Sunday, March 24, 2013

चल आपलं राहिलेलं गाणं आता गाऊन घेऊ..


सोडून देऊ रुसवे फुगवे 
मनामध्ये धरलेले
मोकळे करू श्वास आपले
काहीसे गुदमरलेले

पुन्हा एकदा आपली वाद्ये एका पट्टीत लावून घेऊ, 
चल आपलं राहिलेलं गाणं आता गाऊन घेऊ..

करूयात सैर रात्रीची
नक्षत्रांच्या राशींतून
पिऊयात चहा जगासमोर
दोघं एका बशीतून

क्षितिजाआड जाण्यापूर्वी लोभस सूर्य पाहून घेऊ,
चल आपलं राहिलेलं गाणं आता गाऊन घेऊ..

दृष्ट काढू पहाटे
कळ्यांची फुले होताना
निरोप देऊ पक्षांना
घरट्यांमधून जाताना

ऊन कोवळं असेपर्यंतच आपण त्यात न्हाऊन घेऊ,
चल आपलं राहिलेलं गाणं आता गाऊन घेऊ..

घडे लागलेत ढगांचे
पाण्याने भरायला
सज्ज करू हात आपले
पुन्हा जमीन कसायला

उसवलेली स्वप्नं आपली पुन्हा एकदा शिवून घेऊ,
चल आपलं राहिलेलं गाणं आता गाऊन घेऊ..

समुद्रासारखं आयुष्य आपलं
अथांगपणे पसरलेलं
कित्येक त्याच्या फेसाळ लाटा
किनाऱ्यावरच विसरलेलं

एवढा सगळा हा पसारा आपल्या मिठीत मावून घेऊ
चल आपलं राहिलेलं गाणं आता गाऊन घेऊ..

Sunday, December 16, 2012

श्रीखंडाची गोळी

परवा असाच सुख:दु:खांना गुणत मी बसलो होतो.
हिशोब करत आयुष्याचा स्वेटर विणत बसलो होतो.

तेवढयात तिथे सत्तरीचा एक म्हातारा माणूस आला,
अगदी आजोबांसारखाच त्याने मला प्रेमळ लूक दिला!

त्याच्या हातात काठी,
माझ्या कपाळावर आठी!
माझं मन एकाकी,
त्याच्या डोळ्यांत लकाकी!

"काळजीत आहेस का पोरा?" विचारंत मोठठ्या स्माईलने हसला,
मला त्याच्या कवळीचा शेवटचा दातसुद्धा दिसला!

काय सांगू आजोबा.. म्हणत माझी सुख-दु:खं मी गुणून दाखवली,
खिशातून काढून त्यांनी चक्क, मला श्रीखंडाची गोळी चाखवली!

समजलंच नाही मग कधी आम्ही गप्पा सुरु केल्या,
त्यांचं बालपण, तारुण्यानंतर माझ्या बालपणावरसुद्धा झाल्या!

म्हणाले, आजी रागावेल.. अंधार पडला. आता मी जातो,
उदास नको राहत जाऊस, तुला एक कानमंत्र देतो

"गुणत नसतं राहायचं दोस्ता, गुणगुणत राहायचं बघ!
जेवढं मिळालंय आयुष्य, त्यात मजेत जग पहायचं बघ..!"

कोण जाणे त्यांची शिकवण किती परिणाम करून गेली होती,
जाता जाता माझ्या कपाळावरची आठी तेवढी त्यांनी नेली होती..

Thursday, December 6, 2012

झाडांची निंदा


नावं ठेवण्याच्या इच्छेचं धुकं
समस्त जीवांच्या मनात दाटत असतं
झाडा-फुलांना देखील गॉसिप करून
पिसागत हलकं वाटत असतं

लाजाळूला "introvert" असं लेबल लावलं जातं
बाभळी मग जरा जास्तच रुक्ष ठरते
गप्पा मारताना कुणाहीबद्दल बोललं 
तरी माणसांसारखेच झाडांचेही पोट भरते 

"वडाला काही हेअर स्टाइल सेन्स नाही.."
बिचाऱ्याच्या पारंब्यांवर बोललं जातं
"पिंपळाचं वजन जरा जास्तच आहे, नाई?"
प्रत्येकालाच असं तराजूत तोललं जातं

"इतकंही कुणी बारीक असू नये"
भेंडी चारचौघीत गवारीबद्दल बोलत असते
"फिगर मेंटेन करण्यापलीकडे काय जमतं तिला?"
चवळीची शेंग पाहून फरसबीला सलत असते

कांदा मग "over sentimental" ठरतो
आंबा म्हणे उगाचच गोड गोड बोलतो
फणस आतल्या गाठीचा असतो, तर
नारळ आजकाल कुणाच्यातच नसतो

"गुलाबाची फुलं किती "show off" करतात.."
"मोगरा, जाई-जुई केवढं perfume मारतात.."
"जास्वंदाची फुलं म्हणे देवाला आवडतात!"
"दुर्वांनाच का फक्त गणपतीसाठी निवडतात..?"

एका जागी एवढं आयुष्य काढण्यासाठी
त्यांना जगण्याची मोठी उमेद लागते 
ती गरज कधी परोपकारी भावनेतून
तर कधी अशा विरंगुळ्यातून भागते..

Friday, November 30, 2012

थेंबांचं जगणं

थेंबच ठरवत असतात पावसाची दिशा
मेघातून झेपावतात भरून ओली नशा

कुणी जाऊन फुलाला बिलगतं
कुणी त्याच्या मधात जाऊन मिसळतं
तिथे न्याहारी करणारं फुलपाखरू
मग क्षणार्धात वर उसळतं

कुणी पानांना ओलंचिंब भिजवतं
कुणाला फक्त चिखल करायचा असतो
सृष्टीचा असा पोरकटपणा
मग अगदी थेंबा-थेंबातून दिसतो

कुणी पानावरचा दवबिंदू होतं
कुणी रस्त्यावर सडा घालतं
आयुष्यात काहीही केलं
तरी त्या वेड्यांना चालतं

कुणी शांत तळ्याला घाबरवतं
कुणाला नदीत पडून वाहायचं असतं
"आभाळातून दिसते तशीच आहे का पृथ्वी?"
हे स्वत: सैर करून पहायचं असतं

कुणी पिलांच्या चोचीत जातं
कुणाला पिकांच्या मुळात राहायचं असतं
पृथ्वीचे पांग फेडाया
त्यांना परोपकारी व्हायचं असतं

पुन्हा मेघ भरू लागतात,
नवी सर येणार असते
उत्साहाच्या नव्या लक्षकणांना
ती पुन्हा जन्म देणार असते..

Wednesday, November 21, 2012

व्यक्त न करता येण्यासारखं..


व्यक्त न करता येण्यासारखं
प्रेम एकदा करून बघ
त्रास होईल मनाला, इतका
कुणासाठी झुरून बघ

त्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीचं

कौतुक मग मनाला करू देत
मनाची समजूत घालणं
तुझ्यासाठी अग्निदिव्य ठरू देत

नको मिळू देत प्रतिसाद तुला
मनाला तुझ्या दुखू देत
विचारात पडशील स्वत:बद्दल,
तुझ्या आत्मविश्वासाला झुकू देत

खूप वाटेल तुला व्यक्त करावसं,
पण शब्दांना जन्म देऊ नकोस
रोज सलत असेल काळीज तुझं
पण त्या दुखण्याला तू भिऊ नकोस

शक्य आहे त्या व्यक्तीला तुझ्या
प्रेमाबद्दल कधीच कळणार नाही
बहरलेल्या बगीच्यातलं तिला
एकही फुल मिळणार नाही

पण सरते शेवटी तुलाच वेड्या
एक आगळीक समाधान मिळेल
कारण तेव्हाच तुला
"निर्व्याज" प्रेमाचा खरा अर्थ कळेल..

Monday, August 27, 2012

जनरेशन गॅप आणि शीलाची scientific जवानी..


मला लहान मुलांशी कधीच छान गप्पा मारता येत नाहीत. कारण, मला किती वयाच्या मुलाशी काय गप्पा मारलेल्या त्याला आवडतील, हे अजून समजत नाही. "सुशांत दादा/काका/मामा लई बोर गप्पा मारतो" असं मग तो सगळ्यांना सांगत फिरेल, अशी भीती माझ्या मनात बसली आहे!

मध्ये मी माझा पुतण्या, तन्मयशी बोलत होतो. "काय मग तन्मय, कितवीत गेलास तू आता?" मी त्याला विचारलं. सगळी मोठी माणसं, लहान मुलांना पहिला हाच प्रश्न विचारतात, म्हणून तो अगदीच सेफ प्रश्न होता. "सातवीत." तन्मय म्हणाला. "अरे वाह!.." मी म्हणालो. पण पुढे काय..?! काय बरं विचारता येईल सातवीतल्या मुलाला..? 'मग, सातवीच्या स्कॉलरशिपला बसणार का?' नको! उगंच कशाला अपेक्षांचं ओझं! आणि आई-वडील सोडले तर अजून कोणालाही तुमच्याकडून कसल्याही अपेक्षा नसतात! अर्थात हे कळायला मोठं व्हावं लागतं म्हणा! पण असो. हा प्रश्न नको. मग मी आठवू लागलो, मला लहानपणी लोकांनी काय प्रश्न विचारले होते.. 'मग, सहावीत, वार्षिक परीक्षेत गणितात किती मार्क पडले तुला..?' मोठी माणसं हा प्रश्न का विचारतात मला अजून कळत नाही. मला इतर विषयांप्रमाणेच गणितात मार्क मिळायचे ('चांगले का वाईट?' हा मुद्दा या लेखाच्या स्कोपच्या बाहेरचा आहे!). त्यांच्या लहानपणी त्यांची गणितात विकेट उडाली, म्हणजे सगळ्यांचीच उडायला पाहिजे काय? आणि जर माझीही गणितात विकेट उडली असेल, तर ते ऐकून त्यांना कसला आनंद मिळणार आहे...?! असो. हा पण प्रश्न नको. सातवी...सातवी..सातवी.. मी आठवू लागलो आणि अचानक माझ्या डोक्यात ट्यूब पेटली! "तुला मोठेपणी कोण व्हायचंय..?"

आम्ही सातवीत असताना हा आमचा लाडका चर्चेचा मुद्दा होता! "तुला मोठेपणी कोण व्हायचंय..?" आमच्या ग्रुप मध्ये आम्ही एकमेकांना विचारायचो. आमच्या एका मित्राला आर्मी जॉईन करायची होती. सौरभ  नावाचा मित्र म्हणायचा, मला कॉम्पुटर इंजिनियर व्हायचं आहे. त्याकाळी कॉम्पुटर मधला पत्त्याचा गेम सोडून बाकी ते काय असतं, कोणालाही माहिती नव्हतं. त्याला "का रे?" विचारल्यावर म्हणायचा, "माझे बाबा म्हणाले, कॉम्पुटर इंजिनियर झाल्यावर जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस होता येतं!" तर एकाला ओपन हार्ट सर्जन व्हायचं होतं.. "ए, ओपन हार्ट सर्जन म्हणजे काय?"..आम्ही विचारायचो... "ऑपरेशन करताना हृदय कापून उघडून ठेवतात!" हे त्याचं उत्तर! ..."बाप रे! का रे?"... "अरे म्हणजे कुठे बिघाड झालाय सरळ सरळ दिसतं..! पण खूप नाजूक काम असतं बरंका..!"... हे असे आम्ही होतो सातवीत असताना! ('आता ते माझे मित्र काय करतात?'..'त्यांची स्वप्नं पूर्ण झाली का?'.. 'सौरभच्या बाबांचं सध्याचं काय मत आहे?'.. हे प्रश्न प्रस्तुत लेखाच्या आवाक्याबाहेरचे आहेत. त्यांच्या उत्तरासाठी दुसरं काहीही रिफर करू नये. कारण त्याबद्दल काहीही लिहिले जाणार नाहीये..!)

"मग तन्मय, मला सांग, तुला मोठेपणी कोण व्हायचंय..?" मी तन्मयला विचारलं. तो म्हणाला, "फॅशन डिज़ाइनर"! मला शास्त्रज्ञ, सैनिक, डॉक्टर, सचिन तेंडूलकर, स्टीव जॉब्स, नरेंद्र मोदी, आमीर खान, सलमान खान, युसेन बोल्ट, मायकल फेल्प्स, अण्णा हजारे, पु.ल.देशपांडे, सोनू निगम, झाकीर हुसैन, गिरीश कुलकर्णी, संदीप खरे, गुरु ठाकूर, अजय-अतुल... यापैकी कुठलंही उत्तर चाललं असतं. म्हणजे मी त्याची मानसिक तयारी ठेवली होती! पण सगळं सोडून फॅशन डिज़ाइनर? तेसुद्धा सातवीत?!  काहीतरी मलाच समजत नव्हतं. तरी मी त्याला शांत राहून म्हणालो, "फॅशन डिज़ाइनर? अरे वाह! आत्तापर्यंत मला कोणीच असं उत्तर दिलेलं नाहीये.. (जसं काय मी सातवीतल्या मुलांचे इंटरव्यू घेत फिरत होतो!). पण का रे? असं या प्रोफेशन मधे काय आहे, जे तुला सगळ्यात आवडतं..?" तन्मय म्हणाला, "काहीतरी अलौकिक शोधून काढण्याची शक्यता..!" आता मात्र कंप्लीट बाउन्सर बॉल होता! त्याला शान्स्त्रज्ञ म्हणायचं होतं का? पण त्यात गैरसमज करण्याएवढाही तो लहान नाहीये, असं मी स्वत:ला समजावलं. मग 'काका', 'कोणीतरी मोठा' आणि तत्सम इगो बाजूला ठेवून मी त्याला म्हणालो, "मला नाही रे कळत आहे.. जरा समजावून सांगतोस..?"

तन्मय हसला. मला म्हणाला, "काका मला सांग, तू 'शीला की जवानी' गाणं बघीतलं आहेस?" मला धक्काच. हो म्हणू का नाही म्हणू...मी विचार करू लागलो.. मी कधी बघत असताना तन्मयने मला बघीतलं होतं की काय..! शेवटी, जाऊदेत असा विचार करून म्हणालो, "हो..बघितलंय बहुतेक.. ते टीव्हीवर अधून मधून लागतं.. छान आहे म्युसिक त्याचं.. विशाल-शेखरचं! आणि सुनिधी चौहान तर मस्तच गाते..!". मी जरा जास्तच सज्जनपणाचा आव आणला. पण आणायलाच पाहिजे होता. काहीही झालं तरी पुतण्या आहे माझा तो! "त्यात बघ कतरिनाचा तो ड्रेस आहे. तिने पांढरा शर्ट घातलाय. त्यावर काळा टाय. छोटी काळी शॉर्ट्स आणि वर हॅट... त्यात कशी दिसलीय सांग कतरिना..?" आता मात्र कहर झाला होता! मी काय उत्तर देणं अपेक्षित होतं त्याला?! माझ्या बुद्धीची चक्र पुन्हा जोरात फिरू लागली.. इयत्ता सातवी.. इयत्ता सातवी.. काय काय शब्द माहिती असतात सातवीत असताना..? त्यात जनरेशन गॅप चा थोडा अलाऊवन्स... मी विचारलं, "छान?"...... "बरोब्बर!" तन्मय म्हणाला. मी मनातल्या मनात "हुश्श" केलं.. पुढे तो म्हणाला तर, "त्या कपड्यात अशी काय स्पेशल बाब आहे, ज्याने कतरिना जरा जास्तच छान दिसते, हे फॅशन डिज़ाइनर शोधून काढतो!"... "म्हणजे?"... "म्हणजे बघ काका, हॉटेल मधला वेटर पण काळा टाय घालतो, पण तो कधी इतका छान दिसतो का? आमचे समोरचे काळे काका, रोज काळी चड्डी घालून ग्राउंडला चकरा मारत असतात. पण त्यांच्याकडे कोणी बघत बसतं का?! चार्ली चॅप्लिन काळी हॅट घालायचा. तो ग्रेट होता. पण त्याला कधी कोणी सुंदर म्हणायचा का? आणि तू!..." "मी काय?!"... "परवा काकी तुला म्हणत होती ना, इतके पांढरे शर्ट घालतोस तू, की लोकांना वाटेल एकंच शर्ट आहे ह्याच्याकडे! जरा रंगीत घालत जा..! मग पांढरा शर्ट, काळा टाय, डोक्यावर हॅट, काळी शॉर्ट्स आणि एका स्त्रीचा कमनीय बांधा...".. मी आवंढा गिळला.. "ह्या गोष्टी एकत्र आल्यावर अशी काय जादू होते, की ती व्यक्ती "छान" दिसते.. "खूप खूप छान" दिसते..? हे फॅशन डिज़ाइनर शोधून काढतात.. आणि तसे कपडे डिज़ाइन करतात.."

मी तन्मयकडे अवाक होऊन पाहत होतो.. त्याच्या विचार शक्तीचं मला खूप कौतुक वाटलं. मी कधीच असा विचार केला नव्हता..! अगदी उत्स्फूर्तपणे मी त्याची पाठ थोपटली! पण मला समाधान होतं की "छान" आणि "कमनीय बांधा" पलीकडचे शब्द तन्मयला ठाऊक नाहीयेत.. कदाचित मराठी मीडियम मध्ये असल्याचा परिणाम असेल.. खरं सांगतो, मलाही ह्याच्या पुढचे शब्द सातवीत असताना ठाऊक नव्हते! ('ते कधी ठाऊक झाले?', हा प्रश्न प्रस्तुत लेखाच्या आवाक्याबाहेरचा आहे!) जाता जाता तन्मय म्हणाला, "तुला थोडक्यात सांगू का काका...? निर्जीव वस्तू हॉट कधी होते हे थर्मल साइंटिस्ट शोधतो.. आणि सजीव वस्तू हॉट कधी होते, हे फॅशन डिज़ाइनर शोधतो..!" मी कपाळाला हात लावणं तेवढं बाकी राहिलं होतं...

Monday, July 30, 2012

(न) झिजणाऱ्या चपला


कुठल्याही सरकारी कार्यालयात कामासाठी जाणं आपल्याला अगदी जीवावर येतं. याचं कारण आपल्याला खात्री असते, की तिकडे आजच्या दिवसात आपलं काम होणार नाहीये! म्हणजे 'एयरपोर्टवर गेल्यावर आपली फ्लाईट डिले झाली असणार', 'अंगणात खेळायला सोडलेलं बाळ सगळं सोडून माती खाणार' किंवा 'महेश कोठारेच्या सिनेमात त्याची जीप पंक्चर होऊन मग तो "डॅमिट" म्हणणार!', हे सगळं आपण जितक्या खात्रीने सांगू शकतो, अगदी तितक्याच खात्रीने आपल्याला माहिती असतं की सरकारी कार्यालयात आजच्या दिवसात काही आपलं काम व्हायचं नाही..! काही लोकं तर सरकारी कार्यालयाच्या एवढ्या खेपा मारतात, की त्यांच्या चपला झिजून, शेवटी खाली भोक पडून जेव्हा तापलेल्या रस्त्याचा तळपायाला चटका बसतो, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आधीच शंभराची नोट सरकवायला हवी होती! कित्येक लोकांच्या चपला झिजतात, पण सरकारी कार्यालायचा उंबरठा कधी झिजल्याचं ऐकिवात नाहीये. त्यामुळे रस्ते किंवा पूल बांधताना जरी कमी दर्जाचं मटेरिअल वापरलं जात असलं, तरी सरकारी कार्यालयाचे उंबरठे बनवताना भ्रष्टाचार किंवा हलगर्जीपणा कधीही होत नाही..! तेव्हा यापुढे जेव्हा लोकं मला तावातावाने विचारतील, "मला एक जागा सांग भारतात, की जिकडे भ्रष्टाचार होत नाही" तेव्हा "सरकारी कार्यालायचा उंबरठा" असं उत्तर द्यायचं मी मनाशी पक्कं केलं आहे..!

पण जगातलं सगळ्यात मोठं तत्वज्ञान जर तुम्हाला अनुभवायचं असेल, तर सरकारी कार्यालायासारखी दुसरी जागा शोधूनही सापडणार नाही! 'अपेक्षा ठेवली तरच दु:ख वाट्याला येतं, नाहीतर जग हा सुखाचा महासागर आहे..'! ह्याच विचाराचा प्रत्यय आपल्याला सरकारी कार्यालयात येत असतो! आपण काम असलं तरच सरकारी कार्यालयात जातो, आणि इथेच चुकतो! कधी काही काम, काही देणं-घेणं, काही अपेक्षा नसताना सरकारी कार्यालयात जाऊन बघा. तुम्हाला वेगळ्याच विश्वाचं दर्शन जर नाही झालं, तर तुम्हाला पुन्हा झिजवायला नवीन चपला मी घेऊन देईन!

खास फर्निचर्स बघायला सरकारी कार्यालयात जायचं. तिथली फर्निचर्स अगदी खास करवून घेतलेली असतात. म्हणजे बघा, तिथली जी डेस्क असतात, ती खूप उंच असतात आणि त्या पलीकडे जो माणूस बसलेला असतो, तो अगदीच खाली असतो. म्हणजे आपल्याला टाचा उंच करून त्याच्याकडे बघावं लागतं. आता असं का असतं, याबद्दल बरेच मतभेद आहेत. कोणी म्हणतं कामचुकारपणा बघून जर कोणाचं डोकं फिरलंच, तर हात सहजासहजी त्या पलीकडे बसलेल्या माणसाच्या गालापाशी पोहोचू नये, म्हणून असं खास बनवून घेतलेलं असतं! तर कोणी म्हणतं, की ते डेस्क जर कमी उंचीचं असेल तर त्यावर सामान्य माणसांना हात ठेवता येतील, आणि बऱ्याच वेळ समोरून उत्तरंच आलं नाही, तर काहीतरी विरंगुळा म्हणून माणसं त्यावर तबला वाजवत बसतील, म्हणून ते उंचावर असतं! पण मला सगळ्यात पटलेली थिअरी म्हणजे, प्रत्येक आलेल्या माणसाकडे चष्म्याच्या वरून बघून "काय कटकट आहे" असा खास "सरकारी" चेहेरा करण्यासाठी एवढा सगळा खटाटोप केलेला असतो! तिथल्या कपाटांना कधीही न लागणारी अशी वेगळी दारं केलेली असतात, जेणेकरून आतल्या रजिस्टरच्या गठ्ठ्यांकडे  लोकांची नजर जावी आणि आपला कामसूपणा त्यांच्या डोळ्यात भरावा, यासाठी केलेली ती खास युक्ती असते. कपाटांवरही रजिस्टर्स ठेवायला जागा असते. त्या रजिस्टर्सची पानं गळायच्या तयारीत असतात. त्यावरच्या पुसटश्या रेघा वाळक्या पर्ण वाहिन्यांसारख्या दिसत असतात. तिथे नव्याने पालवी यायची जरासुद्धा शक्यता नसते...!

सरकारी कार्यालयात गेल्यावर पेशवे पार्कमध्ये गेल्यासारखं वाटू शकतं! आपण खूप उंचीवरून त्या खाली कॉम्पुटरमध्ये डोळे घातलेल्या माणसाकडे बघत असतो. आपण त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतो. पण तो आपल्याकडे ढुंकूनही बघत नाही. तो ऐकून न ऐकल्यासारखा करतोय, का त्याला आपली भाषा समजत नाहीये, कळायला मार्ग नसतो. तो खूप कामात असल्यासारखा वाटू शकतो, पण त्याच्या कॉम्पुटरकडे वरून  बघितल्यावर तो Pentium 1 असून, तो माणूस Windows 95 वर Solitair किंवा Minesweeper खेळत असल्यासारखा वाटतो. त्याचं लक्ष आपल्याकडे वळवून घ्यायला आपल्याला त्याला पॉपकॉर्न किंवा खारेदाणे टाकायची इच्छा होऊ शकते, पण तसं न केलेलंच बरं! काही वेळाने देवाच्या कृपेने आणि आपल्या नशिबाने तो आपल्याकडे बघतो. क्षणभर आपला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. पण तो लगेच बसवावा लागतो, कारण तो आपल्याकडे क्षणभरच बघणार असतो! आपण त्याला आपला प्रश्न विचारतो आणि तो काही न बोलतो एक मळकट फॉर्म आपल्या हातात देतो. आपल्या प्रत्येक प्रश्नाला त्याच्याकडे एक मळकट फोर्म असतो..!

आपल्याकडे शाई पेन असेल तर ते पेन कागदावर टेकवताच शाई पसरायला सुरुवात होते. आपल्याकडे बॉलपेन असेल, तर लिहायला लागताच त्या कागदाला भोक पडतं! आपण केविलवाण्या नजरेने मग आजूबाजूला बघतो. प्रत्येकाची तशीच धडपड चालू असते. ते बघून जीवनातलं आपण "To err is human" हे दुसरं मोठं तत्वज्ञान तेव्हा शिकतो! तुम्ही कितीही उच्च शिक्षित असाल, तरी त्या फॉर्मवर असा एकतरी प्रश्न निघतोच, की ज्याचा अर्थ तुम्हाला कळत नाही.  माणसांना जमिनीवर आणण्याचे मोठं काम ते फॉर्मस करत असतात. आपल्या मनात त्याच्याकडे जाऊन शंका विचारण्याचा विचार येतो, पण त्याचा त्रासिक चेहरा डोळ्यासमोर येऊन आपण अंदाज पंचेच त्याचं उत्तर लिहितो आणि फॉर्म पूर्ण करतो..!

"उद्याच्याला या. साहेबांची सही घेऊन ठेवतो." पुन्हा रांगेत उभं राहून त्याला फॉर्म दिल्यावर त्याचं असं उत्तर येतं. "पण साहेब तर केबिनमधेच आहेत ना? आज नाही का होणार..?" असं काहीतरी आपण विचारायचा प्रयत्न केला, की आपल्याला अपमानाची तयारी ठेवावी लागते! आपण अपेक्षा ठेवतो आणि म्हणूनच दु:ख आपल्या पदरात पडतं. "एकदा सांगितलं ना तुम्हाला, उद्या या! साहेब बिझी आहेत. तुमच्या सारखे शंभर फॉर्म आहेत या टेबलवर! साहेबांनी काय बाहेर येऊन सह्या करत बसायचं का?"! आपलं त्याने दाखवलेल्या त्या शंबर फॉर्मस च्या गठ्ठ्याकडे लक्ष जातं. त्याला पांढऱ्या नाडीने बांधलेलं असतं. त्या माणसाच्या लेंग्याचं काय झालं असेल, असा विचार मनात येऊन आपण टाचा अजूनच उंच करून बघतो! पण त्याने लेंगा घातलेला नसतो. आपण उदास चेहेर्याने त्या सरकारी कार्यालयाबाहेर पडतो.

दुसऱ्या दिवशी गर्दी टाळायला आपण भर सकाळी जातो. बहुतेक सगळ्यांनी आपल्यासारखाच विचार केलेला असतो. त्यामुळे ऑफिसला जायच्या आधी ते सरकारी कार्यालय भाजी-मंडई सारखं भरलेलं असतं. पुन्हा मोठ्या रांगेत थांबून, ऑफिसला थोडा उशीर करून आपला एकदाचा नंबर लागतो. आपल्या फॉर्मवर साहेबांनी वेळात वेळ काढून सही केलेली असते. "संध्याकाळच्याला या. शिक्का मारून मिळेल!" हे ऐकून आता आपलं डोकं बधीर व्हायची वेळ आलेली असते. 'अहो, तुमच्या शेजारी शिक्का आहे. त्याच्या शेजारी शाई आहे. तुम्हाला कितीसा वेळ लागणार आहे? तुम्हाला जमत नसेल तर मी स्वत: मारून घेतो!" असं चिडून म्हणायची मनात खूप इच्छा निर्माण होते. पण कालच झालेला अपमान ताजा असतो. त्यामुळे आपण शेळीसारखा चेहरा करून तिथून निघून जातो. बाहेर जाताना दारावर हसऱ्या गांधीजींचा फोटो लावलेला असतो. त्याच्या शेजारच्या भिंतीवर धीर-गंभीर लोकमान्य टिळकांचा फोटो असतो. सगळे आदर्श, सगळ्या आकांक्षा त्यावेळी गळून पडतात आणि रागारागाने आपण ऑफिसला निघून जातो.

ऑफिसमध्ये मग आपला चर्चेचा विषय असतो सरकारी कार्यालये, त्यातला ढिसाळ कारभार, भ्रष्टाचार, आपल्या इन्कम टॅक्स चा गैरवापर आणि देशाची अधोगती. मग आपल्या लक्षात येतं, आपल्या मित्राला एका दिवसात सही, शिक्का आणि रिसीट सगळंच मिळालं! तो आपल्याला मग आपण किती साधे आहोत यावर चिडवतो. दुसऱ्या दिवशी सख्ख्या मित्राच्या नात्याने आपल्या बरोबर त्या सरकारी कार्यालयात येतो. आपला नंबर आल्यावर समोरच्या माणसाला हळूच म्हणतो, "साहेब, संध्याकाळी चहाला थांबा ना.." पुढच्याच क्षणी आपल्या फॉर्मवर शिक्का बसलेला असतो आणि आपल्या हातात रिसीट असते!

संध्याकाळी आपण "चहाला" भेटतो. तो माणूस पहिल्यांदाच आपल्याला पूर्णपणे दिसतो. त्याने लेंगा घातलेला नसतो. तुमच्या आमच्या सारखा साधाच असतो तो दिसायला. आपण आपल्या खिशातली एक नोट काढून त्याला देतो. नोटेवरचे गांधीजी आपल्याकडे बघून हसत असतात. त्या क्षणी आपल्या चपलांचं झिजणं थांबतं आणि तो माणूस क्षणार्धात समोरच्या गर्दीत नाहीसा होतो..