Friday, November 26, 2010

देवबाप्पा

आस्तिकतेच्या आणि नास्तिकतेच्या मधे असलेल्या अदृष्य रेषेवर माझं मन नेहेमी रेंगाळत असतं. आणि ते फक्त रेंगाळतच नाही, तर चक्क तळ्यात-मळ्यात खेळत असतं! ती रेषा अदृष्य यासाठी की आस्तिक म्हणावं, तर देव आणून दाखवता येत नाही! तो आपल्याच दिसत नाही, तर आणणार कुठून! आणि नास्तिक म्हणावं, तर आपलं विज्ञान अजून एवढं प्रगत नाहीये, की देवाविना मनाच्या कुतूहलाची तहान भागवता येईल!

मला नेहेमी वाटतं की संस्काराच्या नावाखाली आई-बाप त्यांच्या मुलांना गंडवत असतात! म्हणजे, लहानपणी आयुष्याचं अगदी गोजिरं रूप दाखवलं जातं. तेव्हा आयुष्याचे नियमही खूप साधे असतात. ‘चांगलं वागलं, की देवबाप्पा खूश होऊन बक्षीस देतो आणि वाईट वागलं, की देवबाप्पा शिक्षा करतो.’ ‘आपले आजोबा खूप म्हातारे झाले होते की नाही, मग देवबाप्पाने त्यांना बोलवून घेतलं. आता ते देवबाप्पाकडे असतात.’ रोज संध्याकाळी देवापुढे दिवा लावल्यावर ‘शुभम् करोति’ म्हणा, शाळेत अथर्वशीर्ष म्हणा, १२वा,१५वा अध्याय म्हणा, रामरक्षा म्हणा. आपले आई-बाबा आपलं लहानपण अगदी देवबाप्पामय करून टाकतात! देवबाप्पा आपल्याच कुटुंबाचा एक परमोच्च सदस्य असतो. अगदी Highest Authority! आणि वरच्या मजल्यावर जावं तसे आपले आजोबा त्याच्याकडे गेलेले असतात..!

लहान असताना माझा देवावर अगदी विश्वास होता. परीक्षेच्या आधी न चुकता त्याला नमस्कार करून जायचो आणि देवाची आपल्यावर कृपा आहे म्हणूनच आपल्याला पेपर चांगले जातात, असा शाळेतल्या प्रत्येक पोट्या-सोट्यासारखाच माझाही समज होता. रस्त्यावरून जाताना मंदिर दिसलं की नमस्कार करायची मला तेव्हा सवयच लागली होती. एकदा आम्ही गाडीतून परगावी चाललो होतो. त्या प्रवासात एक रस्ता असा होता, की त्याच्या दोन्ही बाजूला तुरळक लोकवस्त्या अधून मधून लागायच्या. लोकवस्ती लागली, की त्यात दर १० सेकंदाला डावीकडे किंवा उजवीकडे एकतरी छोटंसं मंदिर असायचंच. आणि धावत्या गाडीत मी एकही मंदिर चुकू नये म्हणून दोन्हीकडे बघून पटापट नमस्कार करत होतो. अशाच एका मंदिराला मी नमस्कार केला आणि मला थोडीशी शंका आली. म्हणून मी मागे वळून बघितलं तर ते मंदिर नव्हतं, ती मुतारी होती! आणि घाईघाईत चक्क मी त्या मुतारीला नमस्कार केला होता!

जसे जसे आपण मोठे होतो, तसं तसं आपल्याला येड्यात काढलंय हे कळायला लागतं! B.Com, M.Com होऊन बँकेत नोकरी करणारा बाप आपल्या ‘हुशार’ मुलाला Science ला घालून पुढे Engineering ला पाठवतो. आणि विज्ञानाची कास धरलेल्या त्या मुलाच्या मनात, रंगलेली मेंदी जशी हळू हळू विरून जाते, तशी देवबाप्पाची छबी पुसत जाऊन अस्पष्ट होऊ लागते. आणि मनी पसरते ती नास्तिकता... ज्ञानाच्या सक्तीमुळे म्हणा, ज्ञानाच्या अभिमानामुळे म्हणा किंवा गर्वामुळे म्हणा.. आणि मीही ह्याला काही अपवाद नव्हतो.

मी देवाचं नाव घेणं खरं तर शाळेत असतानाच बंद केलं होतं आणि आस्तिकतेतून पूर्ण नास्तिक होऊन सुद्धा माझ्या आयुष्यात अगदी काहीच फरक पडला नाही! ना त्या देवाचा प्रकोप झाला, ना मला काही शिक्षा मिळाली, ना माझं खूप काही वाईट झालं. अगदी खूप काही चांगलं झालं अशातलाही भाग नव्हता. म्हणजे नास्तिक होऊन मला काही फायदाही झाला नाही. ह्याचाच अर्थ, आपला देवावरचा विश्वास हा ‘no profit – no loss’ या तत्वावर काम करतो, हे मला समजलं!

तर जेव्हा ‘देव नाहीच आहे’ आणि ‘Science च खरं रे’ ह्या मताचा मी होतो, तेव्हा गणपतीत आरती झाल्यावर नमस्कार करून डोळे बंद करून मी बाप्पाला म्हणायचो, “हे बघ गण्या, तुला माहितीच आहे, की आता काही माझा तुझ्यावर विश्वास नाहीये. पण मला लहानपणापासून तुला नमस्कार करायची सवय लागलीय म्हणून मी करतोय. मी तुझ्याकडे काही मागत नाही. पण जर का तू खरंच असशील(!), तर या बाकीच्या लोकांनी जे काही मागितलंय ते त्यांना देऊन टाक!’ देवालाच नमस्कार करून त्याच्याशीच गप्पा मारताना त्यालाच म्हणायचं, की ‘तू नाहीच आहेस, मला माहितीय!’ ह्यातला वेडेपणा, निरागसता आणि सौंदर्य कळायला अजून ५-६ वर्षे लागली!

अजून थोडा मोठा झाल्यावर जेव्हा देव आणि धर्म ह्यातला संबंध कळला, आणि ‘धर्म’ ह्या अतिशय फोल गोष्टीवर चाललेला मुर्खपणा समजला तेव्हा तर देवाचा अक्षरशः रागच आला. लोकं टोळक्यांना आणि टोळकी समाजाला जोडली जावीत आणि समस्त मानवजातीचा वेगाने विकास व्हावा म्हणून आपल्या थोर पूर्वजांनी ‘देव’ ही संकल्पना समाजात रुजवली. त्यांचा हेतू चांगलाच होता. फक्त निसर्गाची चूक एवढीच झाली, की एकाचवेळी असे वेगवेगळे दैदिप्यमान नेते जगाच्या वेगवेगळ्या ठिकाणी तिथल्या जनसमुदायाला ‘देव’ म्हणजे काय ते सांगत होते. ते जर तेव्हा एकमेकांना ओळखत असते, telecommunication, transportation तेवढं विकसित असतं, तर कदाचित problem आलाच नसता. पण झालं असं, की त्या प्रत्येक नेत्याने देवाचं एक वेगळं चित्र उभं केलं. त्यातून पुढे ‘तुझा देव खरा का माझा’ किंवा ‘हिंदू खरा, मुसलमान का ख्रिश्चन’ यावरून भांडणं होतील, दंगली होतील, एकमेकांचे गळे कापले जातील, हे त्या बिचाऱ्या साधू-संतांच्या ध्यानी-मनीही नव्हतं. आजही विव्हळत असतील त्यांचे आत्मे.. स्वर्ग असेल तर स्वर्गात आणि जर नसेल तर त्यांच्या शरीराच्या राखेने सुपीक झालेल्या जमिनीतही आज भितीने पिकं येण्यास कचरत असतील..
पण धर्म हा समाजासाठी असतो तर देव हा प्रत्येकासाठी. आज मी अशी बरीच लोकं बघतो, जी धर्मांध मुळीचं नाहीयेत. पण देवावर मात्र त्यांचा विश्वास आहे. ‘देव सहकारी बँकेत’ त्यांची personal accounts आहेत! त्यामुळे देवावरचा राग आता माझा निवळला आहे..

अडीच वर्षांपूर्वी मी इथं अमेरिकेला आलो, आणि मला एका वेगळ्याच देवाने दर्शन दिले! असं म्हणतात एखादी गोष्ट आपल्या आयुष्यातून निघून गेली, की त्याची आपल्याला किंमत कळते. त्याचीच प्रचीती पुन्हा एकदा आली. इकडे पहिल्यावर्षी गणपती आले आणि उत्सवाविनाच निघूनही गेले. गणपतीची ती प्रसन्न मूर्ती नव्हती. छोटासा उंदीर नव्हता. आरास नव्हती. मोदक नव्हते. तबकातला जळणारा तो कापूर नव्हता. आरत्यांचे स्वर नव्हते. ढोल ताशांचे घुमणारे आवाज नव्हते. गुलाल नव्हता आणि लयीत नाचणारी पावलंही नव्हती.. भारतात सगळीकडे उत्सव चालू होता. तिकडे घरी गणपती बसला होता. आईकडून सगळं फोनवर ऐकत होतो. पण काहीच जाणवत नव्हतं. खूप वेळ मांडी घालून बसल्यावर पायाला मुंग्या येऊन जशी बधिरता येते, तसंच काहीसं मनाचं झालं होतं.

दसऱ्याला केशरी-पिवळ्या झेंडूला बहुतेक डोळे शोधत होते. सारखं अस्वस्थ वाटत होतं. आपट्याची पानंही कुठे दिसली नाहीत. माझ्या टेबलवर दहा डॉलरची नोट खूप दिवसांपासून पडून होती. संध्याकाळी सहज ती हातात घेतली. तेव्हा पैशाच्या राक्षसाने दसऱ्याच्याच दिवशी त्याच्या दहा तोंडांसकट मला दर्शन दिल्यासारखं वाटलं!

कोरडी दिवाळी तर मनाला अक्षरशः चटका लावून गेली. दिवाळी माझी सगळ्यात लाडकी. त्यामुळे सगळंच खूप प्रकर्षाने जाणवू लागलं. माझा जन्मही दिवाळीतला. खूप प्रदूषण होतं, हे बुद्धीला कितीही पटत असलं तरी मला फटाक्यांचे आवाज लागतातच! ‘फटाक्यांविना दिवाळी’ वगैरे माझ्या कल्पनेच्याही पलीकडची होती. आता तर मी ते प्रत्यक्ष अनुभवत होतो! साधा एक लवंगी फटाकाही नव्हता हो! डोळ्यांना स्वतःकडे बघायला लावणाऱ्या त्या असंख्य पणत्या नव्हत्या. पणत्या मला नेहेमी ७-८ वर्षांच्या, परकर-पोलकं आणि केसांचा बो घातलेल्या मुलींसारख्या वाटतात. त्या चिमुकल्या तोंडातून, गोड आवाजात सतत बडबड करणाऱ्या.. वारा आला आणि पणत्यांची ज्योत फडफडली, की त्या पोरींची बडबड वाढते! त्या पणत्यांचीही खूप आठवण येत होती. घराबाहेर आकाशकंदील नव्हता. उटणं लावून अभ्यंगस्नान नव्हतं. ओवाळणं नव्हतं की नातेवाईकांना भेटणं नव्हतं... घरून दिवाळीचा फराळ आला होता, पण त्याला दिवाळीपणच नव्हतं. लाडू, चिवडा, चकली, सगळंच छान झालं होतं. पण तेव्हा ते नुसतेच पदार्थ होते. त्याचं फराळत्वच हरवलं होतं..

दुसऱ्या वर्षी ठरवलं की परत असं होऊ द्यायचं नाही. त्या गणपतीत स्वत:हून enjoy करायचा प्रयत्न केला. सगळे मित्र जमलो. जेवणाचा खास बेत केला. एवढंच नाही तर ‘You Tube’ वर गणपतीच्या आरत्या ऐकल्या आणि विसर्जनाला मिरवणुका बघितल्या. दिवाळीत झब्बा-सलवार घालून Indian Student Association च्या cultural program ला गेलो. दिव्यांची माळ आणून घरासमोर लावली. आणि एवढं सगळं करून मग घरून आलेला फराळ खाल्ला.. पण कशाचाच फारसा उपयोग झाला नाही.

‘हे असं सगळं का होतं?’ असा विचार करत असताना अचानक ‘tube’ पेटली आणि एका ‘खऱ्या’ देवाचं दर्शन झालं! गणपतीची आरास, तबकातला कापूर, निरांजन, रंगपंचमीचे रंग, दहीहंडी, आकाशकंदील, मिरवणुकीतला गुलाल, पणत्यांच्या ज्योती, फटाके, नागपंचमीचा तो टोपलीतला नाग आणि पुंगीवाला गारुडी, नंदीबैल, झेंडू, आंब्यांच्या पानांची तोरणं, गुढी, दारातली रांगोळी... यांसारख्या फारसा काही अर्थ नसलेल्या मानवनिर्मित गोष्टी सण किंवा उत्सव कसे उभे करू शकतात? मनामनात उत्साह पेरून आनंदाची हंगामी पिकं कशी आणू शकतात? एवढं सामर्थ्य त्यांच्यात येतं कुठून? याचं एकमेव कारण म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये ओतप्रोत चैतन्य भरलेलं आहे. आणि हाच तो देव!

घरी माझा नीट अभ्यास होत नसला की मी लायब्ररीत जातो. तिथल्या ‘अभ्यासू’ वातावरणात मग माझा चांगला अभ्यास होतो. हे वातातावरण तयार होतं तिकडे अभ्यास करणाऱ्या लोकांमुळे. वातावरण हाच तो देव! आई घरी असली की घरातला उत्साह दुप्पटीने वाढतो. घर जणू बोलकं होतं. हाच तो देव! निसर्गाच्या सान्निध्यातलं शांत वाटणं, शिक्षकांच्या सहवासातलं प्रोत्साहित वाटणं, मित्राच्या सहवासातलं हलकं वाटणं आणि प्रेयसीच्या सहवासातलं तरंगणं... हाच तो देव!

मी विचार केला , समजा आत्ता या क्षणी समस्त मानवजात नष्ट झाली. सगळे प्राणी, वनस्पती, कीटक.. म्हणजे सगळेच सजीव नाहीसे झाले तर काय उरेल? ओसाड कॉंक्रीटचा पसारा उरेल, उजाड जमिनी उरतील आणि इलेक्ट्रोनिक्सचा कचरा उरेल.. सगळं चैतन्य हरपून जाईल.. त्या क्षणासाठी ती पृथ्वीची मृतावस्था असेल..

हा विचार होताच मला संतांच्या शिकवणीचा अर्थ कळला. देव माणसात, निसर्गात कसा असतो, हे उमगलं. मला माझा ‘देवबाप्पा’ भेटला..!

30 comments:

sahdeV said...

Aayla, i wrote summary of this very article more than an year back!!! :-o
Here's the link!
You may also want to read about सांख्य philosophy . These match my current beliefs very closely.

sahdeV said...

Nicely written btw, plz don't think I used this to advertise my blog! :p Only because our posts are relevant. :)
Alright... I did! So what? What u gonna do??? :P :D

Sushant said...

:) hahaha.
Your link is not working.
Facebookwar msg karshil ka pls?

Sagar Keer said...

Awesome. As I said, I have similar thoughts too. However I feel what occurs once we enter adolescence is not "Naastikta" its just a plain apathy towards the issue of God & religion. We just cease to care, until we reach adulthood and some of us start thinking about these things. Because, most atheists know more about religion than 'religious' people.

Karan said...

Fantastic...
sagle vichaar faar properly maandles..
great job..

thodasa flip side cha v4 alaa fakt...
ya lekhatoon asa sangitlayas ki "Chaitanya" manasaatla, nisargaatla ani samajatala...mhanje Dev
Positive/Anandi baaju ya tinhinchi mhanje dev..

pan tula hi janeev vyayacha mool kaaran kaay hota...
tar "udaasinata" ... manasaatali, nisargaatli ani samajaatlihi..
mag tula jya goshtine (So called) "Kharya" devachi jaaneev karun dili ti pan ka bara dev asu shakat nai!!!

So ajun ek santanchi shikvan yogya vaatate ti mhanje...
"Dev saglikadech aahe..anandaat pan ani dukkhhaat suddhhaa.."


Aani mulaat "Dev" hi concept aaplyala laagte kaaran apan inherently mentally weak aahot..

But another master piece from Mr. Khopkar...

dude tu tuze selected lekh Avachatanna pathavat jaa...

Mast mast.. :)

Sushant said...

@ Sagar- I coudn't agree more!

@ Karan- खूप छान विचार आहे. तुझी मोठ्ठी comment वाचून छान वाटलं. आपण mentally weak आहोत हे अगदी खरं आहे.
'उदासीनता' किंवा generalize करायचं झालं तर 'lack of something' नी आपल्याला जाणीव होते आणि तुझ्या मते आपण त्याला 'देव' म्हणू शकतो. बरोबर आहे तुझं. पण ह्यातून vagueness वाढतो असं मला वाटतं. 'देव' ही एक abstract पण खूप व्यापक concept आहे. त्यातला नेमकेपणा मला पकडायचा आहे. चैतन्यता किंवा consciousness ही अशी एक energy आहे की त्यामुळे जगण्यालाच अर्थ येतो. बाळाचा जन्म होत असताना नक्की कधी चैतन्य अंगात जातं हे अजूनही आपल्याला माहिती नाही. मेलो की हेच चैतन्य बाहेर पडतं.
मला सजीवपणाचं मूळ तेच वाटतं आणि 'देव' ह्या खूप व्यापक गोष्टीतल्या ह्या subsetला मला माझा 'देवबाप्पा' मानावंसं वाटतं...
जाऊदे. कधी भेटलो की यावर बोलू. Complexity वाढवली की सौंदर्य कमी होतं..
तेजाला सांग ना अवचट सरांना लेख पाठवायला..

Karan said...

my pleasure mitraa..

Pan mitraa..jagnyala yenarya jya "Artha" baddal aapan boltoy na...to fakt eka goshtine yet nai re..

utsaah, anaand aani chaitanya hyanchya astitvacha ekmev kaaran mhanje tyancha abhaav..

aani aapan jar fakt changlya goshtinnach Dev mhananaar asu tar mag Dev aaplyala kahich shikvat nai, to aplyala ladavoon thevato asa mhanta yeil..

mhanun mala asa vatata ki Dev mhanje sagla kinva dev mhanje kaich nai...

kaaran tya "Saglya" madhe ekach goshtichya don baaju astaat +ve ani -ve...jenva te sagle ekatra yetaat tenva sagla 0 hota...

he faar vague ahe..

Mi hi prayatna karen jara superfinish karayche maaze vichaar..nd complexity kami karnyachi


ani
Nakki sangen Teja la... :)

shalaka said...

dada, khoop massta rre... 1st para adadi khara ahe!! ani "dharma ya fol goshtiwar challela murkhapana"_ perfect shabda...

A Peregrine Perspective said...

Chan lihilay..."Dev" hi gost khup utkrustpane mandli aahe...and i like the writing style i.e. eka pointsche (Deva war vishwas) donhi baju (Astik/Nastik) convincingly explain karene... Good work.. Keep it up..:)

teja said...

काय रे मला ओळखत नाहीस कि काय...! करण्या कडून कशाला सांगतो कि अवचातांकडे पाठव म्हणून ...!!!!! हा हा
आता थोडे लेखाविषयी....
लिखाण छान केले आहेस...लेखाचा "भरणा' कसा असावा याचा 'साचा' सुंदरच जमतो तुला! यातील आता वाटणारी देवा बद्दल ची "अमूर्तता" आणि लहानपणी जपलेला 'वास्तववाद ' याचा मेल छान घातला आहेस. तुम्हाला जाणवणारा एकटेपणा नेमका मांडला आहेस जो माझ्या मनाला इथे बसून देखील 'चटका' लावून जातो.

पण सुशांत मला काय वाटत माहित आहे का, देव हा आपल्या कामात तर पहावाच पण तो त्याहून हि छान भासतो तो म्हणजे आपल्या आवडीच्या गोष्टीत. म्हणजे माझ्यासाठी म्हणशील तर तानपुरा घेऊन षड्ज लावला कि आ हा !वाटून जातो आणि तेच तेच करावासा (गात रहावं) त्यात देव पाहावा....

पण छान ... या लेखाच्या "शब्दांकानावर" कधीतरी बोलूयात पुन्हा.
मी avachatanparyanta पाठवायचा मग प्रयत्न करेन म्हणजे तुझी हरकत नसल्यास अजून verify करून मगच पाठवू. चालेल?

prach said...

sushant..khupach bhari lihila ahes...mazya manatla sagla ahe...same vichar...te tu farach uttam mandle ahes...khupach bhari... especially ha para far avadla..
घरी माझा नीट अभ्यास होत नसला की मी लायब्ररीत जातो. तिथल्या ‘अभ्यासू’ वातावरणात मग माझा चांगला अभ्यास होतो. हे वातातावरण तयार होतं तिकडे अभ्यास करणाऱ्या लोकांमुळे. वातावरण हाच तो देव! आई घरी असली की घरातला उत्साह दुप्पटीने वाढतो. घर जणू बोलकं होतं. हाच तो देव! निसर्गाच्या सान्निध्यातलं शांत वाटणं, शिक्षकांच्या सहवासातलं प्रोत्साहित वाटणं, मित्राच्या सहवासातलं हलकं वाटणं आणि प्रेयसीच्या सहवासातलं तरंगणं... हाच तो देव!

THE PROPHET said...

प्रचंड भारी लिहिलं आहे!!!
जबरदस्त!!!!

facebook lile it said...

अतिशय सुंदर, प्रामाणिक आणि ओघवत्या भाषेत क्लिष्ट मुद्दा मांडण्यात तुम्ही भयंकर यशस्वी झालेला आहात.
आज प्रथमच तुमच्या ब्लॉगला भेट दिली व हाच लेख वाचला. खूप आवडला. आणि खूप अपेक्षा वाढल्या तुमच्याकडून.

अनघा said...

मला नेहेमीच असं वाटत आलंय कि देव माणसांत असतो. कधी लपलेला तर कधी उघड. म्हणून मग अशी माणसं जिथे असतील तेथील वातावरणात देव पसरतो. सुगंध दरवळावा तसा. छान आहे लेख. :

अनघा said...

मला नेहेमीच असं वाटत आलंय कि देव माणसांत असतो. कधी लपलेला तर कधी उघड. म्हणून मग अशी माणसं जिथे असतील तेथील वातावरणात देव पसरतो. सुगंध दरवळावा तसा. छान आहे लेख. :)

शांतीसुधा said...

छान झालाय लेख. मागे चार-पाच वर्षांपूर्वी मी मराठी डॉट नेट या याहू ग्रुपवर एका मेल ला उत्तर लिहीताना तुमच्या लेखातील उत्तरार्धात व्यक्त केलेले विचारच मांडलेले होते. लहानपणी मी काही अति देवभोळी नव्हते, पण देवाला नमस्कार करणे, दिसेल त्या देवळाला नमस्कार हे प्रकार होते आणि अजुनही माझे हात आपोआप जोडले जातात.........केवळ देवळातील देवापुढेच नाहीत तर हवेत वर असलेल्या शक्तीपुढे, एखाद्या चर्च मधल्या क्रॉस पुढे, एखाद्या उपकार कर्त्या व्यक्तीपुढे, एखाद्या ज्ञानी व्यक्तीपुढे, ग्रंथालयापुढे.....सगळीकडेच. मग प्रचिती येते देव सगळीकडे असल्याची. हाच तो देव. मलाही तसंच वाटतं की देव हा वातावरणात, निसर्गात, माणसांत आणि आपल्या श्रद्धेत आहे. प्रत्येक माणसात देव आणि दानव दोन्ही आहे........आपल्यातील विल आणि एव्हिल पॉवरच्या रूपात. जी पॉवर एखाद्यावेळी जास्त होते त्यावेळी आपल्याला त्याचं अस्तित्त्व जाणवतं. अशा अनेक गोष्टी आयुअष्यात घडतात की ज्याला आपण लॉजीक नाही लावू शकत पण आपली श्रद्धा मात्र आपल्या सगळ्या शंका कुशंकांना शांत करते.

संकेत आपटे said...

वा! खूप सुंदर लिहिलं आहे. माझी देवावर खूप श्रद्धा आहे. पण, तरीही देवाच्या बाजूने किंवा देवाच्या विरुद्ध बोलतानाही मला एवढे सुसंगत मुद्दे नसते बुवा सुचले. ग्रेट. :-)

Sushant said...

@ Shalaka, Harshal, Prachi, Teja -
Thank you so much! :)

@ Teja- :) चालेल. बोलुयात लवकरच.

@ Karan - लवकरच बोलुयात! Harley Davidson घेऊन ये इकडे Buffaloला! :)

@ The Prophet, Facebook lile it, Anagha, Shantisudha, Sanket - खूप खूप धन्यवाद! तुमचं या ब्लॉगवर स्वागत आहे! येत रहा. वाचत रहा. कळवत रहा. :)

@ अनघा, शांतीसुधा-
आपले विचार जवळपास सारखेच आहेत की! आपल्या 'ह्या' देवबाप्पाबद्दल आपल्याला कोणीच सांगत नाही. अनुभवातून आणि observations चा analysis करून हा असा देवबाप्पा भेटतो!

आनंद पत्रे said...

अगदी मनातले विचार मांडले आहेत.. सुपर्ब

Yogesh said...

अशक्य भारी लिहल आहेस...प्रचंड आवडल...आस्तिक अन नास्तिकतेच्या हिंदोळ्यावर अस द्वंद्व नेहमीच चालु असत.

davbindu said...

खरच खुप सुंदर विचार मांडले आहेस...ते द्वंद्व आणि खरया बाप्पाचा साक्षात्कार छानच...

Vini said...

खूप सुंदर....

सागर said...

खूप खूप आवडलं...पटल....

Sushant said...

@ आनंद, योगेश, दवबिंदू, Vini, सागर -
Thank you!! :)
तुमचं या ब्लॉगवर स्वागत आहे.

अपर्णा said...

मागची सात वर्षे मला जे कळत नव्हत ते तू किती सहज सुंदररित्या समजावलस भौ.............:)
वेगवेगळ्या पद्धतीने मीही सारे सण साजरे करून झाले....पहिलं वर्ष तुझ्यासारखं कम्प्लीट सायलेन्स नंतर मग मित्र मंडळी मग मराठी मंडळ....मग आता पुन्हा जागा बदली झाली तर पुन्हा सायलेन्स ....कशातच तो आधीचा आनंद का नाही कळल नव्हतं तू एका दमात सांगून टाकलस...
मला तुझी लिहिण्याची शैली फार्फार आवडली....

Sushant said...

Thank you Aparna! :)

Priyanka said...

छान लेख आहे
आणि अगदी बरोबर बोललास देवाबाबत!
मी पण ह्यावेळी दिवाळीची किंवा गणपतीची मजा miss केली ....... चैतन्यमय वातावरणासाठी

कधी कधी कुठले decoration बघितले की मी लगेच म्हणते दिवाळी आल्यासारखी वाटतंय आणि सकाळ वाचतानापण पान जाहिरातींनी पूर्णपणे भरलेली असतात

You are right!
God is indeed everywhere! Even though I myself am not a believer of him!

Priyanka said...

किंवा असे म्हणता येईल का की देव एकाघ्रेह्तेत असतो?

my life said...

vaa.....prashansa karnya saathi shabta tokde padaavet itka surekh lihilay....

me he adhi maajhya aai la vachaayla laavnaar ahe....

pan, kahi goshti patat naslya tari aapan tya kartoch, konala bara vaatava mhanun...aevdha ek reason pure ahe ki maazya saarkha nastik 4 dhaam karun yeto, rudraksha, gande-dore ghalto ani te ummriket yeun pan japto...

baaki, Karan barobar mhantoy...manaacha dublepanaa is the cause behind such beliefs...

Meenakshi...... said...

मी काही महिन्यान पूर्वी उनाडक्या blog वाचला आणि त्याची fan झाले :) good one again ..
मी वेळ मिळेल तसा सगळे लेख वाचण्याचा प्रयत्न करत आहे .. कारण तुम्हा सर्व मित्रांचे लेख मनाला भिडतात ..
हे विचार आपल्या पण मनात येतात अशे वाटते पण ते इतक्या छान पद्धतीने मांडलेले इथे मिळतात ... :)