Monday, July 30, 2012

(न) झिजणाऱ्या चपला


कुठल्याही सरकारी कार्यालयात कामासाठी जाणं आपल्याला अगदी जीवावर येतं. याचं कारण आपल्याला खात्री असते, की तिकडे आजच्या दिवसात आपलं काम होणार नाहीये! म्हणजे 'एयरपोर्टवर गेल्यावर आपली फ्लाईट डिले झाली असणार', 'अंगणात खेळायला सोडलेलं बाळ सगळं सोडून माती खाणार' किंवा 'महेश कोठारेच्या सिनेमात त्याची जीप पंक्चर होऊन मग तो "डॅमिट" म्हणणार!', हे सगळं आपण जितक्या खात्रीने सांगू शकतो, अगदी तितक्याच खात्रीने आपल्याला माहिती असतं की सरकारी कार्यालयात आजच्या दिवसात काही आपलं काम व्हायचं नाही..! काही लोकं तर सरकारी कार्यालयाच्या एवढ्या खेपा मारतात, की त्यांच्या चपला झिजून, शेवटी खाली भोक पडून जेव्हा तापलेल्या रस्त्याचा तळपायाला चटका बसतो, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आधीच शंभराची नोट सरकवायला हवी होती! कित्येक लोकांच्या चपला झिजतात, पण सरकारी कार्यालायचा उंबरठा कधी झिजल्याचं ऐकिवात नाहीये. त्यामुळे रस्ते किंवा पूल बांधताना जरी कमी दर्जाचं मटेरिअल वापरलं जात असलं, तरी सरकारी कार्यालयाचे उंबरठे बनवताना भ्रष्टाचार किंवा हलगर्जीपणा कधीही होत नाही..! तेव्हा यापुढे जेव्हा लोकं मला तावातावाने विचारतील, "मला एक जागा सांग भारतात, की जिकडे भ्रष्टाचार होत नाही" तेव्हा "सरकारी कार्यालायचा उंबरठा" असं उत्तर द्यायचं मी मनाशी पक्कं केलं आहे..!

पण जगातलं सगळ्यात मोठं तत्वज्ञान जर तुम्हाला अनुभवायचं असेल, तर सरकारी कार्यालायासारखी दुसरी जागा शोधूनही सापडणार नाही! 'अपेक्षा ठेवली तरच दु:ख वाट्याला येतं, नाहीतर जग हा सुखाचा महासागर आहे..'! ह्याच विचाराचा प्रत्यय आपल्याला सरकारी कार्यालयात येत असतो! आपण काम असलं तरच सरकारी कार्यालयात जातो, आणि इथेच चुकतो! कधी काही काम, काही देणं-घेणं, काही अपेक्षा नसताना सरकारी कार्यालयात जाऊन बघा. तुम्हाला वेगळ्याच विश्वाचं दर्शन जर नाही झालं, तर तुम्हाला पुन्हा झिजवायला नवीन चपला मी घेऊन देईन!

खास फर्निचर्स बघायला सरकारी कार्यालयात जायचं. तिथली फर्निचर्स अगदी खास करवून घेतलेली असतात. म्हणजे बघा, तिथली जी डेस्क असतात, ती खूप उंच असतात आणि त्या पलीकडे जो माणूस बसलेला असतो, तो अगदीच खाली असतो. म्हणजे आपल्याला टाचा उंच करून त्याच्याकडे बघावं लागतं. आता असं का असतं, याबद्दल बरेच मतभेद आहेत. कोणी म्हणतं कामचुकारपणा बघून जर कोणाचं डोकं फिरलंच, तर हात सहजासहजी त्या पलीकडे बसलेल्या माणसाच्या गालापाशी पोहोचू नये, म्हणून असं खास बनवून घेतलेलं असतं! तर कोणी म्हणतं, की ते डेस्क जर कमी उंचीचं असेल तर त्यावर सामान्य माणसांना हात ठेवता येतील, आणि बऱ्याच वेळ समोरून उत्तरंच आलं नाही, तर काहीतरी विरंगुळा म्हणून माणसं त्यावर तबला वाजवत बसतील, म्हणून ते उंचावर असतं! पण मला सगळ्यात पटलेली थिअरी म्हणजे, प्रत्येक आलेल्या माणसाकडे चष्म्याच्या वरून बघून "काय कटकट आहे" असा खास "सरकारी" चेहेरा करण्यासाठी एवढा सगळा खटाटोप केलेला असतो! तिथल्या कपाटांना कधीही न लागणारी अशी वेगळी दारं केलेली असतात, जेणेकरून आतल्या रजिस्टरच्या गठ्ठ्यांकडे  लोकांची नजर जावी आणि आपला कामसूपणा त्यांच्या डोळ्यात भरावा, यासाठी केलेली ती खास युक्ती असते. कपाटांवरही रजिस्टर्स ठेवायला जागा असते. त्या रजिस्टर्सची पानं गळायच्या तयारीत असतात. त्यावरच्या पुसटश्या रेघा वाळक्या पर्ण वाहिन्यांसारख्या दिसत असतात. तिथे नव्याने पालवी यायची जरासुद्धा शक्यता नसते...!

सरकारी कार्यालयात गेल्यावर पेशवे पार्कमध्ये गेल्यासारखं वाटू शकतं! आपण खूप उंचीवरून त्या खाली कॉम्पुटरमध्ये डोळे घातलेल्या माणसाकडे बघत असतो. आपण त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतो. पण तो आपल्याकडे ढुंकूनही बघत नाही. तो ऐकून न ऐकल्यासारखा करतोय, का त्याला आपली भाषा समजत नाहीये, कळायला मार्ग नसतो. तो खूप कामात असल्यासारखा वाटू शकतो, पण त्याच्या कॉम्पुटरकडे वरून  बघितल्यावर तो Pentium 1 असून, तो माणूस Windows 95 वर Solitair किंवा Minesweeper खेळत असल्यासारखा वाटतो. त्याचं लक्ष आपल्याकडे वळवून घ्यायला आपल्याला त्याला पॉपकॉर्न किंवा खारेदाणे टाकायची इच्छा होऊ शकते, पण तसं न केलेलंच बरं! काही वेळाने देवाच्या कृपेने आणि आपल्या नशिबाने तो आपल्याकडे बघतो. क्षणभर आपला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. पण तो लगेच बसवावा लागतो, कारण तो आपल्याकडे क्षणभरच बघणार असतो! आपण त्याला आपला प्रश्न विचारतो आणि तो काही न बोलतो एक मळकट फॉर्म आपल्या हातात देतो. आपल्या प्रत्येक प्रश्नाला त्याच्याकडे एक मळकट फोर्म असतो..!

आपल्याकडे शाई पेन असेल तर ते पेन कागदावर टेकवताच शाई पसरायला सुरुवात होते. आपल्याकडे बॉलपेन असेल, तर लिहायला लागताच त्या कागदाला भोक पडतं! आपण केविलवाण्या नजरेने मग आजूबाजूला बघतो. प्रत्येकाची तशीच धडपड चालू असते. ते बघून जीवनातलं आपण "To err is human" हे दुसरं मोठं तत्वज्ञान तेव्हा शिकतो! तुम्ही कितीही उच्च शिक्षित असाल, तरी त्या फॉर्मवर असा एकतरी प्रश्न निघतोच, की ज्याचा अर्थ तुम्हाला कळत नाही.  माणसांना जमिनीवर आणण्याचे मोठं काम ते फॉर्मस करत असतात. आपल्या मनात त्याच्याकडे जाऊन शंका विचारण्याचा विचार येतो, पण त्याचा त्रासिक चेहरा डोळ्यासमोर येऊन आपण अंदाज पंचेच त्याचं उत्तर लिहितो आणि फॉर्म पूर्ण करतो..!

"उद्याच्याला या. साहेबांची सही घेऊन ठेवतो." पुन्हा रांगेत उभं राहून त्याला फॉर्म दिल्यावर त्याचं असं उत्तर येतं. "पण साहेब तर केबिनमधेच आहेत ना? आज नाही का होणार..?" असं काहीतरी आपण विचारायचा प्रयत्न केला, की आपल्याला अपमानाची तयारी ठेवावी लागते! आपण अपेक्षा ठेवतो आणि म्हणूनच दु:ख आपल्या पदरात पडतं. "एकदा सांगितलं ना तुम्हाला, उद्या या! साहेब बिझी आहेत. तुमच्या सारखे शंभर फॉर्म आहेत या टेबलवर! साहेबांनी काय बाहेर येऊन सह्या करत बसायचं का?"! आपलं त्याने दाखवलेल्या त्या शंबर फॉर्मस च्या गठ्ठ्याकडे लक्ष जातं. त्याला पांढऱ्या नाडीने बांधलेलं असतं. त्या माणसाच्या लेंग्याचं काय झालं असेल, असा विचार मनात येऊन आपण टाचा अजूनच उंच करून बघतो! पण त्याने लेंगा घातलेला नसतो. आपण उदास चेहेर्याने त्या सरकारी कार्यालयाबाहेर पडतो.

दुसऱ्या दिवशी गर्दी टाळायला आपण भर सकाळी जातो. बहुतेक सगळ्यांनी आपल्यासारखाच विचार केलेला असतो. त्यामुळे ऑफिसला जायच्या आधी ते सरकारी कार्यालय भाजी-मंडई सारखं भरलेलं असतं. पुन्हा मोठ्या रांगेत थांबून, ऑफिसला थोडा उशीर करून आपला एकदाचा नंबर लागतो. आपल्या फॉर्मवर साहेबांनी वेळात वेळ काढून सही केलेली असते. "संध्याकाळच्याला या. शिक्का मारून मिळेल!" हे ऐकून आता आपलं डोकं बधीर व्हायची वेळ आलेली असते. 'अहो, तुमच्या शेजारी शिक्का आहे. त्याच्या शेजारी शाई आहे. तुम्हाला कितीसा वेळ लागणार आहे? तुम्हाला जमत नसेल तर मी स्वत: मारून घेतो!" असं चिडून म्हणायची मनात खूप इच्छा निर्माण होते. पण कालच झालेला अपमान ताजा असतो. त्यामुळे आपण शेळीसारखा चेहरा करून तिथून निघून जातो. बाहेर जाताना दारावर हसऱ्या गांधीजींचा फोटो लावलेला असतो. त्याच्या शेजारच्या भिंतीवर धीर-गंभीर लोकमान्य टिळकांचा फोटो असतो. सगळे आदर्श, सगळ्या आकांक्षा त्यावेळी गळून पडतात आणि रागारागाने आपण ऑफिसला निघून जातो.

ऑफिसमध्ये मग आपला चर्चेचा विषय असतो सरकारी कार्यालये, त्यातला ढिसाळ कारभार, भ्रष्टाचार, आपल्या इन्कम टॅक्स चा गैरवापर आणि देशाची अधोगती. मग आपल्या लक्षात येतं, आपल्या मित्राला एका दिवसात सही, शिक्का आणि रिसीट सगळंच मिळालं! तो आपल्याला मग आपण किती साधे आहोत यावर चिडवतो. दुसऱ्या दिवशी सख्ख्या मित्राच्या नात्याने आपल्या बरोबर त्या सरकारी कार्यालयात येतो. आपला नंबर आल्यावर समोरच्या माणसाला हळूच म्हणतो, "साहेब, संध्याकाळी चहाला थांबा ना.." पुढच्याच क्षणी आपल्या फॉर्मवर शिक्का बसलेला असतो आणि आपल्या हातात रिसीट असते!

संध्याकाळी आपण "चहाला" भेटतो. तो माणूस पहिल्यांदाच आपल्याला पूर्णपणे दिसतो. त्याने लेंगा घातलेला नसतो. तुमच्या आमच्या सारखा साधाच असतो तो दिसायला. आपण आपल्या खिशातली एक नोट काढून त्याला देतो. नोटेवरचे गांधीजी आपल्याकडे बघून हसत असतात. त्या क्षणी आपल्या चपलांचं झिजणं थांबतं आणि तो माणूस क्षणार्धात समोरच्या गर्दीत नाहीसा होतो..

3 comments:

vinay narayane said...

Different angle! masta jamlay! form cha kagad, shai pen-ball pen cha chunk mastach lihilays! end awadla :)

Sushant said...

Thanks Vinay! :)

Akshaya Borkar said...

Masta jamlay... Vegali story line and write up aahe.