Friday, March 26, 2010

युग युग जियो!

आत्तापर्यंतची चार युगे मानली जातात. सत्य युग, त्रेता युग, द्वापार युग आणि आपलं कलियुग! एक सज्जन सत्य युग सोडलं, तर प्रत्येक युगात काही चांगल्या गोष्टी झाल्या तर काही वाईट. पण सगळ्यात जास्त शिव्या ह्या आपल्या आत्ताच्या कलियुगालाच दिल्या जातात! म्हणजे बघा, महाभारत इसवी सन पूर्व ३१३७ वर्षांपूर्वी झालं. त्यानंतर ३५ वर्षांनी कृष्णानी प्राण सोडले. आणि तिथेच सुरु झालं आपलं हे शिव्या-शापांनी भरलेलं, दुष्ट प्रवृत्तीचं, वाईट असं कलियुग!

आता ज्ञानेश्वर-तुकारामांसारखे थोर संत, शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, राणा प्रताप, यांसारखे थोर योद्धे, हे सुद्धा कलियुगातलेच! तरीसुद्धा त्यांचा काळ हा बऱ्यापैकी 'चांगला' काळ मानला जातो. सगळ्यात वाईट हा आत्ताचा, आपला काळ! आपण याला 'उत्तर कलियुग' म्हणूयात. या उत्तर कलियुगात सगळीकडे भ्रष्टाचार बोकाळलाय, महागाई वाढलीय, आपणच प्रदूषणाने पृथ्वीचा नाश करू पाहतोय...तर असं हे आपलं 'उत्तर कलियुग' सगळ्यात वाईट युग आहे!

पण आपण याच युगाचा आता भाग आहोत. म्हणून या युगात निमुटपणे जगणे आपल्याला भाग आहे! म्हणून या 'उत्तर कलियुगावर' मी विचार करायला लागलो.. खरंच एवढं वाईट आहे का हे? एखादी तरी चांगली गोष्ट असेलच की! काय बरं असेल ती चांगली गोष्ट..? असा विचार करताना पहिली गोष्ट मनात चमकली ती म्हणजे 'Technology'..तंत्रज्ञान! तंत्रज्ञानालाही सरळसोट शिव्या घातल्या जातात! पण या तंत्रज्ञानाचे फायदेही अनेक आहेत. जर आत्ताएवढं प्रगत तंत्रज्ञान या आधीच्या युगांत असतं, तर त्या युगातल्या लोकांना काही मदत झाली असती का..?

अहो नक्कीच झाली असती! म्हणजे बघा, आपल्याला माहितीय कर्णाचा मृत्यू त्याच्या रथाचं चाक जमिनीत रुतल्यामुळे झाला. कर्णाच्या रथाचं चाक जमिनीत रुतलं, तो खाली उतरून ते काढायचा प्रयत्न करू लागला आणि तेवढ्यात अर्जुनाने त्याचा वध केला. पण जर का त्यांची तांत्रिक प्रगती झाली असती, तर कर्णाचा रथ म्हणजे ‘All wheel drive’, SUV (Sports Utility Vehicle) असता! आणि त्याला खाली उतरून चाक काढायची गरजच पडली नसती..दुसरं उदाहरण म्हणजे अभिमन्यूचं. चक्रव्यूह ही सैन्याची रचना. अभिमन्यूला चक्रव्युहात शिरायचं कसं हे माहिती होतं. पण ते भेदून बाहेर कसं यायचं, याचं ज्ञान त्याला नव्हतं. आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला. पण जर का त्यावेळी त्याच्या जवळ GPS (Global Positioning System) हे device असतं..तर त्याच device ने त्याला सांगितलं असतं.. ‘Take left from here. Go straight. Kill that Kaurav and take next exit..’ वगैरे! आणि त्याचाही मग जीव वाचू शकला असता..

त्या काळच्या दुष्ट लोकांचाही फायदा झालाच असता की! म्हणजे सुदर्शन चक्राने सूर्याला झाकून श्रीकृष्णाने जयद्रथाला गंडवलं होतं! आणि अर्जुनाने त्याचा वध करून आपली प्रतिज्ञा पूर्ण केली होती..पण जर त्यावेळी जयद्रथाने ‘Weather Forecast’ check केलं असतं..तर त्याला सूर्यास्ताची exact वेळ कळली असती! आणि मग कृष्ण त्याला गंडवू शकला नसता..! भीमाने युद्धाचे नियम तोडून दुर्योधनाच्या मांडीवर गदेचा प्रहार केला. पण जर दुर्योधनाने त्या वेळी थाय पॅड घातलं असतं, तर तो वाचू शकला असता! किंवा कोण जाणे, कदाचित त्या काळी ‘technology’ असती, तर १०० कौरव झालेच नसते!!

रामायणातही खूप फायदा झाला असता तंत्रज्ञानाचा..आता लक्ष्मणाला वाचवायला जी संजीवनी वनस्पती लागत होती, ती आणायला हनुमान इतक्या लांब द्रोणागिरी पर्वतावर गेला. आणि एवढंच नाही, तर तो अख्खा द्रोणागिरी पर्वतच घेऊन आला! एवढं करण्यापेक्षा ‘Google’ वर search करून जवळच्या केमिस्टकडे नसती मिळाली संजीवनी?!

किंवा हनुमानाने शेपटीला आग लावून अवघी लंका जाळली! तेंव्हा एक साधा Fire Extinguisher असता, तर वाचली असती लंका! आज त्या श्रीलंकेची लोकं जरा तरी उजळ असती! किंवा कमीतकमी क्रिकेट ग्राउंडवर फिल्डिंग करणाऱ्या श्रीलंकेच्या प्लेयर्सपैकी नक्की कोण कुठे उभा आहे, हे तरी समजलं असतं! आणि रावणाचा वध झाल्यावर, रामायण संपताना, सीतेला अगदी अग्निपरीक्षा द्यावी लागली नसती. साधी ‘Lie Detector Test’ पुरली असती की तिला!

या तंत्रज्ञानाने सगळे काही फायदेच झाले असते, असंही नाही! काही तोटेही झाले असते. Mediaचा धुमाकूळ हा त्यातला एक मोठा तोटा! त्याकाळीही मग Mediaचा सगळीकडे मुक्त वावर असता..राम, लक्ष्मण, सीता वनवासात गेले असताना तिथेही मग Mediaची लोकं सापडली असती! काय दृश्य असतं ते...! एक जण रामाला विचारतोय, "प्रभु राम, आप कैसा मेहेसूस कर रहे है? आपकी सौतेली माँ, कैकेयी, आपसे इतनी नफ़रत क्यूँ करती है?" तर दुसरा सीतेला विचारात असेल, "इतने रईस खानदान की बहु होते हुए भी आज आपपे ये नौबत आयी है| क्या प्रभु राम से शादी करने का आपका निर्णय सही था? आपकी क्या राय है?!" किंवा 'आज तक' ने ‘Breaking News’ दाखवली असती..'खबर मिली है के अभी अभी प्रभु रामने एक फल का प्राशन किया है| और ये एक ऐसा फल है, जिसके बारे में ना किसीने कभी सुना था, ना किसीने इस फल को कभी देखा है! जहरीला भी हो सकता है ये फल..! क्या प्रभु राम जिंदा रहेंगे..? क्या ये फल 'रामफल' नाम से जाना जाएगा?..अभी अभी खबर मिली है के सीताने भी प्रभु राम का अनुयय करते हुए ऐसाही एक फल खाया है! अब उस फलको 'सीताफल' की संज्ञा प्राप्त हुई है! राम और सीता को देखकर लक्ष्मणनेभी एक फल खाया है! लेकिन ठहरिये, उस फल को 'लक्ष्मणफल' कहेनी की जरुरत नहीं है| क्यूँ के खबर के मुताबिक लक्ष्मण हापूस आम खा रहा था!!

मराठी News channel वाले सुद्धा काही मागे नसतील! 'आत्ताच एक हेलावून टाकणारी बातमी मिळाली आहे! लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापलं आहे! राम त्यावर बेहद्द खुश झाले आहेत!' मी किशोर, कॅमेरामन किरणसोबत, स्टार माझा! 'आत्ताच एक नवी बातमी मिळाली आहे..रामाने खुश होऊन लक्ष्मणाला वर दिला आहे की 'इथून पुढचा ६२ वा जन्म तू भारत देशातच घेशील. तू खूप प्रसिद्ध होशील! भारताकडून क्रिकेट खेळशील आणि IPLमधे हैद्राबाद डेक्कन चार्जर्सचा कॅप्टन होशील! तेंव्हा तुझं नाव व्ही.व्ही.एस.लक्ष्मण असेल...!!'
आता आपल्या सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे की प्रभू राम त्यांच्या ६२ व्या जन्मात कोण असतील..? आम्ही हे खुद्द प्रभू रामालाच विचारलं, पण त्यांनी उत्तर न देण्याचं पसंत केलं..त्यांनी फक्त काही संकेत, काही hints दिल्या आहेत. त्यांचे शब्द होते..'मी तेव्हाही लक्ष्मणाला साथ देईन. या जन्मात मी दशरथाचा पुत्र आहे आणि दशमुखी रावणाचा वध करणार आहे. त्या जन्मात 'दश' हा शब्द माझ्या आडनावात असेल. माझी उंची थोडी कमी असेल आणि केस कुरळे असतील..' कोण असेल राम त्या जन्मात? काय असेल त्याचं आडनाव? दशपुत्रे? आपण फक्त अंदाजच बांधू शकतो..कॅमेरामन किरणसोबत, मी किशोर, स्टार माझा..!

याबरोबरच अशा कित्येक गमती-जमती होतील! तंत्रज्ञान असतं तर यम यामाहावरून आणि देवाचे राजदूत, राजदूत मोटरसायकलवरून फिरले असते! गणपतीने उंदराऐवजी टाटा नॅनो पसंत केली असती! भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपुने विचारलं असतं, " काय रे, या खांबात आहे का तुझा देव?" आणि हो म्हणाल्यावर त्याने गदेने त्या खांबावर जोरदार प्रहार केला असता. पण तो खांब काही तुटला नसता. दोन, चार, दहा, अगदी शंभर वेळा प्रहार करूनही तुटला नसता! आणि नंतर कळलं असतं की त्या खांबात 'अंबुजा सिमेंट' वापरलंय! कर्ण त्याच्या आईला म्हणाला असता, "आई ही permanent कुंडलं नकोत मला. त्यापेक्षा मी फिरकीची कानातली घालतो! रोज बदलत जाईन!" द्रोणाचार्यांकडे शिकायला CET द्यावी लागली असती! एकलव्याने मग त्यांचे ‘Online Courses’ घेतले असते! बिचाऱ्याचा अंगठा वाचला असता..! श्रावणबाळाने नदीवर पाणी आणायला जाऊन प्राण नसता गमावला. त्याने जवळच्या ‘Vending machine’ मधून ‘Mineral water’ ची बाटली काढून दिली असती आपल्या आई-वडिलांना! गांधीजी ‘Cotton King’ चे brand ambassador असते, रामदास स्वामींची ‘Fitness club’ ची chain असती, तर ज्ञानेश्वरांचे प्राकृत मराठीचे classes प्रसिद्ध झाले असते! आणि युद्ध्याची सुरुवात शंख फुंकून व्हायच्या ऐवजी अजय-अतुलच्या दमदार गाण्याने झाली असती! भीष्मांनी त्यांची 'भीष्म प्रतिज्ञा' सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘buzz’ वर नाहीतर ‘facebook’ वर टाकली असती! भीष्म एवढे सुस्वरूप आणि तरणेबांड! आता ते ब्रम्हचर्यत्व स्वीकारणार हे वाचून, आणि आता आपल्याला scope जास्त आहे, असा विचार करून त्या काळच्या तरुणांनी तो status message ‘Like’ केला असता! तर तरुणी हे ऐकून हिरमुसल्या असत्या! किंवा युधिष्टिर Facebook वर ‘Lover of the day’ खेळला असता आणि उत्तर आलं असतं गांधारी! आणि कदाचित हेच कारण ठरलं असतं महायुद्धाचं...

खरंच, कोणी काही म्हणा, पण आपलं हे 'उत्तर कलियुग' आणि त्याची तंत्रज्ञानाची देणगी अगदीच काही वाईट नाहीये! जसं बाकी युगात काही चांगलं होतं आणि काही वाईट होतं, तसं आपल्याही युगात आहे..या वीरांनी त्यांची युगं गाजवली, आपण आपलं गाजवूयात! खूपसं वाईट असलं तरी चांगलं ते वेचूयात. ‘3 idiots’ नुसार आपल्या युगात ‘Life is a broken अंडा' असते. आणि म्हणूनच आपलं युग हे 'युगांडा' आहे! तरी त्या युगांडात भरताचं राज्य आणुयात. त्याचा खराखुरा पूर्वीसारखा भारत करूयात...!


(आमोद आगाशे आणि सुशांत खोपकर यांच्या 'विनोदाची चादर' या लेखमालेतला हा पहिला लेख!)

Saturday, March 20, 2010

शेवट..

पश्चिमेच्या खोल डोहात सूर्य बुडायला सुरुवात झालेली असते. संध्येच्या तांबूस-पिवळ्याला काळसर छटा कवेत घ्यायचा प्रयत्न करत असते. क्षणाक्षणाला रंग गहिरा होत असतो. पाकोळ्या सैरभैर उडत असतात. हलकेच, पण गंभीरपणे वाहणारा वारा जमिनीवरच्या कोरडया मातीला उडवत असतो. फांद्यांचा सांगाडा झालेल्या, पर्णहीन होऊ घातलेल्या झाडावरचं शेवटचं पिकलेलं पिवळं पान देठापासून वेगळं व्हायची वाट बघत असतं.. शेवट आलेला असतो...

परवा बिछान्यातून उठताना मी डोळे उघडत होतो..तर मला दोन मोठ्ठी काळी शिंगं दिसली! क्षणभर एवढा खूष झालो मी..! वाटलं आली वेळ आपली. आला यमराज सोडवायला..! पण कसलं काय! गोखले डॉक्टरांची काळी कुळकुळीत दाढी होती ती! मी पूर्ण डोळे उघडताच मला म्हणाले, "आजोबा, बरं आहे का? जेवण झाल्यावर ताट ठेवायला म्हणून निघालात आणि चक्कर आली तुम्हाला! शुगर थोडी वाढली होती. पण आता सगळं नॉर्मल आहे. त्या गोळ्या वेळच्यावेळी घेणं चालू ठेवा. काळजी घ्या. चला मी येतो.." अहो काय सांगू तुम्हा दोघींना! चक्कर आली होती की झोपेतून उठतोय, हेही कळत नाही हल्ली मला!

ह्या दाढीवाल्या गोखले डॉक्टरांचं मला विशेष कौतुक वाटतं! एकदा ते असेच मला तपासायला घरी आले होते आणि तपासून झाल्यावर ते माझ्या शेजारीच बसलेत, हे मी साफ विसरलो! त्यांच्या समोरच मी मुलाला म्हणालो, "त्या गोखले डॉक्टरांचं औषध काही काम करत नाही बघ! दुखणं काही थांबत नाही. आपण डॉक्टर बदलुयात का?!" त्यावेळी माझ्या मुलाचा चेहेरा अगदी बघण्यासारखा झाला होता! पण हे बिचारे गोखले डॉक्टर तरीही येतात. मला तपासतात, विचारपूस करतात.

पण मी चक्कर येऊन पडलो त्या दिवशी माझा मुलगा चांगलाच घाबरला होता! त्याने मला चांगलंच खडसावलं..मला नीटसं आठवत नाही, पण 'कोणालातरी हाक मारत जा' असं काहीतरी म्हणाला. पण आता तुम्हीच सांगा, सारखं त्या बाईंना हाका मारणं बरं वाटतं का? आणि हा नातू माझा लहान आहे..बाकी सगळे कामाला. कोणाला हाक मारायची? आणि तेही फक्त ताट ठेवायला...

आधी रात्री आम्ही सगळे एकत्रच जेवायचो. पण नंतर माझ्या अंगाला कंप सुटायला सुरुवात झाली. हातात कितीही ताकद आणली तरी तो थरथरायचा काही थांबेना. चमच्यातलं तोंडात जायच्या आधी अर्ध-अधिक खाली सांडायला लागलं. माझा नातू हसायचा मला मग..लहान आहे तो बिचारा. त्याला काय कळतंय..आता सूनबाई मला आधी वाढतात जेवायला.

सूनबाईंना माझा सगळ्यात जास्त त्रास होतो. त्यांना मी म्हणजे, घरातली एक अडगळ वाटते..मग माझ्यावरून कधी कधी मुलात आणि सुनेत भांडणं होतात. पण मला सूनबाईंचं काही चुकीचं वाटत नाही. अहो, माझी मलाच अडचण होते हल्ली..स्वतःचाच त्रास होतो! सूनबाईंचं काय घेऊन बसलायत! आंघोळ करायचं म्हटलं की ज्या अग्निदिव्याला मला सामोरं जावं लागतं..ते माझं मलाच ठाऊक!

रात्र झाली का हो? थांबा, मी उठून बसतो. आई Sग..पाय खूप दुखतो माझा..तरुणपणी काय व्यायाम करायचो माहितीय तुम्हाला! आमच्या ग्रुपमधे सगळ्यात फिट मीच होतो! नंतर रिटायर झाल्यावरही आमच्या ग्रुपमधे आम्ही पंजा लावायचो. मला कोणीच हरवू शकायचं नाही! पण हळू हळू ताकद कमी होते. हे अवयव साथ सोडू पाहतात. अंग खूप दुखतं हो..उभं राहिलं की गुडघे दुखतात आणि बसलं की कंबर. एक क्षण थांबत नाही. पण रात्री एकदा झोप लागली की मग काही जाणवत नाही. पण मग पुन्हा सकाळी जाग आली की सगळं दुखायला सुरुवात होते! म्हणून वाटतं जागंच येऊ नये..कायमचीच झोप लागावी..आमच्या ग्रुपमधले सगळे गेले मला सोडून. मी असा हा एकटाच आता वाट बघत बसलोय..वर जाऊन पुन्हा पंजात हरवीन एकेकाला!

लहानपणी तर मी अभ्यास आणि खेळ, दोन्हीत पुढे होतो. सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याचं पारितोषिक मिळालं होतं मला. ते दिवसच मंतरलेले होते..मी अगदी खवय्या होतो! आणि मला पैजा लावायचा भारी शौक! एकदा पैज लावून हॉटेलमधे मेनूकार्डवरची प्रत्येक डीश मागवून संपवून दाखवली होती! आमचं गणपतीचं आणि दहीहंडीचं पथक होतं. मी सगळ्यात वरच्या माळ्यावर चढून दहीहंडी फोडायचो! एका गोकुळाष्टमीला तर मी ५ ठिकाणच्या हंडया फोडल्या होत्या! कामातही मी अगदी चोख बरंका! मला आमचे साहेब म्हणायचे, "तुझ्यावाचून आपल्या ऑफिसचं पान हलत नाही...तू एक दिवस मोठा साहेब होणार बघ! माझ्याहून मोठा साहेब!" मी पत्तेपण छान खेळायचो. आम्ही सगळे भावंडं जमलो की रम्मीचा डाव व्हायचा. एक पॉईंट- एक पैसा. आमची 'ही' पण मस्त खेळायची रम्मी! नेहेमी ती नाहीतर मीच जिंकायचो! आता राहिलं नाही काही यातलं..इस्पिक राजा झालाय म्हातारा आणि इस्पिक राणीतर गायबच झालीय कॅटमधून...

खरं म्हणजे आता कशाचं काहीच वाटत नाही मला. जेवताना पदार्थांच्या चवी नीटशा कळत नाहीत. स्पष्ट दिसत नाही, त्यामुळे वाचू शकत नाही. टी.व्ही बघता येत नाही. ऐकूही नीट येत नाही. सगळ्या इच्छा-आकांक्षा कधीच संपून गेल्यात.. पण 'ही' गेल्यापासून एकटेपणा जास्त जाणवतो. म्हातारपणात सगळं गेलं तरी प्रेम, आपुलकी या भावना काही शेवटपर्यंत जात नाहीत. आजही वाटतं कोणीतरी येऊन आपल्याशी बोलावं. संध्याकाळी छान गप्पा माराव्यात. निदान..माझ्या मुलाने तरी... पण नंतर वाटतं कदाचित माझ्याच अपेक्षा अवाजवी आहेत. बाहेरचं जग आता खूपच धकाधकीचं झालंय म्हणतात..जो काही थोडासा वेळ मिळत असेल त्यांना, तो त्यांनी संसाराला द्यावा. अगदी मान्य आहे. खरं सांगायचं तर आता माझी पिढीच संपलीय. माझ्यासाठी जागाच नाहीये इकडे आता. म्हणून मी सारखी मृत्यूची वाट बघत असतो...

पण तुम्हा दोघींना अगदी खास धन्यवाद बरं का! तुम्ही मला नेहेमी साथ देता. २००४ साली, म्हणजे बघा.. ६ वर्षांपूर्वी माझे अगदी सगळे दात मला सोडून गेले. त्यानंतर तुमचीच तर साथ मिळालीय मला!

अरे, झालीच बघा जेवणाची वेळ! रोजच्यासारखी साथ देणार ना मला? जेवण झाल्यावर छान आंघोळ घालीन मी तुम्हाला..

ती कसली भाजी होती, कळलं का हो? कोबी होता बहुतेक..का भेंडी होती? देव जाणे! बर, तुम्हा दोघींना मी परवाची गंमत सांगितली का? 'परवा बिछान्यातून उठताना मी डोळे उघडत होतो..तर मला दोन मोठ्ठी काळी शिंगं दिसली..क्षणभर एवढा खूष झालो मी..वाटलं, आली वेळ आपली. आला यमराज सोडवायला..'

समईतलं सगळं तेल संपलेलं असतं. वातसुद्धा कोरडी पडत आलेली असते.. ज्योतीचा एक छोटासा निळा-पिवळा बिंदू त्या वातीवर बसून, कधी वारा आपल्याला पोटात घेईल याची वाट बघत असतो...शेवट आलेला असतो...

Saturday, March 13, 2010

मिसेस कुलकर्णी

आज महिला दिवस असून मिसेस कुलकर्णींचा काही मूड नव्हता. त्या एकट्याच पलंगाच्या कोपऱ्यात बसून खिडकीच्या बाहेर बघत बसल्या होत्या. त्यांचा मूड जायला कारणंही तसं 'खास' होतं. ऑफिसमधून घरी येताना त्यांची मैत्रीण त्यांना तिचं नवं घर दाखवायला म्हणून घेऊन गेली होती. आणि तिनं त्यांना त्यांचं नवं कोरं पाच खोल्यांचं घर, त्याच्या मार्बल टाईल्स, त्याला शोभेल असं interior, नवा सोफा सेट, नवी कांजीवरम आणि अष्टेकर ज्वेलर्स मधून घेतलेल्या नव्या कोऱ्या सोन्याच्या घसघशीत पाटल्या दाखवल्या होत्या..! हे एवढं सगळं एकावेळी पचवणं मिसेस कुलकर्णींच्या सहनशक्तीच्या पलीकडचं होतं!

त्यामुळे आज त्या, नुसता राग येणं, डोकं दुखणं किंवा पोटात काहीतरी 'जळजळतय' असं वाटणं...याच्या पलीकडे गेल्या होत्या! आज त्या चक्क आयुष्यावर विचार करत बसल्या होत्या!

'उगाच कुलकर्ण्यांच्या घरची सून झाले! एवढी स्थळं चालून आली होती..एखाद्या श्रीमंताशी लग्न केलं असतं, तर आज श्रीमंतीत लोळत असते! पण कुठे गेली होती अक्कल? मिस्टर कुलकर्ण्यांच्या रंग-रूपाने, भारदस्त आवाजाने, प्रामाणिक डोळ्यांनी भाळले. पण या सगळ्याची काय भाजी करायची का आता? शी बाई! 'सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही' हेच खरं! खरंच मूर्खपणा केला. एवढं सुंदर रूप दिलं होतं देवाने...स्वतःच्या हाताने पायावर दगड मारून घेतला मी! तेव्हा आई म्हणाली होती, "कुलकर्ण्यांचं कुटुंब अगदी छान आहे. बरंका सुमे, नवऱ्याइतकेच त्याचे कुटुंबीयही महत्वाचे!" पण मिस्टर कुलकर्णी हे एकुलते एक सुपुत्र. आणि लग्नानंतर ५-१० वर्षांत सासू-सासरे एवढे थकलेले असतात, की ते चांगले आहेत का वाईट आहेत, काही फरकच पडत नाही! सेवा करत बसावं लागतं त्यांची...छे! छे! छे! चूक झाली आयुष्यात...मोठ्ठी चूक झाली!' खरं तर मिसेस कुलकर्णी मनाने खूप चांगल्या. सासू-सासऱ्यांचं अगदी मनापासून सगळं केलंय त्यांनी..पण तरीही आज त्यांच्या मनात असे विचार येत होते. त्यांच्या मैत्रिणीच्या अष्टेकर ज्वेलर्सच्या पाटलीवरची नाजूकशी नक्षी त्यांच्या डोळ्यांना जरा जास्तच टोचत होती..

त्यांचा धाकटा मुलगा रोहन आणि मोठी मुलगी राधिका नुकतेच शाळेतून आले होते. रोहन आत येऊन म्हणाला, "आई भूSS क लागलीय. खायला दे न काहीतरी."मिसेस कुलकर्ण्यांनी त्याच्याकडे एक त्रासिक कटाक्ष टाकला आणि जरा वैतागूनच म्हणाल्या, " आल्या आल्या काय रे भूक भूक? ताईला maggi करायला सांग. मी काही करणार नाहीये!" आईचं हे असं रूप पहिल्यांदाच बघून रोहन बिचकलाच! आणि पटकन खोलीच्या बाहेर निघून गेला.

त्या पुन्हा विचार करू लागल्या. 'मलाच सगळी कामं करायला लागतात. ह्यांच्यासारखी मीसुद्धा नोकरी करते. तरीसुद्द्धा एक 'स्त्री' म्हणून मीच सगळी कामं करायची. पुरुष हा 'कर्ता पुरुष' असतो म्हणून काय आम्ही लगेच 'कर्म स्त्री' होऊन सगळी कामं करत बसायचं का? ह्यासाठी मिळालाय का जन्म?...' तेवढ्यात त्यांचं लक्ष शेजारच्या पेपरवर पडलं. पहिल्याच पानावर बातमी होती, 'स्त्रियांसाठी ३३ टक्के आरक्षण मंजूर!' त्याचाही त्यांना राग आला. '३३ कशाला, ५० द्या की! तुम्ही तुमच्या ५० टक्क्यात मग हवा तो गोंधळ घाला! आम्ही आमचे ५० सांभाळतो..'

दाराची बेल वाजली. रोहनची मित्र-मंडळी त्याला खेळायला बोलवायला आली होती. पण 'आता वार्षिक परीक्षा तोंडावर आलीय. म्हणून आता खेळ बंद.' असं कालच आईने रोहनला बजावलं होतं. रोहन नाही म्हणतोय म्हणून त्याचे मित्र त्याच्या आईला विचारायला थेट आत गेले! "काकू please रोहनला आजच्या दिवस पाठवा ना खेळायला. उद्यापासून आम्ही कोणीच खेळणार नाहीयोत. सगळे अभ्यास करणार आहोत.." त्यांना चांगलंच ओरडावं आता, असं मिसेस कुलकर्ण्यांना वाटलं. पण मग त्यांनी विचार केला, 'जरा खेळायला गेला हा, तर तेवढाच आपल्या डोक्याशी कटकट करणार नाही.' त्यांनी जरा चिडूनच, "जा, जाऊन ये' असं रोहनला सांगितलं आणि तो खेळायला निघून गेला.

'काकू'... मी कधी सुमित्राची 'काकू' झाले..कळलंच नाही. सगळं किती पटपट होतंय..एकदा लग्न झालं, पोरांची आई झालं की रंग, रूप, बांधा सगळंच सरायला लागतं..आणि मग आपण काकू होतो..काकू?!! काकूंच्या कपाळावर एकदम आठ आठया पडल्या! त्यांनी खिडकीतली केस काळे राहण्यासाठी असलेली जास्वंदाच्या तेलाची बाटली खसकन घेतली. तळहातावर बदाबदा तेल ओतलं आणि ते डोक्यावर थापून केसातून हात फिरवू लागल्या..त्यांचं डोकं एव्हाना एवढं तापलं होतं की त्या तेलाचाही boiling point येऊ घातला होता! त्यांना स्त्री जन्मावर एक जबरदस्त शिवी हासडायची इच्छा झाली. पण 'हलकट', 'नालायक' च्या पुढे त्यांना पटकन काही सुचेना! त्यांना मग पुन्हा पुरुषांचा हेवा वाटू लागला. पुरुष आई-माईवरून शिव्या देऊ शकतात. दारू पितात. सगळ्यांसमोर सिगरेटी ओढतात. मिसेस कुलकर्ण्यांना ह्यातलं काहीच करायचं नव्हतं. पण जर पुरुष हे सगळं करतात, तर काही स्त्रियांनी असं करण्यात काही चूक नाहीये, असं त्यांना वाटत होतं..

असा सगळा सगळा विचार झाल्याने त्यांना जरा बरं वाटू लागलं. एव्हाना संध्याकाळ झाली होती. मिस्टर कुलकर्णी घरी आले होते. रोहनही खेळून आला होता. रोहन आणि राधिकाने बाबांना कानात 'आज आईला काहीतरी झालंय..' असं हळूच सांगितलं.

मिसेस कुलकर्णींनी मावळत्या सूर्याकडे पाहिलं. ते पाहून स्वयंपाकाची वेळ झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं! त्यांनी स्वतःला सावरलं. डोळे आणि गाल पुसले. अश्रू गालावर येऊन वाळून गेले होते. त्या पलंगावरून उठणार तेवढयात रोहन आत आला. "आई बाबा विचारतायत 'जयश्री'ची पावभाजी आणि कॉफी का 'मयुरी' ची थाळी? आणि आम्हाला 'मयुरी'ची थाळीसुद्धा चालेल. आम्ही दोघं तिकडे J.M रोडवर 'पिझ्झा हट' मधे जाण्याचा हट्ट करणार नाही..!" आपल्याला बघून ही दोघं आणि आता बाबाही घाबरलेत हे मिसेस कुलकर्णींच्या लक्षात आलं. त्या रोहनकडे बघून हसल्या आणि त्याला घेऊन खोलीबाहेर आल्या. हॉलमधे बाबा पेपर वाचत बसले होते. आई आल्याचे पाहून त्यांनी हळूच पेपेरच्यावरून मिसेस कुलकर्णींकडे पाहिले आणि म्हणाले, " चल ग, आज बाहेरच जाऊयात जेवायला! रोज रोज स्वयंपाक करून कंटाळा येणं साहजिकच आहे..!" हॉलमधे घाबरून काय प्रकार घडला असणार, हे मिसेस कुलकर्णींच्या लक्षात आलं. त्यांना पुन्हा हसू आलं. आणि 'महाराष्ट्रीयन थाळीपेक्षा मुलांना पावभाजी आवडते' असा विचार करून "जयश्रीत जाऊयात!" असं त्या म्हणाल्या.

'जयश्री'त चौघही निमूटपणे पावभाजी खात होते. कोणीच फारसं बोललं नाही. मग कॉफी आणि मिल्कशेक आले. आई कॉफी पीत असताना राधिकाने बाबांना खूण केली. आईने ते पाहून बाबांकडे पाहिलं. बाबांनी खिशातून 'आयुष्यावर बोलू काही' ची तिकीटं काढली. रात्री ९ ते १२ चा show होता. ते पाहून आईची कळी खुलली!

मिसेस कुलकर्णींना आपला नवरा आणि मुलं अगदी बिच्चारी वाटू लागली. त्यांनी विचार केला, 'एक दिवस काय माझा मूड नेहेमीसारखा नव्हता, तर ह्यांची कशी अवस्था झाली!' आपला नवरा, मुलं आपल्यावर केवढं प्रेम करतात हे त्यांना जाणवलं आणि घरात आपलं स्थान किती महत्वाचं आहे, हेही लक्षात आलं. त्यांचा मूड पुन्हा पहिल्यासारखा झाला. त्या तिकिटांकडे पाहून म्हणाल्या, "अहो, याची काय गरज होती...?"

९ वाजता 'आयुष्यावर बोलू काही' सुरु झाला. मध्यंतरापर्यंत पावसाची गाणी, प्रेम कविता झाल्या. 'कसे सरतील सये..' गाण्याला मिसेस कुलकर्णींना आपल्या लग्नानंतरचे 'ते' दिवस आठवले..त्यांच्या मनानेही 'हनिमून' हा शब्द उच्चारला नाही. त्यांना ते दिवस आठवले..मिस्टर जयंत कुलकर्णी. देखणे रूप, पिळदार शरीरयष्टी, कुरळे केस आणि काळेभोर डोळे..त्यांनी विचार केला, 'आपली निवड नाही चुकलेली. आपण काय विचार करत होतो..जयंता खरोखरच लाखात एक आहेत..! आपण भाग्यवान आहोत..त्या मैत्रिणीपेक्षाही!!' त्यांनी मिस्टर कुलकर्ण्यांकडे पाहिलं. मिस्टर कुलकर्णी मिशीतून मिश्कील हसत होते.. काही वेळाने 'मन तळ्यात, मळ्यात..' गाणं सुरु झालं. मिस्टर कुलकर्णींनी कोपराने हळूच मिसेस कुलकर्णींना 'Ping' केलं! पण 'आपलं वय काय...आणि इथे लोकं बसलीयत!' असा विचार करून मिसेस कुलकर्णींनी त्याकडे लक्षही दिलं नाही!

मध्यांतरानंतर थोडी गंभीर गाणी आणि विरह कविता सुरु झाल्या. 'मिस्टर कुलकर्णी आपल्याला केवढं समजून घेतात..आमचा विरह कधीच होणार नाही...' असा त्यांनी मनोमनी विचार केला. कार्यक्रमाचं शेवटचं गाणं गायला सलीलने सुरुवात केली. गाणं होतं, 'नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो. जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो..' मिसेस कुलकर्णी अगदी गढून जाऊन ते गाणं ऐकत होत्या. त्यांना पुन्हा एकदा स्वतःचे, 'एक स्त्री' असल्याचे महत्व पटले. आपल्यावाचून जयंताची कशी अवस्था होईल, हे ते गाणं सांगत होतं. त्यांनी मोठया कौतुकाने मिस्टर कुलकर्ण्यांकडे पाहिलं आणि त्यांना धक्का बसला! त्यांचा जयंता चक्क घोरत होता!! आता मिसेस कुलकर्णींना अगदी मनापासून हसू आलं..

कार्यक्रम संपला. घड्याळात १२ वाजले होते. महिला दिनाच्या शेवटी मिसेस कुलकर्णींच्या चेहेऱ्यावर अगदी छान हसू उमटलं होतं...

Monday, March 8, 2010

समृद्ध चैतन्य

समृद्ध आणि चैतन्य. दोघांचाही जन्म ७ मार्च, १९८१ साली झाला. तोही एकाच वेळी. त्यांची जन्मवेळ सकाळी ११ वाजून,८ मिनिटं आणि ३३ सेकंदाची! खरंतर दोघांचा तसा काहीच संबंध नाही. समृद्धचा जन्म पुण्याचा, तर चैतन्याचा रत्नागिरी जिल्ह्यातल्या लाटघरचा. दोघात फक्त एकचं काय ते साम्य होतं. एकाच क्षणी जन्म झाल्याने, त्यांनी आत्तापर्यंत सारखेच श्वास घेतले होते.
आज रविवार, दि. ७ मार्च, २०१०. दोघांचाही आज २९ वा वाढदिवस.

समृद्ध देशमुख. गोरा,उंचापुरा, देखणा. पोट थोडंसं सुटलेलं. लकाकणारे तपकिरी डोळे आणि त्यावर Professional look देणारा चौकोनी काचांचा चष्मा. समृद्ध एका Investment firm मधे Financial Analyst. अतिशय तल्लख बुद्धीची देणगी लाभलेला समृद्ध सध्या कॅलिफोर्निया, USA . मधे स्थायिक झालेला. गेल्याच वर्षी त्याने स्वतःचं असं घर विकत घेतलं होतं. बुद्धीच्या जोरावर शेअर मार्केटमधून त्याने बराच पैसा कमावला होता.

सकाळी जाग आली. त्याने घड्याळात पाहिलं.१०:४१ झाले होते. काल रात्री ‘Birthday Celebration'साठी मित्रांबरोबर पबमधे गेला होता. तिथे घेतलेल्या scotch चा hangover अजून होता. डोकं थोडं दुखत होतं. त्याने त्याच्या Apple Macवर शेअर मार्केट check केलं. त्याला $४२४५ चा फायदा झाला होता. त्याच्या चेहेऱ्यावर हास्याची बारीकशी लकेर उमटली आणि लगेच मिटूनही गेली. त्याने त्याचा i-phone check केला. आईचे २ missed calls होते. 'Happy Birthday' wish करायला असतील, असा विचार करून, आवरून झाल्यावर घरी फोन करायचा असं त्याने ठरवलं.

समृद्ध एवढ्या मोठ्ठ्या घरी एकटाच राहत होता. २ वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं. त्याची बायको, मीना, जर्मनीत PhD करत होती. हे तिचं शेवटचं वर्ष होतं. कालच संध्याकाळी त्यांचं एका छोट्याश्या कारणावरून मोठ्ठं भांडण झालं होतं. त्याला काही मीनाला फोन करावासा वाटत नव्हता आणि तिचाही आला नव्हता. भुकेमुळे पोटात गरम वाटून ते दुखू लागल्याने तो आवरायला म्हणून उठला. खोलीत बराच पसारा झाल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि आता लवकरच तो आवरला पाहिजे असं त्याने ठरवलं. त्याने कधी नव्हे ती आज त्याच्या पांघरुणाची घडी घातली. तोंड धुतलं आणि नाश्ता तयार करायला सुरुवात केली.

त्याने केलेला चहा कपात ओतताना थोडा बाहेर सांडला. त्याला आईची आठवण आली. सॅंडविचेस तयार करताना त्याला मीना आठवत होती. सगळ्या बाजूंनी सारखा आणि काहीसा खरपूस असा मीना भाजते तसा ब्रेड त्याला नाही भाजता आला. ती सॅंडविचेस आणि चहा घेऊन तो सोफ्यावर येऊन बसला. त्याने त्याचा 47 inches, Flat screen, LCD TV सुरु केला आणि Basketball match बघत खाऊ लागला.

खाऊन झाल्यावर घरी फोन करू म्हणून त्याने फोन घेतला, पण डोकं अजूनही थोडं बधीर होतं. छान गरम पाण्याने आंघोळ करून, fresh होऊन मग घरी फोन करूयात असं त्याने ठरवलं.

आज रविवार असल्याने कसलीच घाई नव्हती. त्याने टब बाथ घ्यायचं ठरवलं. पाणी तयार केलं. सगळे कपडे उतरवले आणि त्या टबात स्वतःला झोकून दिलं. त्या गरम साबणाच्या पाण्यात त्याला खूप बरं वाटलं. अंगावर काही नसल्याने छान हलकं वाटत असावं असा विचार त्याच्या मनात आला. मग अंगावर उरलेली शेवटची वस्तू, त्याच्या बोटातली अंगठी त्याला जास्तच जड वाटू लागली. त्याने तीही मग बाजूला काढून ठेवली.

आता त्याला खरंच fresh वाटत होतं. मेंदूची बधिरता हळूहळू उतरत होती. ते गरम पाणी त्याच्या body cells charge करत होतं. त्याची विचारचक्र सुरु झाली. 'आज आपला वाढदिवस आहे. आज खूप special दिवस आहे.' असा त्याने विचार केला आणि तो त्याच्या आत्तापर्यंतच्या आयुष्याचा विचार करू लागला. त्याला आधी त्याच्या सगळ्या achievements आठवल्या. १० वी, १२ वीतलं घवघवीत यश, एका प्रतिष्ठित Engineering College मधे मिळालेली admission, राष्ट्रस्तरीय Project competition मधला प्रथम क्रमांक, MBA entrance मधे पहिल्याच प्रयत्नात मिळालेलं अचंबित करणारा यश..MBA Finance आणि आता गलेलठ्ठ पगाराची नोकरी..त्याने विचार केला, 'याला म्हणतात 'कमावणं'!.. असंच लढत राहिलं पाहिजे..' मग त्याने आयुष्यातल्या अपयशांचा विचार करणं सुरु केलं. त्याला काही सुचलंच नाही. फक्त खूप वेळा ठरवून आपण नियमितपणे व्यायाम करू शकलो नाहीये आणि gym ची फी वाया घालवलीय याची थोडीशी खंत वाटली, एवढंच. पण 'ही काही मोठी गोष्ट नाहीये. लवकरच पुन्हा सुरु करू' असा विचार त्याने केला. आणि gym ची वाया गेलेली फी तर त्याच्यासाठी मुळीच मोठी गोष्ट नव्हती. हे सोडून बाकी काही अपयश त्याला आठवलं नाही. मग असेच मनात random विचार आणि आठवणी येऊन गेल्या... १०वीत बोर्डात आल्यामुळे बक्षीस म्हणून मिळालेला त्याचा पहिला computer आठवला. आणि त्यावर मग सुट्टीभर दिवस-रात्र कसे गेम्स खेळत बसायचो..हे आठवलं.. Engineeringमधे मित्रांबरोबर प्यायलेली पहिली beer आठवली. ऑफिसमधून घरी येताना तो नेहेमी त्याच्या ipod वर गाणी ऐकत येतो. त्यातल्या एका गाण्याची tune त्याच्या डोक्यात वाजू लागली. Facebook मधल्या त्याच्या 'Childhood' नावाच्या अल्बम मधला एक फोटो त्याला आठवला..ह्या सगळ्या विचारांचे अर्थ त्याला कळत नव्हते. मग त्याला emails check इच्छा झाली म्हणून तो टब मधून उठला.

त्याला एक ‘New Mail’ दिसला. त्याचा Payment direct deposit झाल्याची ती receipt होती. सवयीप्रमाणे त्याने तो ‘Payments’ folder मधे transfer केला. त्याचं घड्याळाकडे लक्ष गेलं. दुपारचे २ वाजले होते. आई आता झोपली असेल हे त्याला जाणवलं. तिला फोन करायचा राहून गेला होता. त्याच्या उजव्या पापणीच्या कठड्यावरून एक पाण्याचा थेंब हलकेच खाली घरंगळला. त्याने खिशातून रुमाल काढला. त्या चुरगळलेल्या रुमालाने त्याने तो गालावर आलेला थेंब पटकन पुसला…


चैतन्य खोत. कुरळ्या केसांचा, गव्हाळ रंगाचा, मध्यम उंचीचा आणि पिळदार शरीरयष्टीचा हा एका कोळ्याचा मुलगा. त्याने रत्नागिरीत B.com केलं आणि आता मासेमारीच्या व्यवसायात आहे. ह्याचे वडील जरी कोळी असले तरी ह्याने स्वतःच्या हिम्मतीवर बँकेतून कर्ज काढून एक छोटीशी बोट विकत घेतली आणि मासेमारीचा व्यवसाय सुरु केला. कोळ्यांना त्या बोटीतून मासेमारी करायला पाठवायचं आणि आलेले मासे मार्केटमध्ये विकायचे हा त्याचा धंदा. आज त्याच्याकडे स्वतःच्या ३ बोटी आहेत. हा लाटघर मधेच स्थायिक आहे. छान कौलारू घर, मागे नारळ-पोफळीची बाग, ३ काजूची आणि २ आंब्याची झाडं आणि घरासमोर अंगणात एक मोठ्ठं जांभळाचं झाड. चैतन्यचं लग्न काहीसं लवकर, म्हणजे तो २४ वर्षांचा असतानाच झालं..

आज दि. ७ मार्च, २०१० रोजी ह्याचाही वाढदिवस. सकाळी ५ वाजता उठून चैतन्य आणि त्याची बायको सुलेखा, टेकडीवरच्या देवळात जायला निघाले. सकाळच्या त्या प्रसन्न वातावरणात सूर्य नुकताच त्याला 'Happy Birthday' wish करायला आला होता! सर्वत्र केशरी-पिवळ्या कोवळ्या किरणांची उधळण चालू होती. त्यातली काही किरणं चैतन्यच्या डोळ्यांचे चटाचट मुके घेत होती. टेकडीच्या माथ्याशी असलेल्या देवळात कीर्तन चालू असल्याने टाळ, मृदुंग, चिपळ्यांचे हळुवार, काहीसे अस्पष्ट आवाज ऐकू येत होते. दूरवरून येणाऱ्या मधुर बासरीचे स्वर त्यात मिसळले होते. पक्ष्यांची किलबिल सुरु होती. कळसावर फडकणारा तो भगवा, चैतन्यला खुणावत होता. त्या दोघांच्या चालीला गती देत होता. जसजसे ते माथ्याजवळ जायला लागले तसे ते टाळ मृदुंगाचे आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागले. आजूबाजूला निलगीरींचा वास दरवळत होता. देवळात चैतन्यने एकदा खणखणीत घंटा वाजवली आणि गणपतीसमोर साष्टांग घातला. चैतन्यचं कपाळ त्या गार फरशीला टेकलं आणि त्याच्या आजूबाजूची प्रसन्नता दुप्पटीने वाढली..

खरंतर समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांना समुद्राचं अप्रूप नसतं.पण आज चैतन्यला समुद्रात भिजावंसं वाटलं. सुलेखाला पुढे पाठवून तो समुद्रात गेला. काही वेळ मनसोक्त पोहून झाल्यावर त्याने मग डुंबायला सुरुवात केली. येणारी प्रत्येक लाट तो पाठीवर घेऊ लागला. जणू ती प्रत्येक लाट त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थापच देत होती! सूर्य आता थोडा वर आला होता. काहीशा प्रखर पण तरीही खूपशा कोमल अशा सूर्याकडे त्याने पहिले आणि नंतर डोळे मिटून पाण्यावर तरंगायला लागला. हे सगळं चालू असताना त्याच्या मनात ना कुठला विचार होता, ना कुठली आठवण होती, ना कुठली चिंता होती..
तो फक्त आनंदित होता. स्वतःवर आणि सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीवर. २ तास मनसोक्त डुंबून झाल्यावर तो घराकडे जायला निघाला.

घरी त्याच्या आवडीचं कोलंबीचं कालवण, पापलेट फ्राय, दशमी आणि सोलकढी असा बेत होता. घरी जाताना त्याने मार्केटमधून Payment collect केलं. ते होतं समृद्धच्या biweekly paycheck च्या फक्त एक दशांश..

घरी आल्यावर आजीने त्याला ओवाळलं. मग काकीने, मग सुलेखाने आणि मग आईने. आईने जेव्हा त्याच्या कपाळाच्या मधोमध मोठ्ठं उभं गंध लावलं तेव्हा त्याचे डोळे मिटले गेले. त्याला जणू गणपतीला पुन्हा साष्टांग घातल्यासारखा वाटलं. त्याने डोळे उघडले. आईच्या डोळ्यातला अभिमान आणि ओसंडून वाहणारं कौतुक बघून त्याच्या उजव्या डोळ्यातून एका पाण्याच्या थेंबाने पटकन गालावर उडी मारली! कोणाच्या हे लक्षात येऊ नये म्हणून त्याने खिशातून रुमाल काढला आणि त्या पांढऱ्याशुभ्र, कडक इस्त्रीच्या रुमालाने भरकन ते पाणी पुसलं..

त्या दोघांच्यात फक्त एकच काय ते साम्य होतं. त्यांनी आत्तापर्यंत सारखेच श्वास घेतले होते..