Monday, November 2, 2009

कडकलक्ष्मी

दिवस: लक्ष्मीपूजन(भारतात). अमेरिकेत ठाऊक नाही(किंवा काही फरक पडत नाही.)

वेळ: सकाळची(अमेरिकेतली)

उठल्या उठल्या सवयीप्रमाणे Gmail, Orkut आणि University चं email account check केलं. सकाळी उठल्या उठल्या ही accounts check करायची इतकी सवय झालीय ना, की कदाचित मी अन्न, हवा, पाणी आणि internet browser या गोष्टींशिवाय जगूच शकत नाही असं माझं मत व्हायला लागलंय..! ( अजून एक गोष्ट सापडली की ‘5 things I can’t live without’ असं Orkutवर टाकता येईल!)

माझ्या advisor चा mail आला होता. Research updates पाठवायला सांगितले होते. हा माणूस इतका का हात धुवून मागे लागतो, मला खरंच कळत नाही. दर आठवड्याला research updates घेऊन याच्याकडे जा. मग तो आपल्या आवडत्या लालबुंद शाईच्या पेनाने माझ्या research updates वर चित्र काढणार. स्वतःला डॉक्टर समजून अतिशय घाणेरड्या अक्षरात corrections लिहिणार (आता PhD म्हणजे तू Dr.आहेस ठीक आहे, पण उगाच 'खऱ्या'(!) डॉक्टरांसारखं अक्षर काढायची काय गरज आहे बाबा?!) आणि मी घरी येऊन त्याच्या अक्षराचा अर्थ लावत पुढील आठवड्याच्या research updates ची तयारी करणार हे अगदी ठरलेलं.. परवा तर मला स्वप्नं पडलं की माझ्या advisor च्या अंगात रक्त नाही तर ती लालबुंद शाईच वाहतीय! आणि आता तर त्याला पेनाचीही गरज नव्हती ! तो डाव्या हातात टाचणी घेऊन बसला होता. Correction द्यावीशी वाटली की तो ती टाचणी उजव्या हाताच्या तर्जनीला टोचे. मग एक रक्ताची(लाल शाईची) चिळकांडी उडे.. आणि मग त्या वाहणाऱ्या रक्तातून मला corrections मिळत होत्या. ती रक्ताळलेली research updates माझ्या डोळ्यासमोर नाचू लागली. एक रक्ताचा थेंब माझ्या अंगावर पडला आणि मी झोपेतून खाड्कन जागा झालो! पण ती लाल शाई आता सवयीची झालीय..मागे advisor ला एका conference ला जावं लागल्यामुळे आमची weekly meeting cancel झाली होती. त्या आठवड्यात इतकं चुकल्याचुकल्यासारखं झालं मला..वाटलं लाल पेन घेऊन स्वतःच रेघोट्या माराव्यात! मी खरंच राहू शकत नाही हो त्या लाल शाई शिवाय..(अरे! मिळाली की पाचवी गोष्ट!)

तर तो mail वाचून माझ्या advisor ला मी एक जबरदस्त शिवी हासडली. काल रात्री जागून केलेली homework assignment तशीच गादीवर पडली होती. ती उचलून दप्तरात ठेवली आणि चहा करायला म्हणून उठलो.

हल्ली चहा पावडर थोडी जास्त टाकून चहा थोडा कडक प्यायला लागलोय आम्ही. कारण त्याशिवाय चहा प्यायल्यासारखा वाटतच नाही.तर तो उकळता कडक चहा पीत आम्ही तिघं room-mates नी dining table वर रोजचा कट्टा टाकला!

चहाचा पहिला गरम गरम घोट घशाखाली उतरवला की आम्ही रोज चावून चावून चोथा झालेल्या विषयांचा रवंथ करायला लागतो. विषयाची सुरुवात होते current job scene पासून.. Recession हा किती hopeless प्रकार आहे आणि आपणच बरोब्बर कसे त्याच्या कात्रीत सापडलो..Obama च्या Policies किती बरोबर किती चुकीच्या?(होय, आणि Peace Prize?!!) मग तिथून अफगाणिस्तान..तालिबान..How to fight terrorism?.. अमेरिका किती गेमाड आहे आणि पाकिस्तान, चीन आपल्या देशाचे कसे लचके तोडतायत..बांगलादेशची घुसखोरी, देशातली गरिबी, देशाला लागलेली कीड..इथून पुन्हा फिरून PhD करावी का? खरंच आहे का interest? पैशासाठी किती मनाविरुद्ध वागायचं आणि शेवटी मनाला नक्की काय हवं असतं हे आपल्याला कितपत कळतं..? आणि जरी कळलं तरी ते किती valid असतं? म्हणजे मन हा frame of reference थोडीच आहे? अगदी लहान मुलासारखे हट्ट करणाऱ्या मनाला कितपत भाव द्यावा?! असे International Politics, Economics ते Personal Finance आणि मग Psychology आणि Philosophy वर येऊन सकाळचे विषय संपतात.

पण आज हे विषय चावायची कुणाचीच इच्छा नव्हती. याला कारण की कदाचित भारतात दिवाळी चालू होती आणि biological clock नुसार आमच्या मनातही कुठेतरी..एक मित्र म्हणाला, "वाह! चहा आज चांगलाच कडक झालाय.." आणि त्याचवेळी "अरे, आत्ता लक्ष्मीपूजन चालू असेल ना Indiaत?" असं दुसऱ्याने म्हटलं. त्यावर मी म्हणालो," कडक चहा पीता पीता लक्ष्मीपूजन करणं काय किंवा साधा चहा पीता पीता कडकलक्ष्मीचं पूजन करणं काय, सारखंच ना!" ह्या अतिशय पांचट jokeवर आम्ही तिघं मनापासून हसतानाच माझ्या मनावर कडकलक्ष्मीच्या आसुडाचा एक जोरदार चपराक बसला.. ढोलक्याचा तो तालबद्ध आवाज आणि त्यावर वाजणारी ती घुंघरं.. अधूनमधून कडाडणाऱ्या फटक्यांचे आवाज कानी पडू लागले ...आणि या सगळ्यानी मला काही वर्षे मागे नेऊन सोडलं..

दिवस: लहानपणचा..तारीख, साल..काहीच आठवत नाही..

वेळ: तिही आठवत नाही.

साताऱ्याचं जुनं घर.. समोर अंगणात पडलेला उंबरांचा सडा...घरामागे तूतूच्या झाडाला लाल, गुलाबी, काळे तूतूंचे घोस लगडलेले..शेजारी रिठ्याचं स्थितप्रज्ञ झाड..खाली पडलेल्या रिठ्यांवर गुंजांसारखे केशरीधमक किडे.. मागच्या दाराशी ठेवलेला तो मोठ्ठा बंब..त्यात खाली काही अर्धवट जळलेली लाकडं आणि जळलेल्या लाकडांची मऊ राख..फिक्कट हिरव्या रंगाची दारं आणि त्याच रंगाच्या लोखंडी गजाच्या खिडक्या.. खिडकीवर कोनाडे, त्याच्या बाजूला लाकडी खुंटी आणि त्यावर आजोबांचा पांढराशुभ्र सदरा...माझं अख्खं बालपण या घरी गेलं. घराच्या एका बाजूला बोळ होता.(जो बहुतेक आजीशी तासनतास cricket खेळायलाच बांधला होता) घराच्या दुसऱ्या बाजूला एक शेत होतं. त्या शेतात 'अळूच्या पानांवरचा दवबिंदू म्हणजे काय?', 'धुकं कशाला म्हणातात?','बुजगावणं कसं असतं आणि ते कशासाठी वापरतात?' आणि 'काजवा हा नक्की काय प्रकार असतो?' याची प्रात्यक्षिकासहित उत्तरं देणाऱ्या निसर्गमास्तरांची २४ तास शाळा भरलेली असायची..

सकाळी उठून आवरून आजोबांबरोबर फिरायला जायचं. येताना चण्याफुटाण्याच्या दुकानातून एक पुडी आणि एखादा फुगा घेऊन घरी यायचं. मग आजी मला भरवणार. भरवताना एक गोष्ट. दुपारी झोपवताना दुसरी गोष्ट. मग उठल्या उठल्या मी मामाबरोबर त्याच्या कंपनीचं काम करायला बसणार. त्याच्या कंपनीचं सगळं काम मला कसं करता येतं हे मी सगळ्यांना पटवून देणार. मग तो सुद्धा," अरे, या कागदावर मला आजचे reports लिहून दे ना, नाहीतर आपला boss आपल्याला रागवेल!" आणि मी ‘Don’t Worry’ च्या सुरात त्याचं काम झट्दिशी करून देणार.. संध्याकाळी आई आली की बागेत एखादी चक्कर. येताना कोपऱ्यावरच्या पिंपळाच्या झाडाखाली जणू माझीच वाट बघत थांबलेला तो आईस्क्रीमवाला आणि शनिवारी पपा आले की त्यांच्याबरोबर दंगामस्ती..

एकदा असाच आईस्क्रीम खात खात आईबरोबर येत असताना तो चाबकाचा कडकडीत आवाज फाड्कन कानी पडला..पहिल्यांदाच..तोच ढोलक्याचा तालबद्ध आवाज..घुंगरांचा आवाज..ते उग्र वातावरण..आणि त्या कडकलक्ष्मीचं ते भयानक रूप मी पहिल्यांदा पाहिलं..आईचा हात मी घट्ट धरून ठेवला होता आणि कावराबावरा होऊन रडत होतो. दुसऱ्या हातातलं आईस्क्रीम कधीच खाली पडलं होतं. आयुष्य 'कडक' असतं (Life is tough) ची ती पहिली चाहूल..ती पहिली प्रचीती..

चहाचा जिभेला चटका बसला आणि मी भानावर आलो. पण अगदी क्षणभरासाठीच. तेवढ्यात आसुडाचा दुसरा चपराक बसला. आणि 'झपाटलेला' सिनेमातलं ते बाहुलं आठवलं. तो शेवटचा scene आठवला जेव्हा ते बाहुलं लक्ष्याला म्हणतं, 'मला तुला मारायचं. मला तुझ्या शरीराचा ताबा घ्यायचाय..' आसुडाच्या तिसऱ्या फटक्यासरशी शाळेत असताना पाहिलेला कठपुतळ्यांचा खेळ आठवला..ज्यात त्या बाहुल्यांना स्वतःच्या इच्छेविरुद्ध, दुसऱ्याच्या मनाप्रमाणे वागावं लागतं. त्याच्या तालावर नाचावं लागतं..मी त्यातलाच एक बाहुला होतो का? माझ्या हातापायाला दोऱ्या बांधल्या होत्या. माझा स्वतःवर ताबाच नव्हता. वरून दोरी हलली की मला मनाविरुद्ध हालचाल करावी लागे. जगाचं रहस्य मानतात अशा ‘String Theory’ चा आणि कठपुतळ्यांच्या दोऱ्यांचा काही संबंध तर नसेल..अशी उगाच शंका मनाला स्पर्श करून गेली..घराच्या बाजूचं ते शेत आठवलं. निसर्गमास्तर डोळे वटारून मला सांगत होते," आता कळलं, बुजगावणं म्हणजे नक्की काय ते.."

मित्राने भानावर आणलं आणि उशीर होईल म्हणून दोघं निघून गेले. आसुडाचा चवथा फटका बसला. आता मी लाकुडतोड्या होतो. माझी कुऱ्हाड विहिरीत पडली होती. पण विहिरीतून प्रश्न विचारायला कोणी वरच येत नव्हतं. मला खरंच प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं होतं हो..अगदी खरं..

काहीवेळाने भानावर आलो. तळहाताकडे लक्ष गेलं. त्या नशीबाच्या रेषांच्या जाळ्यात अडकलेला मी कोळी होतो..मला ते जाळं पुन्हा बांधायचं होतं..अगदी नव्याने..अगदी मनासारखं..पण खूप उशीर झाला होता.माझ्या आधी नियतीनेच ते जाळं बांधलं होतं. तिने माझ्या पायाखाली चिकट डिंक लावला होता..आणि मला आव्हान देत होती..लढण्याचं..जिंकण्याचं..

अशावेळी सणकून इच्छा झाली 'कडकलक्ष्मी' अंगात भिनवायची. मला तो पोतराज व्हावसं वाटलं. भालावर लाल गंध फासून स्वतःला चाबकाचे फटके मारावेसे वाटले..कारण त्या प्रत्येक फटक्याने मला जाग येणार होती..मेंदूला लागलेली जळमटं आणि मतीला आलेली गुंगी प्रत्येक फटक्यासरशी नाहीशी होणार होती..विवेकबुद्धी जागृत करणारे होते ते फटके..स्वतःची स्वतःला ओळख करून देणारे होते..प्रवाहाच्या विरुद्ध जायची ताकद देणारे होते..मला गर्वगीत गाणारा तो कोलंबस बनवणारे होते..

मी हात जोडले..आरती म्हणली..

'आलीया मरीबाई तिचा कळेना अनुभऊ

भल्याभल्यांचा घेती जीव| आलीया मरीबाई

आलीया मरीबाई हा का सुटला तुझा वारा

दुनिया कापते थरथर आलीया मरीआई|'

आणि लक्ष्मीपूजन पूर्ण झालं...

13 comments:

Shashank Kanade said...

पहिल्या काही ओळी वाचल्या, थोडसं खाली scroll केलं आणि हा मग हा लेख लई मोठा आहे हे बघून खूप आनंद झाला. :)

तू म्हणतोयस ते अगदी पटलं बघ. नियती बद्दल. अशा वेळेस मी अमलतासाचं पिवळं धमक्क झाड होण्याचा प्रयत्न करतो.

झकास जगतोयस. लक्ष्मी पावणार तुला.

shivali said...

I am speechless...
khup sundar lihila ahes....

A Peregrine Perspective said...

well, khupach chan lihila aahe... the way you portrayed your childhood is marvelous...
eka vicharat wahayche, mag haluch dursa vicharachi kath pakdaychi ani tyala punha pahilya vicharat bandhun takayche...
Apratim kala aahe..
Keep up the good work dude..

Makarand Mijar said...

आख्खा blog वाचला ... छान वाटलं !
तू खरच मानसिक रित्या सु’शांत’ आहेस.
मस्तं रे.

parvez said...

are yaar ultimate..sahi ahe ekdum..

Nachiket said...

kaDak joke kaDak Ahe ....
string theory chi ontology-sort-of hi :D

"niyati chya jALyAt adaklelA koLi" hi kalpanA Awadli... paTali kami tari ... aapuN ach koLIi ANi ApaNach wiNlele jaaLele ... kela ApaNach ... te niyati ne karvun ghetale ka Aplya kaDun .. koNe hi? ANi karvunach ghetle asel.. tar khant kasli... ti khant hi niyatine Alelich ...

ANi te Strings che hi .... ApuN AplyAsAThi kAhi standards ghAlun ghetle Ahet... susankrutpaNAche, chAnglyA v4sarNi che, chAnglyA A4Anche ... standard of life che ... jyAnchyA60i ApaN je kAhi karto te karto.... he standards lahAn paNapAsun bimbavlelyA kalpanAnmadhun hi Alet ... attAparyantchyA anubhavAnwarun suddhA... so ApaN AplyAch concepts ni bAndhlelo kivvA free Ahot. asa hi asu shakel kadAchit ... ?

Amruta said...

simply amazing!!

Amruta said...

simply amazing!

Harshal Chaudhary said...

"Kadaklaxmi"

Thanks to chabkacha fatka...jyachyamule aamhala ha kadak blog watchayla milala...lol...

He kadaklaxmi ashach chabkachya faktkane hya hidden lekhakala kai anek blog lihinyasathi prawrutta kar...hich tuzya kade prarthana...!!!

Keep it up...!!!

Mayur said...

mast! khup awadla...hatatlya reshancha jo para aahe, to mast lihilaye..

sahdeV said...

मी सिनेमा पहिला!!! awesome direction पठ्ठे! :)

shamal said...

KADKLAXMICHA NAVA ARTHA KALLA.

SHAILAATYA.

KHUP CHAN. TRANSPARENT THINKING.

SHAMLATYA.

Sushant said...

@ All- Thank you!!