शाळेत असताना पाठीवरच्या दप्तराच्या ओझ्याने कधी कधी खांदे दुखायचे. ९ विषयांच्या वह्या, त्यांची पुस्तकं, काही विषयांच्या गृहपाठाच्या वह्या असं सगळं दप्तरात असायचं. त्यामुळे पाठीवरचं ओझं अगदी जाणवायचं. आयुष्याचही आजकाल असंच झालंय..
काही जबाबदाऱ्या, काही भूतकाळातली दु:खं, रोजची जगण्याची लढाई आणि बरीचशी स्वप्नं याचं खरंच कधीकधी ओझं जाणवतं. जीव पार थकून जातो. या सगळ्यावर मलम लावण्यासाठीच शनिवार-रविवार असतात. कधी नातेवाईकांची भेट, तर कधी मित्रांशी गप्पा होतात. कधी एखादा चित्रपट, नाटक तर कधी छोटीशी सहल होते. कधी घराची आवराआवर होते, तर कधी कुठल्या celebration ची party होते. पण हा सगळा तात्पुरता विरंगुळा असतो. कारण हे सगळं असूनसुद्धा कुठेतरी रग लागून राहिल्याची जाणीव ही असतेच. झालेली दमछाक पूर्णपणे काही गेलेली नसते. आणि वाटत राहतं...कुठेतरी लांब निघून जावं..निवांत ठिकाणी..उगंच पडलो या सगळ्यात..सालं सारखं सलत राहतंय काहीतरी..
खूप प्रयत्न करूनही कधी कधी काही मिळत नाही. मग नशिबाला दोष द्यावासा वाटतो. पण तर्कशास्त्र तसं करू देत नाही. सुखंपण कधी कधी आपणहून दारी येतात. काही सुखं तर अशी असतात की 'आपण खरंच योग्य आहोत का यांच्यासाठी..?!' असं वाटतं! या सुखांच्याही मागची उकल होत नाही. तर्कशास्त्राकडे पुन्हा एकदा उत्तर नसतं. पण या मोठमोठ्या सुखांच्यातही ताकद नसते दमछाक थांबवण्याची, जीव शांत करण्याची. त्यामुळे ही सुखसुद्धा जेव्हा मनासारखा आनंद देऊ शकत नाहीत ना, तेव्हा कुठेतरी हरल्याची सगळ्यात जास्त जाणीव होत असते..
एखाद्या सुट्टीच्या दिवशी दुपारी बरेच दिवस वाचायचं राहून गेलेलं पुस्तक आपण वाचायला घेतो. बाहेर जोराचा वारा वाहू लागल्याने आपण खिडकी बंद करायला उठतो आणि भरलेल्या आभाळाकडे आपलं लक्ष जातं. क्षणार्धात ते भरलेलं आभाळ कोसळायला सुरुवात होते. दरवळलेला मातीचा सुगंध आल्याच्या चहाची आठवण करून देतो. वाफाळलेला तो चहा खिडकीत बसून पिताना पावसाचे २-३ थेंब त्या कपात पडतात आणि चहा अजूनच चवदार लागायला लागतो..!
बाहेर धो-धो पडणारा तो पाऊस बघताना आपलं मनही हळू हळू हलकं होऊ लागतं. कधी सहन केलेले अपमान, पोटात घातलेले अपराध, सोसलेले काही घाव आणि पचवलेली बरीचशी दु:खं बाहेर पडून पावसात विलीन होऊ लागतात. पाऊस थांबतो आणि सारं कसं अगदी शांत होतं..
5 comments:
arey wa!! masta lihilays... avadla mala.. :))
chhan ahe .. mala pan avadla..
sahi !!chhan lihtos :)
hmm !
Describes nicely .. how some emotional burdens are insoluble in human (interactive) and logical 'solutions'; they need a natural or divine path to flow out.
One good thing about your blogs, is your 'second-level' of thinking (meaning thinking on 'how one thinks'). But beware ... it can have an effect on your emotional balance !
JahaPanah tussi gr8 ho ..
Post a Comment