Monday, August 27, 2012

जनरेशन गॅप आणि शीलाची scientific जवानी..


मला लहान मुलांशी कधीच छान गप्पा मारता येत नाहीत. कारण, मला किती वयाच्या मुलाशी काय गप्पा मारलेल्या त्याला आवडतील, हे अजून समजत नाही. "सुशांत दादा/काका/मामा लई बोर गप्पा मारतो" असं मग तो सगळ्यांना सांगत फिरेल, अशी भीती माझ्या मनात बसली आहे!

मध्ये मी माझा पुतण्या, तन्मयशी बोलत होतो. "काय मग तन्मय, कितवीत गेलास तू आता?" मी त्याला विचारलं. सगळी मोठी माणसं, लहान मुलांना पहिला हाच प्रश्न विचारतात, म्हणून तो अगदीच सेफ प्रश्न होता. "सातवीत." तन्मय म्हणाला. "अरे वाह!.." मी म्हणालो. पण पुढे काय..?! काय बरं विचारता येईल सातवीतल्या मुलाला..? 'मग, सातवीच्या स्कॉलरशिपला बसणार का?' नको! उगंच कशाला अपेक्षांचं ओझं! आणि आई-वडील सोडले तर अजून कोणालाही तुमच्याकडून कसल्याही अपेक्षा नसतात! अर्थात हे कळायला मोठं व्हावं लागतं म्हणा! पण असो. हा प्रश्न नको. मग मी आठवू लागलो, मला लहानपणी लोकांनी काय प्रश्न विचारले होते.. 'मग, सहावीत, वार्षिक परीक्षेत गणितात किती मार्क पडले तुला..?' मोठी माणसं हा प्रश्न का विचारतात मला अजून कळत नाही. मला इतर विषयांप्रमाणेच गणितात मार्क मिळायचे ('चांगले का वाईट?' हा मुद्दा या लेखाच्या स्कोपच्या बाहेरचा आहे!). त्यांच्या लहानपणी त्यांची गणितात विकेट उडाली, म्हणजे सगळ्यांचीच उडायला पाहिजे काय? आणि जर माझीही गणितात विकेट उडली असेल, तर ते ऐकून त्यांना कसला आनंद मिळणार आहे...?! असो. हा पण प्रश्न नको. सातवी...सातवी..सातवी.. मी आठवू लागलो आणि अचानक माझ्या डोक्यात ट्यूब पेटली! "तुला मोठेपणी कोण व्हायचंय..?"

आम्ही सातवीत असताना हा आमचा लाडका चर्चेचा मुद्दा होता! "तुला मोठेपणी कोण व्हायचंय..?" आमच्या ग्रुप मध्ये आम्ही एकमेकांना विचारायचो. आमच्या एका मित्राला आर्मी जॉईन करायची होती. सौरभ  नावाचा मित्र म्हणायचा, मला कॉम्पुटर इंजिनियर व्हायचं आहे. त्याकाळी कॉम्पुटर मधला पत्त्याचा गेम सोडून बाकी ते काय असतं, कोणालाही माहिती नव्हतं. त्याला "का रे?" विचारल्यावर म्हणायचा, "माझे बाबा म्हणाले, कॉम्पुटर इंजिनियर झाल्यावर जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस होता येतं!" तर एकाला ओपन हार्ट सर्जन व्हायचं होतं.. "ए, ओपन हार्ट सर्जन म्हणजे काय?"..आम्ही विचारायचो... "ऑपरेशन करताना हृदय कापून उघडून ठेवतात!" हे त्याचं उत्तर! ..."बाप रे! का रे?"... "अरे म्हणजे कुठे बिघाड झालाय सरळ सरळ दिसतं..! पण खूप नाजूक काम असतं बरंका..!"... हे असे आम्ही होतो सातवीत असताना! ('आता ते माझे मित्र काय करतात?'..'त्यांची स्वप्नं पूर्ण झाली का?'.. 'सौरभच्या बाबांचं सध्याचं काय मत आहे?'.. हे प्रश्न प्रस्तुत लेखाच्या आवाक्याबाहेरचे आहेत. त्यांच्या उत्तरासाठी दुसरं काहीही रिफर करू नये. कारण त्याबद्दल काहीही लिहिले जाणार नाहीये..!)

"मग तन्मय, मला सांग, तुला मोठेपणी कोण व्हायचंय..?" मी तन्मयला विचारलं. तो म्हणाला, "फॅशन डिज़ाइनर"! मला शास्त्रज्ञ, सैनिक, डॉक्टर, सचिन तेंडूलकर, स्टीव जॉब्स, नरेंद्र मोदी, आमीर खान, सलमान खान, युसेन बोल्ट, मायकल फेल्प्स, अण्णा हजारे, पु.ल.देशपांडे, सोनू निगम, झाकीर हुसैन, गिरीश कुलकर्णी, संदीप खरे, गुरु ठाकूर, अजय-अतुल... यापैकी कुठलंही उत्तर चाललं असतं. म्हणजे मी त्याची मानसिक तयारी ठेवली होती! पण सगळं सोडून फॅशन डिज़ाइनर? तेसुद्धा सातवीत?!  काहीतरी मलाच समजत नव्हतं. तरी मी त्याला शांत राहून म्हणालो, "फॅशन डिज़ाइनर? अरे वाह! आत्तापर्यंत मला कोणीच असं उत्तर दिलेलं नाहीये.. (जसं काय मी सातवीतल्या मुलांचे इंटरव्यू घेत फिरत होतो!). पण का रे? असं या प्रोफेशन मधे काय आहे, जे तुला सगळ्यात आवडतं..?" तन्मय म्हणाला, "काहीतरी अलौकिक शोधून काढण्याची शक्यता..!" आता मात्र कंप्लीट बाउन्सर बॉल होता! त्याला शान्स्त्रज्ञ म्हणायचं होतं का? पण त्यात गैरसमज करण्याएवढाही तो लहान नाहीये, असं मी स्वत:ला समजावलं. मग 'काका', 'कोणीतरी मोठा' आणि तत्सम इगो बाजूला ठेवून मी त्याला म्हणालो, "मला नाही रे कळत आहे.. जरा समजावून सांगतोस..?"

तन्मय हसला. मला म्हणाला, "काका मला सांग, तू 'शीला की जवानी' गाणं बघीतलं आहेस?" मला धक्काच. हो म्हणू का नाही म्हणू...मी विचार करू लागलो.. मी कधी बघत असताना तन्मयने मला बघीतलं होतं की काय..! शेवटी, जाऊदेत असा विचार करून म्हणालो, "हो..बघितलंय बहुतेक.. ते टीव्हीवर अधून मधून लागतं.. छान आहे म्युसिक त्याचं.. विशाल-शेखरचं! आणि सुनिधी चौहान तर मस्तच गाते..!". मी जरा जास्तच सज्जनपणाचा आव आणला. पण आणायलाच पाहिजे होता. काहीही झालं तरी पुतण्या आहे माझा तो! "त्यात बघ कतरिनाचा तो ड्रेस आहे. तिने पांढरा शर्ट घातलाय. त्यावर काळा टाय. छोटी काळी शॉर्ट्स आणि वर हॅट... त्यात कशी दिसलीय सांग कतरिना..?" आता मात्र कहर झाला होता! मी काय उत्तर देणं अपेक्षित होतं त्याला?! माझ्या बुद्धीची चक्र पुन्हा जोरात फिरू लागली.. इयत्ता सातवी.. इयत्ता सातवी.. काय काय शब्द माहिती असतात सातवीत असताना..? त्यात जनरेशन गॅप चा थोडा अलाऊवन्स... मी विचारलं, "छान?"...... "बरोब्बर!" तन्मय म्हणाला. मी मनातल्या मनात "हुश्श" केलं.. पुढे तो म्हणाला तर, "त्या कपड्यात अशी काय स्पेशल बाब आहे, ज्याने कतरिना जरा जास्तच छान दिसते, हे फॅशन डिज़ाइनर शोधून काढतो!"... "म्हणजे?"... "म्हणजे बघ काका, हॉटेल मधला वेटर पण काळा टाय घालतो, पण तो कधी इतका छान दिसतो का? आमचे समोरचे काळे काका, रोज काळी चड्डी घालून ग्राउंडला चकरा मारत असतात. पण त्यांच्याकडे कोणी बघत बसतं का?! चार्ली चॅप्लिन काळी हॅट घालायचा. तो ग्रेट होता. पण त्याला कधी कोणी सुंदर म्हणायचा का? आणि तू!..." "मी काय?!"... "परवा काकी तुला म्हणत होती ना, इतके पांढरे शर्ट घालतोस तू, की लोकांना वाटेल एकंच शर्ट आहे ह्याच्याकडे! जरा रंगीत घालत जा..! मग पांढरा शर्ट, काळा टाय, डोक्यावर हॅट, काळी शॉर्ट्स आणि एका स्त्रीचा कमनीय बांधा...".. मी आवंढा गिळला.. "ह्या गोष्टी एकत्र आल्यावर अशी काय जादू होते, की ती व्यक्ती "छान" दिसते.. "खूप खूप छान" दिसते..? हे फॅशन डिज़ाइनर शोधून काढतात.. आणि तसे कपडे डिज़ाइन करतात.."

मी तन्मयकडे अवाक होऊन पाहत होतो.. त्याच्या विचार शक्तीचं मला खूप कौतुक वाटलं. मी कधीच असा विचार केला नव्हता..! अगदी उत्स्फूर्तपणे मी त्याची पाठ थोपटली! पण मला समाधान होतं की "छान" आणि "कमनीय बांधा" पलीकडचे शब्द तन्मयला ठाऊक नाहीयेत.. कदाचित मराठी मीडियम मध्ये असल्याचा परिणाम असेल.. खरं सांगतो, मलाही ह्याच्या पुढचे शब्द सातवीत असताना ठाऊक नव्हते! ('ते कधी ठाऊक झाले?', हा प्रश्न प्रस्तुत लेखाच्या आवाक्याबाहेरचा आहे!) जाता जाता तन्मय म्हणाला, "तुला थोडक्यात सांगू का काका...? निर्जीव वस्तू हॉट कधी होते हे थर्मल साइंटिस्ट शोधतो.. आणि सजीव वस्तू हॉट कधी होते, हे फॅशन डिज़ाइनर शोधतो..!" मी कपाळाला हात लावणं तेवढं बाकी राहिलं होतं...