा सुटली की मित्रांबरोबर खेळून, टिंगल-टवाळ्या करत घरी यायचं.

त्याने आणि त्याच्या मित्रांनी शाळेच्या मैदानाच्या आवारात एका झाडामागे सायकलचे टायर लपवून ठेवलेत. शाळा सुटली की ते टायर घ्यायचं, एखादी काठी शोधायची आणि चाक पळवायची शर्यत लावायची, हा त्यांचा उद्योग. ते खेळून झालं की पुढच्या इयत्तेतल्या मुलांचा विटी-दांडूचा खेळ बघायचा. बिन्न्या लहान असल्यामुळे त्याला ते विटी-दांडू खेळायला घेत नाहीत. पण पुढच्या वर्षी, पाचवीत गेल्यावर घेणार आहेत असं म्हणतो.

हे होईपर्यंत सूर्य मावळत आलेला असतो. मग स्वारी दप्तर उडवत उडवत पुन्हा घराकडे जायला निघते. वाटेत बिन्न्याला एक पडकी भिंत लागते. तिथं चिंचेचं मोठं झाड आहे. अजून आम्हाला काही दगड मारून चिंचा पडता येत नाहीत. त्यामुळे तो खाली पडलेल्या, पण न फुटलेल्या चिंचा शोधतो आणि सोलून तोंडात टाकतो.ती पडकी भिंत जेमतेम त्याच्याच उंचीची आहे. मग बिन्न्या खालच्या दगडावर उभा राहून आपली दोन्ही कोपरं त्या भिंतीच्या कठड्यावर टेकवून मावळत्या सूर्याकडे बघत बसतो. तिकडे क्षितिजावर खाली जाणारा लाल-केशरी सूर्य असतो आणि इकडे बिन्न्याच्या तोंडात आंबट-चिंबट चिंच असते. त्याला क्षणभर वाटतं, आपल्याला लालचुटूक सुर्याचीच चव लागतीय! तो सूर्य चवीला आंबट असावा... संध्याकाळचा गारवा आणि त्यात बेफाम सुटलेला वारा बिन्न्याचे तेल लावून चप्पट भांग पडलेले केस उडवायचे अतोनात प्रयत्न करतो. पण वाऱ्याला ते काही जमत नाही. मग तो चिडून माती उडवतो, जी बिन्न्याच्या केसाला जाऊन चिकटते.

एव्हाना चिंच खाऊन झालेली असते. चिंचोका जिभेवर रेंगाळत असतो. मग बिन्न्या दप्तरातून आपली लाडकी 'ष्टील'ची कंपासपेटी काढतो. त्यात पेन, पेन्सिल, रबर..असं काहीच नसतं. असतात फक्त चिंचोके! बिन्न्या दप्तर लावून घेतो. तोंडातला चिंचोका त्या कंपासीत टाकतो आणि खुळखुळ्यासारखी ती खडाखडा वाजवत घरी येतो...

आईनी एव्हाना पाणी गरम करून ठेवलेलं असतंच. त्या मळक्या पोराला ती खसाखसा घासून आंघोळ घालते. जेवायला कधी दूध-भात तर कधी वरण-भात असतो. जेवण झालं की आबा त्याची उजळणी घेतात. बिन्न्याचे वडील दहावीपर्यंत शिकलेत. तो त्यांना आबा म्हणतो. बिन्न्याचे डोळे मिटायला लागले की आबा अभ्यास थांबवतात. मग बिन्न्याला आई लागते. तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून पडतो. मग आई त्याला गोष्ट सांगते. आईकडे मोजून ३ गोष्टी आहेत. त्याचं ती आलटून पालटून सांगते. पण बिन्न्याला ते खूप आवडतं. ती गोष्ट चालू असताना कधी त्याची ब्रम्हानंदी टाळी लागते कळतही नाही..! बिन्न्या अगदी गाढ झोपी जातो..

काही वर्षातच हा छोटासा बिन्न्या मोठा होईल. खेडेगावातसुद्धा वेळ पटकन जातो बरंका! गावातली सरकारी शाळा दहावी पर्यंतच आहे. त्याला तितकंच शिकवायचं, यावर त्याच्या आबा आणि आईचं एकमत आहे. दहावी शिकला की आबाला शेतीत मदत करेल आणि पुढे तोच शेती करेल. 'शेतीच करायची, तर शिकायचं कशापायी?' या प्रश्नाचं उत्तर 'कुनी येड्यात काढू नये म्हनून.' असं त्याचे आबा देतात. बिन्न्या शहराकडे चुकूनही जाणार नाही. त्यांच्याच गावातला एकाचा मुलगा रोजगारासाठी मुंबईला गेला होता. रेल्वे प्लॅटफॉर्मवर हमालाचं काम मिळालं. मुंबईत जागा घेणं कसं परवडणार. फुटपाथवर राहायचा. लोकांच्या सामानांची ओझी वाहून वाहून इतका थकला बिचारा, की त्याला स्वतःच्या आयुष्याचं ओझं झेपेनासं झालं. मग त्यानं दारूला जवळ केलं. मग तर सगळच संपलं... 'दारू पिऊन येगळ्याच विश्वात जगायला लागतो मानुस.. डोस्कं फिरतं त्याचं. भ्रष्ट बुद्धीला औषध न्हाय रं...' असं आबा म्हणतो. त्यामुळे बिन्न्या कधीच शहरात जाणार नाही.

आत्ता शरीराच्या काड्या असल्या, तरी एकदा शेती करायला लागला की बिन्न्याचं शरीर भक्कम होईल. तो स्वतःचा घाम गाळून, धान्यांची बीजं मातीच्या गर्भात ठेऊन इमाने इतबारे तिला प्रसवत राहील. पुढे त्याचे लग्न होईल. कुटुंब वाढेल. एकार्थी त्याचं आयुष्य बदलेल. पण शेवटपर्यंत प्रामाणिकपणे कष्ट करून, थोडे थोडके पण हक्काचे आनंद वेचत तो आयुष्य कसवेल. तेवढे संस्कार आबा आणि आई देतायत त्याला. एक दिवस तो त्याचं खेडयात प्राण सोडेल. त्याच्या शरीराची राख त्याच गावातल्या नदीत सोडली जाईल आणि त्याच पाण्यानं पुढे भरघोस पिकं येतील..

बिन्न्याचे सगळे मित्र त्याच्या गावचेच असतील. त्यांना त्याला कधीही भेटता येईल. आयुष्यभर तो त्याच्या आई-वडिलांसोबत राहील. आधी त्यांच्या छत्राखाली आणि मग त्यांची काठी बनून. तो कधीच इतका busy असणार नाही की मित्रांना हरवून बसेल. त्याला कधीच long distance relationship 'maintain' करावी लागणार नाही. २१ व्या शतकाच्या या जीवघेण्या स्पर्धेत त्याला पळावं लागणार नाही. तो माणूस असला तरी त्याच्या मनात कधी कोणाबद्दल ईर्षा नसेल. अहो कशासाठी असेल? ज्ञानाच्या शक्तीच्या नावाखाली तो तुमच्या internet च्या जाळ्यातही अडकणार नाही. अहो, ज्याला 'Social Status' म्हणजे काय हेच आयुष्यभर समजणार नाही, तो काय त्याचा status update करणार! तुमच्या business venture मध्ये या बिन्न्याला कसं ओढून घेता येईल याचं काही solution आहे का तुमच्याकडे Mr. Zuckerberg..the Spiderman?! काय म्हणता Mr. Jobs, social status maintain करायला बिन्न्या तुमचा 'iPhone' किंवा 'MacBook Pro' घेईल का हो? मी असं ऐकलंय तुम्ही Marketing मधे इतके expert आहात, की कोणालाही काहीही विकू शकता! दाखवा तुमचा product या बिन्न्याला विकून.. कोळी कितीही विषारी असला, तरी जाळ्यात कधीच न सापडणाऱ्या किड्याला तो काहीच करू शकत नाही.

Technology ही दारूसारखी असते. एका आनंददायी अश्या वेगळ्याच विश्वात आपल्याला ती घेऊन जाते...आपली बुद्धी भ्रष्ट करून.. ह्याच वेगळ्या विश्वात आपण सगळे आहोत. माझी जेव्हा 'उतरते', तेव्हा मला बिन्न्या दिसतो.. काळ्यामिट्ट डोळ्यांचा..अन् कानात त्याच्या चिंचोक्यांच्या कंपासपेटीचा खडाखडा आवाज ऐकू येत राहतो...

Wednesday, January 5, 2011

फुललेला निखारा

एक मी होतो
ध्यासलेला तारा
पोटात तेजतप्त
फुललेला निखारा

एक मी होतो
पराक्रमी छाती
उजळवली कर्मभूमी
पेटवल्या ज्योती

एक मी होतो
प्रेमाच्या सरी
होतो राधेसाठी
कान्हाची बासरी

एक मी होतो
आधार दीनांचा
जेष्ठ कौंतेय
पुत्र सूर्याचा

एक मी होतो
धरतीचा कुबेर
सरस्वतीची वीणा
कार्तिकेयाचा मोर

एक दिन आला
श्वास हलकेच थांबला
मंद आला वारा
अन् विझला तो निखारा

आज मी बघतो
जग थांबले नाही
समुद्रातल्या स्वर्ण थेंबाने
मागे ऋण सोडले नाही

पुन्हा आस आहे
त्या तेजात बुडण्याची
जिंकता न येणारा खेळ
पुन्हा एकदा खेळण्याची

पुन्हा असीन मी
ध्यासलेला तारा
पोटात असेल माझ्या
फुललेला निखारा