Saturday, May 22, 2010

फुगेवाला

प्रत्येक माणूस एक फुगा घेऊन जन्माला येतो. इगोचा फुगा! बालवयात तो न फुगलेल्या अवस्थेत असतो. पण जसं जसं कळायला लागतं तशी तशी त्या फुग्यात हवा भरायला सुरुवात होते...

३री-४थीत असताना ‘अरे, तो ‘ढ’ मुलगा आहे. त्याला नको आपल्या ग्रुपमधे घ्यायला.’ असं कधी आपण मित्रांना म्हणतो. आता हे चूक की बरोबर हा भाग बाजूला ठेवूयात. पण तो मुलगा ‘ढ’ वाटतो कारण आपण स्वतःला हुशार वाटत असतो. आणि आपण हुशार का, तर आपल्याला परीक्षेत जास्त मार्क असतात! म्हणजेच ‘sense of achievement’ आपली ‘image’ तयार करत असते. आपल्या इगोच्या फुग्यात हवा भरत असते. प्रत्येक achievement बरोबर, प्रत्येक झालेल्या कौतुकाबरोबर हवा भरली जाते.

आता achievement किंवा केलेलं कौतुक हे अभ्यासातल्या हुशारीपुरतंच मर्यादित नसतं. कोणी खेळात पुढे असतं, कोणी कुठल्या कलेत पुढे असतं, तर कोणी सगळ्यांकडून ‘गुणी मुलगा’ अशी पदवी मिळालेलं असतं! आणि या प्रत्येक माध्यमातून फुगा फुगवला जात असतो. त्यामुळे होतं असं, की जेव्हा ९वी-१०वी येते, तेव्हा प्रामुख्याने मुलांचे ३ गट पडलेले असतात. पहिला गट असतो हुशार मुलांचा! या गटात ५-६ मुलं असतात. त्यांच्यात पहिल्या तीनात नंबर येण्यासाठी चुरस असते. आपलं करियर उत्कृष्टच होणार असा विश्वास त्यांचा फुगा त्यांना देत असतो आणि वर्गातल्या बाकीच्या मुलांची नाही म्हटलं तरी त्यांना थोडीफार कीव येत असते. दुसरा गट असतो ‘हिरो’ मुलांचा! जे खेळात नाहीतर ‘Extracurricular activities’ मधे पुढे असतात आणि अभ्यासात बऱ्यापैकी असतात. त्यांचा फुगा त्यांना सांगतो की ही पहिली पाच मुलं म्हणजे फक्त पुस्तकी किडे आहेत! पुस्तकं चावून आयुष्यात काही होत नसतं. सर्वांगाने विकास झाला पाहिजे. तुम्हीच खरे ‘हिरो’ आहात! आणि तिसरा गट असतो थोडा आत्मविश्वास कमी असलेल्या मुलांचा. त्यांच्या achievements तशा कमी असतात. कौतुकही कदाचित फारसं झालेलं नसतं. त्यांच्या फुग्यात खूप कमी हवा असते. त्यामुळे त्यांचे फुगे काही बोलण्याच्या अवस्थेत नसतात!

पुढे कॉलेजमधे गेल्यावर कला-गुणांना व्यक्त करायला मोठा मंच मिळतो. तिथे फुगे फुगतात. काही मुली सौंदर्याच्या जोरावर किंवा आपल्याला मुलं किती भाव देतात या गोष्टीमुळे हवा भरत असतात. कॉलेजच्या cultural ग्रुप मधल्या मुलांचे फुगे तर एवढे मोठे असतात की एखादा जुनियर, त्याला अनुभव नसल्यामुळे काही चांगलं करूच शकत नाही यावर त्यांचा गाढ विश्वास असतो! ऑफिसमधे बॉसच्या फुग्यात हवा असते ती त्याला मिळालेल्या खुर्चीमुळे. आणि ‘आपला बॉस बिनडोक आहे. फक्त अनुभवाच्या जोरावर आज तो तिथे आहे.’ असा विचार जो जुनियर लोकांच्या मनात येतो, तो त्यांच्या फुग्यातल्या हवेमुळेच, नाही का!

हा इगोचा फुगा कधीकधी पंक्चर सुद्धा होतो! आपल्याला ज्या गोष्टीचा अभिमान आहे, त्याच गोष्टीत कोणी आपल्यापेक्षा श्रेष्ठ बघितल्यावर आपल्या फुग्याला भोक पडतं आणि हवा निघून जाते. पण निसर्ग तात्काळ आपल्याला पंक्चर काढून देतो आणि आपण पुन्हा त्यात हवा भरायला सज्ज होतो!

हाच फुगा कारणीभूत ठरतो नवरा-बायकोच्या ‘Classic’ भांडणांना! २ पिढ्यांपूर्वी बायका फक्त चूल आणि मूल करायच्या. तेव्हा फक्त पुरुषांच्या फुग्यात हवा असायची! नवऱ्याने उठ म्हटलं उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं! पण आज मुली शिकल्या. मुलांच्या खांद्याला खांदा लावून achieve करायला लागल्या. आता दोघांचे फुगे फुगलेले असतात. त्यामुळे ‘एवढं असेल तर तू कर ना स्वयंपाक. घर सांभाळ. मी जाते फक्त कमवायला.’ किंवा ‘नेहेमी तुझाच मुद्दा कसा काय रे बरोबर असतो? भांडण तुझ्याच वाक्याने संपलं पाहिजे का?’ ही अशी वाक्यं हमखास बोलली जातात!

‘बघितलंस, तिने स्वत:हून ओळखही नाही दाखवली. मीपण नाही दाखवणार!’, ‘मी का सॉरी म्हणू? तो पण चुकलाय. माझं घोडं काही त्याच्यावाचून अडत नाही!’... ही सगळी त्या फुग्यातल्या हवेचीच करामत..!

पण जरा विचार केला तर लक्षात येईल की हा हवा भरलेला फुगा जगायला आवश्यक असतो. जर त्याची काही गरजच नसती, तर निसर्गाने माणसाला त्याच्या जन्माबरोबर तो दिलाच नसता. माकडाचा माणूस होताना जसं गरज नसल्यामुळे निसर्गाने शेपटी काढून घेतली, तसंच त्याला फुगाही काढून घेता आला असता. आणि त्या फुग्यात हवाही असणं महत्वाचं आहे. नाहीतर अवस्था ९वी-१०वीतल्या त्या तिसऱ्या गटातल्या मुलांसारखी होईल. हवा भरलेला फुगा आपल्याला आत्मविश्वास देतो. फक्त त्या भरल्या जाणाऱ्या हवेवर आपलं नियंत्रण हवं. कुठली आणि किती हवा भरावी हे आपणच ठरवायचं. पाय जमिनीवर राहिले पाहिजेत. फुग्यातल्या हवेने मनाला उभारी यावी, पण त्याच हवेने आयुष्य ‘पोकळ’ होणार नाही ना ह्याची काळजी आपण घ्यायची..