Sunday, February 19, 2012

माझ्या लग्नाची गोष्ट..

'लग्न म्हणजे काय हो?' असा प्रश्न कोणा मोठ्यांना विचारला, तर त्याचं उत्तर, 'अरे लग्न म्हणजे देवा-ब्राम्हणांच्या साक्षीने झालेला दोन जीवांचा सुरेख मेळ असतो!' असं साखरेत घोळवून दिलेलं आणि अगदी पुस्तकी मिळायची शक्यताच जास्त असते! हे उत्तर चुकीचं नक्कीच नाहीये. पण हे अर्धवट उत्तर आहे! मला विचारलंत, तर त्याचं खरं उत्तर - 'लग्न म्हणजे दोन जीवांचा मेळ आणि शे-दोनशे जीवांचा एक उत्सव असतो.!' असं मी देईन. या उत्तराचा साक्षात्कार होण्यासाठी साक्षात लग्न करून पहावं लागतं! आणि तो योग नुकताच माझ्या आयुष्यात आला होता...!

माझं लग्न जेव्हा काहीच दिवसांवर येऊन ठेपलं, तेव्हा मी पु.लं च्या नारायणाचा विचार करत होतो. माझ्या लग्नात कोण बरं असेल नारायण..? माझा मित्र असेल, की भाऊ असेल..? का तो दादा असेल..? कोणीतरी आनंदाने नारायण व्हावं आणि हा धाकधुकीचा लग्न-समारंभ व्यवस्थित पार पाडून द्यावा अशी मनाशी मी इच्छा धरली होती. पण जसे लग्नाचे विधी सुरु झाले, तसे हा 'नारायण' मला सहस्ररूप दर्शन द्यायला लागला! भेटणाऱ्या प्रत्येकात, म्हणजे अगदी, आई, वडील, बहिण, भाऊ, आजी, आजोबा, काका, काकू, मामा, मामी, मावश्या, आत्या, शेजारी-पाजारी, मित्र-मंडळी, त्यांचे आई-वडील, कामवाल्या बाई, पूजा सांगणारे गुरुजी, हॉलवाला, फोटोवाला, व्हिडियो शूटिंगवाला, न्हावी, ज्वेलर्सवाला, दुकानदार आणि अशी इतर बरीच मंडळी.. या सगळ्यांच्यात मला एक नारायण दिसायला लागला होता!

मी जवळपास महिन्याभराची सुट्टी घेऊन लग्नासाठी भारतात जाणार होतो. तशी सगळी तयारी झाली होती. विचार केला केस कापून जाऊयात. म्हणजे लग्नाच्या वेळेपर्यंत तसे बऱ्यापैकी वाढतील. नाहीतर अजून एक वीस वर्षांनी माझी मुलं मला लग्नाचे फोटो बघत 'बाबा लग्नापासूनच तुम्हाला जरा केस कमीच होते का हो..?' असा प्रश्न विचारतायत असं चित्र माझ्या डोळ्यासमोर येऊन गेलं! माझा इथला नेहेमीचा 'अहमद' नावाचा जॉर्डन देशाचा न्हावी आहे. त्याचा गिऱ्हाईक, हा फक्त केस कापायचे नाही तर केस कापून होईपर्यंत सतत बडबड करून मनोरंजन(!) करायचे पण पैसे देतो असा समज आहे! म्हणून गिऱ्हाईक त्याच्या तावडीत असेपर्यंत तो मोडक्या-तोडक्या इंग्लिशमध्ये त्याच्याशी बोलत असतो. पण धीर-गंभीर माणसांपेक्षा गप्पिष्ठ माणसं परवडली, या हेतूने मीही आनंदाने त्याच्याशी माझ्या मोडक्या-तोडक्या इंग्लिशमध्ये बोलत असतो. आमचे उच्चार कमालीचे वेगळे आणि भाषेची दोघांची बोंब असूनही आम्हाला एकमेकांचं सगळं बोलणं कसं समजतं ह्याचं मला नेहेमी आश्चर्य वाटत आलंय..! त्याला त्या दिवशी मी सांगितलं की माझं अजून एका महिन्याने लग्न आहे, त्यामुळे केस खूप बारीक करू नकोस. महिन्याभरात वाढतील असं बघ. तेव्हा मला माझ्या पहिल्या नारायणाचं दर्शन झालं! मुसलमान असला म्हणून काय झालं, नारायणंच होता तो! त्याने सगळ्यात आधी मला मिठी मारून माझं अभिनंदन केलं! मग खूप विचार करतोय असे काहीतरी भाव चेहेऱ्यावर आणले आणि मला म्हणाला, "मिलीमीटर मध्ये हिशोब केलाय मी! असे केस कापतो की लग्नात तू हिरोच दिसशील! भारतात गेलास की तुझ्या तिकडच्या नाव्ह्याला कात्रीला हात लावून देऊ नकोस! केस फक्त ट्रीम करायला सांग त्याला." एवढया आत्मविश्वासाने आमच्या क्षेत्रातले तज्ञ, माझे प्रोफेसर सुद्धा असं कधी बोलत नाहीत! मग केस कापताना त्याने मला मी लग्नात कसा गडद निळ्या रंगांचाच सूट घालावा, त्यावर निळ्या रंगाचा टाय आणि कसलातरी फिकट गुलाबी अथवा अलोबी रंगाचा शर्ट घालावा म्हणजे मी 'हिरो' दिसीन असं सांगितलं. त्यात त्याला गुलाबी म्हणजे नक्की कसा हे दाखवायचं होतं. ती शेड शोधायला त्याने त्याच्या दुकानातल्या सगळ्या क्रीमच्या आणि तेलाच्या बाटल्या चाचपडून बघितल्या. मग कुठल्या तरी बाटलीवर कोपऱ्यात त्याला तो रंग सापडला. आणि मग मीही लगेच, "हो, हो, मला कळला तो रंग!" असं त्याला म्हणालो आणि मग तो माझ्या बुटांकडे वळला! मग बूट किती टोकदार हवेत इथपासून मोजे कुठल्या रंगाचे आणि कसल्या कापडाचे घाल इथपर्यंत त्याने मला सगळं सांगितलं! पण त्याने केस मस्त कापून दिले म्हणून मी खुश होतो! त्यालाही त्याने मन लावून केलेलं काम आवडलं असावं. शेवटी त्याने त्याच्या कॅमेरात टायमर लाऊन आमच्या दोघांचा एक आठवण राहावी म्हणून फोटो काढला! नेहेमीची २० मिनिटांची कटिंग यावेळी पूर्ण तासभर चालली. माझ्यानंतर येऊन ताटकळत थांबलेला एक बिचारा माणूस वैतागून निघूनही गेला. पण त्याची अहमदला पर्वा नव्हती..!

मी घरी जायच्या कितीतरी आधीपासून आई, वडील आणि धाकटी बहिण माझ्या लग्नासाठी राबत होते. पत्रिकेचं डिजाईन ठरवणं, त्यावरचा मजकूर निवडणं, त्या छापून आणणं, बऱ्याचश्या लोकांना जाऊन नेऊन देणं, लग्नाची बरीचशी खरेदी, द्यायच्या भेटवस्तू, लग्नाचा हॉल बुक करणे, पूजा सांगणाऱ्या गुरुजींची appointment घेणं!, यासारखी बरीचशी कामं त्यांनी आधीच करून ठेवली होती! मी घरी आलो आणि माझ्या हातात एक मोठ्ठी यादी पडली! "ह्यांच्याकडे केळवणाला जायचं आहे. कोणाकडे कधी ते तू ठराव. सगळ्यांना शनिवार-रविवार जास्त सोयीचे आहेत." इति. - आई. एवढे कमी दिवस आणि एवढी केळवणं! लग्नात (त्यातल्या त्यात) छान दिसावं, म्हणून मी वजन कमी करायचे केविलवाणे प्रयत्न करून आलो होतो. आणि आता एवढया सगळ्यांकडे आग्रहाचं आणि प्रेमाचं जेवण जेवायचं म्हणजे माझं काही खरं नव्हतं!

हा हा म्हणता केळवणं सुरु झाली. गोडधोड पदार्थांचा माझ्यावर जणू माराच होत होता. अगदी खरं सांगायचं तर मी आता लग्नात आणि त्या फोटोंत कसा दिसीन ह्याची मला जरासुद्धा फिकीर नव्हती! जगात 'गोड' ही एकटीच चव अस्तित्वात असती, तरी मी अगदी मजेत जगलो असतो! 'अन्न हे पूर्णब्रम्ह' म्हणत मी सगळ्यावर ताव मारत होतो. हे माझ्या धाकटया बहिणीच्या बहुतेक लक्षात आलं! तिने मला 'लग्न कसं एकदाच होतं' आणि त्याचे फोटो चांगले येणं हा कसा जन्म-मरणाचा प्रश्न असतो हे समजावलं! हे फक्त तिचंच नाही तर माझ्या आत्ये-मामे बहिणींचं आणि माझ्या होणाऱ्या बायकोचंही म्हणणं होतं! म्हणजे यावरून आज-कालच्या मुलींना 'जोडीदार कसा का मिळो, लग्नाचे फोटो चांगले आले पाहिजेत!' असं वाटतं की काय अशी मला शंका आली! पण एकंदर मी जरा बेतानेच खावं यावर घरी सगळ्यांचं एकमत झालं. मग त्यावर आमच्या आत्याने असं सुचवलं की लोकं सहसा केळवणाला बोलावताना विचारतात की काय खायची इच्छा आहे मुलाची. तेव्हा म्हणायचं, "अहो एवढी केळवणं चालू आहेत .. सगळं काही खाऊन झालंय आता माझं! त्यामुळे साधंच काहीतरी करा!" सुरुवातीला ही युक्ती छान चालली. पण नंतर अचानक लोकांनी हा प्रश्नच विचारणं बंद केलं! त्यावरून माझ्या लग्नाची चर्चा आता गावभर होतीय आणि त्यामुळे सगळ्यांनाच आम्ही तेच उत्तर देतोय हे लोकांना कळलं असावं की काय असं मला वाटून गेलं!

पण हे सगळं चालू असताना मी एक वेगळीच गोष्ट अनुभवली. मी केळवणाचं जेवण जेवत असताना बाकी सगळ्यांच्या चेहेऱ्यावर कृतकृत्य झाल्याचे भाव असायचे. जो तो माझ्याकडे कौतुकाने पाहत असायचा. त्यांना जणू गंगेत जाऊन डुबकी मारून आल्यासारखं वाटत होतं! एवढं का सगळ्यांचं प्रेम एकाच वेळी उतू जातंय हे मला समजत नव्हतं! कदाचित आता हा निर्विकारपणे बायकोच्या मुठीत जाऊन बसेल आणि एकाएकी अदृश्य होईल अशा भीतीने, 'जोपर्यंत आपला आहे तोपर्यंत crash-course स्वरूपाचं प्रेम करून घेऊन' असा विचार प्रत्येकाने केला असावा! त्यावेळी अगदी 'रात्र थोडी आणि सोंगं फार' अशी परिस्थिती होती. खूप जणांकडून आग्रहाचं निमंत्रण होतं आणि लग्नाचे विधी जवळ आल्याने सगळ्यांकडे जाणं शक्य नव्हतं. मग लोकं 'सकाळी नाश्त्याला ये, मस्त पोहे करतो', 'दुपारच्या चहाला ये, तेवढ्याच गप्पा होतील' यावर आली. एक काकू तर आईला 'अहो सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा पाठवा त्याला!' असं म्हणाल्या. त्यावर, "प्रातर्विधीसाठी आलो तर चालेल का, विचार त्यांना!" असं मी आईला म्हणालो! तेव्हा 'मुलाचं जरा लवकरच लग्न करतीय का काय?' अशी आईला आलेली शंका तिच्या चेहेऱ्यावर मला स्पष्ट दिसून गेली!

लग्नाच्या आधीचे विधी सुरु झाले आणि मला लहानपणी पोरांना मांडी घालून का बसायला लावतात ह्याचं उत्तर मिळालं! प्रत्येक पूजा दीड ते दोन तास चालायची आणि प्रत्येक पूजेला माझ्या पायाला मुंग्या यायच्या! पूजा सुरु होऊन एक-पंधरा मिनिटं झाली की माझी चुळबूळ सुरु व्हायची आणि आमचे गुरुजी मिशीतल्या मिशीत हसायचे. मी त्यांना एकदा न राहून विचारलंच की अहो तुमचे पाय कसे नाही दुखत? त्यावर ते म्हणाले, "अरे आम्ही जेव्हा लहानपणी आश्रमात पूजा सांगण्याची शिक्षा घेत होतो, तेव्हा आम्हाला आठ-आठ तास मांडी घालून बसायला लागायचं!" तेव्हा, 'शिक्षणाला 'शिक्षा घेणं' का म्हणतात' हे कळण्यासाठी तुम्ही इंजिनियरिंगच केलं पाहिजे असं काही नसतं, हे मला पटलं! एका कुठल्यातरी पूजेला तर मधे होमपण पेटवला होता. घरात सगळीकडे नुसता धूर! त्यामुळे पायाला मुंग्या आणि डोळ्यातून घळाघळा पाणी वाहतंय अशी माझी अवस्था झाली होती! मी गुरुजींना विचारलं, "काय हो, पायाच्या मुंग्या जायला हा धूर केलाय का?"! त्यावर त्यांनी क्षणभर डोळे मोठे केले, मग लगेचच स्मित हास्य पण केलं. पण हे सगळं करताना तोंडाने मंत्र म्हणायचे काही ते थांबले नव्हते!

ह्या सगळ्या पूजा चालू असताना मी आणि आई-वडिलांनी अगणित वेळा आचमन केलं असेल! गुरुजी "ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः..." म्हणायला लागले की छोट्याश्या पळीने तीन वेळा पाणी प्यायचं आणि एक वेळा ताम्हणात सोडायचं, असा तो उपक्रम असतो. दर दोन मिनिटांनी गुरुजींचं "ओम केशवाय नमः.." सुरु व्हायचं, आणि आम्ही निमुटपणे पाणी प्यायचो. त्यात घरात काही जीवांची लुडबुड सुरु असायची. कोणी पंचा आणून देतंय, कोणी तांब्यात पाणी, कोणी आंब्याची डहाळी, कोणी सुट्टे पैसे, तर कोणी सुपाऱ्या. स्वयंपाकघरात पूजेच्या जेवणाची तयारी चालू असायची. त्यातही काही जीवांची लुडबुड! 'या शुभ कार्यासाठी माझा हातभार लागतोय' ह्यातच सगळ्यांना आनंद वाटत होता.. गुरुजींना मी अमेरिकेला शिकतोय हे कळल्यावर माझी दया आली! आता ह्याच्या नशिबात अजून किती पूजा असतील कोण जाणे! असा विचार त्यांच्या मनात आला असावा. पूजा संपल्यावर त्यांनी "आपण आत्ता ही पूजा का केली माहितीय का?" असं मला विचारलं, आणि आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या पूजांचे अर्थ सांगायचा त्यांच्या परीने प्रयत्न केला..

सगळ्या गुरुजींच्या हातात HMT चं एकाच model चं एक जुनं घड्याळ असतं! मला या गोष्टीचं नेहेमी आश्चर्य वाटत आलंय. मी आमच्या गुरुजींना त्याबद्दल विचारलं, तेव्हा कळलं, की गुरुजी जेव्हा पूजा सांगण्याची शेवटची परीक्षा पास झाले तेव्हा त्यांना बक्षीस म्हणून कोणीतरी हे घड्याळ दिलं होतं आणि त्याचा त्यांना खूप अभिमान होता. यावरून माझ्या लक्षात आलं, की आत्तापर्यंत मी पाहिलेले सगळे गुरुजी साधारण एकाच वयाचे होते. त्यामुळे ते सगळे जेव्हा 'graduate' झाले असणार, तेव्हा कदाचित 'पूजा सांगणे' या communityत HMT च्या या घड्याळाची fashion असणार! पूजा संपल्यावर मी गुरुजींना वाकून मनापासून नमस्कार केला आणि लग्नासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले..

लग्नाचा हॉल तर बूक झाला होता. पण लग्नाच्या चार-पाच दिवस आधी जेवणाचा बेत पक्का करायला त्या हॉलवाल्याला भेटायचं होतं. त्याने प्रत्येक गोष्टीसाठी एवढे पर्याय देऊन ठेवले होते की, ते पर्याय तुम्हाला, हवं तसं जेवण निवडण्यासाठी नव्हे तर तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठीच दिले असावेत असं वाटावं! 'अळू भाजी की रस्सा भाजी?', 'पंजाबी भाजी घेणार का? असलात तर मटार पनीर का पनीर बटर मसाला?', 'मटकीची उसळ का बटाट्याची भाजी? त्यात बटाट्याच्या भाजीचे तीन प्रकार असतात! त्यातला कुठला?', 'भजी का बटाटेवडे? भजी कोणती घेणार?', 'साधा भात, मसाले भात का पुलाव?', 'स्वीट डीश मध्ये श्रीखंड आहे, आम्रखंड आहे, गाजर हलवा, जिलबी, सीताफळ रबडी, बासुंदी, रसमलाई आहे..', 'मठ्ठा घेणार का?' 'मग शेवटी आईस्क्रीम ठेवायचं का? कुठलं...?'! एवढे प्रश्न कोणी विचारले की मला करियर गायडन्ससाठी आलेल्या होतकरू तरुणांची आठवण होते. 'सायन्स, कॉमर्स का आर्टस?' इथपासून सुरुवात करून पुढे 'इंजिनिअरिंग का मेडिकल? मग त्यात कुठल्या ब्रान्चेस? बी.एस.सी, बी,बी,ए, बी.सी.ए, बी.फार्म,....' इत्यादी जगातल्या तमाम करियर ऑप्शन्सपैकी काय निवडू, असं विचारलं तर वैतागून 'तुला काय हवं ते निवड बाबा!' असंच आपल्याला सांगावसं वाटतं! पण आपण जसं न कंटाळता, त्याच्या आवडी निवडी जाणून घेतो आणि मग त्याला एक -दोन पर्याय सुचवून पाहतो, तसंच आपण त्या हॉलवाल्याला आपल्या एक-दोन आवडी-निवडी सांगून म्हणतो की आता तुम्हीच सुचवा, आणि त्यालाही तेच हवं असतं! त्याची पहिली दोन-तीन वाक्य अशी असतात की, "एक सुचवू का? सीताफळ रबडी किंवा बासुंदी वगैरे कशाला ठेवताय? त्याने एक तर ताटाची किंमत वाढते आणि ती खूप खाल्लीपण जात नाही! लोकांनी कसं तृप्त होऊन जेवलं पाहिजे. आणि आम्ही ताटानुसार किंमत लावतो. त्यामुळे कितीही जेवलं तरी काही हरकत नाही.." हे असं बोलल्यावर मग "तो विकायला बसलाय का विकत घ्यायला?' असा आपल्याला प्रश्न पडतो! मग पुढे तो, "हल्ली गाजर हलवा आणि आईस्क्रीम खूप हिट कॉम्बिनेशन आहे. पंजाबी ठेवणार असाल तर मटार पनीर ठेवा. मटार चा सिझन असल्यामुळे अगदी कोवळे आणि मस्त मटार आहेत बाजारात..!" खरं म्हणजे तेव्हा गाजर आणि मटार दोन्हीचा सिझन असतो. त्यामुळे त्याला अश्या गोष्टींवरच जास्तीत जास्त नफा कमावता येतो. पण हे आपल्याला सांगताना तो सांगतो की 'लोकं तृप्त होऊन भरभरून आशीर्वाद देतील!' आपल्याला त्याच्यात एका नारायणाची झलक दिसून येते आणि आपण चक्क त्याचं सगळं ऐकतोही..!

लग्नाला गुरुजी वेगळेच होते. 'आमचेच गुरुजी घ्यावे लागतील' असा हॉलचा हट्ट होता. हे म्हणजे 'बाहेरून खाद्यपदार्थ आणून प्रेक्षागृहात खाऊ नयेत. इथे मिळणारे पदार्थच घ्यावे लागतील.' अश्यातला प्रकार होता! लग्न लागणं सुरु झालं, तेव्हा गुरुजी, फोटोग्राफर आणि व्हिडियो शूटिंगवाला, ह्यांच्यातली केमिस्ट्री बघून मला ते तिघं एकमेकांचे अगदी कट्ट्यावरचे मित्र वाटले! लग्न सभागृह लोकांनी खच्चून भरलं होतं. त्यातही मी विधीचे सगळे मंत्र एकाग्रतेने ऐकून मनात साठवून ठेवायचा प्रयत्न करत होतो. मला ती प्रसन्नता अनुभवायची होती. कुठलातरी मंत्र म्हणून झाला आणि गुरुजी म्हणाले, "आता वधूला मंगळसूत्र घाला.." माझं मन क्षणभर गलबललं. मी मनाला खात्री पटवून दिली, की 'हो, आयुष्यातला 'तो' खास क्षण आता आलाय.." मी ते मंगळसूत्र अलगद उचलून हळुवार तिला घालायला गेलो. तेवढयात गुरुजी म्हणाले, "थांबा. तसेच थांबा! समोर बघा. हसा. एक फोटो घ्यायचाय!" शांत सुखाची झोप लागली असताना कर्कश्य गजराने मला जाग आल्यासारखं वाटलं! माझ्या 'त्या' खास क्षणाला त्यांनी क्षणार्धात साधं करून टाकलं होतं. कारण काय तर म्हणे 'लग्नाचे फोटो'! गुरुजी असं सांगतात का कधी, की 'आता फोटोला पोज द्या!'? राग आलेला असतानाही प्रसन्न हसायचा प्रयत्न मग मी त्या फोटोत केला!

लग्न लागून लोकांनी जेवायला सुरुवात केली की वधू-वराचा एक खास फोटोसेशन असतो. त्यात वधू-वर फोटोग्राफर आणि शूटिंगवाल्याबरोबर एका खोलीत जमतात आणि तिथे त्या दोघांचे अतिशय फिल्मी फोटो काढले जातात! माझं नशीब म्हणायचं की माझ्या बायकोने त्यांना स्पष्ट सांगितलं की, एकही 'फिल्मी' फोटो काढायचा नाही! त्यामुळे मी पहिल्यांदा आनंदाने फोटो काढून घ्यायला तयार झालो! आम्ही छान हसत उभे राहिलोय बघितल्यावर तो फोटोग्राफर फटाफट आमचे फोटो काढायला लागला. त्यावर त्या शूटिंगवाल्याने त्याला अडवत म्हटले, "अरे थांब की. आधी 'स्माईल चेक' कर!". तोही लगेच "हो, हो." म्हणत थांबला. आम्हाला दोघांना त्याने 'चीज' म्हणायला सांगितलं आणि मगच फोटोसेशन पुन्हा सुरु झालं. हा 'स्माईल चेक' काय प्रकार असतो असं विचारल्यावर आम्हाला कळलं की अशाच कुठल्याश्या लग्नात सगळे फोटो काढून झाल्यावर त्यांना समजलं होतं की त्या नवऱ्या मुलाचा एक कोपऱ्यातला दात किडला आहे! त्यामुळे त्यांना ते सगळे फोटो 'फोटोशॉप' मध्ये एडीट करायला लागले होते! आमचं 'स्माईल चेक' झालं आणि मगच आम्हाला लग्नाच्या फोटोंत दिलखुलास हसायची मुभा मिळाली!

लग्नात अजून एक मजेशीर प्रकार असतो. लग्न लागल्यावर लोकांनी वधू-वराला भेटायला, त्यांना शुभेच्छा, आशीर्वाद द्यायला स्टेजवर यायचं असतं. त्यासाठी नवरा-बायको कपडे बदलून येतात. आम्ही कपडे बदलून जेव्हा स्टेजवर पोहोचलो, तेव्हा आम्हाला भेटण्यासाठी एक मोठ्ठीच्या मोठ्ठी रांग लागली होती! दुपारचा मुहूर्त असल्यामुळे बहुतेक सगळी लोकं हाफ-डे घेऊन, नाहीतर त्यांच्या जेवणाच्या सुट्टीत आली होती. त्यामुळे त्या घाईत शुभेच्छा देण्यासाठी लोकं अक्षरश: आमच्यावर तुटून पडली. खरं तर त्यातल्या निम्म्या-अधिक लोकांना आपण ओळखत नसतो! कोणीतरी लांबचे नातेवाईक, ज्यांना आपण लहानपणी भेटलोय, ते आता इतक्या वर्षांनी आपल्याला भेटत असतात! आमचे आई-वडील होते आमच्या मदतीला, पण लोकांची रांग इतक्या जोरात पुढे सरकत होती, की त्यांचीही त्रेधा तिरपीट उडाली होती! भेटणाऱ्या प्रत्येकाची ओळख करून देणं अपेक्षित असतं, आणि ती झाली की दोघांनी वाकून नमस्कार करायचा असतो. समोरच्या व्यक्तीला ओळखणं, त्याची ओळख सांगणं आणि त्याच्या पाया पडून पुन्हा पटकन पुढच्या व्यक्तीची ओळख करून द्यायला उभं राहणं हे वाटतं तितकं सोपं नसतं! तिथे माझ्या बायकोने तर एका बाईची चक्क चुकीची ओळख सांगितली! "अरे, ही माझी ती बंगलोरची काकू..". त्यावर त्या बाई पटकन म्हणाल्या, "ए मी काही तुझी काकू नाही ग. मी तुझ्या आईबरोबर त्या पौड फाटा ब्रांचमध्ये होते!". त्यामुळे आम्हाला फारच ओशाळायला झालं! पण त्या रांगेच्या वेगाने ती काकू/मावशी आपोआप पुढे ढकलली गेली, आणि आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकला! भेटायला आलेल्या जवळपास प्रत्येकाला आम्ही वाकून नमस्कार करत असल्यामुळे जणू नमस्कार करायची सवयच लागून गेली होती. मी त्या ओघात समोर कोण आहे हे न बघता वाकलो आणि एका ११-१२ वर्षाच्या मुलीला चक्क वाकून नमस्कार केला! नमस्कारासाठी खाली वाकल्यावर माझ्या लक्षात आलं की आपण काहीतरी गोंधळ केलाय! त्यामुळे सारवासारव करायला मी तसाच वाकून उभा राहिलो. त्या मुलीला पुढे जाऊन दिलं. पुढचे येणारे पाय जरा प्रौढ गृहस्थाचे वाटले. त्यांना नमस्कार केला आणि मगच वर येऊन बघितलं की आपण नुकताच नक्की कोणाला नमस्कार केलाय ते..! मी उठून उभा राहिलो तेव्हा शूटिंग वाला माझ्याकडे बघून हसत होता! त्याने माझी फजिती बघितली होती. पण नंतर 'तू अजिबात काळजी करू नकोस. मी छान एडीट करीन." असे भाव त्याने चेहेऱ्यावर आणले आणि त्यातूनही एक नारायण डोकावला!

जशी आमची मजा येत होती, तशी ती भेटायला येणाऱ्या लोकांचीही येत होती! लोकं आम्हाला भेटायला समोर आले की शूटिंगवाला त्याचा तो प्रकाशझोत आमच्या अंगावर टाकायचा. त्यामुळे लोकांना 'हे सगळं रेकॉर्ड होतंय..' आणि इतकंच नव्हे तर 'हॉलमधला प्रत्येक माणूस आत्ता माझ्याकडेच पाहतोय!' असं वाटायला लागायचं! त्यांच्या अंगातली सहजता क्षणार्धात गायब व्हायची आणि मग उरायची ती फक्त गम्मत! काही नुसत्याच ओळखीच्या लोकांनी मला अगदी जीवश्च-कंठश्च मित्र असल्यासारखी कडकडून मिठी मारली! काही लोकं 'काय बोलायचं' हे ठरवून आल्यासारखी वाटली! पण गंमत म्हणजे त्यांना तिथे आल्यावर लक्षात यायचं, की भेटायला वेळ खूप कमी आहे. त्यात मागचा माणूस त्यांना हळूच पुढे ढकलत असायचा! मग ठरवलेलं संक्षिप्त स्वरुपात करून ते बोलताना त्यांचा जो काही गोंधळ उडत होता, विचारू नका! काही लोकं मस्त हस्तांदोलन करायला हसत पुढे यायची आणि मग त्यांच्या लक्षात यायचं की आधीच्या ग्रुपचा फोटो राहिलाय. मग त्यांना ओशाळत मागे जावं लागायचं. माझ्यावर त्यावेळी होणाऱ्या आनंदाच्या वर्षावातही मला ते बिचारे वाटायचे. मग जेव्हा त्यांची भेटायची वेळ आली, तेव्हा मी त्यांना एकदम कडक हस्तांदोलन तरी केलं नाहीतर नमस्कार करताना एक-दोन क्षण जास्त वेळ वाकून नमस्कार चालू तरी ठेवला! मी पूजेच्या वेळी जितक्या वेळा आचमन केलं असेल, तितक्याच वेळा आम्ही लोकांना वाकून नमस्कार केला असेल! नंतर एक दिवस मला 'मी आचमन करत बसलोय आणि नंतर आम्ही दोघं लोकांना वाकून नमस्कार करतोय.' असं स्वप्नही पडलं होतं!

लग्नात 'ओटी भरणं' हा एक प्रकार असतो. त्या खणाचा, नारळाचा आणि मुठभर तांदळाचा खरंच काही उपयोग असेल, तर तो म्हणजे त्याने दुसऱ्या बाईची ओटी भरता येते! लग्नानंतर आम्ही एका देवीला गेलो होतो. देवीची ओटी भरायला! तिथे बाहेर पूजेचं साहित्य मिळायचं एक दुकान होतं. तिथून ओटीचं साहित्य असलेलं तबक आणि देवीसाठी साडी घ्यायची आणि आत देवळात जाऊन, देवीचं दर्शन घेऊन तिला द्यायची, असा तो प्रकार. तिथे मंदिराचे गुरुजी बसले होते. आत चार पाच मोठी पोती होती. आपलं दर्शन घेऊन होईपर्यंत ते गुरुजी नारळ नारळाच्या पोत्यात टाकायचे, तांदूळ तांदळाच्या, खण खणांच्या आणि साडी साड्यांच्या! आणि छोट्याश्या साखर फुटाण्यांची पुडी आपल्याला देवीचा प्रसाद म्हणून द्यायचे! म्हणजे दिवस संपला, की ते पोत्यातलं सगळं साहित्य पुन्हा दुकानात जायचं, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ते भक्तांना विकलं जायचं. ह्याच्या इतका नफा मिळवून देणारा धंदा जगात दुसरा कुठला नसेल!

'लग्न' या उत्सवाचा सगळेजण आपापल्या परीने आनंद साजरे करत असतात. वर आणि वधू हे जरी या उत्सवाचं मुख्य आकर्षण असलं, तरी लग्नात यापेक्षा अजून बरंच काही असतं! लग्नाच्या दिवशी सभागृहात वयाने थोड्या लहान, म्हणजे लग्न न झालेल्या मुली एकमेकींच्या साड्यांकडे बघत होत्या. एकमेकींचं कौतुक करत होत्या. साड्या नेसायचे प्रसंग त्यांच्यासाठी विरळंच! लग्न न झालेली मुलं त्यांचे भावी जोडीदार शोधण्यात मग्न होते! नुकत्याच लग्न झालेल्या बायका इतर बायकांच्या अंगावरचे दागिने बघत होत्या. आणि जवळपास त्यांचे नवरे असले तर, "मला पुढच्या वेळी कसा हार हवाय माहितीय का..?" असं म्हणून कुठल्यातरी बाईचा हार दाखवत होत्या! आमच्या आत्या, काकू, मावश्या, माम्या सासरकडच्यांची उणी-दुणी डोळ्यात तेल घालून शोधात होत्या! तर आम्हा दोघांच्या आई-वडिलांना अगदी भरून पावल्यासारखं वाटत होतं! पण पुरुष मंडळींचे उत्सव इतर दिवसांपेक्षा काही वेगळे नसतात. बरीचशी पुरुष मंडळी त्याही दिवशी एकमेकांशी क्रिकेट नाहीतर राजकारण ह्या विषयांवर बोलत असावीत, हे मी खात्रीने सांगू शकतो!

लग्नानंतर मुलगी जेव्हा माप ओलांडून पहिल्यांदा घरी येते तेव्हा आमच्याकडे साखर वाटण्याचा कार्यक्रम असतो. मोठ्यांचे शुभाशीर्वाद मिळण्यासाठी नवीन जोडपं सगळ्यांना साखर वाटतं. 'तोंड गोड करा आणि आम्हाला भावी आयुष्यासाठी भरभरून आशीर्वाद द्या' असा त्याच्या मागचा विचार असतो. त्यावेळी मग प्रत्येक जण अडवतो. "आधी 'नाव घ्या' मगच साखर घेईन आणि आशीर्वाद देईन." असं त्याचं म्हणणं असतं. प्रत्येकासाठी वेगळं नाव घेतल्याने प्रत्येकालाच विशेष मान मिळाल्यासारखा होतो आणि मग तो खुश होतो. आम्ही साखर वाटत असताना नातेवाईकांच्या डोळ्यातलं खरंखुरं कौतुक मला दिसलं. सगळ्यांनी आम्हाला अगदी मनापासून आशीर्वाद दिले. खरं तर त्या दिवशी त्या खोलीत असलेल्या प्रत्येकानेच आधीचे काही दिवस जे कष्ट घेतले होते, त्यानेच आमचा लग्न सोहळा सुरळीत पार पडला होता. आम्हाला दोघांना कधीच दडपण आलं नाही, कार्याची जबाबदारी जाणवली नाही आणि त्यामुळेच आम्ही ह्या लग्नकार्याचा मनापासून आनंद घेऊ शकलो. त्या खोलीतल्या प्रत्येक माणसात एक नारायण आहे ह्याचा मला तेव्हा साक्षात्कार झाला. एवढ्या नारायणांचं प्रेम एकाचवेळी लाभल्याने आम्ही दोघं भरून पावलो. अचानक मला त्या सगळ्यांचा मोठा ऋणी झाल्यासारखं वाटलं.. आणि या संपूर्ण सोहळ्यात दडपणमुक्त वावरणाऱ्या मला त्यावेळी पहिल्यांदा कसलंतरी दडपण जाणवलं...