Monday, July 19, 2010

पूर्णब्रम्ह

‘आपण कशासाठी जगतो?’ हा प्रश्न मला अधूनमधून पडायचा. अजूनही पडतो! आता हा प्रश्नच इतका भयंकर philosophical असल्यामुळे त्याचं समाधानकारक उत्तर कधी मिळालंच नाहीये. ‘आयुष्यात प्रत्येकाचं काहीतरी ध्येय असतं, ते पूर्ण करण्यासाठी..’, ‘आपल्या माणसांसाठी’, ‘आता आलोच आहोत तर जगायचं आणि वेळ झाली की मरायचं!’ ही त्यातलीच काही उत्तरं.. पण त्यातल्या त्यात मला सगळ्यात पटलेलं उत्तर म्हणजे ‘आपण पोटासाठी जगतो’!

‘कशासाठी-पोटासाठी’ हे वर वर बघता फारच फालतू उत्तर वाटतं, पण नीट विचार केल्यावर त्यातली गंमत दिसून येते! मानवी शरीराला काही ठराविक अवयव असतात आणि प्रत्येक अवयवाच्या ठराविक अशा गरजा असतात. बाकी सगळ्या अवयवांच्या गरजा भागवणं सोपं असतं. म्हणजे गणितं सोडवली, विचार केला, की मेंदूची गरज भागली. सुंदर गोष्टी बघितल्या की डोळ्यांची गरज भागली. श्रवणीय संगीत ऐकलं की कानांची गरज भागली. खेळलं, व्यायाम केला, की हातापायांची गरज भागली. पण पोटाचं असं नाहीये बघा. कारण पोटाची गरज भागवायला अन्न लागतं आणि ते मिळवण्यासाठी आणि शिजवण्यासाठीच तर सगळा खटाटोप असतो!

अन्न मिळवण्यासाठी पैसे कमवा, पैसे कमावण्यासाठी नोकरी करा, नोकरीसाठी शिक्षण हे लागतंच आणि एकदा का नोकरी सुरु झाली की तुमचं काम अगदी रिटायर्ड होईपर्यंत करत बसा! नाहीतर ‘पोटा-पाण्याचे’ वांधे होतात! आणि फक्त एवढंच नाही. अन्न मिळवल्यावर ते शिजवायचं असतं. त्यासाठी घरातलं स्वयंपाकघर आयुष्यभर चालू ठेवा. मग ते एकटयाला कसं झेपणार? त्यामुळे लग्न करा! चार दिवस प्रेमात घालवा. पुढची चाळीस वर्षे भांडत बसा! पण ते स्वयंपाकघर अखंड चालू राहिलं पाहिजे..कशासाठी?..अहो पोटासाठीच नाही का!

तर अशा ह्या पोटासाठी जगण्यानेच ज्यात ‘scope’ आहे तिकडे माणूस वळाला, आणि ह्या जगाचा विकास झाला! शेती, मासेमारी, घरबांधणी, व्यापार, धातू, खनिजे, तंत्रज्ञानाची सुरुवात, रस्ते, गाडी, रेल्वे, विमानं, संगणक, इलेक्ट्रोनिक्स, मोबाईल्स, इंटरनेट, सोशल नेटवर्किंग... जे विकलं जाईल ते तो तयार करत गेला. एका कुठल्या व्यवसायात गर्दी झाली की तो दुसरं काहीतरी करू लागला. नवीन शोध लावू लागला..सगळं पोटासाठी, म्हणजेच जगण्यासाठी! असं हे पोटासाठी जगणंच हे जग अखंड चालू ठेवतं आणि या जगाचा विकास करतं.

आता हे जे अन्न आपण मिळवतो, वेगवेगळ्या पद्धतीने शिजवतो, ते खाऊन पोट भरायच्या आधी त्याला एका ‘जीभ’ नावाच्या Quality Assurance Inspector मार्फत जायला लागतं! आणि या ‘जीभ’ नावाच्या Quality Inspectorला जे आवडतं, तेच आपल्यालाही खावंसं वाटतं आणि त्याला जे आवडत नाही, ते आपल्यालाही आवडत नाही. प्रत्येक माणसाचा तो ‘Quality Inspector’ थोडयाफार फरकाने सारखाच असतो. त्याला पुरणपोळी, बासुंदी, जिलबी.. असे गोडधोड पदार्थ, वडापाव, समोसा, भजी.. यासारखे तळलेले पदार्थ, पावभाजी, चायनिज, पंजाबी किंवा नॉनव्हेज सारखे चमचमीत पदार्थ, बर्गर, पिझ्झा सारखं फास्ट फूड किंवा आईस्क्रीम, मिल्कशेक, कोल्ड्रिंक सारखे गोड आणि गार पदार्थ खूप आवडतात. पण दोडकं,पडवळ, तोंडलं, कारलं या सारख्या फळभाज्या आणि माठ, आंबट-चुका, करडई यासारख्या पालेभाज्या आवडत नाहीत. आणि तिथेच निसर्ग एक खेळ मांडतो!

तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का, की जे पदार्थ आपल्याला भयंकर आवडतात, ते नेहेमीच अपायकारक, हानिकारक किंवा शरीराला वाईट का असतात? आणि जे पदार्थ आपल्याला मुळीच आवडत नाहीत ते प्रचंड पोषण करणारे, शरीराची वाढ आणि विकास करणारे का असतात? कधी आई किंवा आपले डॉक्टर आपल्याला असं म्हणतात का की, ‘तू रोज सकाळ संध्याकाळ बासुंदी पीत जा! भरपूर तेल घालून deep fried भजी खा! रोज एक बर्गर तर खाल्लंच पाहिजेस आणि आईस्क्रीमची एखादी बादली फ्रीजरमधे ठेवत जा!’ हे सगळे आवडणारे पदार्थ आपलं वजन वाढवतात, cholesterol वाढवतात, आपल्याला डायबेटीस होऊ शकतो आणि पुढे Heart Attack ही येऊ शकतो..
या उलट पथ्य-पाणी म्हणजे, ‘दुधी भोपळ्याचा रस प्या. उकडलेली कडधान्य खा. उपासाचे पदार्थ खा. बिनसाखरेचं दूध प्या. कमी तेलाची भाजी खा. Lettuce सारखा पालापाचोळा खा!’ म्हणजे अगदी त्या ‘Quality Inspector’ला काळ्यापाण्याची शिक्षा देऊन, त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न करा! म्हणजे तुम्ही तंदुरुस्त व्हाल!

लहानपणी आईने मला डब्यात कधी आंबट-चुक्याची भाजी दिली, तर मी तसाच न खाता डबा संध्याकाळी घरी आणायचो. आईला उघडून दाखवायचो. हात जोडायचो आणि विचारायचो, “आई माझ्या हातून काही ‘चुका’ झाल्यात का!” पडवळ, दोडकं या सारख्या बेचव भाज्या कसं काय पोषण करू शकतात? कारलं तर म्हणे भयंकर healthy असतं! पण ते खाताना मला कुठलीतरी शिक्षा भोगत असल्याची जाणीव होत असते! हिरवा माठ, लाल माठ खाऊन बुद्धी तल्लख होऊच कशी शकते? आणि जर होते, तर ‘माठ’ नाव ते कशाला! आणि बिनसाखरेचा चहा किंवा दूध प्यायचं असेल तर वासरू होऊयात किंवा मांजराचा जन्म घेऊयात! Sprouts किंवा lettuce ‘चरायचं’ असेल तर शेळी होण्यात काय वाईट आहे!

असा हा विरोधाभासाचा खेळ निसर्ग मांडतो आणि चविष्ट अन्नाच्या मोहात पाडून रोज जिभेची लढाई लढायला लावतो! पण अशावेळी निसर्ग मला आई-वडिलांसारखा वाटतो. ‘काय चांगलं आहे, पेक्षा काय योग्य आहे’ ते करत रहा असे संस्कार जणू तो करत असतो. हा त्याने मांडलेला खेळ ही वडीलकीच्या नात्यानेच केलेली गोष्ट आहे.
आता आपण पोटासाठी जगतो, अन्न मिळवतो. पण जे अन्न खूप चविष्ट आहे ते जर मुळीच हानिकारक नसतं, उलट जर का ते पौष्टिक असतं, तर ते आपण गरजेच्या पलीकडे जाऊन खाल्लं असतं. माणसाचं खाण्याचं प्रमाण वाढलं असतं. नावडत्या भाज्यांची शेतीच केली गेली नसती. अन्नधान्य साठा मर्यादित असल्याने आणि श्रीमंत लोकांचा आहार वाढल्याने गरीब नेहेमीच उपाशी राहिले असते. लोकं, जिभेचे आनंद उपभोगत बसले असते. जगाचा विकास थांबला असता. अपरंपार प्राणिहत्या झाली असती. एक दिवस अन्नधान्य संपूनही गेलं असतं. सगळंच विस्कळीत झालं असतं..

लहानपणी आई म्हणायची, “वरण भाताचे हे शेवटचे तीन घास खाल्लेस तर चॉकलेट मिळेल..” आणि मी ते तीन घास खायचो.
पोटासाठी असणाऱ्या या जगण्यात, निसर्गाचं ऐकायचं असतं. तीन घास ‘वरण भाताचे’ खाऊनच मग एक ‘चॉकलेट’ खायचं. जगण्याची लढाई आणि स्वतःशी लढाई एवढंच तर सगळं काही असतं. म्हणूनच कदाचित अन्नाला ‘पूर्णब्रम्ह’ असं म्हणतात..