Thursday, December 6, 2012

झाडांची निंदा


नावं ठेवण्याच्या इच्छेचं धुकं
समस्त जीवांच्या मनात दाटत असतं
झाडा-फुलांना देखील गॉसिप करून
पिसागत हलकं वाटत असतं

लाजाळूला "introvert" असं लेबल लावलं जातं
बाभळी मग जरा जास्तच रुक्ष ठरते
गप्पा मारताना कुणाहीबद्दल बोललं 
तरी माणसांसारखेच झाडांचेही पोट भरते 

"वडाला काही हेअर स्टाइल सेन्स नाही.."
बिचाऱ्याच्या पारंब्यांवर बोललं जातं
"पिंपळाचं वजन जरा जास्तच आहे, नाई?"
प्रत्येकालाच असं तराजूत तोललं जातं

"इतकंही कुणी बारीक असू नये"
भेंडी चारचौघीत गवारीबद्दल बोलत असते
"फिगर मेंटेन करण्यापलीकडे काय जमतं तिला?"
चवळीची शेंग पाहून फरसबीला सलत असते

कांदा मग "over sentimental" ठरतो
आंबा म्हणे उगाचच गोड गोड बोलतो
फणस आतल्या गाठीचा असतो, तर
नारळ आजकाल कुणाच्यातच नसतो

"गुलाबाची फुलं किती "show off" करतात.."
"मोगरा, जाई-जुई केवढं perfume मारतात.."
"जास्वंदाची फुलं म्हणे देवाला आवडतात!"
"दुर्वांनाच का फक्त गणपतीसाठी निवडतात..?"

एका जागी एवढं आयुष्य काढण्यासाठी
त्यांना जगण्याची मोठी उमेद लागते 
ती गरज कधी परोपकारी भावनेतून
तर कधी अशा विरंगुळ्यातून भागते..

4 comments:

krishnakumar pradhan said...

वनस्पतिंना जिवंत करायला छान जमतं तुला,सुशांत
आजोबांच्या वाजणा्रया बोळक्याला काय नावदेशिल?
krishnakumarpradhan@gmail.com

Sushant said...

Thank you Ajoba! :)
ह्याच्या पुढची कविता वाचा. कदाचित तुम्हाला उत्तर मिळेल..! :)

Himanshu said...

Absolutely brilliant! I am out of words to write a befitting compliment. Hence I will just shut up and say Hats Off! \m/

Sushant said...

Thank you so much Himanshu! :)