Thursday, February 24, 2011

बिन्न्या

आमच्या भारत देशात, महाराष्ट्र राज्यातल्या एका छोटयाश्या खेडयात १० वर्षांचा बिन्न्या राहतो. वडील शेतकरी. आई घरीच असते. बिन्न्या म्हणजे अगदीच किडकिडीत शरीरयष्टीचं वितभर पोर. आईबापाचा गव्हाचा रंग, कणसाच्या दाण्यासारखे दात आणि काळेभोर डोळे घेऊन जन्माला आलेला. अन् डोळेपण किती काळे, तर त्यांचा रंग अमावास्येच्या काळ्यामिट्ट रात्रीलाही फिका पाडतो! त्या रात्री चंद्र नसल्यामुळे कशी एखादी चांदणी जास्तच चमकत असते, त्याच चांदणीची चमक डोळ्यात भरून त्या वरच्या देवाने त्याला खाली टाकलंय!

तर असा आमचा बिन्न्या गावातल्या सरकारी शाळेत शिकतो. सकाळी उठून मोरीत दात घासून झाले की शेजारच्या बंबावर तापत असलेलं गरम पाणी घेऊन आई त्याला तिथंच आंघोळ घालते. ते झालं, की घरच्या एकुलत्या एका गाईचं धारोष्ण दूध प्यायचं अन् शाळेकडं पळायचं. खाकी चड्डी-पांढरा शर्ट आणि चड्डीच्याच रंगाचं त्याचं ते एका बंदाचं दप्तर. तेल लाऊन आई चप्पट भांग पाडून देते अन् मग स्वारी शाळेकडे जायला निघते.

शाळेची पायवाट कुरणातून जाते. त्यामुळे बिन्न्या जेव्हा शाळेत पोहोचतो, तेव्हा त्याच्या सावळ्याश्या पायांवर कुरणांचे पांढरे ओरखडे उठलेले असतात. बाई जे शिकवतायत ते भक्तिभावानं शिकायचं, मधल्या सुट्टीत अखंड दंगा घालायचा, मित्रांबरोबर भाकरी खायची अन् शाळा सुटली की मित्रांबरोबर खेळून, टिंगल-टवाळ्या करत घरी यायचं.

त्याने आणि त्याच्या मित्रांनी शाळेच्या मैदानाच्या आवारात एका झाडामागे सायकलचे टायर लपवून ठेवलेत. शाळा सुटली की ते टायर घ्यायचं, एखादी काठी शोधायची आणि चाक पळवायची शर्यत लावायची, हा त्यांचा उद्योग. ते खेळून झालं की पुढच्या इयत्तेतल्या मुलांचा विटी-दांडूचा खेळ बघायचा. बिन्न्या लहान असल्यामुळे त्याला ते विटी-दांडू खेळायला घेत नाहीत. पण पुढच्या वर्षी, पाचवीत गेल्यावर घेणार आहेत असं म्हणतो.

हे होईपर्यंत सूर्य मावळत आलेला असतो. मग स्वारी दप्तर उडवत उडवत पुन्हा घराकडे जायला निघते. वाटेत बिन्न्याला एक पडकी भिंत लागते. तिथं चिंचेचं मोठं झाड आहे. अजून आम्हाला काही दगड मारून चिंचा पडता येत नाहीत. त्यामुळे तो खाली पडलेल्या, पण न फुटलेल्या चिंचा शोधतो आणि सोलून तोंडात टाकतो.ती पडकी भिंत जेमतेम त्याच्याच उंचीची आहे. मग बिन्न्या खालच्या दगडावर उभा राहून आपली दोन्ही कोपरं त्या भिंतीच्या कठड्यावर टेकवून मावळत्या सूर्याकडे बघत बसतो. तिकडे क्षितिजावर खाली जाणारा लाल-केशरी सूर्य असतो आणि इकडे बिन्न्याच्या तोंडात आंबट-चिंबट चिंच असते. त्याला क्षणभर वाटतं, आपल्याला लालचुटूक सुर्याचीच चव लागतीय! तो सूर्य चवीला आंबट असावा... संध्याकाळचा गारवा आणि त्यात बेफाम सुटलेला वारा बिन्न्याचे तेल लावून चप्पट भांग पडलेले केस उडवायचे अतोनात प्रयत्न करतो. पण वाऱ्याला ते काही जमत नाही. मग तो चिडून माती उडवतो, जी बिन्न्याच्या केसाला जाऊन चिकटते.

एव्हाना चिंच खाऊन झालेली असते. चिंचोका जिभेवर रेंगाळत असतो. मग बिन्न्या दप्तरातून आपली लाडकी 'ष्टील'ची कंपासपेटी काढतो. त्यात पेन, पेन्सिल, रबर..असं काहीच नसतं. असतात फक्त चिंचोके! बिन्न्या दप्तर लावून घेतो. तोंडातला चिंचोका त्या कंपासीत टाकतो आणि खुळखुळ्यासारखी ती खडाखडा वाजवत घरी येतो...

आईनी एव्हाना पाणी गरम करून ठेवलेलं असतंच. त्या मळक्या पोराला ती खसाखसा घासून आंघोळ घालते. जेवायला कधी दूध-भात तर कधी वरण-भात असतो. जेवण झालं की आबा त्याची उजळणी घेतात. बिन्न्याचे वडील दहावीपर्यंत शिकलेत. तो त्यांना आबा म्हणतो. बिन्न्याचे डोळे मिटायला लागले की आबा अभ्यास थांबवतात. मग बिन्न्याला आई लागते. तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून पडतो. मग आई त्याला गोष्ट सांगते. आईकडे मोजून ३ गोष्टी आहेत. त्याचं ती आलटून पालटून सांगते. पण बिन्न्याला ते खूप आवडतं. ती गोष्ट चालू असताना कधी त्याची ब्रम्हानंदी टाळी लागते कळतही नाही..! बिन्न्या अगदी गाढ झोपी जातो..

काही वर्षातच हा छोटासा बिन्न्या मोठा होईल. खेडेगावातसुद्धा वेळ पटकन जातो बरंका! गावातली सरकारी शाळा दहावी पर्यंतच आहे. त्याला तितकंच शिकवायचं, यावर त्याच्या आबा आणि आईचं एकमत आहे. दहावी शिकला की आबाला शेतीत मदत करेल आणि पुढे तोच शेती करेल. 'शेतीच करायची, तर शिकायचं कशापायी?' या प्रश्नाचं उत्तर 'कुनी येड्यात काढू नये म्हनून.' असं त्याचे आबा देतात. बिन्न्या शहराकडे चुकूनही जाणार नाही. त्यांच्याच गावातला एकाचा मुलगा रोजगारासाठी मुंबईला गेला होता. रेल्वे प्लॅटफॉर्मवर हमालाचं काम मिळालं. मुंबईत जागा घेणं कसं परवडणार. फुटपाथवर राहायचा. लोकांच्या सामानांची ओझी वाहून वाहून इतका थकला बिचारा, की त्याला स्वतःच्या आयुष्याचं ओझं झेपेनासं झालं. मग त्यानं दारूला जवळ केलं. मग तर सगळच संपलं... 'दारू पिऊन येगळ्याच विश्वात जगायला लागतो मानुस.. डोस्कं फिरतं त्याचं. भ्रष्ट बुद्धीला औषध न्हाय रं...' असं आबा म्हणतो. त्यामुळे बिन्न्या कधीच शहरात जाणार नाही.

आत्ता शरीराच्या काड्या असल्या, तरी एकदा शेती करायला लागला की बिन्न्याचं शरीर भक्कम होईल. तो स्वतःचा घाम गाळून, धान्यांची बीजं मातीच्या गर्भात ठेऊन इमाने इतबारे तिला प्रसवत राहील. पुढे त्याचे लग्न होईल. कुटुंब वाढेल. एकार्थी त्याचं आयुष्य बदलेल. पण शेवटपर्यंत प्रामाणिकपणे कष्ट करून, थोडे थोडके पण हक्काचे आनंद वेचत तो आयुष्य कसवेल. तेवढे संस्कार आबा आणि आई देतायत त्याला. एक दिवस तो त्याचं खेडयात प्राण सोडेल. त्याच्या शरीराची राख त्याच गावातल्या नदीत सोडली जाईल आणि त्याच पाण्यानं पुढे भरघोस पिकं येतील..

बिन्न्याचे सगळे मित्र त्याच्या गावचेच असतील. त्यांना त्याला कधीही भेटता येईल. आयुष्यभर तो त्याच्या आई-वडिलांसोबत राहील. आधी त्यांच्या छत्राखाली आणि मग त्यांची काठी बनून. तो कधीच इतका busy असणार नाही की मित्रांना हरवून बसेल. त्याला कधीच long distance relationship 'maintain' करावी लागणार नाही. २१ व्या शतकाच्या या जीवघेण्या स्पर्धेत त्याला पळावं लागणार नाही. तो माणूस असला तरी त्याच्या मनात कधी कोणाबद्दल ईर्षा नसेल. अहो कशासाठी असेल? ज्ञानाच्या शक्तीच्या नावाखाली तो तुमच्या internet च्या जाळ्यातही अडकणार नाही. अहो, ज्याला 'Social Status' म्हणजे काय हेच आयुष्यभर समजणार नाही, तो काय त्याचा status update करणार! तुमच्या business venture मध्ये या बिन्न्याला कसं ओढून घेता येईल याचं काही solution आहे का तुमच्याकडे Mr. Zuckerberg..the Spiderman?! काय म्हणता Mr. Jobs, social status maintain करायला बिन्न्या तुमचा 'iPhone' किंवा 'MacBook Pro' घेईल का हो? मी असं ऐकलंय तुम्ही Marketing मधे इतके expert आहात, की कोणालाही काहीही विकू शकता! दाखवा तुमचा product या बिन्न्याला विकून.. कोळी कितीही विषारी असला, तरी जाळ्यात कधीच न सापडणाऱ्या किड्याला तो काहीच करू शकत नाही.

Technology ही दारूसारखी असते. एका आनंददायी अश्या वेगळ्याच विश्वात आपल्याला ती घेऊन जाते...आपली बुद्धी भ्रष्ट करून.. ह्याच वेगळ्या विश्वात आपण सगळे आहोत. माझी जेव्हा 'उतरते', तेव्हा मला बिन्न्या दिसतो.. काळ्यामिट्ट डोळ्यांचा..अन् कानात त्याच्या चिंचोक्यांच्या कंपासपेटीचा खडाखडा आवाज ऐकू येत राहतो...

8 comments:

varada said...

MAst Sushant...Vichar karayala lavanara...Shevati khoop chhan lihila ahes..

Unknown said...

फारच मस्त... हेवा वाटतो त्या बिन्न्याचा... अप्रतीम वर्णन केलंयस सगळ्याचंच..! आणि शेवटचे २ paras - bravo! :D Great! :)

kunal said...

मित्रा..... लेख अप्रतिम आहे.....असाच विचार करत होतो काही दिवस..... मस्त टाइमिंग जमलय.....

हा तुझा बिन्न्या समजा शराताला विनय असता, मग तो कॉनवेंट मधे शिकला असता, मग मित्रांना पाहून किंवा सध्याच्या अ.जा.पा.पा. पालकांच्या हट्टामुळे परदेशी शिकला असता....मग सगळा उलटा होत गेला असता.... विनयने कधी चिंच खाल्लीच नसेल, त्याने कधी टाइयर रेस केलीच नसेल, त्याने विटी दांडू पहिलाच नसेल, कुरण त्याने फक्त चित्रपटात पहिला असेल, तर त्याला कळणार कसा की त्याचे काय हरवलय......किंवा त्याला पटणार कसे की काही हरवलय..... त्याला सगळाच ओक वाटत राहणार...

sahdeV said...

असाच विचार करत होतो काही दिवस..... मस्त टाइमिंग जमलय..... आणि शेवटचे २ paras - bravo!
(not just copy-pasting, this is what I wanted to write exactly, good to see its already been pointed out!

...and I think this is because there is that बिन्न्या in each one of us...)

Sushant said...

धन्यवाद मित्रांनो! :)

teja said...

निःशब्द शब्द, अशांत शांत.......खोल खोल काही !!!!!! :)

devashree said...

farach antarmukh karayala lavanara lekh ahe....sundar!!

Rakesh said...

pharach chhan!
suruvaat agadi diggaj lihitaat tashi... Upama alankar kkkhhhachoooon bharalaay.. Awadala...
mumbaila jaun hamal houn darula javal kelela ekjan , aani apalyasarakhe shaharaat jaaun technology chya nashet budnaare, Apratim tulanaa!!!