सोडून देऊ रुसवे फुगवे
मनामध्ये धरलेले
मोकळे करू श्वास आपले
काहीसे गुदमरलेले
पुन्हा एकदा आपली वाद्ये एका पट्टीत लावून घेऊ,
चल आपलं राहिलेलं गाणं आता गाऊन घेऊ..
करूयात सैर रात्रीची
नक्षत्रांच्या राशींतून
पिऊयात चहा जगासमोर
दोघं एका बशीतून
क्षितिजाआड जाण्यापूर्वी लोभस सूर्य पाहून घेऊ,
चल आपलं राहिलेलं गाणं आता गाऊन घेऊ..
दृष्ट काढू पहाटे
कळ्यांची फुले होताना
निरोप देऊ पक्षांना
घरट्यांमधून जाताना
ऊन कोवळं असेपर्यंतच आपण त्यात न्हाऊन घेऊ,
चल आपलं राहिलेलं गाणं आता गाऊन घेऊ..
घडे लागलेत ढगांचे
पाण्याने भरायला
सज्ज करू हात आपले
पुन्हा जमीन कसायला
उसवलेली स्वप्नं आपली पुन्हा एकदा शिवून घेऊ,
चल आपलं राहिलेलं गाणं आता गाऊन घेऊ..
समुद्रासारखं आयुष्य आपलं
अथांगपणे पसरलेलं
कित्येक त्याच्या फेसाळ लाटा
किनाऱ्यावरच विसरलेलं
एवढा सगळा हा पसारा आपल्या मिठीत मावून घेऊ
चल आपलं राहिलेलं गाणं आता गाऊन घेऊ..
No comments:
Post a Comment