Monday, July 30, 2012

(न) झिजणाऱ्या चपला


कुठल्याही सरकारी कार्यालयात कामासाठी जाणं आपल्याला अगदी जीवावर येतं. याचं कारण आपल्याला खात्री असते, की तिकडे आजच्या दिवसात आपलं काम होणार नाहीये! म्हणजे 'एयरपोर्टवर गेल्यावर आपली फ्लाईट डिले झाली असणार', 'अंगणात खेळायला सोडलेलं बाळ सगळं सोडून माती खाणार' किंवा 'महेश कोठारेच्या सिनेमात त्याची जीप पंक्चर होऊन मग तो "डॅमिट" म्हणणार!', हे सगळं आपण जितक्या खात्रीने सांगू शकतो, अगदी तितक्याच खात्रीने आपल्याला माहिती असतं की सरकारी कार्यालयात आजच्या दिवसात काही आपलं काम व्हायचं नाही..! काही लोकं तर सरकारी कार्यालयाच्या एवढ्या खेपा मारतात, की त्यांच्या चपला झिजून, शेवटी खाली भोक पडून जेव्हा तापलेल्या रस्त्याचा तळपायाला चटका बसतो, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आधीच शंभराची नोट सरकवायला हवी होती! कित्येक लोकांच्या चपला झिजतात, पण सरकारी कार्यालायचा उंबरठा कधी झिजल्याचं ऐकिवात नाहीये. त्यामुळे रस्ते किंवा पूल बांधताना जरी कमी दर्जाचं मटेरिअल वापरलं जात असलं, तरी सरकारी कार्यालयाचे उंबरठे बनवताना भ्रष्टाचार किंवा हलगर्जीपणा कधीही होत नाही..! तेव्हा यापुढे जेव्हा लोकं मला तावातावाने विचारतील, "मला एक जागा सांग भारतात, की जिकडे भ्रष्टाचार होत नाही" तेव्हा "सरकारी कार्यालायचा उंबरठा" असं उत्तर द्यायचं मी मनाशी पक्कं केलं आहे..!

पण जगातलं सगळ्यात मोठं तत्वज्ञान जर तुम्हाला अनुभवायचं असेल, तर सरकारी कार्यालायासारखी दुसरी जागा शोधूनही सापडणार नाही! 'अपेक्षा ठेवली तरच दु:ख वाट्याला येतं, नाहीतर जग हा सुखाचा महासागर आहे..'! ह्याच विचाराचा प्रत्यय आपल्याला सरकारी कार्यालयात येत असतो! आपण काम असलं तरच सरकारी कार्यालयात जातो, आणि इथेच चुकतो! कधी काही काम, काही देणं-घेणं, काही अपेक्षा नसताना सरकारी कार्यालयात जाऊन बघा. तुम्हाला वेगळ्याच विश्वाचं दर्शन जर नाही झालं, तर तुम्हाला पुन्हा झिजवायला नवीन चपला मी घेऊन देईन!

खास फर्निचर्स बघायला सरकारी कार्यालयात जायचं. तिथली फर्निचर्स अगदी खास करवून घेतलेली असतात. म्हणजे बघा, तिथली जी डेस्क असतात, ती खूप उंच असतात आणि त्या पलीकडे जो माणूस बसलेला असतो, तो अगदीच खाली असतो. म्हणजे आपल्याला टाचा उंच करून त्याच्याकडे बघावं लागतं. आता असं का असतं, याबद्दल बरेच मतभेद आहेत. कोणी म्हणतं कामचुकारपणा बघून जर कोणाचं डोकं फिरलंच, तर हात सहजासहजी त्या पलीकडे बसलेल्या माणसाच्या गालापाशी पोहोचू नये, म्हणून असं खास बनवून घेतलेलं असतं! तर कोणी म्हणतं, की ते डेस्क जर कमी उंचीचं असेल तर त्यावर सामान्य माणसांना हात ठेवता येतील, आणि बऱ्याच वेळ समोरून उत्तरंच आलं नाही, तर काहीतरी विरंगुळा म्हणून माणसं त्यावर तबला वाजवत बसतील, म्हणून ते उंचावर असतं! पण मला सगळ्यात पटलेली थिअरी म्हणजे, प्रत्येक आलेल्या माणसाकडे चष्म्याच्या वरून बघून "काय कटकट आहे" असा खास "सरकारी" चेहेरा करण्यासाठी एवढा सगळा खटाटोप केलेला असतो! तिथल्या कपाटांना कधीही न लागणारी अशी वेगळी दारं केलेली असतात, जेणेकरून आतल्या रजिस्टरच्या गठ्ठ्यांकडे  लोकांची नजर जावी आणि आपला कामसूपणा त्यांच्या डोळ्यात भरावा, यासाठी केलेली ती खास युक्ती असते. कपाटांवरही रजिस्टर्स ठेवायला जागा असते. त्या रजिस्टर्सची पानं गळायच्या तयारीत असतात. त्यावरच्या पुसटश्या रेघा वाळक्या पर्ण वाहिन्यांसारख्या दिसत असतात. तिथे नव्याने पालवी यायची जरासुद्धा शक्यता नसते...!

सरकारी कार्यालयात गेल्यावर पेशवे पार्कमध्ये गेल्यासारखं वाटू शकतं! आपण खूप उंचीवरून त्या खाली कॉम्पुटरमध्ये डोळे घातलेल्या माणसाकडे बघत असतो. आपण त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतो. पण तो आपल्याकडे ढुंकूनही बघत नाही. तो ऐकून न ऐकल्यासारखा करतोय, का त्याला आपली भाषा समजत नाहीये, कळायला मार्ग नसतो. तो खूप कामात असल्यासारखा वाटू शकतो, पण त्याच्या कॉम्पुटरकडे वरून  बघितल्यावर तो Pentium 1 असून, तो माणूस Windows 95 वर Solitair किंवा Minesweeper खेळत असल्यासारखा वाटतो. त्याचं लक्ष आपल्याकडे वळवून घ्यायला आपल्याला त्याला पॉपकॉर्न किंवा खारेदाणे टाकायची इच्छा होऊ शकते, पण तसं न केलेलंच बरं! काही वेळाने देवाच्या कृपेने आणि आपल्या नशिबाने तो आपल्याकडे बघतो. क्षणभर आपला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. पण तो लगेच बसवावा लागतो, कारण तो आपल्याकडे क्षणभरच बघणार असतो! आपण त्याला आपला प्रश्न विचारतो आणि तो काही न बोलतो एक मळकट फॉर्म आपल्या हातात देतो. आपल्या प्रत्येक प्रश्नाला त्याच्याकडे एक मळकट फोर्म असतो..!

आपल्याकडे शाई पेन असेल तर ते पेन कागदावर टेकवताच शाई पसरायला सुरुवात होते. आपल्याकडे बॉलपेन असेल, तर लिहायला लागताच त्या कागदाला भोक पडतं! आपण केविलवाण्या नजरेने मग आजूबाजूला बघतो. प्रत्येकाची तशीच धडपड चालू असते. ते बघून जीवनातलं आपण "To err is human" हे दुसरं मोठं तत्वज्ञान तेव्हा शिकतो! तुम्ही कितीही उच्च शिक्षित असाल, तरी त्या फॉर्मवर असा एकतरी प्रश्न निघतोच, की ज्याचा अर्थ तुम्हाला कळत नाही.  माणसांना जमिनीवर आणण्याचे मोठं काम ते फॉर्मस करत असतात. आपल्या मनात त्याच्याकडे जाऊन शंका विचारण्याचा विचार येतो, पण त्याचा त्रासिक चेहरा डोळ्यासमोर येऊन आपण अंदाज पंचेच त्याचं उत्तर लिहितो आणि फॉर्म पूर्ण करतो..!

"उद्याच्याला या. साहेबांची सही घेऊन ठेवतो." पुन्हा रांगेत उभं राहून त्याला फॉर्म दिल्यावर त्याचं असं उत्तर येतं. "पण साहेब तर केबिनमधेच आहेत ना? आज नाही का होणार..?" असं काहीतरी आपण विचारायचा प्रयत्न केला, की आपल्याला अपमानाची तयारी ठेवावी लागते! आपण अपेक्षा ठेवतो आणि म्हणूनच दु:ख आपल्या पदरात पडतं. "एकदा सांगितलं ना तुम्हाला, उद्या या! साहेब बिझी आहेत. तुमच्या सारखे शंभर फॉर्म आहेत या टेबलवर! साहेबांनी काय बाहेर येऊन सह्या करत बसायचं का?"! आपलं त्याने दाखवलेल्या त्या शंबर फॉर्मस च्या गठ्ठ्याकडे लक्ष जातं. त्याला पांढऱ्या नाडीने बांधलेलं असतं. त्या माणसाच्या लेंग्याचं काय झालं असेल, असा विचार मनात येऊन आपण टाचा अजूनच उंच करून बघतो! पण त्याने लेंगा घातलेला नसतो. आपण उदास चेहेर्याने त्या सरकारी कार्यालयाबाहेर पडतो.

दुसऱ्या दिवशी गर्दी टाळायला आपण भर सकाळी जातो. बहुतेक सगळ्यांनी आपल्यासारखाच विचार केलेला असतो. त्यामुळे ऑफिसला जायच्या आधी ते सरकारी कार्यालय भाजी-मंडई सारखं भरलेलं असतं. पुन्हा मोठ्या रांगेत थांबून, ऑफिसला थोडा उशीर करून आपला एकदाचा नंबर लागतो. आपल्या फॉर्मवर साहेबांनी वेळात वेळ काढून सही केलेली असते. "संध्याकाळच्याला या. शिक्का मारून मिळेल!" हे ऐकून आता आपलं डोकं बधीर व्हायची वेळ आलेली असते. 'अहो, तुमच्या शेजारी शिक्का आहे. त्याच्या शेजारी शाई आहे. तुम्हाला कितीसा वेळ लागणार आहे? तुम्हाला जमत नसेल तर मी स्वत: मारून घेतो!" असं चिडून म्हणायची मनात खूप इच्छा निर्माण होते. पण कालच झालेला अपमान ताजा असतो. त्यामुळे आपण शेळीसारखा चेहरा करून तिथून निघून जातो. बाहेर जाताना दारावर हसऱ्या गांधीजींचा फोटो लावलेला असतो. त्याच्या शेजारच्या भिंतीवर धीर-गंभीर लोकमान्य टिळकांचा फोटो असतो. सगळे आदर्श, सगळ्या आकांक्षा त्यावेळी गळून पडतात आणि रागारागाने आपण ऑफिसला निघून जातो.

ऑफिसमध्ये मग आपला चर्चेचा विषय असतो सरकारी कार्यालये, त्यातला ढिसाळ कारभार, भ्रष्टाचार, आपल्या इन्कम टॅक्स चा गैरवापर आणि देशाची अधोगती. मग आपल्या लक्षात येतं, आपल्या मित्राला एका दिवसात सही, शिक्का आणि रिसीट सगळंच मिळालं! तो आपल्याला मग आपण किती साधे आहोत यावर चिडवतो. दुसऱ्या दिवशी सख्ख्या मित्राच्या नात्याने आपल्या बरोबर त्या सरकारी कार्यालयात येतो. आपला नंबर आल्यावर समोरच्या माणसाला हळूच म्हणतो, "साहेब, संध्याकाळी चहाला थांबा ना.." पुढच्याच क्षणी आपल्या फॉर्मवर शिक्का बसलेला असतो आणि आपल्या हातात रिसीट असते!

संध्याकाळी आपण "चहाला" भेटतो. तो माणूस पहिल्यांदाच आपल्याला पूर्णपणे दिसतो. त्याने लेंगा घातलेला नसतो. तुमच्या आमच्या सारखा साधाच असतो तो दिसायला. आपण आपल्या खिशातली एक नोट काढून त्याला देतो. नोटेवरचे गांधीजी आपल्याकडे बघून हसत असतात. त्या क्षणी आपल्या चपलांचं झिजणं थांबतं आणि तो माणूस क्षणार्धात समोरच्या गर्दीत नाहीसा होतो..

Tuesday, July 24, 2012

ठाऊक आहे मला

ठाऊक आहे मला, त्याने कळ्यांचं रुसणं पाहिलं होतं..
कोरांटीचं फुल मग, प्रेमाने मारुतीला वाहिलं होतं

ठाऊक आहे मला, तो गाईच्या डोळ्यांत बघत बसायचा
माणसांचं कारुण्य दिसलं, की हलकेच मग हसायचा

ठाऊक आहे मला, त्याने देवळात नमाज वाचला होता
मशिदीत आरत्या गाताना, बेभान होऊन नाचला होता

ठाऊक आहे मला, तो सारखा कचरा आवरायचा
कोसळत्या जगाला जणू, एका हाताने सावरायचा

ठाऊक आहे मला, त्याने त्याचं बालपण जपलं होतं
त्या खळाळत्या हास्यामागे, ते अवखळपणे लपलं होतं

ठाऊक होतं मला, तो एक दिवस निघून जाणार
त्याला दुरूनच बघणारं मन, मग कायमचं आधारहीन होणार..




मी ही कविता लिहून पूर्ण केली आणि मला वाटलं एक अभिजात कलाकृती नुकतीच माझ्या हातून घडली आहे! नेहेमीप्रमाणे मी ती हक्काच्या लोकांना वाचून दाखवली आणि "छान लिहिलयस रे..! पण.. नक्की काय म्हणायचंय...तुला? जरा समजावून सांग ना.." असं अगदी सगळ्यांकडून ऐकायला मिळालं! आनंदाच्या भरात दोघांना सांगितला मी अर्थ. पण सगळ्यांना कसं समजावून सांगू..?
मग मनात एकदम श्रेठ कवीसारखा विचार आला, "माझी कविता ही मुळी सगळ्यांसाठी नाहीच आहे! ज्यांना कळेल ते खरे जाणकार, ज्यांना कळणार नाही ती सामान्य माणसं..!" मग मला वाटलं, ज्ञानाच्या गव्हाची पेरणीही अजून नीट झाली नाहीये, आणि मी ज्ञान'पीठ' पुरस्कर्ता असल्याचा आव आणतोय..! आठवलं, की शाळेत असताना मला बऱ्याचश्या कविता समजायच्याच नाहीत. वाटायचं, 'कवी का असं काहीतरी क्लिष्ट लिहितो..? उगाच भाव खायला असणार..!' हा विचार डोक्यात असताना मी जेव्हा ह्या कवितेचा अर्थ लिहायला घेतला, तेव्हा सुरुवात केली, "या रूपकात्मक कवितेतून कवीला असं स्पष्ट करायचं आहे..."!..जणू मी दहावीतला कवितेवरचा ७ मार्कांचा 'सविस्तर उत्तरे लिहा' च सोडवत होतो..!
छ्या! ह्याच्यासाठी कुणी कविता करतं का? कविता म्हणजे भावनांचा पुष्पगुच्छ! "ए अरे, तिच्याकडे बघितलं ना, की मला हृदयात कसंतरी होतं.. एकदमच सगळं थांबून जातं.. हेच प्रेम असतं का रे? मी तिच्या प्रेमात पडलोय का..?" असं जिवलग मित्राला विचारणं, म्हणजे त्याला आपल्या भावनांचा पुष्पगुच्छ देणं..!

आपल्या सगळ्यांनाच भावना असतात. त्यामुळे कविता आपल्या सगळ्यांसाठीच असतात..

अर्थ:

अशी कोणीतरी व्यक्ती असते, खरी किंवा काल्पनिक, की जिच्याकडे आपण फक्त अवाक होऊन बघतो. आपल्या मनात तिच्याबद्दल खूप आदर निर्माण होतो आणि ती व्यक्ती कशी असेल ह्याचे आपण अंदाज बांधायला लागतो.. म्हणून "ठाऊक आहे मला..(त्या व्यक्तीबद्दल)"

'ठाऊक आहे मला, त्याने कळ्यांचं रुसणं पाहिलं होतं
कोरांटीचं फुल मग, प्रेमाने मारुतीला वाहिलं होतं'

ती व्यक्ती इतकी संवेदनशील आहे, इतकी दयाळू आहे की तिला मुक्या झाडांच्याही भावना समजतात. तिने कळ्यांना रुसलेलं पाहिलं होतं. कदाचित त्या कळ्या कोरांटीच्या असतील. आणि फुलल्यावर आपण कदाचित गुलाब-मोगऱ्या सारखे सुंदर होणार नाही, ह्या विचाराने त्या रुसल्या असतील. त्याने बघितलं. तो थांबला. आणि तेच कोरांटीचं फुल, मग त्याने प्रेमाने मारुतीला जाऊन वाहिले.

'ठाऊक आहे मला, तो गाईच्या डोळ्यांत बघत बसायचा
माणसांचं कारुण्य दिसलं, की हलकेच मग हसायचा'

गाईच्या डोळ्यात ओतप्रोत कारुण्य भरलेलं असतं. तिच्या डोळ्यात बघितलं, की ती किती बिचारी वाटते. दु:खात वाटते. त्या व्यक्तीने आयुष्यात इतकं कारुण्य बघितलं आहे की जणू तो गाईच्या डोळ्यांतच बघत बसलाय..! आणि तुझ्या - माझ्यासारखा माणूस जेव्हा 'आमचं दु:ख किती मोठं' असा आव आणतो, तेव्हा ते बघून त्याच्या चेहेऱ्यावर हलकेच हास्याची लकेर उमटते..

'ठाऊक आहे मला, त्याने देवळात नमाज वाचला होता
मशिदीत आरत्या गाऊन, बेभान होऊन नाचला होता'

समाजाची बंधनं त्याने कधीच मानली नाहीत. धर्मामुळे होणारं नुकसान बघून त्याने धर्माचा केवळ निषेधच केला. त्याने देवळात जाऊन नमाज वाचला, मशिदीत जाऊन आरत्या गायल्या.. पण हे सगळं धर्म पाळणाऱ्यांचा राग म्हणून नव्हे. देवावर चिडला होता तो.. वेगवेगळ्या रुपात पृथ्वीवर अवतरल्यामुळे.. त्याच्यावरचाच राग व्यक्त केला होता त्याने..

'ठाऊक आहे मला, तो सारखा कचरा आवरायचा
कोसळत्या जगाला जणू, एका हाताने सावरायचा'

तो सारखा कचरा आवरताना दिसायचा. तो कचरा माणसांच्या चुकांचा असो, काही मोडल्या-बिघडल्याचा असो, किंवा अगदी 'कचरा' असो.. त्याला जे काही चुकीचं वाटायचं, ते तो त्याच्या परीने आवरायचा. तुझ्या माझ्या सारखाच, हाडा-मासांचाच होता तो. त्यामुळे त्याच्या कार्याने बुडणारं जग सावरलं नसतं. पण तरीही तो करायचा. पर्वताएवढा विश्वास मनात ठेवून..

'ठाऊक आहे मला, त्याने त्याचं बालपण जपलं होतं
त्या खळाळत्या हास्यामागे, ते अवखळपणे लपलं होतं'

काय हसायचा तो..! दिल खुश करून टाकायचा! खळाळत्या पाण्याप्रमाणे हास्य होतं त्याचं.. उत्साही आणि अवखळ.. हे फक्त निरागस लहान मुलांनाच जमू शकतं.. त्याचं बालपण कुठेतरी नक्की लपलं होतं.. तो हसला की ते हळूच डोकावायचं!

'ठाऊक होतं मला, तो एक दिवस निघून जाणार
त्याला दुरूनच बघणारं मन, मग कायमचं आधारहीन होणार'

काय माहिती का.. पण मला कुठेतरी ठाऊक होतं की हा एक दिवस निघून जाईल...आणि मग आपल्याला परत कधीच दिसणार नाही. आणि तसंच झालं.. मी खूप दुरून बघायचो त्याला. कधी बोललोही नाही त्याच्याशी. पण कळत-नकळत केवढा आधार वाटायचा त्याचा.. एका अंधाऱ्या खोलीतला लख्ख उन्हाचा कवडसा होता तो.. माझं मन आता अगदीच आधारहीन झाल्यासारखं झालंय.. मनाला पुन्हा तसा आधार कधीच मिळणार नाही. ठाऊक आहे मला...

Monday, July 23, 2012

वेदनेचे गाणे

किती करशील तू असे सुखाचे बहाणे
डोळ्यातून वाहू देत वेदनेचे गाणे

रात्र शेवटी सरून जाते
सावलीसुद्धा विरून जाते
संपतेच की पिलाच्या चोचीतले खाणे..
डोळ्यातून वाहू देत वेदनेचे गाणे

कोण इथे असते सांग सदा सुखी
भावनांची बासरी कृष्णाच्या मुखी 
त्याच्या-तिच्या सारखेच तुझे माझे-जीणे
डोळ्यातून वाहू देत वेदनेचे गाणे

पुन्हा भरेल आकाश लख्ख तारकांनी
पुन्हा भरेल अंगण शुभ्र प्राजक्तांनी
दुपारच्या उन्हात जमव शांत राहणे  
डोळ्यातून वाहू देत वेदनेचे गाणे

किती करशील तू असे सुखाचे बहाणे
डोळ्यातून वाहू देत वेदनेचे गाणे..

Friday, July 20, 2012

चांभार चौकश्या

मी सुद्धा अमेरिकेतल्या प्रत्येक तरुण भारतीय मुलासारखाच सुट्टीत घरी जायला घाबरायचो! कारण तिथे गेल्यावर तमाम ओळखीच्या लोकांचा एकंच प्रश्न असायचा; 'काय मग? तुझ्या लग्नाचं काय?!' त्यामुळे गेल्या सुट्टीत जेव्हा लग्न करायला म्हणून भारतात गेलो, तेव्हा मला हा प्रश्न विचारला जाणार नाही, या विचाराने मी निश्चिंत होतो! सगळ्यांना पत्रिका आधीच वाटून झाल्या होत्या. त्यामुळे 'माझ्या लग्नाचं काय' ह्याचं उत्तर सगळ्यांनाच मिळालं होतं. पण हे ऐकून आमच्या बडवे काकू थोड्या हिरमुसल्या होत्या. त्यांना लग्न जुळवायची भारी हौस! आणि माझं लग्न, त्यांनी न जुळवता मीच जुळवलं होतं म्हणून त्या खट्टू झाल्या होत्या!

बडवे काकू प्रत्येक लग्नात भेटतात! आमच्या सोसायटीतल्या कोणाचं लग्नं असो, वा आमच्या कुठल्या मित्राच्या लांबच्या बहिणीचं असो,  तिथेही आम्हाला बडवे काकू भेटल्या आहेत! बडवे काकूंच्या एवढ्या ओळखी कशा, हा प्रश्न आम्हाला नेहेमी पडायचा. बडवे काकूंना लग्नात वधू, वर, लग्नाचं जेवण, सजावट, साड्या, दागिने ह्यात कशातही रस नसतो. त्या तरुण मुला-मुलींच्या शोधात असतात! माझ्या आणि माझ्या कित्येक मित्रांशी त्यांनी, 'आमचा लग्नाचा काय विचार आहे... त्यांच्या बघण्यात कशा गोऱ्या आणि सुंदर मुली आहेत.. चांगल्या मुली मिळण्याचं प्रमाण दिवसेंदिवस कसं कमी होत चाललंय आणि त्यामुळे आम्ही कसं लवकर लग्न केलं पाहिजे...आणि मग शेवटी आईला सांग मी थोड्या दिवसात भेटायला येते..' अशा प्रकारच्या गप्पा खूप वेळा मारल्या आहेत. त्यामुळे लग्न समारंभात, आम्ही जितकी लपाछपी लहानपणीही खेळली नाहीये, तितकी बडवे काकूंबरोबर खेळतो, असं मधे आमच्या लक्षात आलं!

बडवे काकूंनी एकदा तर सातवीतल्या मुलीला विचारलं होतं, 'तुझ्या लग्नाचं काय' म्हणून! माझ्या मित्राची अशी थिअरी आहे की बडवे काकूंनी आयुष्यात खूप पापं केली असणार. म्हणजे मुलांना (आणि नवऱ्याला) खूप 'बडवलं' असणार, पुढे त्यांच्या सुनेला छळलं असणार, वगैरे. त्यामुळे आता थोडं पुण्य कमावण्यासाठी ब्रम्हदेवाच्या sub contractor चं, गाठी मारायचं त्या काम करतायत! पण काहीही म्हणा, बडवे काकूंमुळे  कोणाचं लग्न जुळलं तर त्यांना त्याचा अनामिक आनंद होतो! पुढे कित्येक दिवस ते त्याचं कौतुक सांगत फिरतात. बडवे काकू स्वतःच्या लग्नाच्या दिवशीही जेवढ्या खुश नव्हत्या, तेवढ्या त्या कोणा दुसऱ्याचं लग्न जुळवल्यावर होतात म्हणे!

पण हल्लीच बडवे काकूंना आमच्या ग्रुप मध्ये खूप महत्व प्राप्त झालंय! याचं कारण म्हणजे माझे मित्र आता लग्नाच्या रणांगणात उतरायला लागले आहेत आणि त्यांना आता हे पटू लागलंय की चांगल्या मुली मिळणं खरंच दिवसेंदिवस अवघड होत चाललंय. एवढंच नाही तर ते आता बडवे काकूंना सारखं भेटून त्यांच्या बघण्यात चांगल्या मुली आहेत का, हे विचारात असतात! आणि हे म्हणे इतकं अति झालंय की आता बडवे काकू त्यांच्यांशी लपाछपी खेळायला लागल्यात!

बडवे काकूंची सख्खी मैत्रीण म्हणजे परांजपे काकू! सख्खी मैत्रीण याचा अर्थ त्या दोघी जीवा-भावाने आणि काळजाच्या ओलाव्याने आमच्या बिल्डींगमधल्या सगळ्यांबद्दल gossip करत असतात! परांजपे काकूंचा 'सध्याची लग्न' याबद्दल फारसा व्यासंग नसला तरी 'अमेरिकेत झेप घेतलेली पाखरे' हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय! त्या एकदा कधीतरी अमेरिकेला जाऊन आल्या आहेत आणि त्यानंतर अमेरिका म्हणजे त्यांच्या घराशेजारची गल्ली असल्यासारखं ते इतरांशी बोलत असतात!

लग्न केल्यामुळे मी बडवे काकूंच्या हातून कायमचा सुटलो, पण त्यामुळे परांजपे काकूंच्या १००% हक्काचा झालो! बडवे काकू जणू परांजपे काकूंना म्हणाल्या असतील, "सांभाळ ग ह्याला तू आता!". कारण माझ्या लग्नाच्याच दिवशी, जेव्हा लोकं वधु-वरांना भेटायला स्टेजवर येतात, तेव्हा परांजपे काकूंनी तिथे मला विचारलं, "काय मग, आता अमेरिकेचेच होणार का येणार आपल्या देशात परत? लवकर ठरव बाबा, नंतर अवघड होऊन बसतं..!"लग्नाची डीव्हीडी बघताना, त्यात जेव्हा मी परांजपे काकूंशी बोलतोय, तेव्हा माझा चेहेरा बघून हा "marriage nervousness" असणार असा समज नंतर माझ्या बऱ्याच नातेवाईकांनी करून घेतला!

परांजपे काकूंचं अमेरिकेबद्दल नक्की मत काय आहे हा तसा चर्चेचा मुद्दा आहे. कारण भारतात स्थायिक व्हावं असं जरी त्यांचं म्हणणं असलं तरी त्या अमेरिकेचे खूप गोडवेही गात असतात. पण काही असलं तरी परांजपे काकूंना अमेरिकेबद्दल गप्पा मारायला फार आवडतात. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे अमेरिकेत बरीच वर्ष राहणाऱ्या लोकांनाही त्या 'अमेरिका कशी आहे?' हे सांगू शकतात! 

एकदा आमच्या घरी येऊन सांगत होत्या, "अहो एवढं सगळं ऑटोमॅटिक आहे अमेरिकेमध्ये, की बटन दाबून मगच रस्ता क्रॉस करावा लागतो!" आता आपणच बटन दाबायचं, तर त्यात ऑटोमॅटिक काय आहे! पण नाही, अमेरिकेत सगळं ऑटोमॅटिक आहे! त्या कधीतरी न्यूयॉर्क सिटीला जाऊन आल्या. त्याची आठवण सांगताना म्हणतात, "बागेत कसे वेगवेगळ्या रंगाच्या फुलांचे ताटवे असतात. तशी लोकं आहेत अगं अमेरिकेत. केवढा खुला देश आहे तो. पण काही गडद रंग सुंदर नाही दिसत ना फुलांवर..!" वाह! काय कल्पना आहे! म्हणजे त्यांना साहित्यिक म्हणावं का रेसिस्ट असा प्रश्न समोरच्याला पडतो! त्यांचं स्वत:चं शिक्षण तसं कमी झाल्यामुळे असेल म्हणा, पण त्यांना अमेरिकेची तंत्रज्ञानातली प्रगती, शिक्षणाचा दर्जा ह्याबद्दल फारसा रस असावा असं वाटत नाही. त्यावर एकदा विचारलं असताना म्हणाल्या, "त्यावर काय बोलायचं, त्याच्यासाठीच तर जातो आपण अमेरिकेत! त्यामुळे तुम्हाला जे काही शिकायचंय ते शिका. जे काही करायचं ते करा आणि मग परत या." पण त्यांची विशेष लाडकी वाक्य म्हणजे, "तुला सांगते सुमे, तिकडे ना, प्रवास करावा तर बसमध्ये आणि जुगार खेळावा तर वेगसमध्ये!" म्हणजे समोरचा खुर्चीवरून उडलाच पाहिजे! त्यावर पुढे त्या सांगतात की त्यांना गाडीतून जायला भीती वाटते कारण ती लेफ्ट हॅण्ड ड्राइव असते! आम्ही हे त्यांचं वाक्य चोवीस वेळा तरी ऐकलं असेल, पण त्या बसबद्दलच सांगतात, वेगसची गंमत गुपितच राहते..!

नवीन श्रोत्यांची परांजपे काकू नक्कीच करमणूक करतात. म्हणजे "नायागाराची ती बोट राईड अगं संपूर्ण भिजवते आपल्याला. त्यामुळे जाताना अंघोळ करून जायचंच नाही!" म्हणजे काय? अमेरिकेला गेलात तर तुमची एक अंघोळ वाचेल?! किंवा "तिकडे कोणी कॅश ठेवतच नाही. खरेदी झाली की क्रेडीट कार्ड त्या मशीन मधून सपासप खेचतात, की दिले पैसे!" इथपर्यंत ठीक आहे. पण पुढे जाऊन स्वत:ची थिअरी सांगतात की, "त्यामुळे अमेरिकेत अगं भिकारीच नाहीयेत. कारण भिकाऱ्यांनाही माहितीय ना, की लोकांच्या खिशात कॅश नसणार म्हणून!" बडवे काकू परांजपे काकूंची इतकी सख्खी मैत्रीण आहे की परवा बडवे काकू तिसऱ्याच व्यक्तीला, नायागाराची बोट राईड कशी असते आणि मग अंघोळ कशी वाचते हे उत्साहाने सांगताना माझ्या मित्राने ऐकलं!

पण ही सगळी करमणूक फक्त पहिल्यांदा ऐकणाऱ्यांचीच होऊ शकते. विचार करा, आम्ही हे सगळं २०-२५ वेळा ऐकलं आहे! म्हणजे अमेरिकेत, "कोलंब्या सोललेल्या असतात. दूध हवं तितक्याच सायीचं मिळतं. एक कपाट भरून फक्त ब्रेड..वेगवेगळ्या प्रकारचे.. एक कपाट भरून नुसतं चीज... मोसंब्या एवढं लिंबू आणि मोसंबं तर अननसाएवढं (म्हणजे "Sehwag is Sachin and Sachin is God! " याच ओळींवर..!) रस्त्यावर खड्डेच नसतात. रस्ते काय, अहो छोट्या गल्लीमध्ये पण खड्डे नसतात. सगळीकडे घासून पुसून स्वच्छता. कचरा दिसतंच नाही बाहेर..! बागेत गेलं, तर बाक चक्क रिकामे असतात! फास्ट फूड तिकडे इतकं फास्ट की मॅगी करायला जास्त वेळ लागेल..!" असं आणि यासारखं बरंच काही. आमच्या तर एका मित्राने हे ४९ वेळा ऐकल्याचं सांगितलं, तेव्हा आम्ही त्याला कॉंट्रिब्यूशन काढून ट्रीट दिली!

हेसुद्धा एक वेळ समजून घेता येईल. पण सुट्टी काढून भारतात गेल्यावर "मग तिकडचेच होणार का? भारतात परत येणार का? ठरवलंयस का काही? नंतर अवघड होऊन जातं बरका.." असे प्रश्न ते इतक्या वेळा विचारतात, की वैतागायला होतं आम्हाला. बडवे काकूंचंही अगदी तसंच असतं. "आता लग्न आणि करियर या जर इतक्या महत्वाच्या गोष्टी असतात तर त्याचा निर्णय आम्हाला आमचा घेऊ द्यात की. कशाला हव्यात चांभार चौकश्या? मला कळतंच नाही या दोन काकूंचं" असं मी परवा आईशी बोलत असताना आईने आत्तापर्यंत लपवलेल्या दोन गोष्टी मला सांगितल्या..
१) बडवे काकूंचं खूप उशिरा लग्न झालं. त्यांचा नवरा काही वर्षातच त्यांना सोडून निघून गेला.
२) परांजपे काकूंचा मुलगा अमेरिकेत स्थायिक आहे. त्याने भारतात येणं कधीच सोडलंय. आजीला नातीला बघायचा उत्साह म्हणून त्याने एकदाच आईला अमेरिकेला बोलावलं होतं. काकूंनी जेव्हा त्यांच्या नातीला पहिल्यांदा बघितलं, तेव्हा ती ८ वर्षांची होती.

मला पुढे काही बोलवलंच नाही. मनाची दारं-खिडक्या गच्च बंद करून जगणारे आपण, जर कोणी आपल्या आयुष्यात डोकवायचा प्रयत्न केला तर वैतागतो. पण नकळतही असेल कदाचित, पण तरीही आपलं दु:ख समोरच्याच्या वाट्याला न येवो यासाठी त्या दोघी झगडत आहेत. थोडं विचित्र असेलही त्यांचं वागणं. एवढं दु:ख पदरी पडल्यावर असं होणं अगदी साहजिक आहे... आपल्याला हवा तसा समोरचा माणूस नाही वागला की आपल्याला त्याचा त्रास होतो. तो असलाच आहे असं लेबलही आपण त्याला लगेच चिकटवतो. पण त्याच्या चपला घालून आपण दहा पावलं सुद्धा चालायचा प्रयत्न करत नाही. कसा करणार.. मनाची दारं-खिडक्या गच्च बंद असतील तर त्याच्या चपला तरी कशा दिसतील आपल्याला..?

मी ठरवलं. पुन्हा भारतात गेल्यावर बडवे काकू आणि परांजपे काकूंशी मनसोक्त गप्पा मारायच्या! थोडं त्यांच्या आयुष्यात डोकावायचं.. चांभार चौकश्या करायच्या! इथे अमेरिकेत शेजारच्या काकू तश्या असत्या ना, तर मी आत्ता लगेच उठून गेलो असतो! पण तेवढंच फक्त नाहीये अमेरिकेत...