Wednesday, January 21, 2009

आपल्यालाही गरज आहे?

मी सद्ध्या बर्फात राहतोय..! त्यामुळे हे दृश्य आता रोजचं झालयं.. ह्याला  icicles म्हणतात. Gravity मुळे पाण्याचा ओघोळ खाली पडताना, थंड हवेमुळे त्याचं solidificationही होत असतं. 

एक प्रकारची चढाओढंच सुरू असते.. दुष्ट  gravity खाली खेचत असते आणि ते बर्फाचे स्फटिक पूर्ण शक्तीनिशी एकमेकांना बिलगुन असतात! शेवटी ice crystals जिंकतात आणि सुंदर icicles तयार होतात!

आता ह्याला एकीचं बळ म्हणावं का एकमेकांमधलं प्रेम म्हणावं…! काही म्हणा, जिंकले खरे गडी!

आज आपल्यालाही गरज आहे का? Economic recession, terrorist attacks किंवा corruptionमुळे जेव्हा आपण 'Life SUCKS' म्हणतो, तेव्हा कदाचित आपल्यालाही गरज आहे निसर्गाकडून काहीतरी शिकायची.. गरज आहे एकीच्या बळाची,  गरज आहे आपापसातील द्वेष विसरुन प्रेम करायचीगरज आहे जिंकायची... 

Tuesday, January 20, 2009

विशेष..


काल उगवलेला सूर्य, काहीतरी विशेष होता,

अगदी त्याच्या पहिल्या किरणासारखाच…!

 

काल पडलेला पाऊस, काहीतरी विशेष होता,

अगदी त्याच्या पहिल्या सरीसारखाच…!

 

काल त्या पावसात नाचलेला मोर, काहीतरी विशेष होता,

अगदी त्याच्या सर्वात सुंदर पिसासारखाच…!

 

काल पडलेलं चांदणं, काहीतरी विशेष होतं,

अगदी शुक्रताऱ्यासारखंच…!

 

पण काल भेटलेली तू, अगदी तश्शीच होतीस!

कारण तुला भेटणं हेच विशेष असतं.. अगदी तुझ्या अस्तित्वासारखंच...

Sunday, January 18, 2009

मी (न) माझा..



आई-आज्जीच्या संस्कारात न्हाताना पाण्यासारखा स्वच्छ होतो मी,

अगदी पारदर्शक आणि शुद्ध असल्याचं आठवतयं मला..

 

मग अल्लडतेच्या लाल आणि मैत्रिच्या पिवळ्या रंगाच्या डोहात उडी मारली मी!

आणि त्या केशरी तेजात मिरवत मिरवतच शाळेतू बाहेर आलो..

 

आता तरुणाईच्या रसरसत्या हिरव्याने तर थेट राजाचं करून टाकलं होतं मला..

'आई बाबांना काही कळत नव्हतं', 'जग खूप सुंदर होतं', आणि मी होतो राजा!

 

मधेच काहीतरी टोचल्यासारखं झालं, पाहिलं तर मला बाण लागला होता! प्रेमाचा गुलाबी रंग प्रवेश करत होता..

पाऊस अचानक आवडायला लागला होता आणि 'हृदय' नावाच्या अवयवाचं 'खरं' कार्य  कळायला लागलं होतं...

 

यशाचा निळा मग खुणावू लागला  पडलो, धडपडलो, अगदी नेटाने लढलो आणि जिंकलोही..

आकाशातला नीलमणी मिळवला होता मी आणि तहान भागवली होती सागराच्या निळाईने..

 

कसा कोण जाणे पण Pandora's Box उघडला गेला आणि वेड लागलं त्या पैशाच्या सोनेरी रंगाचं...

त्या आवडत्या सोनेरी रंगाच्या मागे धावता धावता अंगात शिरला अहंकाराचा, द्वेशाचा आणि  स्वार्थाचा तपकिरी रंग..

 

मग अशाच एका दु:खी क्षणी मनाच्या आरशात डोकावलो, तर काही दिसलंच नाही..तशी रात्र होती तेव्हा..

पण सकाळी परत बघितल्यावर कळलं, रात्रीचा दोश नव्हता..माझाचं रंग काळा झाला होता...

सगळे रंग एकमेकांत मिसळून भीषण झाला होता रंग माझा..

 

 ठेच लागली, डोळे उघडले आणि आज मी पांढरा  रंग भरायला सुरुवात केलीय.. समाधानाचा, शांतीचा,प्रेमाचा...

पण त्यामुळे आज माझा रंग करडा आहे.. Grey cells बरोबरच Grey Mentality घेऊन जगतोय मी आज..

 

कधी पूर्ण पांढरा होईन का ते ठाऊक नाही....कदाचित पांढरं कापड चढल्यावरच..

पण एक गोष्ट मात्र खरी आहे..

 

बदलत्या जगाबरोबर मीही बदलत गेलो,

भेटणाऱ्या लोकांबरोबर त्यांच्यासारखाच होत गेलो...

आज...

मी माझा राहिलो..मी माझा राहिलो...

मी..


 

नेहमी गोंधळून जाणारा मी, दुसऱ्याला अगदी स्पष्टपणे उपदेश करतो,

पण नक्की कोणासाठी होता तो उपदेश हे कळल्यावर, पुन्हा गोंधळून जातो

 

मुक्या प्राण्याने तडफडून प्राण सोडलेला पाहून, मी मांसाहार कायमचा बंद करायचा ठरवतो,

आणि नंतर समोर जेव्हा नॉनव्हेज डिश येते, तेव्हा मी निसर्गाच्या अन्नसाखळीचं कारण देतो...

 

सेलीब्रेशनचा रंग चढवण्यासाठी घेतलेली जेव्हा उतरते, तेव्हा देशातले गरीब बांधव आठवतात मला,

आणि 'यांच्यासाठी काहीतरी करायलाच हवं' असं वाटून काहीच दिवसात मी पुन्हा 'सेलीब्रेट'  करत असतो

 

दहशतवादाविरोधात आज मला, ‘देशासाठी काय केलं पाहिजे आपण' हा प्रश्न पडतो,

आणि लायसन्स काढताना दिलेले जादा पैसे आठवून, काय करायला नको होतं, याचं उत्तर मिळतं

 

चित्रपट म्हणजे समाजाचाआरसा’ मानणारा मी, आजच्या समाजाची कीव करतो खरी,

पण आपणही कधी असेच वागल्याचे आठवल्यावर, स्वत:ला आरशातही पाहवत नाही...

 

माझ्या चूकांकडे डोळेझाक करणाऱ्या मला, दुसऱ्याच्या चूका मात्र पटकन दिसतात,

आणि समोरच्याने चूक मान्य केल्यावर, स्वत:च्या सगळ्या चूका कबूल कराव्याश्या वाटतात...

 

असा सगळा विचार केल्यावर आपण किती दयनीय आहोत, याची मग जाणीव होते,

पण दुसऱ्याच दिवशी कोणीतरी कौतुक करतं, आणि मी पुन्हा जग जिंकायचं स्वप्नं पाहू लागतो...