Friday, November 30, 2012

थेंबांचं जगणं

थेंबच ठरवत असतात पावसाची दिशा
मेघातून झेपावतात भरून ओली नशा

कुणी जाऊन फुलाला बिलगतं
कुणी त्याच्या मधात जाऊन मिसळतं
तिथे न्याहारी करणारं फुलपाखरू
मग क्षणार्धात वर उसळतं

कुणी पानांना ओलंचिंब भिजवतं
कुणाला फक्त चिखल करायचा असतो
सृष्टीचा असा पोरकटपणा
मग अगदी थेंबा-थेंबातून दिसतो

कुणी पानावरचा दवबिंदू होतं
कुणी रस्त्यावर सडा घालतं
आयुष्यात काहीही केलं
तरी त्या वेड्यांना चालतं

कुणी शांत तळ्याला घाबरवतं
कुणाला नदीत पडून वाहायचं असतं
"आभाळातून दिसते तशीच आहे का पृथ्वी?"
हे स्वत: सैर करून पहायचं असतं

कुणी पिलांच्या चोचीत जातं
कुणाला पिकांच्या मुळात राहायचं असतं
पृथ्वीचे पांग फेडाया
त्यांना परोपकारी व्हायचं असतं

पुन्हा मेघ भरू लागतात,
नवी सर येणार असते
उत्साहाच्या नव्या लक्षकणांना
ती पुन्हा जन्म देणार असते..

Wednesday, November 21, 2012

व्यक्त न करता येण्यासारखं..


व्यक्त न करता येण्यासारखं
प्रेम एकदा करून बघ
त्रास होईल मनाला, इतका
कुणासाठी झुरून बघ

त्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीचं

कौतुक मग मनाला करू देत
मनाची समजूत घालणं
तुझ्यासाठी अग्निदिव्य ठरू देत

नको मिळू देत प्रतिसाद तुला
मनाला तुझ्या दुखू देत
विचारात पडशील स्वत:बद्दल,
तुझ्या आत्मविश्वासाला झुकू देत

खूप वाटेल तुला व्यक्त करावसं,
पण शब्दांना जन्म देऊ नकोस
रोज सलत असेल काळीज तुझं
पण त्या दुखण्याला तू भिऊ नकोस

शक्य आहे त्या व्यक्तीला तुझ्या
प्रेमाबद्दल कधीच कळणार नाही
बहरलेल्या बगीच्यातलं तिला
एकही फुल मिळणार नाही

पण सरते शेवटी तुलाच वेड्या
एक आगळीक समाधान मिळेल
कारण तेव्हाच तुला
"निर्व्याज" प्रेमाचा खरा अर्थ कळेल..