Sunday, February 28, 2010

दिल तो बच्चा है जी!

व.पु.काळे म्हणतात, 'गरुडाचे पंख कबुतराला लावता येतीलही. पण गरुडभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. आकाशाची ओढ उसनी आणता येत नाही...' पण समजा, एका गरुड दांपत्याने एका कबुतर पिल्लाला दत्तक घेतलं आणि त्याला हे कधी कळूच दिलं नाही की 'तू एक कबुतर आहेस'. जर त्याच्या नातेवाईकांनी, भावंडांनी, मित्र-मैत्रिणींनी, कोणीच त्याला हे सांगितलं नाही किंवा जर आयुष्यात त्याला कधीच फुटक्या आरशाचा तुकडादेखील सापडला नाही, की ज्यात तो स्वतःला बघू शकेल..तर ते कबुतराचं पिल्लू स्वतःला गरुडच समजायला लागेल! त्याच्या आई-वडिलांप्रमाणे, भावा-बहिणीप्रमाणे तेही गरुडभरारी घ्यायचा प्रयत्न करेल. 'आपण गरुड आहोत. आपल्याला हे जमेलच.' ही भावनाच त्याच्या पंखात बळ देईल. त्याच्या रक्तात गरुडभरारीचं वेड जन्मतःच नसलं, तरी या विश्वासाने ते त्याच्या रक्तात भिनेल. त्यालाही मग आकाशाची ओढ निर्माण होईल. आणि जरी तो कधी पक्ष्यांचा राजा होऊ शकणार नसला, तरी कबुतरांचा राजा होण्याची क्षमता त्याच्या अंगी नक्की येईल!

एखाद्या चांदण्यारात्री पारिजातकाने अंगणभर कधी तिच्या फुलांचा सडा घातला असेल आणि त्या फुलांनी अंगणात खेळता खेळता वर बघून जर आपल्या जन्मदात्रीला विचारलं, "आई, या आकाशातल्या चांदण्या किती सुंदर आहेत! आम्ही का नाही ग इतक्या सुंदर झालो..?" तर त्यावर त्या झाडाने उत्तर द्यावं, "अगं वेडयांनो! तुम्हीच तर आहात त्या! आकाशात एक मोठ्ठा आरसा असतो. त्या सुंदर चांदण्या, म्हणजे तुमचंच त्या आरशातलं प्रतिबिंब! केवढ्या सुंदर आहात तुम्ही...!" खरंतर केवढी त्या फुलांची फसवणूक! कुठे त्या तेजस्वी चांदण्यांचे कोट्यावधी वर्षे आयुष्य आणि कुठे या सौम्य फुलांचे काही तासभर..पण असं फसवून जर ती फुलं त्यांचं मोजकं आयुष्य स्वतःवर खूष होऊन आनंदात आणि हसत -खेळत जगणार असतील..तर धन्य आहे ती फसवणारी आई..!

मला नेहेमी वाटतं,डॉक्टरांनी कधीच पेशंटला याची कल्पना देऊ नये की तो किती आजारी आहे..त्याला साधी सर्दी झाली असली काय किंवा अगदी असाध्य आजार झाला असला काय..'अरे काही नाहीये. लवकरच बरा होणार आहेस तू' हेच वाक्य असावं डॉक्टरांचं! कारण 'आपण नक्की बरे होणार आहोत' हा विश्वासच त्याला पूर्ण ताकद देतो, त्या आजाराशी लढण्याची. पण एकदा का त्याला त्याच्या आजाराचे details कळाले, मग या stageला वाचण्याचे ‘chances’ कळाले, statistics कळाले, तर तो मनानेच इतका खचून जाईल की पूर्ण ताकदीनिशी लढायला त्याला खूप कष्ट घ्यावे लागतील. या उलट जर खोटं सांगून 'नक्की बरा होशील' असा विश्वास त्याला दिला, तर हेच लढणं आपोआप होईल त्याच्याकडून. त्याचे मानसिक कष्ट वाचतील.

असं हे मनाला फसवण्याने केवढी शक्ती निर्माण होऊ शकते, याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आत्मघातकी अतिरेकी! कोण अनोळखी लोकांचा विनाश करायला स्वतःचा जीव गमावेल? पण त्यांचा धर्म, त्यांची शिकवण स्वर्गसुखाचा एवढा विश्वास त्यांच्यात बिंबवते, की ते मरायलाही तयार होतात! हा एवढा जास्त खोटा विश्वास जर या ऐवजी एखादं सद्कृत्य करण्यासाठी दिला, तर जगाचं सोनं होण्याखेरीज राहील का?

Managementमधेही या विश्वासाचं खूप मोल आहे. सगळ्यांची स्वप्ने पूर्ण होणार नसली तरी सगळ्यांना स्वप्ने दाखवावीत. बुद्धिबळाच्या पटावरच्या राजाने त्याच्या प्याद्यांना म्हणावं, " तुम्ही माझे होऊ घातलेले वजीर आहात! तुम्ही निकराने लढून त्या शेवटच्या चौकोनात पोहचलात, तर तुमचं वजिरात रुपांतर होईल. आणि मग तुम्हीही पट गाजवू शकाल. माझ्या शेजारी असलेला हा वजीर कधी काळी तुमच्या सारखंच एक प्यादं होता..." का जीव तोडून लढणार नाहीत गडी?

मला वाटतं आपणही आयुष्यात असंच स्वतःला फसवत राहिलं पाहिजे! हा ‘3 Idiots’ मधला माझा favourite dialogue.."..उस दिन एक बात समझ में आयी| ये जो अपना दिल है ना, बड़ा डरपोक है यार| इसको बेवकूफ बनाके रखो|Life में कितनी भी बड़ी problem हो ना, उसको बोलो,"कोई बात नहीं चाचू, सब ठीकठाक है| All izz well!" "और उससे problem solve हो जाएगी?" "नहीं, लेकिन उसको झेलने की हिम्मत आ जाती है|"

आपलं मन हे खरंच एखाद्या लहान मुलासारखं असतं. आणि आपल्याला जन्मतःच त्याचं पितृत्व लाभलं असतं! आपल्या या 'मुलाला' चांगलं वळण लावण्यासाठी, त्याला तरबेज बनवण्यासाठी आणि आयुष्यभर आनंदी ठेवण्यासाठी त्याला असं अधून मधून फसवत राहावं लागतं.. आणि ते ही लहान असल्यामुळे फसू शकतं! काही लागलं, खरचटलं तर त्याला 'आल्ला मंतर कोल्ला मंतर..' करायचं..इच्छेविरुद्ध काही काम करायचं असेल तर त्याला, 'हा शेवटचा वरण-भाताचा घास खल्लास ना, तर संध्याकाळी एक चॉकलेट!' असं करायचं..पण आयुष्यात त्याला कधीच कसलं tension द्यायचं नाही. कधी घाबरला कशाला तर पाठीवर थोपटून 'All izz well' म्हणायचं! आणि तो आपलं नक्की ऐकेल..
आखीर, दिल तो बच्चा है जी...

Friday, February 26, 2010

पहिलं प्रेम!

पहिलं प्रेम, म्हणजे ते 'First and Last' प्रेम नाही म्हणायचं मला. 'प्यार जिंदगी में सिर्फ एक ही बार होता है' वगैरे असली काही भानगड नाहीये ही! हे Love, 'Love at first sight' जरी असलं तरी ती अगदीच 'First sight' आहे हो! आपण त्याला भाबडं प्रेम म्हणूयात. शाळेत होणारं प्रेम! आता शाळेत म्हणजे ८ वी , ९ वी, १० वी नाही. कारण पहिली गोष्ट म्हणजे तेव्हा आपण भाबडे मुळीच नसतो! आणि दुसरं म्हणजे तेव्हा बोर्डाच्या परीक्षेची tensions वगैरे असतात. हे प्रेम, 'प्रेम कशाशी खातात' हेही कळायच्या आधीचं आहे! अगदी ३ री, ४ थीतलंच म्हणा ना...!

नवी कोरी वह्या-पुस्तकं आणि ती ठेवायला नवं कोरं दप्तर पाठीवर अडकवून आपण नवीन शालेय वर्षासाठी तयार होतो. पहिल्या दिवशी वर्ग भरतो आणि आपलं 'तिच्याकडे' लक्ष जातं. कडक इस्त्रीचा गणवेशाचा फ्रॉक, त्याला फ्रीलच्या फुगेदार बाह्या, खांद्यांपर्यंत लांब केस, डोक्यावर पांढरा hair-band, त्याला काळी क्लिप लावून त्यात ताज्या-टवटवीत मोगऱ्याच्या फुलांचा गजरा अडकवलेला, डोळ्यात काजळ घातलेलं..पापण्यांची नाजूक तर नाहीच नाही, पण अतिशय स्पीडात फडफड! गौर वर्ण..दोन्ही गालांवर छानशा खळ्या..आणि तोंडाची कधीही न थांबणारी बडबड! हे असं सगळं पाहताना, आपल्या बरगड्यांच्या पिंजऱ्यातल्या, हृदयाच्या पेटीतल्या, सगळ्यात आतल्या चोरकप्प्यात तिने क्षणार्धात जागा घेतली असते! आणि ती जागा एवढी लहान असते, की त्यात फक्त तीच मावू शकते. तिच्या वयाला, आडनावाला, आई-बाबांना त्यात मुळीच जागा नसते!

मराठीचा तास होतो, गणिताचा होतो, शास्त्राचा होतो, तरी अधून-मधून तिच्याकडे लक्ष जाणं काही थांबत नाही. मधल्या सुट्टीत ती डबा खायला बसते. डब्याखाली मस्त मोठ्ठा टर्किश कापडाचा नॅपकिन अंथरते आणि त्यावर डबा ठेवून मैत्रिणींशी गप्पा मारत मारत मधेच फिदीफिदी हसत डबा खाते. आपण तिच्या गप्पा ऐकायला गेलो, तर ऐकू येतं, " अगं काय गंमत झाली..आमच्या त्या शोभाताई आहेत किनई, त्यांच्याकडे किनई, छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आहे! ते किनई.." आणि गप्पा ऐकून झाल्यावर आपण त्या ‘किनई’ शब्दाच्या प्रेमात पडलेलो असतो! आत्तापर्यंत आयुष्यात आपण ३-४ हिंदी सिनेमे पाहिलेले असतात. त्यामुळे 'हिरो', 'हिरोईन' या concepts अर्धवट का होईना कळलेल्या असतात. पण आपल्याला तिच्याकडे बघितल्यावर सिनेमातली नटी का आठवतीय, ते मात्र कळत नसतं..!

संध्याकाळी शाळा सुटल्यावर आपण घरी येतो. खांद्यावरचं दप्तराचं ओझं काढून, बूट न काढता तसेच आरशात बघायला जातो. तिथे वेगवेगळ्या प्रकारे हसायचा प्रयत्न करून, कुठेतरी छोटीशी तरी खळी पडतीय का.. हे बघत असतो! आईला कळत नाही, ह्याला एकदम काय झालं! मग आपणच आईला म्हणतो, "आई, सांग ना, मी असा मोठ्ठं हसल्यावर मला इकडे उजवीकडे खळी पडते ना?" आई बघते आणि म्हणते, "नाही रे.." "आई पडते ग..छोटीशी पडते.." मग आई विचारते, " काय रे, डबा खाल्लास का? आवडला का?" "हो खाल्ला. आई पण किती भंगार नॅपकिन दिलायस! हा नको मला." "अरे, नवीन आहे तो राजा.." "नाही ग आई. भंगार आहे तो. मला तो, तसा टॉवेलसारखा पंचा असतो बघ..आणि तो पंचा कापून नॅपकिन बनवतात..तसा दे..!”

काही दिवसांनी 'मुलं फार दंगा करतात' म्हणून बाई मुलं-मुलींना शेजारी बसवायचं ठरवून उंचीप्रमाणे उभं करतात. तिकडे पोरींचा कलकलाट सुरु असतो, 'शी बाई! नको हो बाई! बाई आम्ही शांत बसतो. मुलांमुळे आम्हाला का शिक्षा..?" आणि इकडे आपण पहिल्यांदाच गणपतीबाप्पाचा धावा करत असतो! पण आपलं नशीब कुठे आलंय एवढं चांगलं..! आपल्या शेजारी दुसरीच कुठलीतरी मुलगी बसते. 'ती' वर्गातल्या कुठल्यातरी 'ढ' मुलाच्या शेजारी बसलेली असते. आणि 'देवबाप्पाला कधीपासून 'ढ' मुलं आवडायला लागली?!' असा आपल्याला प्रश्न पडलेला असतो..

ती आपल्या शेजारी नसली म्हणून काय झालं..आपण स्वप्नांच्या नगरीत केव्हाच रममाण झालेलो असतो! 'समजा ती माझ्या शेजारी बसत असती आणि समजा लिहिताना तिच्या पेन्सिलीचं टोक तुटलं आणि तिच्याकडे दुसरी कुठलीच पेन्सिल नसली..तर मी माझ्या कंपासच्या खालच्या कप्प्यात ठेवलेली, माझी सगळ्यात लाडकी पेन्सिल तिला लिहायला देईन!' आपणही कधी ती लाडकी पेन्सिल वापरत नसतो! जणू तिच्यासाठीच ती जपून ठेवलेली असते..संध्याकाळी मित्रांबरोबर घरी जाताना रस्त्यात चिंचा घ्यायला आपण थांबतो. एक रुपयाचा सगळ्यात मोठा आकडा आणि अजून थोड्या चिंचा विकत घेतो. 'ती आत्ता इथे असती, तर मी तिला हा सगळ्यात मोठा आकडा दिला असता!' स्वप्नांचे घोडे दौडतच असतात..

बाई तिला कधी रागावल्या की आपल्याला बाईंचाच राग येत असतो! तिला कधी हातावर पट्टी मारली की आपलाच हात खसकन मागे जातो..खेळात आपला हाउस जिंकला नाही तरी चालेल, पण तिचा जिंकावा असं मनोमनी वाटत असतं..तिला 'impress' करायला म्हणून आपण एवढा मनापासून अभ्यास करतो, की चक्क आपला पहिला नंबर येतो! आणि तेव्हा आई-बाबांना वाटतं आपल्या पोटी हिरा जन्माला आलाय..! खरं म्हणजे वार्षिक परीक्षेला थोडं वाईट वाटत असतं की आता सुट्टीत तिची भेट होणार नाही. सुट्टीत कुठेतरी रस्त्यात भेटावी असं वाटत राहतं.. पण ते तेवढ्यापुरतंच! एकदा सुट्टीतला दंगा सुरु झाला की थेट पुढच्या वर्षी शाळा सुरु व्हायच्या वेळेसच तिची आठवण होते! आणि आता पुन्हा भेट होणार म्हणून आपण खुशीत शाळेत जातो!

पालक सभेला वाटतं, तिच्या आईने येऊन आपल्या आईशी बोलावं..म्हणावं, " तुमचा मुलगा केवढा हुशार आहे! कसा अभ्यास करतो तो..?" आणि मग त्यांच्या गप्पा व्हाव्यात..मैत्री व्हावी..पुढे लग्नाची बोलणी व्हावीत! स्वप्नांचे घोडे आता आकाशात उडत असतात..! पण दुसऱ्याच क्षणाला वाटतं, नको रे बाबा! तिची आई विचाराची, 'कसा अभ्यास करतो?' आणि आपली आई म्हणायची, " अहो, काय सांगू, करतंच नाही हा अभ्यास! सारखं मागे लागावं लागतं त्याच्या..!"

कधीतरी चुकून-माखून एकदाच ती आपल्याशी बोलते. गैरहजर राहिल्याने, बुडलेलं भरून काढायला तिला 'हुशार' मुलाची वही हवी असते..आपण ती वही तिला देताना दोनदा तपासून घेतो, की कधी घाईघाईत लिहिताना अक्षर तर खराब आलं नाहीये ना..! तो आपल्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस असतो..

पण या भाबड्या प्रेमाचं आयुष्य अगदीच कमी असतं. ते कधी संपतं, कळतही नाही. बरगड्यांच्या पिंजऱ्यातलं, हृदयाच्या पेटीतल्या त्या चोरकप्प्यातलं ते प्रेमाचं फुलपाखरू आपल्या नकळत उडून जातं..आणि ते एकटं उडत नाही, आपल्या निरागस बालपणालाही त्याच्याबरोबर घेऊन जातं..भाबडं प्रेम, ही भाबड्या वयाची शेवटची अवस्था असते. आणि हे प्रेम संपणं हीच मोठं झाल्याची पहिली खूण असते..

Friday, February 19, 2010

गोधडी

गोधडी म्हटलं की मला माझ्या आज्जीशिवाय दुसरं काही आठवूच शकत नाही! मी लहान असताना तिच्या एका जुन्या साडीची कापूस घालून आम्ही गोधडी शिवली होती. ती मी वापरायचो. इतकी मस्त मऊ आणि उबदार होती ती गोधडी..अगदी माझ्या आज्जीसारखीच! लहानपणी आज्जीच्या हातावरून हात फिरवून मी म्हणायचो, "आज्जी अगं किती ग सुरकुत्या आहेत तुझ्या हातावर! आपण इस्त्री करायची का तुला?!" तेव्हा ती हसून म्हणायची, " नाही होणार रे..बघ करून हवं तर..!" आणि मग मी म्हणायचो, "नको ग आज्जी. तू अशीच राहा मऊ-मऊ!" म्हणून गोधडी म्हटलं की मला माझ्या आज्जीचीच आठवण येते..!

आज मी जो पण कोणी आहे, जेवढं काही चांगलं म्हणून असेल ना माझ्यात, त्याचं श्रेय आई-वडिलांना तर जातंच, पण तितकंच मोठं श्रेय माझ्या आज्जी-आजोबांनाही जातं. लहानपणी आम्ही साताऱ्याला राहायचो. आई कॉलेजमध्ये शिक्षिका. ती सकाळी कॉलेजला जायची. पप्पा पुण्याला असायचे. शनिवार-रविवार भेटायचे आम्हाला. त्यामुळे दिवसभर फक्त मी, आज्जी आणि आजोबा! असं म्हणतात, लहानपणीच मुलं सगळ्यात जास्त शिकतात,घडतात. संस्कारक्षम वय असतं त्यांचं ते. त्यावेळी आज्जीने जे माझ्यावर अफाट कष्ट घेतलेत ना, ते शब्दात मांडण्याच्या पलीकडचे आहेत..रामायण-महाभारत, इसापनीतीच्या जाड पुस्तकातल्या अगदी सगळ्या गोष्टी, कित्येक छान गाणी, कविता, श्लोक, रामरक्षा, १२ वा अध्याय, १५ वा अध्याय, अथर्वशीर्ष, शुभं करोति.. आणि अजून बरंच काही, ह्या सगळ्याची हसत-खेळत पारायणं व्हायची घरी! रंग ओळखा, बदक शोधा, कोडी सोडवा..यांसारखे असंख्य लहान मुलांचे खेळ खेळलोय आम्ही. शेजारच्या बोळात रोज क्रिकेट खेळायचो आम्ही. त्यात फक्त एकच नियम होता. मी कायम बॅटिंग करणार आणि आज्जी नेहेमी बॉलिंग! 'एक रुपयात हत्ती' हे माझं सगळ्यात लाडकं गोष्टीचं पुस्तक होतं. ती गोष्ट अशी होती की, एकदा सगळी लहान मुलं जत्रेला जातात. तिथे १ रुपयात प्राणी विकत मिळत असतात! कुठलाही प्राणी घ्या, फक्त १ रुपयाला! मग कोणी वाघ घेतं, कोणी सिंह घेतं, कोणी मोर घेतं तर एक जण चक्क हत्ती आणतो घरी! आणि मग त्या मुलांचे पालक कसे घाबरतात वगैरे.. जेवण झाल्यावर झोपताना मी ते अख्खं पुस्तक आज्जीकडून वाचून घ्यायचो! आणि आज्जीसुद्धा आवडीने मला मधाचं चाटण भरवत ते वाचून दाखवायची. मला अजूनही ती गोष्ट लक्षात आहे. त्या मुलांची नावं आठवतायत. इतकंच नाही तर कोण कुठला प्राणी विकत घेतो, हेसुद्धा लक्षात आहे!

एकदा खेळताना कशानेतरी माझ्या बोटाला कापलं आणि मी रडायला लागलो. ते बघून आज्जीने मूठभर हळद आणून माझ्या बोटावर ओतली! तिच्या साडीचा पदर फाडून बोटावर पट्टी बांधली आणि मला उचलून १२० च्या स्पीडने कोपऱ्यावरच्या बोधे डॉक्टरकडे घेऊन गेली! त्याच साडीची नंतर आम्ही गोधडी शिवली...

खूप वर्ष झाली या गोष्टीला..आता तिच्या हातावरच्या सुरकुत्या आणखी वाढल्यात..त्याचा grit size वाढलाय. एकदम high quality texture तयार झालंय त्या क्रेपच्या कागदासारख्या तिच्या त्वचेचं. थकलीय आता ती.. आणि त्यात भर म्हणजे सगळं विसरायला लागलीय आज-काल! ५ मिनिटांपूर्वी सांगितलेली गोष्ट पुन्हा सांगायला लागते तिला. मध्ये एकदा पत्यातलं ७-८ खेळत होतो आम्ही. प्रत्येक पान टाकताना विचारायची, "हुकुम काय रे?" मग दरवेळी हिला सांगा, "इसपीक ग.." आणि तिचे त्या डावात मी हात ओढले असले तरी पुढच्या डावात विचारणार, "किती हात ओढले मी तुझे? बोल हात देतोयस का पान?!" तेव्हा जरा वैतागून तिला म्हणालो, "अगं मी ओढलेत हात! किती ग विसरतेस? तू काय गजिनीचा आमीर खान आहेस का?!" त्यावर म्हणाली, "म्हणजे काय असतं? आम्हाला नाही बाबा ठाऊक!" त्यावर इतकं मनापासून हसू आलं मला..तिला म्हणावसं वाटलं, "आज्जी अगं अनंत हातांचं कर्ज आहे ग तुझं माझ्यावर..मी या दोन हातांनी ते कसं फेडू सांग..!"

तर अशी माझी आज्जी सध्या 'अनझेपेबल' state मधे आहे. थोडं कमी ऐकू येतं. गोष्टी सारख्या विसरते. परत परत तेच तेच प्रश्न विचारते. त्यामुळे कधी कधी मला तिला त्रास द्यायला खूप मजा येते! मी तिला छळायच्या मूडमध्ये असलो की तिला आज्जी कधी म्हणतच नाही! मालतीबाई किंवा थेट मालते! तिला मी म्हणतो, "मालते, तू आता ७५ वर्षांची झालीयस. एवढं आयुष्य जगलीस. एव्हाना तुला नक्कीच कळलं असेल की आयुष्य म्हणजे नेमकं काय असतं ते! सांग ना, काय असतं आयुष्य म्हणजे?!" पूर्ण bouncer असतो हा! जणू आता माझी बॉलिंग असते! ती हसून म्हणते, " नाही रे मला माहिती.." अजून काय बोलणार बिचारी? मग मी म्हणतो, "मी काय तसा लहानच आहे अजून. त्यामुळे माझ्या जन्माच्या आधीचं मला आठवतंय..सांगू?" "सांग बरं.." "अगं, ब्रम्हदेवाने जन्म देताना मला विचारलं, तुला कुठली आज्जी हवीय? एक खूप छान आज्जी दिसली मला तिथे...ती तू नव्हतीस काही! मी त्याला म्हणालो मला ती दे. आता ब्रम्हदेव तुझ्यासारखाच म्हातारा! त्याला ऐकू आलं 'मालती' दे! म्हणून मी तुझा नातू झालो आज्जी..!" ह्यावर उत्तर म्हणजे फक्त कवळी नसल्याने बोळक्यातून आलेलं हसू! मग मी तिला म्हणतो, "नाही अग आज्जी. मी मालतीच म्हणालो होतो. खरंच..आणि पुढच्या जन्मीसुद्धा मी मालतीच म्हणणार आहे. तू पुढच्या जन्मी अगदी काटेरी साळींदर झालीस ना, तरी मीच तुझा नातू होईन. आणि तुझ्या अंगावर काटे असले तरी तू तितकीच मऊ-मऊ असली पाहिजेस! मला काही माहिती नाही..कळलं ना तुला?..साळू आज्जी..!"

माझ्या लहानपणी आज्जी एक सोन्याची बांगडी घालायची. पण काही वर्षांपूर्वी जेव्हा आज्जीच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, तेव्हा तिने ती बांगडी घालणही सोडून दिलं. मधे एकदा आईने मला ती बांगडी दाखवली. मी ती हातात घेऊन बघत होतो तेव्हा लक्षात आलं की त्या बांगडीच्या थोड्या भागावारची नक्षी पूर्णपणे गेलीय. पण बाकी ठिकाणी ती शाबूत आहे. त्याबद्दल आईला विचारलं तेव्हा कळलं, माझ्या लहानपणी आज्जी मला मधाबरोबर सोन्याच्या वर्खाचं चाटण द्यायची, ती बांगडी उगाळून! का, तर म्हणे डोकं सुपीक होतं मुलाचं. हुशार होतं मूल.. दोन क्षण पायाखालची जमीन सरकल्याचा भास झाला आणि डोळ्यातून खळकन पाणी आलं.

एक ठराविक वय ओलांडलं की सगळेच आज्जी-आजोबा अशा अनझेपेबल state मधे जातात. आपण बऱ्याच वेळा आपल्याच धुंदीत आणि घाईत असतो. त्यामुळे कधी त्यांच्यावर वैतागायला होतं. एकच गोष्ट सारखी सारखी सांगायला लागल्यामुळे कधी कधी चिडचिड होते. पण कधी त्यांना आपण वेळ दिला ना, तर त्यांच्याशी गप्पा मारताना खूप मजा येते! अगदी मनापासून हसू येतं. आपण खूप प्रसन्न राहू शकतो त्यांच्यामुळे. पण कदाचित ही गोष्ट लक्षात न आल्याने म्हणा किंवा सुनेचा सासूवर राग म्हणून म्हणा, पण आज्जी-आजोबांपासून लांब राहण्याचा निर्णय आई-बाबा जेव्हा घेतात, किंवा त्याही पुढे जाऊन जेव्हा त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात, तेव्हा मला त्यांची कीव येते.. नातवंडांना त्यांच्या आज्जी-आजोबांपासून दूर करणं म्हणजे थंडीत शांत झोपलेल्या लहान मुलाच्या अंगावरची गोधडीच काढून घेऊन त्याला कुडकुडत ठेवणं. कधी कधी मोठ्याच्या वाट्याला येते ती गोधडी, पण धाकट्याला वंचित राहावं लागतं त्यापासून. का हा भेदभाव? का गोधडी जुनी झाली म्हणून? आणि मग आज्जी-आजोबाच मिळाले नाहीत तर मुलं गाणी, गोष्टी, श्लोक ऐकत घडण्याऐवजी टीव्हीवरच्या निरर्थक मालिका, वीडियो गेम्स आणि कॉम्पुटर मधे रमून जातात. आणि तसेच वाढतात. कसे संस्कार होतील सांगा? आणि तो मुलगा पुढे कितीही यशस्वी झाला ना, तरी तो आयुष्यातल्या खूप मोठ्या आनंदाला, खूप मोठ्या प्रेमाला आधीच मुकला असेल. आज्जी ही आईची आई असते या logic ने, तो अगदी तिन्ही जगाचा स्वामी झाला तरी भिकाऱ्यांचा भिकारीच असेल..बंगला असेल कदाचित त्याच्याकडे, गाडी असेल, उच्चशिक्षण, भरझरी वस्त्रे असतील आणि अगदी तलम, रेशमी, उंची कापडाचं पांघरूणही असेल अंगावर घ्यायला..पण ज्यात कापसाबरोबरच प्रेमही काठोकाठ भरलंय आणि म्हणूनच जी खूप उबदार झालीय.. आणि जी अंगावर घेतल्यावर एकटेपणा निघून जातो..अशी आज्जीची गोधडी मात्र त्याच्याजवळ नसेल…

Saturday, February 13, 2010

अहो शेजारी..चला जरा आयुष्यावर बोलुयात!

त्यांच्या अगदी शेजारीच बॉम्ब फुटला. क्षणार्धात शरीर फाटलं गेलं. कातडी सोलली गेली. अवयवांच्या चिंध्या झाल्या. रक्ता-मांसाचा सडा पडला. श्वास थांबले. त्यांचं सगळं संपलं... जवळच्यांनी आक्रोश केला. नातेवाईकांनी अश्रू ढाळले. देशबांधवांनी हळहळ व्यक्त केली...पण काय हो, या गोष्टीनंतर किती जणांनी तुमचा धर्म स्वीकारला? तुमच्यासाठी कोणी देशाची दारं उघडली? तुमची शक्ती तुम्ही दाखवलीत. तुमची हुशारी तुम्ही दाखवलीत. पण जरा सांगा, ही अशी भीती पसरवून तुम्हाला काय मिळालं? दोन वर्ष लागली तुम्हाला हा पुण्यासाठी 'Master Plan' करून साकारायला. त्यात तुम्ही तुमच्या स्फोटकांनी नऊ लोकं मारलीत. एक गंमत सांगा, तुम्ही त्यातल्या एकाला तरी ओळखत होता का?... बर ते जाऊ देत.. ९ लोकांना मारायला २ वर्षे. ११५ कोटी लोकं मारणं तुमच्या पुढच्या ७ पिढ्यांना तरी शक्य होणार आहे का? एवढे 'Master Planner' तुम्ही.. हा विचार राहिला का हो करायचा?

सध्या आमच्या विविधतेने नटलेल्या एकत्र कुटुंबात जरा कुरबुरी सुरु आहेत..कर्तबगार पणजोबा गतप्राण झाल्यानंतर कुठल्या आजोबांनी घराची जबाबदारी घ्यावी यावर एकमत नाहीये. हिंदू काकांचे आणि मुसलमान चाचांचे थोडे खटके उडतायत. मराठी काकू बिहारी भाभींकडे बघून नाकं मुरडतायत. काही कुटुंब खूप गरीब झालीयत. काही कुटुंब गेली बरीच वर्ष गप्पपणे बाकीच्यांचं ऐकत होती, त्यामुळे आता त्यांचं ऐकावं अशी त्यांची इच्छा आहे. आणि यावरून मग कधी वादा-वादी, कधी आरोप-प्रत्यारोप, तर कधी भावंडांमध्ये मारामारी चालू असते. पण कुठल्या भावंडांमध्ये भांडणं, मारामारी होत नाही?..एकमेकांना खाली खेचणं चालू आहे. स्वार्थासाठी भ्रष्टाचार चालू आहे. एवढंच काय, तर काही लोकं फितूर होऊन तुम्हाला सामील झालीयत! अगदी सगळं मान्य आहे. अहो साधं आहे.. एवढं मोठं कुटुंब सांभाळणं अवघडच की हो..आणि त्यात ह्या सध्याच्या कुरबुरी! असो..चालायचंच. आम्ही ते आमचं बघून घेऊ. पण मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या..आमची ही घरातली भांडणं बघून तुम्हाला असं कसं वाटलं की ह्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता? असे हे छुपे वार करून कधी तुम्हाला काश्मीर मिळू शकेल? आमचे कुटुंबीय तुमचा धर्म स्वीकारतील? किंवा तुम्ही आमच्यावर राज्य वगैरे करू शकाल..? नाही, म्हणजे मान्य आहे हो, की अशक्य काही नसतं. पण अहो, १५० वर्ष पारतंत्र्याचा अनुभव आहे आम्हाला...आणि फक्त एवढंच नाही, तर त्या पारतंत्र्यातून बाहेर पडण्याचा सुद्धा! लोकमान्य टिळक, भगतसिंग, महात्मा गांधी हे आमचे काही पराक्रमी पूर्वज. ठाऊक असेलच तुम्हाला. त्यांनी पाजलेले बाळकडू आम्ही कसे विसरू?

जो जगातला सगळ्यात बलाढ्य देश समजतात, अमेरिका नावाचा, तिथेही आमचे बरेच बांधव असतात. गरज लागली तर कुटुंब वाचवायला सगळेजण येतील. आणि तो बलाढ्य देशसुद्धा माझ्या या बांधवांवर आता इतका अवलंबून आहे, की तोसुद्धा लागेल ती मदत करायला तयार होईल! मग मला सांगा..तुमचे ते 'आर.डी.एक्स', त्या 'ए.के-47' आणि तुमची ती 'Master Minds' तुम्हाला कुठे कुठे पुरतील?

आम्ही शांत होतो ह्याचा अर्थ आम्ही तुम्हाला माफ केलंय, असा मुळीच समजू नका. वाहिलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब तर तुम्हाला द्यावा लागणारच आहे. त्यात परत तुमच्यावर ६० वर्षांपूर्वीचं ५५ कोटींचं कर्ज आहे. व्याजासकट किती होईल, आहे अंदाज? तरीसुद्धा तुम्हाला एक विनंती. आम्हाला शांतपणे जगू द्या. तुम्ही सुखाने जगा. आपलं पटत नसेल तर दुसऱ्या कोणाशीतरी मैत्री करा. एवढे धर्मांध होऊ नका. तुमच्या कुठल्या मेलेल्या नातेवाईकाने खाली येऊन तुमच्यासमोर स्वर्गसुखाचं वर्णन केलंय? अहो २१ व्या शतकात राहतो आपण. जरा ती डोळ्यावरची पट्टी काढा.

आज मी तुम्हाला एक वचन देतो.. तुम्ही जर असा सारखा सारखा माझ्या कुटुंबाला त्रास दिलात ना, तर तुमच्या सगळ्यांची तशीच शरीरे फाडू, अवयवांच्या चिंध्या करू आणि तुमच्याच जमिनीवर तुमच्याच रक्ता-मांसांचा सडा घालू..

सरफरोशी की तमन्ना आज भी हमारे दिल मैं है| और वोह हमेशा कायम रहेगी|
जय हिंद! जय भारत!

Wednesday, February 10, 2010

I Love You रस(ना)!

परवा दात घासताना आरशात बघितलं आणि वजन खूप वाढल्याचा अचानक साक्षात्कार झाला! थोडा मागे सरकलो आणि पोटाकडे बघितलं. आणि...बघतच बसलो! २ वर्षांपूर्वीचं एक दृश्य डोळ्यासमोर आलं..आई मला कणीक मळायला शिकवत होती..! हेच दृश्य नेमकं का आठवावं हे कळायला वेळ लागला नाही! मी पोटाला हात लावला आणि त्या दिवशी 'फक्त भातच जेवायचा' असं ठरवलं!!

खूप लाज वाटली स्वतःची..वाटलं किती unhealthy खातोय. कसलीच शिस्त नाही. मनाचा निग्रह नाही. वाईट सवयींच्या आहारी जातोय. पूर्वीच्या काळी ऋषी-मुनींचा किती ताबा असायचा मनावर.. केवढी ती तपश्चर्या..केवढी ती साधी राहणी.. अगदी साधं जगणं पाहिजे माणसाचं. अलिप्त जगता आलं पाहिजे. कशाचा मोह नको. कशावर अवलंबून राहता कामा नये.. छे, छे! फारच चुकतंय..

चहा प्यायला बसलो आणि मित्र म्हणाला, "अरे, हे बिस्कीट घे ना. आजच पार्सल आलंय. आईने कणकेची बिस्कीटं पाठवलीयत..!" पुन्हा 'कणीक'...! परत तेच दृश्य. मी कणीक मळतोय आणि आई म्हणतीय, " अरे, थोडं पीठ घाल. पाणी जास्त झालंय.." बास! ठरवलं! आज खेळायला जायचं! असं ठरवून मी फोनाफोनी सुरु केली..बरेच जण तयार झाले. संध्याकाळी जिममध्ये जाऊन आधी बॅडमिंटन आणि मग बेसमेंटमध्ये क्रिकेट, असा प्लॅन ठरला..

लोकांना क्रिकेटचा मोह आवरला नाही. सगळे क्रिकेट खेळायला बेसमेंटमध्ये गेले. पण मी ठरवल्याप्रमाणे आधी बॅडमिंटन खेळायला गेलो. चांगल्या खेळणाऱ्या लोकांना तिथे बघून आनंद झाला..असंच warm up न करता बॅडमिंटनची पहिली मॅच खेळायला उतरलो. ‘या कणकेचा आता ८ बिस्किटांचा पॅकच बनवायचा!’ जणू याच जोशाने खेळलो! २० मिनिटं चालली असेल मॅच आणि जी काही धाप लागली.. ब्रम्हांडच आठवलं! शर्ट पूर्ण ओला..घामाच्या धारा लागल्या होत्या.. तोंड पूर्ण लाल झालं होतं..डोकं आणि डावा पाय ठणकत होता..हृदयाची वाढलेली धडधड..गरगरायला लागलं..जोरजोरात श्वासोश्वास..बाहेर येऊन आधी बूट काढले.. घाम पुसला आणि गटागटा पाणी प्यायलो..!

मग क्रिकेट खेळणं तर शक्यच नव्हतं! खाली बाकावर बसून मित्रांचा खेळ बघत बसलो..अजूनही माझी धाप गेली नव्हती..थोडं गरगरत होतं..एवढं पाणी प्यायल्याने तहान पूर्ण भागली होती आणि भूकही गेली होती. अक्षरशः मेल्यासारखा बसलो होतो मी! कसलीच इच्छा वाटत नव्हती..मित्र फारच रंगात येऊन खेळत होते. अगदी enjoy करत होते. कोणाचंच माझ्याकडे लक्ष नव्हतं..क्षणभर वाटलं..आपलं काही अस्तित्वच नाहीये! मनात विचार आला..समजा आत्ता माझं काही अस्तित्वच नसतं किंवा आत्ता मी जिवंतच नसतो तर..! मी imagine करू लागलो..मी एक मेलेला माणूस आहे आणि आत्ताचा मी म्हणजे माझा आत्मा आहे, जो आपल्या मित्रांचा खेळ बघत बसलाय.. मग जर मी आत्मा असीन, तर मला कसलीच इच्छा नसेल. त्यांच्यात खेळताही येणार नाही..फक्त काय ते बघत बसायचं...मग विचार केला..हे सगळे आता खेळ झाल्यावर निघून जातील..एकमेकांशी गप्पा मारतील..जोक्स मारतील..एकमेकांची खेचतील..मला काहीच करता येणार नाही..मग घरी जाऊन जेवतील..मला भूकच नसेल..नुसतं बघत बसावं लागेल..मग हे मस्तपैकी झोपी जातील..मला कशी झोप येईल? सतत जागाच असीन मी! नुसताच भटकत असीन… एवढंच काय, तर कधी समोर पुरणपोळी, बासुंदी, आम्रखंड किंवा पाव-भाजी, भेळ, वडापाव यातलं काहीजरी आलं, तरी खावंसं वाटणार नाही..कधी आयुष्यात धडपड करून काही मिळवावसं वाटणार नाही..हसता येणार नाही.रडताही येणार नाही.. कधी आनंद होणार नाही. कधी दु:ख होणार नाही. राग नाही, लोभ नाही, आदर नाही, कौतुक नाही..सगळ्या इच्छाच मरतील! म्हणजे उद्या कैतरिना कैफ किंवा नटरंगची 'अप्सरा'.. (नवी) सोनाली कुलकर्णी समोर येऊन म्हणाली, "तुम्हीच हो स्वामी! तुम्हीच! मला वरमाला घाला!" तर मी म्हणेन, "असू देत , असू देत..मला काही वाटत नाही तुझ्याबद्दल..दुसरा कोणीतरी शोध!" बापरे..!! काहीही काय?!..... तेवढ्यात मला मित्रांनी हाक मारली.."अरे, कुठल्या जगात आहेस?" ते माझ्याशी बोलतायत हे कळल्यावर त्या क्षणी मला इतका आनंद झाला सांगतो..! मला खरंच जिवंत असल्याची किंमत कळली...!

जिमवरून घरी येईपर्यंत इतकं हलकं-फुलकं आणि छान वाटत होतं..आपण म्हणतो, इच्छा-आकांक्षांने माणसाला गुलाम बनवला आहे..त्या त्याने त्यागल्या पाहिजेत..अहो, पण त्यागून करायचं काय? मंदिरात घंटा वाजवत बसायचं?! तीसुद्धा वाजवाविशी वाटणार नाही! अहो मोजून श्वास दिलेत तर अगदी हसत खेळत दमदार घेऊयात की! असं म्हणतात, माणूस अपेक्षा ठेवतो. म्हणून दु:खी होतो. त्यामुळे त्याने अपेक्षाच ठेवू नयेत. मी म्हणतो, होऊ देत ना दु:खी. अपेक्षा पूर्ण न झाल्याने जेवढं दु:ख होईल, तेवढाच आनंद अपेक्षा पूर्ण झाल्यावर होईल! पुरवू देत जिभेचे चोचले..खाऊ देत गोड-धोड, चमचमीत. जरी ते unhealthy असलं, तरी जेव्हा आरशात तो स्वत:चा कणकेचा गोळा बघेल, तेव्हा झक मारत व्यायाम करायला लागेल! माणसाचं आयुष्य कसं असं रसरशीत हवं! जीवनरसयुक्त! मग त्याला 'कॉमन मॅन' म्हटलं गेलं तरी चालेल..अहो, हीच तर असते माणूस असल्याची खूण! सगळ्याचा त्याग करून, सन्यास घ्यायला जन्म मिळतो का?

परवा मंगेश पाडगावकरांवर टीका झाली. का, तर म्हणे त्यांना पद्म पुरस्काराची इच्छा होती..अपेक्षा होती..हाव होती..का नसावी? आणि ती आहे, म्हणूनच त्यांच्यात अजूनही एक मिश्कील माणूस जिवंत आहे. आणि त्यामुळेच कदाचित मराठी साहित्यात एवढी मोलाची भर पडलीय..त्यांच्याच कवितेच्या या ओळी..

'अरे खूप मिळालं
तरी खूप हवं असतं
कारण प्रत्येकवेळी
सुख नवं असतं
आणि असं वाटणं हेही
माणूसपणाचंच लक्षण असतं!'

आम्ही घरी आलो. ग्लासमध्ये ऑरेंज ज्यूस ओतला. काही वर्षांपूर्वीची ती 'रसना' ची जाहिरात आठवली. ती एक गोड मुलगी त्यात म्हणते, ' I Love You रसना'.. तो ज्यूस त्यावेळी मला अगदी अमृतासारखा अवीट गोड वाटला.. मला माझ्या जीवनरसाला उद्देशून म्हणावसं वाटलं..'I Love You रस(ना)!'

Sunday, February 7, 2010

कॅलीडोस्कोप

कधी रांगोळी घाले सुखाची
कधी नक्षी ही दु:खाची,
पूर्ण होती स्वप्ने कधी
तर कधी पावती लोप,
जीवन म्हणजे एक कॅलीडोस्कोप...

निसर्गाची मायाच निराळी
कधी शिमगा, तर कधी दिवाळी,
कधी फुलवतो, कधी भिजवतो
तर कधी होई याचा प्रकोप,
जीवन म्हणजे एक कॅलीडोस्कोप...

नात्यांचीही किमया न्यारी
भावनांच्या तारा झंकारी,
कधी आदर, प्रेम कधी
तर कधी पाठीवर चोप,
जीवन म्हणजे एक कॅलीडोस्कोप...

वय वाढता रूप हा बदली
लख्ख कांती ही सोडून जाई,
कुण्या काळचे कुंतल काळे
होती पांढरे धोप,
जीवन म्हणजे एक कॅलीडोस्कोप...

दिन-रातीचे चक्र हे चाली
कधी एकांती, कधी साथ-संगती,
मार्गी तुझिया लढत रहा तू
अन् घे विसाव्यास थोडी झोप..
जीवन म्हणजे एक कॅलीडोस्कोप...

Saturday, February 6, 2010

Happy Farming!

नमस्कार मंडळी! मी जिवा..अहो, तो शिवाजी महाराजांचा जिवा महाला नाही काही! जिवा-शिवा बैलजोडीतला जिवा. आमच्या धन्याने आम्हाला जरा विश्रांती दिलीय. शिवा गेलाय पाणी प्यायला. येईलच इतक्यात. तेवढ्यात म्हटलं जरा तुमच्याशी बोलून घेऊ..

हा आमचा नवा धनी. त्याचं नाव शिवाजी. त्यामुळे मीसुद्धा शिवबाचा जिवाच आहे म्हणा ना! त्याची बायको आलीय कांदा आणि भाकरी घेऊन. त्यामुळे आम्हालाही चरायला सोडलंय त्याने. इतकं हायसं वाटतं सांगतो, पाठीवरून जरा नांगर उतरला की..हल्ली अहो, मान आणि पाठ जरा दुखायला लागलीय माझी..आणि दिवसभर नांगरलं की शिवाचा पुढचा उजवा पाय दुखतो. पण चालायचंच. आमचा धनी आमच्यावर खूप माया करतो. त्यामुळे काही वाटत नाही थोडे जास्त कष्ट करायला. नांगरणी चालू आहे सध्या. मग पेरणी होईल. पाऊस होऊ देत चांगला म्हणजे झालं. अशी तरारून येतात पिकं तुम्हाला सांगतो! आम्ही सगळ्यांनी मिळून गाळलेल्या घामाचं जणू सोनंच होतं!

आमच्या धन्याच्या मुलीचं, म्हणजे तायडीचं, लग्न करायचं म्हणतायत. त्यामुळे आम्ही जोमाने नांगरणी करतोय. पावसाच्या आधी पेरणी व्यवस्थित झाली पाहिजे ना..आमची तायडीपण अगदी गुणाची पोर बरंका! तिचंही खूप प्रेम आहे आम्हा दोघांवर. रोज झोपायच्या आधी गोठ्यात येऊन आमच्या दोघांच्या पाठीवरून हात फिरवते ती..आणि आमच्या वाढदिवसाला तर आमचे सगळ्यात जास्त लाड तीच करते! आमच्या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. अहो, आमच्या दोघांचाच काय, सगळ्याच बैलांचा! तिथिनी येतो आमचा वाढदिवस. श्रावणातल्या पिठोरी अमावस्येला. 'बैल पोळा' म्हणता तुम्ही त्याला. त्यादिवशी आम्हाला सुट्टी असते. पहाटे उठून धनी आम्हाला नदीवर घेऊन जातो आणि आंघोळ घालतो. मग तायडी आमची शिंग रंगवते. अंगावर गेरूचे ठिपके काढून झूल चढवते. गळ्यात सुताच्या माळा आणि घुंघरं घालते. आम्हाला धनी नवी वेसण घालतो. आमच्या वाढदिवसाला पुरण-पोळीचा बेत असतो! खूप खूप मजा येते..

काही वर्षांपूर्वी आम्ही 'जिवा-शिवाची ही बैलजोडं...' हे गाणं ऐकलं. वाटलं, अरे वाह! आपल्यावर कोणीतरी गाणं लिहिलंय! पण नंतर कळलं की त्या गाण्यावरनंच आमची नावं ठेवलीयत! तरीपण आम्ही म्हणतो की ते आमचं ‘title song’ आहे!

हल्ली म्हणे अख्खं जगंच शेती करायला लागलंय! Facebook वरचं Farmville खेळून! लोकं वेगवेगळ्या भाज्या काय लावतायत! फळं काय लावतायत! प्राणी काय पाळतायत! चांगली गोष्ट आहे! मी शिवाला परवा सांगितलं की अरे माऊसच्या एका क्लिकमध्ये एक फूटभर नांगरून होतं त्यात..! तर तो उडालाच! मग त्याला म्हणालो अरे ती काही खरी शेती नसते काय.. 'Virtual शेती' असते. असंच खोटं खोटं खेळायचं. पण त्याला ही concept काही शेवटपर्यंत कळलीच नाही! असो..

पण तुम्हाला सांगतो, इतकं सोपं नसतं हो शेती करणं. खूप कष्टाचं काम आहे आणि वर पाऊसही पडला पाहिजे. म्हणजे नशिबाचा भाग हा आलाच..आमचा जुना धनी होता ना काशीनाथ, त्याच्याकडे नशिबाने साफ पाठ फिरवली. नाही करू शकला शेती. गळफास लावला त्याने..काल त्याची पुण्यतिथी होती. शिवाला त्याची फार आठवण येत होती. काल त्याचा मूडच नव्हता. नांगरवतच नव्हतं त्याला. मला म्हणाला, "काशीनाथ आठवतोय रे..केवढा हसतमुख होता..गेला सोडून..मरायचं वय तरी होतं का रे त्याचं..? मलापण जगावंसं वाटत नाही बघ..पण मरताही येत नाही स्वत:हून.." आता यावर काय बोलायचं? त्याला मी समजावलं. त्याला म्हणालो, "अरे असं होतं आयुष्यात.. जवळची माणसं निघून जातात. पण आता शिवाजी, त्याची बायको, तायडी हेच आपलं कुटुंब. काही कमी माया मिळतीय का सांग बरं? उलट शिवाजीने आपल्याला विकत घेऊन काशीनाथच्या घरच्यांना आधारच दिलाय. आणि शिवाजीचा दुसरा काशीनाथ होऊ न देणं ही आपल्या दोघांचीच जबाबदारी नाहीये का?" त्याला बहुतेक ते पटलं असावं. आम्ही दोघं मग एकमेकांना 'All izz well' म्हणालो आणि पुन्हा नांगरायला लागलो..

संध्याकाळी शेजारच्या गोठ्याच्या दोन गायी आल्या होत्या चरायला. शेवंती आणि जास्वंदी. शिवाला म्हणालो, " चल, गोरीपान शेवंती तुझी, जास्वंदी माझी! काय म्हणतोस, बोल?" त्यावर खुदकन हसला! म्हणाला, "तू शेवंतीसाठी प्रयत्न जरी केलास ना, तरी तुला ती काही मिळायची नाही! तुझ्या league च्या बाहेर आहे रे ती!" म्हणालो, "जा रे! बघूच आपण..तू काय स्वत:ला हृतिक रोशन समजतोस की काय!" तर म्हणाला," हृतिक नाही रे, शाहरुख! मी ‘boy next door’ आहे!"

पण रात्री काही केल्या झोपच लागत नव्हती. काशिनाथची आठवण येत होती..आणि काम करायची इच्छा नसूनही काम केल्याने खूप दमछाक झाली होती. आवंढाच घेता येत नव्हता.. घश्याखाली उतरतच नव्हता.. तेवढ्यात तायडी आली. तिनी मिठी मारली आणि पाठीवरून हात फिरवून निघून गेली. बैल पोळ्याला आम्हाला ओवाळून झाल्यावर तायडी हात जोडून, डोळे मिटून नमस्कार करते. आणि जेव्हा ती डोळे उघडते ना..तेव्हा दोन्ही डोळ्यात पाण्याचा एक एक थेंब असतो तिच्या. ते आठवलं..आणि त्या दोन थेंबांसाठी घामाचे कितीतरी पाट वाहायचं बळ अंगात आणलं पाहिजे हे जाणवलं. शिवालाही तसंच काहीसं वाटलं असेल..कारण तो गुणगुणत होता..'बळ दे झुंझायला, किरपेची ढाल दे..इनवती पंचप्राण जिव्हारात ताल दे...'

अरे! आला बघा तो! शंभर वर्षं आयुष्य आहे त्याला! चला मी निघतो..तो लंगडतोय बघा कसा! पुढचा उजवा पाय दुखतोय त्याचा. "म्हातारा झालास रेSSS ..शिवा!' चला मंडळी, निरोप घेतो तुमचा. पुन्हा भेटूच...आणि हो...'Happy Farming!'

Tuesday, February 2, 2010

माझ्या अरसिक प्रिये..

माझ्या अरसिक प्रिये,

इतकी कशी तू अरसिक? तुला ना पावसाचं अप्रूप आहे ना गुलाबी थंडीचं.. तुझ्या मते पाऊस हा सगळ्यात जास्त हवाहवासा भारतातल्या शेतकऱ्यांनाच असतो. प्रेमी युगुलांचा आणि पावसाचा काहीही संबंध नाही! याचं कारण तू देतेस की पाऊस काही प्रेमी युगुलांसाठी पडत नाही आणि जर का तो पडलाच नाही तर काही त्या दोघांच्यातलं प्रेम कमी होणार नाही. तसेच, तुझ्यामते थंडी ही गुलाबी वगैरे नसतेच! कोणा लेखक किंवा कवीला कधी ती तशी दिसली असेल तर तो खोटं तरी बोलत असेल नाहीतर मिस्टर इंडिया ज्या लाल-गुलाबी काचांच्या चष्म्यात दिसत असे तसा चष्मा तरी त्याने तेव्हा घातला असेल!

तुला आठवतंय..त्या रात्री गच्चीवर आपण दोघं गप्पा मारत बसलो होतो..छान वारा सुटला होता..आकाशात पिठूर चांदणं पडलं होतं..सगळं अगदी भलतंच romantic होतं. तेव्हा मी म्हणालो, " इंद्रदरबारी दिवाळी चालू असेल कदाचित! अप्सरांनी किती पणत्या लावल्यात बघ! का त्यांनी ठिपक्यांची रांगोळी काढायला सुरुवात केली असेल ..?" त्यावर तू म्हणाली होतीस, "इंद्र आणि तुझ्या त्या अप्सरांच्या डोक्यात कोंडा झाला असेल कदाचित! एकेकाला धरून स्वच्छ आंघोळी घातल्या पाहिजेत!!"

देवावर तर विश्वास नाहीचे तुझा आणि नाशिबावारही नाहीये. एकदा बघ आपला वाद झाला होता नियतीच्या अस्तित्वावर.. तेव्हा 'वेळ आली की डोळे मिटून घेण्यापलीकडे आपल्या हातात काही नसतं' हा माझा मुद्दा होता. तेव्हाचं तुझं एक वाक्य मी कधीच विसरू शकणार नाही..तू म्हणाली होतीस, "आपल्या हातात काही नसलं तरी मनगटात नेहेमी ठेवायचं. तुझ्या नियतीच्या तळहातावरच्या रेषांना मनगटापर्यंत कधी पोहचताच येत नाही..!"

भावूक अजिबात नसलीस तरी तुझ्याइतकं मुक्या प्राण्यांवर प्रेम करणारं मी कधीच कोणी पाहिलेलं नाहीये! कुत्र्या-मांजरांच्यात केवढी रमून जातेस तू! केवढ्या गप्पा मारतेस त्यांच्याशी! त्यांना काही कळतं तरी का ?! 'अगदी नि:स्वार्थीपणे फक्त कुत्राच प्रेम करू शकतो' असं तू म्हणतेस..कधी कुठल्या प्राण्याला दुखापत झालेली तू बघितलीस की तुझ्या टपोऱ्या डोळ्यातून घळाघळा वाहणारं पाणी मी कधी थांबवू शकलो नाहीये..

फक्त कर्मयोगावर तुझा विश्वास. मन लावून काम करावं. कामातला आनंद घ्यावा. सतत उत्साही, आनंदी राहून प्रत्येक काम भक्तिभावाने करायला कुठून शिकलीस ? वेगळीच आहेस तू..आम्ही काही मित्रांनी ठरवलं होतं की खूप मोठं होऊन, खूप पैसे कमवून गोर-गरिबांसाठी काहीतरी करायचं..तू तुझा पहिला पगारच दान केलास?! आणि हे तुझं स्वप्न होतं म्हणे! हे असलं कसलं स्वप्न?!

कसली भारी आहेस अग! जगातली सगळ्यात भारी! माझ्या जीवनाचं तर सार्थक झालंय! पण तू माझ्यात काय एवढं बघितलस? सांग ना, तुला मी का आवडलो?

नक्की कळव..

तुझाच,

प्रियकर

ता.: एवढं पण Practical असायची गरज नसते आयुष्यात!

***

माझ्या खूप खूप रसिक प्रियकरा,

तुझ्यातला प्रामाणिकपणा मला आवडला. आणि एक माणूस म्हणून तू उत्तम आहेस.

तुझीच,

अरसिक प्रेयसी!

ता.: ते ओट्यावर ठेवलेलं तेवढं ताक पिऊन टाक! :P

***