Sunday, January 24, 2010

एकदा तरी..

काही विचारकळ्यांची कधीच कृतीफुले होत नाहीत. त्यामागची कारणेही बरीच असू शकतात. कधी जबाबदाऱ्यांमुळे, कधी स्वभावात बसल्याने, कधी रंग-रुपामुळे तर कधी परिस्थितीमुळे..पण हे सगळं असूनसुद्धा त्या विचारांच्या कळ्या जन्म घेण्याचं काही थांबत नाहीत..आणि त्यातच खरी गंमत असते!

आपल्या देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग. उच्चशिक्षण आणि कोळून प्यायलेल्या अनुभवाच्या बळावर आज ते सक्षमरीत्या देश चालवू शकतात. पण शिक्षण आणि अनुभवाची वस्त्रे जरा बाजूला काढून ठेवली तर ते एक पंजाबी आजोबा आहेत. राजकारण खेळणं असो किंवा देश चालवणं. पाकिस्तानशी काश्मीर मुद्द्यावर वाटाघाटी करणं असो नाहीतर अमेरिकेशी अणुकरार असो. हे सगळं कितीही उत्कृष्टरीत्या ते पार पडत असले तरी कधीतरी ते एक म्हातारे आजोबा असतील, एक पंजाबी गृहस्थ असतील. एकदातरी त्यांच्या मनात विचार येत असेल, की गेलं हे सगळं उडत! 'मौजा ही मौजा' गाणं लावून मस्तपैकी भांगडा करूयात! पंजाबला जुन्या घरी जाऊन बायकोच्या हातचं 'सरसो दा साग' आणि 'मक्के दी रोटी' खाऊयात! एकदा तरी..

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटीलांचंही थोड्या-फार प्रमाणात तसंच होत असेल. राष्ट्रपतीपद.. देशाचा पहिला नागरिक होणं काही सोपं नाही. केवढ्या त्या जबाबदाऱ्या..आपल्या देशाचा कणखरपणा आणि लढाऊवृत्ती दाखवण्यासाठी त्यांनी सुखोईमधून यशस्वीरित्या उड्डाण केलं. या वयातही दिवसभर कामात गढून जात असतील बिचाऱ्या..पण महाराष्ट्रातल्या कुठल्या आज्जीला दिवसभर नातवंडांशी खेळायला आवडणार नाही? गरम गरम वरण भात करून, त्यावर तुपाची धार सोडून त्यांना भरवावसं वाटणार नाही? देशाची सर्वाधिक महत्वाची कामं करताना सुद्धा एकदातरी त्यांच्या मनात हा विचार आला असणार..एकदा तरी..

आपला देश हा पुरुषप्रधान संस्कृतीचा. काही वर्षांपूर्वी स्त्रिया शिक्षणापासून वंचित असायच्या. फक्त चूल आणि मूल एवढंच काय ते करायचं. पदर घेऊन आत बसायचं. नवऱ्याची सेवा करायची. आजही काही ठिकाणी हे असंच चालतं. त्या शोषित बाईच्या मनात हे एकदातरी आलं असेलच..की मी जाईन कामाला बुलेटवरून! आणीन पैसे कमवून. पण मी घरी आल्या आल्या नवऱ्याने मला चहा दिला पाहिजे. रात्री जेवणही त्यानेच दिलं पाहिजे आणि खरकटीही त्यानेच काढली पाहिजेत! कधी माझा मूड नसला, कामावर काही बिनसलं की मी घरी दारू पिऊन येईन आणि नवऱ्याला मार मार मारीन...! एकदा तरी..

अहिंसेच्या कडक शिस्तीच्या मार्गावर जाणाऱ्या गांधीजींना एकदातरी कुठल्यातरी ब्रिटीश अधिकाऱ्याच्या श्रीमुखात भडकावाविशी वाटली असेलच की! सदाशिव अमरापूरकर, निळू फुले किंवा सयाजी शिंदे..जे कुठल्याही सिनेमात कमीत कमी एक तरी बलात्कार करतात आणि नंतर पकडले तरी जातात नाहीतर मरतात तरी! त्यांना एकदातरी हिरोची भूमिका करावीशी वाटली असेल..हिरोईनला व्हिलनच्या तावडीतून वाचवून शेवट गोड करावासा वाटला असेल..कॉलेजमध्ये फिक्कट रंगाचा शर्ट घालून, तेल लावून, चप्पट भांग पाडणाऱ्या आणि शक्यतो पहिल्या बाकावर बसणाऱ्या sincere मुलाला एकदातरी वाटत असतंच की stud होऊन एखादी girlfriend मिळवावंसं..

हे जे सगळं 'एकदा तरी..' असतं ना..ते कदाचित कधीच शक्य होत नाही. काही विचारकळ्यांची कधीच कृतीफुले होत नाहीत. पण म्हणून त्या विचारांच्या कळ्या जन्म घेण्याचं काही थांबत नाहीत...आणि त्यातच खरी गंमत असते...